अपभ्रंश भाषेतील वाङ्मयनिर्मिती इसवी सनाच्या सहाव्या शतकानंतर झाल्याचे दिसते. भास व कालिदास ह्यांच्या संस्कृत नाटकांतून अपभ्रंश भाषेचा त्रोटक उपयोग केलेला आढळतो; पण तो विवाद्य आहे. उपलब्ध अपभ्रंश साहित्य जैनांच्या ग्रंथ -भांडारातील असून, जैनेतरांची बरीचशी अपभ्रंशरचना कालौघात लुप्त झाली असावी. उपलब्ध अपभ्रंश ग्रंथांपैकी अनेक ग्रंथ आजही अप्रकाशित आहेत. बहुतेक अपभ्रंश वाङ्मय पद्यात रचलेले आहे. त्यात कथात्मक प्रबंध, खंडकाव्य व मुक्तक असे तीन रचनाप्रकार आहेत. त्यांतील कथात्मक प्रबंधांत पुराण आणि धार्मिक व लौकिक चरिते यांचा समावेश होतो.
संस्कृत नाटकांतील काही वाक्ये व महाराष्ट्री प्राकृतातील कुवलयमाला (७७९) या चंपूकाव्यातील संवादांचा काही भाग एवढीच अपभ्रंश गद्यरचना उपलब्ध आहे. विद्यापति -कृत कीर्त्तिलतेतील गद्य अपभ्रंशकलोत्तर आहे. भासाच्या पंचरात्र या नाटकात, शादमंडलु शुय्यो (शतमंडल: सूर्य:) असे मागधी अपभ्रंशातील शब्द गोपळांच्या तोंडी आहेत. मृच्छ -कटिकाच्या दुसऱ्या अंकातील माथुराची भाषा टक्की किंवा ढक्की आहे, असे पृथ्वीधर या टीकाकाराने म्हटले असले, तरी मार्केंडेयाने व पुढे पिशेल याने तिला मागधी अपभ्रंश मानले आहे. कुवलयमालेत व्यवहारातील अपभ्रंश भाषेचे स्वरूप आढळते.
कथात्मक प्रबंध : अपभ्रंश कथाकाव्याचे रचनातंत्र सामान्यत: पुढीलप्रमाणे असते : (१) मंगलाचरण, (२) आत्मपरिचय, (३) विनयप्रकटन, (४) सज्जन—दुर्जन वर्णन, (५) कथानिरूपण व (६) प्रशस्तिपर उपसंहार. तत्कालीन अभिरुचीप्रमाणे प्रबंधकारांनी अक्षरवृत्तांऐवजी मात्रावृत्तांचा उपयोग केलेला असून पद्धडिया, द्विपदी व चतुष्पदी अशी गेय छंदरचना प्रबंधांत आढळते. त्यांत लोकगीतांच्या चालीची कडवके आहेत. अभंग, ओवी, चौपाई व धवळे या छंदप्रकारांची पूर्वरूपेही प्रबंधरचनेत दिसतात.
धर्मप्रचार हे कथात्मक प्रबंधरचनेचे उद्दिष्ट होय. तिचे पुराण व चरित असे दोन प्रमुख प्रकार आहेत. चरिताचे पुन्हा धार्मिक आणि लौकिक असे दोन प्रमुख प्रकार आहेत. चरिताचे पुन्हा धार्मिक आणि लौकिक असे दोन प्रकार करता येतील. पुराण- काव्यांचे नायक शलाकापुरुष म्हणजे जैन पुराणांतील महापुरुष असून त्यांत मुख्य कथेबरोबरच अवांतर अलौकिक घटनांनी भरलेली आख्याने येतात. त्याचबरोबर ठिकठिकाणी धार्मिक प्रवचने व स्तुतिस्तवने यांची विपुलता आढळते. चरितकाव्यात धार्मिकता आहेच; परंतु उप -कथानकादी आनुषंगिक विषयांचे संक्षेप केल्याने कथावस्तूची गुंफण अधिक बांधीव असते. लौकिक चरितप्रकारात धार्मिक चरितप्रकारातील अद्भुतता व अतिशयोक्ती हे विशेष असले, तरी त्यांचे नायक क्षत्रियकुमार किंवा वैश्यपुत्र असतात. शृंगारवीरादी रसांनी नटलेली ही साहसी चरिते म्हणजे छंदोबद्ध कादंबऱ्याच होत. रासो व चरित यांतील फरक केवळ प्रेरणेचा होय : रासोची प्रेरणा राजभक्तीची, तर चरिताची प्रेरणा धर्मप्रसाराची.
धार्मिक चरितांचे नायक मुख्यत: तीर्थंकर, राम (पद्म) व कृष्ण यांपैकीच असतात. जैनमतानुसार आठवे बलदेव-वासुदेव म्हणजे राम-लक्ष्मण असून, नववे बलदेव-वासुदेव म्हणजे बलराम-कृष्ण होत. बलदेव व वासुदेव हे बंधू असले, तरी वासुदेव राज्योपभोग घेऊन नरकास जातो व बलदेव वासुदेवाच्या मृत्युमुळे विरक्त होऊन मुनिदीक्षा घेतो. नंतर तो मोक्षपद मिळवतो. जैनांच्या रामकथेत दोन प्रवाह आहेत : पहिला प्रवाह बहुतांशी वाल्मीकीच्या रामायणकथेसारखाच आहे. दुसऱ्या प्रवाहातील कथा अद्भुतरामायणाप्रमाणे असून, तीत सीतेला रावणकन्या ठरवून जनकाला तिचा पालनकर्ता मानले आहे. तथापि दोन्ही रामकथांत लक्ष्मण अर्धचक्रवर्ती म्हणून राज्य करून अंती नरकास जातो. गुणभद्रा-च्या उत्तरपुराणानुसार पुष्पदंताने (१० वे शतक) महापुराणात प्रस्तुत कथा स्वीकारली आहे. जैनांच्या कृष्णकथेत कृष्ण व बलराम यांची मरणोत्तर गती लक्ष्मण-
-रामांप्रमाणेच असली, तरी ती कथा व्यासांच्या कृष्णकथेशी मिळतीजुळती आहे.
अपभ्रंश भाषेतील पहिला महाकवी चतुर्मुख हा होय;पण त्याचे ग्रंथ आज उपलब्ध नाहीत. आठव्या शतकातील स्वयंभू या महाकवीने चतुर्मुखाप्रमाणेच रामकथेवरील ⇨पउमरिउ व कृष्णकथेवरील रिठ्ठेणेमिचरिउ यांची रचना केली. पउमचरिउवर रविषेणकृत संस्कृत पद्मचरिताची छाप आहे. स्वयंभूने स्वयंभुछंद नावाचा छंद:शास्त्रावरील एक ग्रंथही रचलेला आहे. त्यात अनेक अज्ञात प्राकृत—अपभ्रंश कवींची रचना उद्धृत केलेली आढळते. पुष्पदंताने तिसट्ठि-
-महापुरिस-गुणालंकार (त्रिसष्टि-महापुरुष-गुणालंकार) किंवा महापुराण याची रचना केली. त्यात तीर्थांकर, वासुदेव व बलदेव इ. त्रेसष्ट शलाकापुरुषांची मूळची साचेबंद चरित्रे पुष्पदंताने आपल्या काव्यमय शैलीने नटवून त्यांत नावीन्य आणि वैविध्य आणले आहे. अकराव्या शतकातील धवलाने रचलेले हरिवंशपुराण अप्रकाशित आहे.
लैकिक चरितांच्या विभागात पुष्पदंताच्या णायकुमारचरिउ (नामकुमारचरित) व जसहरचरिउ (यशोधरचरित) या दहाव्या शतकातील रचनांचा अंतर्भाव होतो. त्यातील काव्यात्मकता व भाषासौंदर्य हे गुण उल्लेखनीय आहेत. वैश्यकुमार नायक असलेली व श्रुतपंचमीचे माहात्म्य वर्णन करणारी धनपालाची (दहावे शतक) ⇨भावसयत्तकहा (भविष्यदत्तकथा) अत्यंत काव्यमय रचना आहे. अकराव्या शतकात कनकामराने करकंडचरिउ (करकंडचरित) रचले. बौद्ध व जैन धर्मीयांचा राजर्षी (प्रत्येक बुद्ध) करकंडू यावर ते रचलेले आहे. महाराष्ट्री-अपभ्रंशात ते लिहलेले असून त्यास उस्मानाबाद -जवळील तेरापूरच्या लेण्यांची पार्श्वभूमी आहे. या काव्यातील रचनाकौशल्य करकंडू राजाची अद्भुतरम्य कथा व नऊ उपकथा यांच्या चातुर्यपूर्ण गुंफणीवरून स्पष्ट दिसते. बाराव्या शतकात धाहिल याने पउमसिरिचरिउ (पद्मश्री-चरित) लिहिले. धाहिल हा संस्कृत महाकवी माघ ह्याचा वंशज होता. प्रस्तुत काव्यही कर्मसिद्धांत व धर्ममाहात्म्य पटविणारी एक अद्भूतरम्य प्रेमकथा आहे. हरिभद्राने नैमिनाथचरित (११५८) रचले. त्यातील सनत्कुमारचरित हा एक भाग हेर्मान याकोबी ह्याने १९२१ मध्ये प्रसिद्ध केला. श्रेष्ठ काव्यगुणांच्या दृष्टीने हे काव्य उल्लेखनीय आहे.
