प्राचीन मराठी संतकविता आणि पंडिती काव्य या दोहोंच्या परंपरांत वाढलेला कथाकाव्याचा एक प्रकार. आख्यान म्हणजे कथा किंवा गोष्ट. तथापि देवदेवता, अवतारी महापुरुष आणि संत इत्यादींची गोष्टीरूप चरित्रे, पौराणिक व धार्मिक स्वरूपाच्या कथा किंवा उद्बोधक स्वरुपाच्या स्वतंत्र काल्पनिक कथा इत्यादींना उद्देशूनही आख्यान ही संज्ञा वापरली जाते. आख्यानाचे मूळ ऋग्वेदातील पुरूरवा-उर्वशी-संवादासारख्या अतिप्राचीन कथांत आढळते. नंतरचे वैदिक वाङ्मय इतिहासपुराणादी रचना आणि बौद्ध व जैन धार्मिक साहित्य यांतून आख्यानरचनेस वेगवेगळी वळणे लागल्याचे दिसून येते. तेराव्या शतकातील महानुभावांच्या साहित्यात मराठी आख्यानकाव्याचा उदय झाला. सोळाव्या शतकात संत एकनाथांच्यारुक्मिणीस्वयंवराने त्यास विशेष चालना व लोकप्रियता मिळाली आणि नंतरच्या धार्मिक आणि पंडिती रचनांतून अठराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत ते वाढत-विकसत गेले. महाराष्ट्रातील कीर्तनसंस्थेमुळे आख्यानकाव्यास विशेष चालना मिळाली. आधुनिक काळात आख्यानकाव्याची जागा खंडकाव्याने घेतली आहे.
मराठी आख्यानकाव्याचे स्वरूप बरेचसे संकीर्ण आहे : ‘रुक्मिणीस्वयंवर’ हे एकच आख्यान महानुभाव कवी नरेंद्र, संत एकनाथ आणि पंडित कवी सामराज या तिघांनीही हाताळलेले आहे आणि प्रत्येकाच्या आख्यानाचा घाट वेगळा आहे. महाभारतावर आधारित रचना मुक्तेश्वर, मोरोपंत, श्रीधर या तिघांनी केलेली आहे आणि या तिघांच्या आख्यानांची रूपरेखा विभिन्न आहे. सामराज व रघुनाथपंडित हे दोघेही पंडित कवीच; पण पहिल्याचे रुक्मिणीहरण महाकाव्याच्या आखणीचे, तर दुसऱ्याचे नलदमयंतीस्वयंवर म्हणजे सुसूत्र खंडकाव्यच. महदंबेचे धवळे आणि मोरोपंत–वामनपंडितांची स्फुट आख्याने यांची आशय-अभिव्यक्ती भिन्न भिन्न आढळते. थोडक्यात, काव्यप्रयोजन, काव्याचा अभिप्रेत वाचकवर्ग किंवा रसिकवर्ग, आख्यानाचा घाट आणि घडण, विस्तार आणि व्याप्ती, स्वभावचित्रण, वर्णनशैली व शब्दकळा यांसारख्या कितीतरी बाबतींत मराठी आख्यानकाव्यात बहुजिनसीपणा दिसून येतो. स्त्रिया (उदा., महदंबा, वेणाबाई) व पुरुष; संत, साधक आणि सत्पुरुष; संस्कृतज्ञ पंडित यांसारख्या वेगवेगळ्या प्रकृतीच्या व प्रकारच्या कवींनी मराठीत आख्यानकाव्ये लिहिलेली आहेत. कदाचित कथा किंवा आख्यान प्रकृतीनेच विविधाकारक्षम असल्याने मराठी आख्यानकाव्य वैचित्र्यपूर्ण झाले असावे.
