অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

म्हणी आणि वाक्‌प्रचार

म्हणी आणि वाक्‌प्रचार

म्हण (हिंदी कहावत, बांगला प्रवाद, संस्कृत लोकोक्ति, आभाणक व इंग्लिश प्रॉव्हर्ब) ही कहाणी, उखाणा यांप्रमाणे मूलतः मौखिक अशा लोकसाहित्यात जमा होणारी, पण छोटेखानी गद्य वाङ्‍मयकृती असते. संक्षेपाबरोबरच यमक, अनुप्रास, अतिशयोक्ती, उपमा इ. अलंकारांमुळे ती चटकदार बनते. त्या त्या समाजाच्या संस्कृतीमधले विशिष्ट विषयाबद्दलचे शहाणपण तिच्यात साठवलेले आणि पुढच्या पिढीच्या हवाली केलेले असते. यूरोप, आशिया, आफ्रिका, पॅसिफिक बेटे यांमधल्या शेती, ग्रामरचना, धर्म, कारागिरी यांच्याभोवती केंद्रित झालेल्या संस्कृतींमधून म्हणी विपूल आढळतात. उत्तर दक्षिण अमेरिकेतील आदिवासी संस्कृतीत म्हणींचा अभाव दिसतो.

वाक्प्रचार (हिंदी मुहावरा, बांगला प्रवचन व इंग्लिश इडियम) हा म्हणीप्रमाणे स्वयंपूर्ण नसतो (म्हणीला तर पंचांसमोरच्या न्यायदानात आधार म्हणून वापरण्याइतकी प्रतिष्ठा असते.) जगातल्या कोणत्याही भाषेत एकेरी शब्दांबरोबर ज्यांचा अर्थ सहजगत्या न लागता रूढीने लागतो असे शब्दसमूह आणि कधी वाक्ये असतात आणि ती लहान मुलाला असो किवा परक्याला असो स्वतंत्रपणे शिकून घ्यावी लागतात. ‘गागर मे सागर’ या हिंदी वाक्प्रचाराचे ‘घागरीत समुद्र’ किवा ‘घोडामैदान जवळ आहे’ या मराठी वाक्यरूप वाक्प्रचाराचे ‘घोडे का मैदान पास है’ असे भाषांतर करून भागणार नाही. सुटा वाक्प्रचार स्वयंपूर्ण नसतो, सुट्‍ट्या शब्दांप्रमाणे तो संदर्भातच जिवंत होतो. (‘काखेत कळसा, गावाला वळसा’, हे वाक्य म्हणजे सुटा विचार सागणारी म्हण नसून समोरच्या प्रसंगाचे केवळ वर्णन करणारा तो वाक्प्रचार आहे) काही वाक्प्रचार तर संदर्भात इतके गुरफटलेले असतात की त्यांचा अर्थ सरळपणे नीट लागत नाही. रूढीनेच तो लावावा लागतो. हे फक्त परक्याच्याच लक्षात यावे; उदा., पायात जोडा, गळ्यात हार, नाकात नथ घालणे, नदीवर-घरावरून-जाणे, नळ येणे, नळ जाणे, प्रवासात नवीन गाव येणे; अविकसीत देश हे वाक्प्रचार आहेत हे स्वकीयांच्या लक्षातही येणार नाही. काही वाक्प्रचार मात्र त्यांच्या चटकदारपणामुळे किंवा ठसठशीतपणामुळे स्वकीयांच्याही लक्षात यावेत; उदा., पी हळद नि हो गोरी; टाळूवरचे लोणी खाणे.

म्हणी व वाक्प्रचार यांच्यात अंतर असले, तरी त्यांचा जो एकत्र विचार करण्याचा प्रभाव दिसतो, तो त्यांच्यामधल्या काही साम्यांमुळे आहे. दोन्हींत सास्कृंतिक संदर्भाच्या आणि अर्थालंकारांच्या बळावर थोडक्यात बराच अर्थ आणलेला असतो. कधी ही संस्कृती जुनावलेली असते (ब्राह्मणाची बाई काष्ट्याशिवाय नाही, संपुष्टात येणे.); तर कधी दोन्हींना अशिष्ट संदर्भ (पाणी घालताना लोंबतय काय विचारू नये; मुंगीला मुताचा पूर) आणि जुनावलेली भाषा (एकावे जनाचे करावे मनाचे, कोणाला कशाचे वावडे नसणे.) चालते. शब्दाप्रमाणेच अशिष्ट [→ अशिष्ट प्रयोग] म्हणी-वाक्प्रचारही विनोदी असतात (कानडीत म्हणतात : प्यायला कांजी पण मिशा उचलून धरायला नोकर लागतो.). सांस्कृतीक दृष्टीने जवळ असणाऱ्या भाषांतून म्हणींचे किंवा वाक्प्रचारांचे साम्य दिसले तर त्यात नवल नाही; उदा.,

मराठी : मी मरेल पण तुला रंडकी करीन.