इ. स. बाराशेनंतर अर्वाचीन भारतीय आर्यभाषांचा उद्य झाल्यानंतरही अपभ्रंश भाषेत चरितकाव्ये लिहिण्यात आली. अपभ्रंशकाळाच्या शेवटी लिहिलेले चरितग्रंथ, विद्यापतिकृत कीर्त्तिलतेसारखे ग्रंथ व रासो आणि चरिते यांत भाषा, रचना, छंद इ. बाबतींत इतके साम्य आढळते, की अर्वाचीन भारतीय आर्यभाषांच्या नव्या कालखंडात आपण शिरत असल्याची जाणीवही होत नाही.
खंडकाव्य : अपभ्रंश भाषेतील एकच खंडकाव्य प्रकाशित झाले आहे. त्याचे नाव संदेशरासक असून अद्दहमाण (अब्दुल रहमान, ११०० ते १४०० च्या दरम्यान) याने ते रचलेले आहे. दूर देशी गेलेल्या आपल्या पतीस एका विरहिणीने दिलेला काव्यमय संदेश ह्यात आहे. जायसीकृत पद्मावतावर व इतर उत्तरकालीन काव्यांवरही ह्याचा प्रभाव आढळतो.
मुक्तक :संस्कृत साहित्यिक जिला मुक्तकरचना म्हणतात, ती अपभ्रंश भाषेत दोहे व गीते यांच्या स्वरूपात आढळते. विक्रमोर्वशीयाच्या चवथ्या अंकात ‘चर्चरीपद्ये’ आहेत. ती जर कालिदासाचीच असतील, तर ‘अपभ्रंश काव्यत्रयी’ यांत मुक्तकरचना आढळते. अपभ्रंश काव्यत्रयीच्या उपदेशरसायनातील गीते गेय व नृत्यानुकूल आहेत, तर चर्चरी व कालस्वरूपकुलक यांतील गीते रागदारीने गाण्यासाठी आहेत.
अपभ्रंशातील दोह्यांपैकी काहींचे विषय ऐहिक स्वरूपाचे असून त्यांत श्रृंगांर—वीरादी रसांचा आविष्कार केलेला आढळतो. धार्मिक विषयांवरील व गूढ आध्यात्मिक अनुभवांचा आविष्कार करणारे दोहेही आढळतात. दोह्यांचे रचनाकार हिंदू, जैन व बौद्ध अशा भिन्नभिन्न धर्मांचे असले, तरी त्यांच्या रचनेत आशयाभिव्यक्तीचे साम्य आढळते. गाहासत्तसईतील(गाथासप्तशतीतील) अनेक अनामिक कवीप्रमाणेच लौकिक विषयांवरील दोह्यांचे रचनाकारही अज्ञात आहेत. हेमचंद्राचे (१०८८–११७२) प्राकृत व्याकरणातील ‘छंदोनुशासन ’ ह्या अध्यायात तसेच सोमप्रभकृत कुमारपालप्रतिबोध (११९५), मेरुतुंगकृत प्रबंधचिंतामणि (१४ वे शतक), राजशेखरसूरीकृत प्रबंधकोश (१४ वे शतक) तसेच प्राकृत पैंगल (१५ वे शतक) इ. ग्रंथांतून दोहे आढळतात. संस्कृत साहित्यशास्त्रकारांनीही अलंकारांची उदाहरणे म्हणून पुष्कळदा अपभ्रंशातील दोहेच उद्धृत केलेले आहेत. सज्जन, दुर्जन, दारिद्र्य इत्यादीवरील संस्कृत-प्राकृत सुभाषितांसारखे हे दोहे आहेत. हेमचंद्र व सोमप्रभ यांनी त्यांची अवतरणे दिलेली आहेत.
जैन, बौद्ध व शैव मतांच्या अध्यात्मवादी कवींचे दोहे उपलब्ध आहेत. आत्मदेवाच्या साक्षात्कारासाठी उपासना करताना येणाऱ्या गूढ अनुभूतींवर त्यांचा भर आहे. असे असूनही, त्यांच्या रचनेत सुबोधता व सुभाषितता हे गुण आढळून येतात. अध्यात्मवादी जैन कवींत जोइंदु (६०० ते १००० च्या दरम्यान) हा बहुधा पहिला असून त्याचे परमप्पपयासु (परमात्मप्रकाश) व योगसार हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्यांत परमात्म -साक्षात्काराची चर्चा असून त्यांतील काही कल्पना शैव व बौद्ध गूढवाद्यांच्या कल्पनांशी जुळणाऱ्या आहेत. मुनी रामसिंहाच्या (सु. १० वे शतक) पाहुड-दोहा (दोहा-प्राभृत) ग्रंथात २२२ दोहे असून त्यात निवृत्तिमार्गाचा उपदेश आढळतो. रामसिंहाविषयी फारशी माहिती उपलब्ध नसली, तरी शैव, योग व तंत्र मतांशी त्याचा परिचय असावा, असे दिसते. एका दोह्यात, शक्तीशिवाय शिव व शिवाविना शक्ती काहीही करू शकत नाही, असा विचार त्याने व्यक्त केला आहे. सावयधम्मदोहा (श्रावकधर्मदोहा) या संग्रहात श्रावकधर्माचे वर्णन आढळते. दिगंबर- पंथीय जैन कवी देवसेन याने प्रस्तुत ग्रंथ ९३२ मध्ये रचला, असे या ग्रंथाचे संपादक हिरालाल जैन यांचे मत आहे. डॉ. आ. ने. उपाध्ये यांच्या मते लक्ष्मीचंद्र हा त्याचा कर्ता असावा. सुप्रभकृतवैराग्यसार (१३ वे शतक) या ग्रंथाची रचना दोह्यातच केलेली आहे. प्रस्तुत ग्रंथातील प्रत्येक दोह्यात ‘सुप्पउ भणइ’ (सुप्रभ म्हणे—) अशा स्वत:च्या नाममुद्रिकेची योजना कवीने केली आहे. हिंदी भाषेत रूढ असलेल्या काही वाक्प्रचारांचा उपयोगही कवीने केलेला दिसतो.
बौद्ध व शैव पंथीय रचनाकारांच्या दोह्यांत संध्याभाषेचा म्हणजे रहस्यमय, द्वयर्थी भाषेचा उपयोग केलेला आहे. वेदाध्ययन, मंत्रतंत्र व कर्मकांड यांचे खंडन करून सहजमार्ग, सद्गुरुमाहात्म्य इत्यादींचे निरूपण त्यात केलेले आहे. आध्यात्मिक अनुभवांचे शृंगारिक वर्णनही त्यात आढळते, हे त्याचे वैशिष्ट्य. डॉ. शहिदुल्लांनी संपादित केलेल्या दोहोकोशाचे रचनाकार काण्हपा (कृष्णपाद) किंवा कानिफनाथ व सरहपा (सरहपाद) हे असून त्यांचा काळ विवाद्य असला, तरी ते सर्वसाधारणपणे ७०० ते १०००च्या दरम्यान होऊन गेले असावेत. सुनीतिकुमार चतर्जींच्या मते या दोह्यांची भाषा इ. स. १००० ते १२०० या काळातील आहे. शहिदुल्लांनी काण्हपाचे व सरहपाचे दोहे दोहाकोशात संपादित केलेले आहेत. काण्हपा, सरहपा, शबरपा, लुईपा, इ. सिद्धांनी निरनिराळ्या रागांत पद्यरचना केलेली आहे. ही पद्यरचना प्राचीन बंगाली मानली जाते. तथापि काही विद्वान त्या दोह्यांच्या भाषेस हिंदी व राज्यस्थानी भाषांचे पूर्वरूप मानतात.
संदर्भ : 1. Majumdar, R. C. Ed. The History and the culture of the Indian People, Vols. IV-V, Bombay, 1955, 1957.
२. कोछड, हरिवंश, अपभ्रंश-साहित्य, दिल्ली, १९५६.
३. जैन, देवेंद्रकुमार, अपभ्रंश भाषा और साहित्य, वारासणी, १९६५.
लेखक: ग. वा. तगारे
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 9/19/2019
अर्धमागधी साहित्य विषयक माहिती.
अर्वाचीन मराठी साहित्य विषयक माहिती.
अँग्लो-इंडियन साहित्य विषयक माहिती.
अमेरिकन साहित्य विषयक माहिती.