सामान्यपणे मराठी आख्यानकाव्यात दोन ठळक प्रवाह आढळून येतात. एक म्हणजे प्राधान्याने धार्मिक स्वरूपाची आख्याने व दुसरा म्हणजे पंडिती स्वरूपाची आख्याने. सोयीसाठी केलेले हे वर्गीकरण स्वीकारून मराठी आख्यानकाव्याची काही ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील. धार्मिक स्वरूपाचा आख्यानकाव्यांत महदंबेचे धवळे, एकनाथांचे रुक्मिणीस्वयंवर, श्रीधराची आख्याने इत्यादींचा अंतर्भाव होतो. धार्मिक आख्यानकवी एकतर संत तरी असत, किंवा विशिष्ट धार्मिक संप्रदायाचे एकनिष्ठ उपासक असत. निदान, संतत्वाचे मूल्य मान्य करणारे ते परमार्थप्रवण भाविक कवी असत. धार्मिक आख्यानकाव्ये म्हणजे भाविकांची, भाविकांसाठी व भाविकतेने लिहिलेली आख्याने होत. त्यांचे मुख्य उद्दिष्ट कथारूपाने धार्मिक किंवा आध्यात्मिक शिकवण देणे, हेच दिसते.
अर्थात श्रद्धाळू अशा सर्वसामान्य लोकांसाठीच ती लिहिण्यात आली. श्रीकृष्ण, श्रीराम यांसारख्या देवदेवता, पांडवांसारखे त्यांचे निष्ठावंत भक्त, संत महात्मे इत्यादींच्या चरित्रवर्णनांनी किंवा लीलावर्णनांनी ही आख्याने नटलेली आहेत. त्यांतील कथा अर्थातच रामायण, महाभारत, भागवत, पुराणे यांतील असून त्यांचे आपल्या प्रकृतीनुसार संस्करण करण्याचे स्वातंत्र्यही आख्यानकवींनी घेतले आहे. अशा उद्बोधक आख्यानांची शब्दकळा सरळ व साधी आणि शैली ओघवती व चित्तवेधक असते. भक्तिरसाबरोबरच शृंगार, करुण, अद्भुत इ. रसांचा आविष्कारही त्यांत आढळतो. वेधक कथानिरुपण हा त्यांचा मुख्य विशेष. त्याच्या अनुषंगाने आणि धार्मिक उद्बोधनाच्या दृष्टीने साधलेली काव्यात्मता आणि कलात्मकता आणि कलात्मकता त्यांत आढळते. धार्मिक आख्यानकाव्याचा एक आदर्श संत एकनाथांनी नमूद केला आहे, तो असा :
ज्ञानी निवती परमार्थबोधें।
पंडित निवती पदबंधें।
लोक निवती कथाविनोदें।
ग्रंथसंबंधें जग निवे।।
(भावार्थरामायण-बालकांड १४·१८३)
आख्यानाकाव्यात परमार्थबोध, पदबंधांचे सौंदर्य, कथाविनोद आणि जगाला शांती देण्याचे सामर्थ्य हे घटक असावेत, असे एकनाथांचे म्हणणे आहे.मराठी आख्यानकाव्यातील दुसरा प्रवाह कलात्मक किंवा पंडिती कथाकाव्यांचा. यात नरेंद्राचे रुक्मिणीस्वयंवर, भास्करभट्ट बोरीकराचे शिशुपालवध, रघुनाथपंडिताचे नलदमयंतीस्वयंवर, सामराजाचे रुक्मिणीहरण, नागेश व विठ्ठल यांची सीतास्वयंवरे इत्यादींचा अंतर्भाव होता. तेराव्या ते अठराव्या शतकापर्यंतच्या परमार्थप्रवण वातावरणाची पार्श्वभूमी या काव्यांना असली, तरी त्यांचा आशय आणि अभिव्यक्ती प्राधान्याने अधिक काव्यात्म व कलात्मक घडवण्याचा प्रयत्न संबंधित कवींनी केलेला आहे.
रामायण–महाभारतादी प्राचीन ग्रंथांतील कथांचे आधार त्यांना असत, तरी संस्कृतातील विदग्ध महाकाव्यांचा आदर्श अनुसरण्याचा त्यांत प्रयत्न दिसतो. सामराजाचे रुक्मिणीहरण संस्कृत महाकाव्याच्या तंत्रानुसारच लिहिलेले आढळते. रघुनाथपंडिताचेनलदमयंतीस्वयंवर व वर उल्लेखिलेली इतर पंडिती आख्याने ही संस्कृतातील विदग्ध महाकाव्याच्या छायेखाली वाढलेली खंडकाव्याची अभिनव रोपटीच आहेत. पंडिती आख्याने ही संस्कृतज्ञ रसिकांना उद्देशूनच लिहिलेली होती. संस्कृत महाकाव्यांतील आदर्शवादी भूमिका, त्यांतील काव्यसंकेत, व्यक्तिचित्रणाची धाटणी, आलंकारिक व कल्पनासुंदर वर्णने, वृत्तरचनेतील विविधता आणि केंद्रीय कथेच्या जडणघडणीचे स्वरूप या सर्वांचा स्वीकार करून त्यांच्या तोडीची कथाकाव्ये लिहिण्याचा प्रयत्न पंडित कवींनी केला.
मराठी आख्यानकाव्याचा विकास-विस्तार मोरोपंतांच्या आर्याभारतातील व इतर आख्यानांतून दिसून येतो. नाट्यपूर्ण कथानिरूपण, मार्मिक स्वभावचित्रण व त्यांना दिलेली प्रौढ शैलीची जोड इ. गुणांचे वैपुल्याने दर्शन घडविणारा हा कवी आहे.प्राचीन काळी गद्यरचनेचा परिपाठच नव्हता. त्यामुळे तत्कालीन कथात्मक साहित्य पद्यातूनच विकसित झाले. परिणामत: मराठी आख्यानकाव्यास वाव लाभला. याशिवाय नाथ, महानुभाव, भागवत, दत्त व रामदासी यांसारख्या धार्मिक पंथोपपंथांनी जो धार्मिक आचारविचार आणि तत्त्वज्ञान समाजात प्रसृत करण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नाला कथारूपाने जोड देणे आवश्यक होते.
मराठी आख्यानकाव्याने तत्कालीन धार्मिक तत्त्वज्ञानाला मनोरंजक व सुबोध केले व ते सामान्य लोकांच्या आवाक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पंडित कवींनी शुद्ध काव्यदृष्टीने मराठी आख्यानकाव्याचे कलात्मक अंग विकसित करण्याचा प्रयत्न केला. कथाकथनाची आणि कथाश्रवणाची मूलभूत मानवी प्रवृत्ती सु. सहाशे वर्षे अखंडपणे मराठी आख्यानरूपाने प्रकट होत राहिली व तृप्त होत गेली. म्हणूनच मराठी वाङ्मयातील एक मोलाचा ठेवा म्हणून मराठी आख्यानकाव्य नेहमीच महत्त्वाचे मानले जाईल. विशेषत: त्यातून विखुरलेली कल्पनासौंदर्याची व भावोत्कट अभिव्यक्तीची स्थळे आणि कथारचनेचे काही सुंदर घाट हे आधुनिक रसिकालाही मोहविणारे आहेत.
संदर्भ :१. ग्रामोपाध्ये, गं. ब. मराठी आख्यान-कविता एक अभ्यास, मुंबई, १९७०.
२. माळी, गजमल प्राचीन आख्यानक कविता, पुणे, १९६६. ३. वाटवे, के. ना. प्राचीन मराठी पंडिती काव्य, पुणे, १९६४.
लेखक: रा. ग. जाधव
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/28/2019
19 व्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात मराठी समाजमन घ...
महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरील काही राज्यांत सु...
अर्वाचीन मराठी साहित्य विषयक माहिती.
खगोलशास्त्रावरील मराठीतील उपलब्ध पुस्तके या बाबत म...