कोकणी : आपण तरी मरद, बाइलेक रांड करीद.

राजस्थानी : हुं मरूं पण तनै रांड कैवार छोडूं.

ओडीया : घइता पछके मरू, सउतणी रांड होऊ.

पण कधी दूरच्या भाषांतूनही विलक्षण साम्य दिसते.

इंग्रजी : टु कट्‍ ऑफ वन्स नोज टु स्पाइट वन्स फेज

मराठी : आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकून करणे.

बांगला : निजेर नाक केटे परेर याञा भङ्‍ग

काही वेळा हे साम्य उसनवारीतून आलेले असते.

इंग्रजी : ओल्ड इज गोल्ड.

मराठी : जुने ते सोने.

काही वेळा म्हणी–वाक्प्रचार स्थानिक अनुभवाशी किवा उपलब्द वाङ्‍मयाशी निगडित असतात.

गुजराती : सुरतनुं जमण अणे काशीनुं मरण.

इंग्रजी : फिजिशियन, हील दाय्‌सेल्फ (बायबल, लूक ४:२३ मूळ गर्क वाक्प्रचार).

मराठी : आधी कळस मग पाया रे (एकनाथ).

कानडीने केला मराठी भ्रतार (तुकाराम).

अग अग म्हशी मला का ग नेशी (लोककथा).

अशा म्हणी-वाक्प्रचारांच्या प्रसाराला स्थळाप्रमाणे काळाच्याही मर्यादा पडतात. पायातली वहाण पायात, अडाणी कुणबी दुणा राबे, चिकू मारवाडी इत्यादींमधून स्त्रियांबद्दलची, कष्टकऱ्यांबद्दलची व परप्रांतियांबद्दलची असहिष्णुता दिसून येते. बदलत्या काळानुरूप नवीन वाक्प्रचारांची भर जितकी पडताना दिसते (काळा बाजार, ब्लॅक मार्केट, टु गेट् इंटु ऑर्बिट) तितकी नव्या म्हणींची भर पडताना दिसत नाही (अ वुमन्ज वर्क इज नेव्हर डन, इफ् यू हॅव समथिंग टु गिव्ह टु द वर्ल्ड, द वर्ल्ड विल बीट अ पाथ टु युअर डोअर; पैशाकडे पैसा जातो; दुखणे हत्तीच्या पावलाने येते आणि मुंगीच्या पावलाने जाते.). परिणामी आजकालच्या सुशिक्षित मंडळीत म्हणींचा वापरच एकंदरीने कमी होत आहे की काय अशी शंका येते (मराठीच्या प्रमाणेतर बोलीमधल्या म्हणी व वाक्प्रचार यांचा संग्रह अजून पुर्ण झाला नाही.) म्हणींमधून शहाणपण साठवले जाते खरे, पण दोन म्हणी कधीकधी एकमेकीला छेद देतात आणि कोणती म्हण आल्या प्रसंगाला लावायची हे तारतम्याने ठरवावे लागते (इंग्रजीत मेनी हँड्ज् मेक लाइट वर्क असेही म्हणतात आणि टू मेनी कुक्स स्पॉइल द ब्रॉथ असेही म्हणतात. ऐकावे जनाचे करावे मनाचे आणि पाचामुखी परमेश्वर या दोन मराठी म्हणींचाही एकमेकींशी मेळ बसत नाही.).

संस्कृत भाषेपासून म्हणींची बरीच उदाहरणे मिळतात. त्यांपैकी काही मराठीत आजही सुशिक्षितांची तोंडी ऐकू येतात (परपदेशे पाण्डित्यम्, एरंडोSपि द्रुमायते), काहींची मोडतोड होते (शुभं च शीघ्रम् ऐवजी शुभस्य शीघ्रम् आढळते), तर काहींना मराठी वेश मिळतो (दूरतः पर्वता रम्या: ऐवजी ही दुरून डोंगर साजरे). संस्कृत भाषेतल्या वाक्प्रचारांचीही तशीच स्थिती आहे (कर्तुमकर्तुं अन्यथा कर्तुम् हा नव्हत्याचे होते, होत्याचे नव्हते, अशाचे तसे करणे इ. सामर्थ्याचे पैलू दाखवण्यासाठी उपयोगी पडतो. मुखमस्तीति वक्तव्यम् हा वाक्प्रचार हल्ली मूळ रूपात न येता तोंड आहे म्हणून बोलायचे झाले, असा भाषांतरित होऊन येतो.).

