"आपल्या पाल्यांना मायमराठी पासून तोडू नका"
उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर पहिल्याच दिवशी शहरातील शाळांचे परिसर गर्दीने फुलून गेलेले.उद्याच्या समर्थ भारतासाठीचे आधारस्तंभ घडविणार्या ज्ञानमंदीरात,संस्कार केंद्रात ज्यांचा आधीच प्रवेश घेऊन झाला आहे असे पाल्य व त्यांना घेऊन आलेले त्यांचे पालक यांच्या चेहर्यावर आनंदाच्या संमिश्र छटा स्पष्ट जाणवत होत्या,तर ज्या पालकांना आपल्या पाल्यांसाठी प्रथमच शाळा प्रवेश घ्यायचा आहे असे पालक अत्यंत भांबावलेल्या अवस्थेत दिसले.मराठी व इंग्रजी माध्यमांच्या बहुतेक शाळांमध्ये कमी अधिक प्रमाणात हेच दृष्य पाहायला मिळाले.
माध्यम कोणते असावे ? शाळा कुठली निवडावी ? खर्च किती येईल ? एक ना अनेक प्रश्न. शाळा कोणतीही निवडा, परंतू माध्यम मातृभाषा मराठीच असले पाहिजे.माझ्या तिन्ही मुली मराठी माध्यमातूनच शिकल्या व आज त्या वैध्यकिय आणि संगणक अभियांत्रीकी क्षेत्रात उच्च पदांवर कार्यरत आहेत. म्हणून मला हे सांगण्याचा नैतिक अधिकार आहे की "आपल्या पाल्यांना मायमराठी पासून तोडू नका".मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे पाल्यांचा मानसिक,बौद्धिक,सामाजिक आणि भावनिक विकास होतो,त्यातूनच निरोगी समाज निर्माण होतो. शिवाय असे आनंददायी शिक्षण घेतलेले पाल्य पुढे जगातील कुठल्याही परकिय भाषेवर सहज प्रभूत्व मिळऊ शकतात.
मराठी हा आमचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे. वारसा अमूल्य असतो. त्याची उपयुक्तता सिद्ध करण्याची आवश्यकता नसते.भाषा संस्कृतीचे माध्यम असते. एखाध्या भाषेचा र्हास म्हणजे संस्कृतीच्या महत्वपूर्ण अंगाचा लोप. मराठी संस्कृतीवर मराठीच्या र्हासाचा विपरित परिणाम होईल. तो परिणाम टाळण्यासाठी मराठीविषयी आस्था असणे ही एक सामाजिक गरज आहे. रोज प्रचंड वेगाने बदलणार्या परिस्थितीशी जुळवून घेताना आपल्या पाल्याने त्याची आर्थिक प्रगती,त्याच्या भावना आणि विचारांना इंग्रजीतूनच वाट करुन ध्यावी हा आग्रह घातक नाही का ? इंग्रजीच्या अट्टहासापायी भावी पिढ्यांना ज्ञानभाषा नाही म्हणून मातृभाषा नसेल अशी लाजिरवाणी, केविलवाणी परिस्थिती उदभवेल.
मातृभाषा असणे ही गोष्ट बालकाला माता असण्याइतकेच महत्वाचे असते. कारण, अति आनंदाचे,अति दु:खाचे प्रत्येक हुंकार मातृभाषेतुनच व्यक्त होतात. मग इंग्रजीतुन शिकले की आपला उद्धार आपोआपच होईल असे दिवास्वप्न आपण आपल्या पाल्यांना का दाखवत आहोत? आधीच आम्ही आमच्या संस्कृत आजीला गमाऊन बसलो आहोत,उद्या मायमराठीलाही आम्ही पोरके होऊ. जगातील सर्व प्रगत राष्ट्रांत मातृभाषा हेच शिक्षणाचे माध्यम असताना आम्हीच गुलामगिरीचे प्रतिक असणार्या परकीय भाषा इंग्रजीचाच का आग्रह धरत आहोत ? सातासमुद्रापार येऊन इंग्रजांनी त्यांच्या स्वार्थासाठी आपल्या देशात त्यांची इंग्रजी भाषा, त्यासाठी त्यांचे इंग्रजी संस्कार(की कुसंस्कार ?) सर्व अडचणींवर मात करुन आमच्यावर लादले,रुजवले.
या मानसिक गुलामगिरीतुन आम्ही बाहेर कधी येणार ? आज आपल्याच देशात आपल्याच मातृभाषेतुन शिक्षण घेण्यास,सर्व दैनंदिन व्यवहार करण्यास अडचणींचा बाऊ का केला जातो आहे ? हे पराभूत मनोवृत्तीच्या स्वाभीमानशून्य समाजाचे लक्षण आहे. तसे नसते तर इंग्रजीने, चीनी वस्तूंनी व विदेशी विकृतींनी थेट आमच्या देव्हार्यापर्यंत धडक मारलीच नसती.परकीय भाषेच्या कुबडया वापरुन व विदेशी विकृतींचे अनुकरण करुन कुठलाही देश प्रगती करु शकत नाही.स्वाभीमानाने ताठ उभा राहु शकत नाही. स्वदेशी सभ्येतेची कास धरुन या मानसिक गुलामगिरीतुन देश ज्या दिवशी बाहेर येईल तो आमचा खरा मुक्तीदिन असेल.
सोमनाथ देविदास देशमाने,
अहमदनगर,
९७६३६२१८५६
अंतिम सुधारित : 6/5/2020