संस्कृत वाक्प्रचारांचा एक लक्षणीय प्रकार म्हणजे न्याय. तसे मराठीतही न्याय आहेत उदा., हातात कळसा गावाला वळसा. इंग्रजीतही ते आहेत उदा., व्हिच केम फर्स्ट द चिकन ऑर द एग? काही तर नव्या वैज्ञानिक युगातले न्याय आहेत उदा., बुडलेला हिमनग व त्याचे डोकावणारे लहानसे शिखर, लंबकाचा उलट येणारा झोका इत्यादी. पण संस्कृतमध्ये असे न्याय संक्षेपाने सांगण्याची एक परंपराच आहे. हंसक्षीरन्यायाने किंवा नीरक्षीरन्यायाने म्हणजे ज्याप्रमाणे हंस तहान लागली तर जलाशयातले पाणी टाकून कमळाच्या देठातले दूधच शोषून ती भागवतो त्याप्रमाणे. असाच काहीसा अर्थ इंग्रजीत सांगायचा तर ॲज वन् सेपरेट्स द चॅफ फ्रॉम द ग्रेन, दाण्यातून भूस बाजूला काढावे त्याप्रमाणे, एवढे सगळे म्हणावे लागते. काही न्याय दूर फैलावलेले दिसतात. संस्कृतातला ‘कूपमंडूक’ मलायात ‘करवंटीखालचा बेडूक’ म्हणून आढळतो.

म्हणींना वाङ्‍मयकृतीही म्हटले जाते. त्यांचे शब्दरूप म्हणजे यमक, अनुप्रास, तालाचा खटका. अर्थरूप म्हणजे उपमा, अतिशयोक्ती, समासोक्ती, हास्यजनक विसंगती. आशय म्हणजे शेती, ग्रामरचना, धर्म, कारागिरी इ. पारंपरिक जीवनाची वैशिष्ट्ये. याभोवतीच म्हण घोटाळत असते. मात्र तीत विज्ञान, तंत्रविद्या, शहरीजीवन यांचा शिरकाव अजूनही तितकासा झालेला दिसत नाही.

संस्कृतमधली सुभाषिते ह्या वाङ्‍मयकृतीच असल्या, तरी त्या म्हणींपेक्षा वेगळ्या आहेत. काही सुभाषिते म्हणजे सरळ मोठ्या वाङ्‍मयकृतींमधून घेतलेली अवतरणे आहेत. महाभारताच्या वनपर्वात धर्मराज यक्षाला सांगतो–धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायां महाजनो येन गतः स पन्था:।’ (कर्तव्य काय हे ठरवण्याचे तत्त्व जणू गुहेत ठेवलेले आहे, अशा स्थितीत थोर मंडळी ज्या वाटेने गेली ती वाट धरणे बरे.). हे शहाणपण सांगणारा श्लोक सुभाषित म्हणून ठरला; परंतु सामान्यतः सुभाषिते सुटी असून पुष्कळदा त्यांचा कर्ता माहीत नसतो. म्हणून ती कधीकधी लोकसाहित्यात जमा होताना दिसते उदा., अमन्त्रमक्षरं नास्ति । नास्ति मूलमनौषधम् । अयोग्यः पुरुषो नास्ति । योजकस्तत्र दुर्लभः । (सुभाषितरत्न माण्डागारम् ३: १५८). म्हण किंवा लोकोक्ती यांच्या मानाने सुभाषित एक सलग पद्यखंड असल्यामुळे ते आकाराने मोठे आणि बांधीव असते. कधी कधी सुभाषिताचाच एखादा तुकडा नंतर लोकोक्तीसारखाही वापरला जातो उदा., महाजनो येन गतःस पन्थाः; योजकस्तत्र दुर्लभः इत्यादी तसे होताना मात्र कधी अर्थाचा विपर्यासही होतो उदा., औषधं ‘जाह्नवीतोयम्’ याचा मूळ संदर्भ पाहिला तर त्याचा अर्थ मृत्यू जवळ आला असता गंगाजळ हेच औषध असा आहे. काहींना वाटते त्याप्रमाणे औषधालाच गंगाजल माना, असा तो नव्हे.

संदर्भ : 1. Makkai Adam, Idiom Structure in English, 1972.

2. Taylor, Archer, The Proverb, Cambridge, 1931.

३. दाते, यशवंत रामकृष्ण, संपा. महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश, २ भाग, पुणे, १९४७.

४. नरवणे, विश्वनाथ दिनकर, संपा. भारतीय कहावत संग्रह, ३ खंड, पुणे, १९७८-८३.

५. भिडे, विद्याधर वामन, मराठी भाषेचे वाक्प्रचार व म्हणी, पुणे, १९५९.

लेखक: अशोक रा. केळकर

माहिती स्रोत: मराठी विकासपीडिया

अंतिम सुधारित : 7/17/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate