অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तुलसीदास

युगप्रवर्तक हिंदी महाकवी

(१५३२–१६२३). युगप्रवर्तक हिंदी महाकवी. त्यांची जन्मतिथी, जन्मस्थान, जात, गुरू, मातापिता या सर्वांबद्दल मतभिन्नता आढळते. हाजीपूर, तारी, राजापूर (जि. बांदा), सोरो सूकरक्षेत्र (जि. एटा), अयोध्या इ. गावांची नावे गोस्वामी तुलसीदासांचे जन्मस्थान ठरविताना पुढे आली आहेत. पंडित रामदत्त भारद्वाज यांनी या सर्व संशोधनांचा अभ्यास करून तुलसीदासांचा जन्म सारो या स्थानाजवळच रामपूर येथे झाला, असे निश्चित केले आहे. ते सवरिया, सारस्वत, सरयूपारीण, सनाढ्य आणि कान्यकुब्ज या ब्राह्मण जातींपैकी निश्चित कोणत्या जातीचे होते याबद्दल मतभेद आहेत. ते ब्राह्मण नसावेच, असेही एक मत पुढे आले आहे. जगन्नाथदास, रामदासजी, नर्ह्यानंद, नरहरिदास, नृसिंह अशी त्यांच्या गुरूची नावे दिली जातात. बहुसंख्य विद्वान त्यांचा विवाह झाला होता, असे मानतात.

त्यांच्या जन्मतिथीसंबंधी सहा संवत तिथी सामान्यतः पुढे आल्या आहेत. त्या अशा : संवत १५५४, १५६०, १५६८, १५८३, १५८९, आणि १६००. बहुसंख्य विद्वान भाद्रपद शुद्ध एकादशी मंगळवार, संवत १५८९ म्हणजे इ. स. १५३२ ही तिथी मान्य करतात. मृत्यू मात्र संवत १६८० श्रवण वद्य तृतीया, शनिवार या तिथीला म्हणजे १६२३ मध्ये झाला, याविषयी सामान्यतः एकमत आहे.

तुलसीदासांच्या मातापित्यांच्या नावांविषयीही मतभेद आहेत; पण त्यांच्या पित्याचे नाव आत्माराम दुबे असावे याविषयी विद्वानांचे बहुमत आहे. त्यांच्या आईचे नाव हुलसी होते. रामचरितमानसाच्या बालकांडात त्यांनी तसा उल्लेख केला आहे. तुलसीदासांचे बालपण फारच कष्टात गेले. त्यांचा जन्म मूळनक्षत्रावर झाला असल्यामुळे त्यांच्या आईवडिलांनी त्यांचा जन्मताच त्याग केला व त्यांना नरहरिदास यांनी वाढवले, अशा कथा प्रचलित आहे. तुलसीदासांच्या जन्मानंतर सु. दहा महिन्यांतच त्यांच्या आईवडिलांचा मृत्यू झाला व तुलसीदास अनाथ झाले, अशीही कथा प्रचलित आहे. त्यांना आईवडिलांचे सुख फारसे मिळाले नाही, एवढे निश्चित. लहानपणी त्यांना एका हनुमानमंदिरात आश्रय मिळाला. त्या दैवताची पूजा ते करू लागले. उदरनिर्वाहासाठी त्यांना भिक्षांदेही करावी लागली. यासंबंधी त्यांच्या काव्यांत विपुल उल्लेख आढळतात.

त्यांचा विवाह झालाच नव्हता किंवा एकदा झाला होता किंवा तीन वेळा झाला होता, अशी मते मांडली जातात. पण सामान्यतः रत्नावली नावाच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला होता हि जनश्रुती खरी आहे, असे पुष्कळ संशोधकांचे मत आहे; त्याला काव्यांतर्गत पुरावाही सापडतो. ते तरुणपणी पत्नीवर खूप आसक्त होते व या आसक्तीपायी लोकाचाराची पर्वा न बाळगता ते पत्नीला तिच्या माहेरी भेटावयास गेले. वादळ–पावसांतूनही भेटायला आलेल्या या आसक्त पतीला त्या धर्मनिष्ठ पत्नीने चांगलेच खडसावले. असे म्हणतात, की तिच्या मर्मवेधी बोलण्याने तुलसीदासांचे मन संसारातून उडाले व रामभजनी स्थिर झाले. साध्वी रत्नावलीने त्यांच्या पादुकांची पूजा करीत उर्वरीत आयुष्य व्यतीत केले. रत्नावली १५९४ पर्यंत हयात होती.

तुलसीदासांनी तीर्थयात्रेच्या निमित्ताने खूप प्रवास केला; पण बहुतांशी त्यांचे वास्तव्य काशी येथेच होते. त्यांचे अनेक ग्रंथ काशीमध्येच लिहिले गेले. त्यांना बाहुपीडा होती. त्यांच्या मृत्युसमयी त्यांच्या काखेत गाठी आल्या होत्या. बाहुपीडा नष्ट व्हावी म्हणून त्यांनी हनुमान बाहुक काव्याची रचना केली. काशीतील अस्सीघाटावर त्यांचे निवासस्थान आजही दाखविले जाते.

तुलसीदासांचे व्यक्तिमत्त्व आकर्षक होते. ते गौर वर्णाचे, दयाळू व परोपकारी होते. काशीमध्ये त्यांना खूप त्रास झाला; पण त्यांची सहिष्णू वृत्ती व सोशिकपणा कधी कमी झाला नाही. ते मनाने कोमल व स्वभावाने उदार होते. रामावर व हनुमानावर त्यांची अपार श्रद्धा होती. त्यांना हनुमानाचे, शिवाचे व रामाचे साक्षात दर्शन झाले होते, अशीही भाविकांची श्रद्धा आहे. त्यांच्या विनम्र वृत्तीचे प्रतिबिंब त्यांच्या सर्वच लेखनात उमटलेले दिसते. ते रसिक, भावनाशील व विनोदप्रियही होते. त्यांच्या सखोल आत्मपरिक्षणाचा प्रत्यय त्यांच्या दोहावली, विनयपत्रिका इ. ग्रंथांत येतो. तुलसीदास गुणग्राहक होते व म्हणून तत्कालीन विभिन्न संप्रदायांतील चांगल्या गोष्टींचा समन्वय ते करू शकले. त्यांनी आपल्या काव्यांत निसर्गाची सुंदर शब्दचित्रे रेखाटली आहेत. माणसाच्या स्वभावाचे त्यांना चांगले ज्ञान होते. ते स्पष्टवक्ते व निर्भय वृत्तीचे होते. सुखदुःखांचा अनुभव, प्रवास, सत्संग व विशाल अध्ययन यांच्या प्रभावातून त्यांची जीवनदृष्टी तयार झाली. तिचा काव्यात्मक आविष्कार त्यांच्या साहित्यात सर्वत्र दिसतो. त्यांच्यावर प्रतिभेचा वरदहस्त होता.

तुलसीदासांचा ग्रंथ

तुलसीदासांच्या नावावर सु. ३९ ते ५४ पर्यंत ग्रंथ दाखविले जातात; परंतु त्यांतील फक्त बाराच ग्रंथ त्यांचे आहेत, हे निश्चित झाले आहे. इतर ग्रंथ फारसे महत्त्वाचेही नाहीत. ते बारा ग्रंथ असे : (१) रामलला नहछू, (२) रामाज्ञाप्रश्न, (३) वैराग्य संदीपिनी, (४) रामचरितमानस, (५) पार्वतीमंगल, (६) जानकीमंगल, (७) बरवै रामायण, (८) गीतावली, (९) कृष्णगीतावली, (१०) विनयपत्रिका, (११) दोहावली, (१२) कवितावली. यांतील तुलसीदासांच्या महान कविव्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय रामचरितमानस आणि विनयपत्रिका या दोन कृतींतून प्रकर्षाने येतो.

रामलला नहछू

सोहर छंदात लिहिलेला हा छोटा ग्रंथ २० पद्यांत पूर्ण झाला आहे. नहछू म्हणजे नखे कापणे. यज्ञोपवीत संस्कारातील नखे कापण्याच्या विधीचे वर्णन यात आहे. काही विद्वान रामचंद्रांच्या विवाहप्रसंगीच्या संस्काराचे वर्णन आहे असे म्हणतात; पण ते खरे नाही. हे अवधी भाषेत आहे. काव्याच्या दृष्टीने ही रचना सामान्य आहे.

रामाज्ञाप्रश्न

सात सर्गांत व एकूण ३४३ दोह्यांत ही रचना आहे. यात रामकथा अशा तऱ्हेने वर्णिली आहे, की प्रत्येक दोह्यात शुभ व अशुभ असा संकेत व्यक्त व्हावा. प्रश्नकर्ता याच्या साह्याने आपल्या प्रश्नाचे अनुकूल वा प्रतिकूल उत्तर शोधतो. अवधी व व्रज अशा मिश्र भाषेतील ही रचना काव्यदृष्ट्या महत्त्वाची नाही.

बैराग्य संदीपिनी

या ग्रंथात ४६ दोहे, २ सोरठे छंद व १४ चौपाया आहेत. त्यात रामनामाचे माहात्म्य व रामध्यानाचे महत्त्व सांगितले आहे. संतस्वभाव, संतमहिमा हे विषयही त्यात आहेत. ज्ञान, भक्ती व वैराग्य यांचे निरूपण त्यात केले असून शांत रसाचा परिपोष आढळतो.

रामचरितमानस

तुलसीदासांच्या काव्यगुणांचा प्रकर्ष या महाकाव्यात आढळतो. रामकथा चार वक्ते व चार श्रोते यांच्यातील संवादरूपाने सांगितली आहे. मुख्यतः चौपाई व दोहा या छंदांत रचलेले हे काव्य अवधी बोलीत लिहिले असून संस्कृत शब्दांचा त्यात प्राचुर्याने उपयोग केला आहे. सात कांडांत पूर्ण केलेल्या या काव्यात भक्तीचा संदेश दिलेला आहे. हे चरित्र्यकाव्य ओघवत्या, रसाळ शैलीत लिहिले आहे. रामचंद्रांच्या रूपाने तुलसीदासांनी मानवी जीवनाचा भव्य आदर्श समाजापुढे ठेवला. त्यांचे लोकजीवनाचे मार्मिक ज्ञान त्यात दिसून येते. म्हणूनच हिंदी भाषेतील रामकथेवरील दुसरे कोणतेही काव्य रामचरितमानसाइतके लोकप्रिय झालेले नाही. ज्ञान व भक्ती, निर्गुण व सगुण, शिव व सौंदर्य, शक्ती व सत्य, वैयक्तिक कल्याण व लोककल्याण यांचा सुंदर समन्वय या काव्यात आढळतो. धार्मिक, सांप्रदायिक मतभेद मिटवून आदर्श जीवनाचे ध्येय त्यात जनतेसमोर ठेवले आहे. भाषासौंदर्य, रसनिर्मिती, प्रभावी प्रसंगचित्रण, सूचक घटनांचे संयोजन, उत्तम स्वभावचित्रण व मनाला उन्नत करणारे संस्कार या सर्वच दृष्टीनीं हे काव्य अभिजात मानले जाते. रामचरितमानस संवत १६३१ (इ. स. १५७४) मध्ये रचले गेले.

पार्वतीमंगल

अवधी भाषेतील या रचनेत १४८ अरूण छंद व १६ हरिगीतिका छंद आहेत. त्यात शिव–पार्वती विवाहाचे वर्णन असून त्यावर कुमारसंभवाची छाप जाणवते.

जानकीमंगल

२१६ छंदांत (१९२ अरूण छंद व २४ हरिगीतिका) लिहिलेल्या या काव्याचा विषय सीता–रामविवाह हा आहे. हा प्रसंग रामचरितमानसातील प्रसंगापेक्षा वेगळ्या तऱ्हेने आला आहे. भाषा अवधी आहे. यावर वाल्मिकि रामायणाची छाप आहे.

बरवै रामायण

वेळोवेळी लिहिलेल्या बरवै छंदांचे हे संकलन आहे. यात रामकथेतील काही प्रसंगांचे चित्रण आहे. स्फुट रूपाने लिहिलेल्या या ग्रंथात ६९ छंद आहेत. प्रारंभीचे काही छंद अलंकारनिरूपणासाठी लिहिलेले आहेत. काही छंद उत्कृष्ट आहेत.

गीतावली

या ग्रंथात ३२८ पदे आहेत. ही पदे रामजीवनासंबंधी असून ती वेगवेगळ्या वेळी लिहिलेली आहेत. ही पदे व्रज भाषेत व अनेक रागांत निबद्ध आहेत. तुलसीदासांचे संगीताचे ज्ञान यात दिसते. शृंगार, करूण, वीर व शांत रसांची अभिव्यक्ती यात चांगली झाली आहे. अलंकारयोजनेच्या दृष्टीनेही ही पदे महत्त्वाची मानली जातात.

कृष्णगीतावली

व्रज भाषेतील हा स्फुट पदांचा संग्रह असून त्यात कृष्णाची कथा गायिली आहे. बाललीला, गोपीची गाऱ्हाणी, उखळाला बांधले जाणे, इंद्रकोप, गोवर्धन–धारण, नवनीत–लीला, सौंदर्यवर्णन, गोपिका–प्रेम, मथुरा–गमन, गोपी–विरह, भ्रमरगीत, द्रौपदी–वस्त्रहरण इ. विषय त्यात वर्णिले आहेत. ही तुलसीदासांची सरळ पण उत्कृष्ट काव्यरचना मानली जाते.

विनयपत्रिका

रामचरितमानसानंतरची ही महत्त्वाची कृती अतिशय प्रौढ व प्रगल्भ असून आपल्या भौतिक व आध्यात्मिक कष्टांच्या निवारणार्थ रामचंद्राने कृपा करावी, या हेतूने कवीने ती लिहिलेली आहे. १७६–२८० पर्यंत पदे वेगवेगळ्या प्रतींत आढळतात. ही पदे वेगवेगळी असली, तरी या सर्व रचनेत एक सूत्र दिसते. रामचंद्राच्या दरबारी आपल्यावर कृपा व्हावी म्हणून दुःखांची कैफियत असलेली चिठ्ठी तुलसीदास पाठवीत आहेत. राजाच्या दरबारात प्रवेश मिळविण्यासाठी आधी पहारेकऱ्यांना व इतर अधिकाऱ्यांना खूष करावे लागते. म्हणून गणेश, सूर्य, शिव, पार्वती इ. देवतांची त्यात स्तुती केली आहे. नंतर हनुमानाची प्रार्थना आहे. योग्य वेळी रामचंद्राजवळ आपली हकीकत सांगावी अशी सीतेला प्रार्थना केली आहे. ही रचना गीतात्मक असून अनेक रागांचाही तीत प्रयोग केला आहे. तुलसीदासांनी केलेले आत्मनिरीक्षण व आपल्या अपराधांची दिलेली प्रांजळ कबुली परिणामकारक आहे. माणसाच्या मनाचे सूक्ष्म ज्ञान तीत प्रकट झाले आहे. आपल्या मनोवृत्तीचे निरूपण करताना कवीचे ज्ञान, वैराग्य, भक्ती, तत्त्वज्ञान यांसंबंधी विचार प्रकट झाले आहेत. भक्तीचे उत्कट आविष्कार तीत आढळतात. संगीतात्मकता, भाषासौंदर्याचे विविध विलास तसेच तत्त्वज्ञान व काव्य यांचा सुंदर मेळ, या दृष्टीने ही रचना यशस्वी झालेली आहे. तुलसीदासांच्या आत्मसाधनेचा उत्कृष्ट काव्यात्मक परिपाक, असे रचनेविषयी म्हणता येईल.

दोहावली

अवधी भाषेत लिहिलेल्या दोह्यांचा हा संग्रह असून काही दोहे रामचरितमानस, रामाज्ञाप्रश्न, बैराग्य, संदीपिनीमधील आहेत. काही स्वतंत्र आहेत. नीती, भक्ती, राममहिमा, नाममाहात्म्य, तत्कालीन परिस्थिती इ. विषयांवर लिहिलेले हे सु. ५७३ दोहे आहेत.

कवितावली

वेळोवेळी लिहिलेल्या सु. ३२५ पद्यांचा हा संग्रह. यात रामकथेचे वर्णन आहे. सवैया, छप्पय, झूलना या छंदांतील काही रचनाही यात समाविष्ट आहेत. रामाच्या ऐश्वर्याचे वर्णन यात आले आहे. रामाची दास्यभावाचे उपासना करावी, म्हणून हा ग्रंथ लिहिलेला आहे. यातील उत्तराकांड मोठे आहे. यात ज्ञान, वैराग्य व भक्तीचा महिमा वर्णन केलेला आहे. आत्मग्लानीने विद्ध होऊन रचलेल्या काही छंदांत कवीच्या पूर्वजीवनाचे धागेदोरे सापडतात. कवितावलीमध्ये वीर व रौद्र रसांचा विशेष आविष्कार आढळतो. उत्तरकांडात शांत रस आहे. शैलीची विविधता या रचनेत आढळते.

हिंदी साहित्यातील भक्तियुग

हिंदी साहित्यातील भक्तियुग पंधराव्या शतकाच्या आरंभी सुरू होते. या काळातील मोगलांच्या राजवटीत राजकीय आणि धार्मिक आक्रमणाचे संकट उभे राहिले होते. रामचरितमानस या ग्रंथात या परिस्थितीचे प्रतिबिंब पडलेले आहे. धर्माचे मूळ स्वरूप बाजूला पडले. कबीरांसारखे निर्गुणवादी, तुलसीदासांसारखे रामभक्त व सूरदासांसारखे कृष्णभक्त यांनी सत्य, प्रेम, सहानुभूती, करुणा, दया, शांती या मूल्यांवर आधारलेल्या भक्तिमार्गाचा जनतेने अवलंब करावा, असा प्रयत्न केला. तुलसीदासांनी तत्कालीन संप्रदायांत समन्वय करण्याचा प्रयत्न केला आणि शुद्ध धर्माचे स्वरूप भक्तीच्या मार्गाने लोकमानसात रुजावे असा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी आपल्या महाकाव्याचा नायक म्हणून जो राम निवडला आहे, त्याच्या व्यक्तिमत्वात शक्ती, शील, सौंदर्य यांच्या समन्वयाचा परमोत्कर्ष साधला.

तुलसीदासांचे तत्त्वज्ञान एका अर्थाने समन्वयवादी होते. शंकराचार्यांचा अद्वैतवाद व रामानुजाचार्यांचा विशिष्टाद्वैतवाद या दोहोंचा स्वीकार करणारी भूमिका त्यांनी घेतली आहे. सामान्यतः रामानुजाचार्यांच्या तत्त्वज्ञानाकडे त्यांचा कल अधिक होता असे म्हणता येईल. विनयपत्रिकेत मात्र ते द्वैतवादाकडे अधिक झुकलेले दिसतात. जगताचे स्वरूप सांगताना शंकराचार्यांच्या मायावादाचे अनुसरण करूनही शेवटी भक्तिमार्गाचे विवेचन करताना मात्र ते रामानुजाचार्यांचे अनुसरण करतात. तुलसीदासांनी मायेची दोन रूपे सांगितली आहेत. अविद्या–माया व विद्या–माया. अविद्या–माया माणसाला जंजाळात गुरफटवते, तर विद्या–माया ही ब्रह्माची शक्ती आहे. विद्या–माया विश्वाचे सृजन, पोषण व संहारही करते. या विद्या–मायेच्या मदतीनेच जीव जीवनमुक्त होतो. अविद्या–मायेने पतन होते. हरिभक्त अविद्येच्या प्रभावापासून दूर राहू शकतात. कधी तत्त्वतः जीव व ब्रह्म यांना एक मानूनही तुलसीदास मुक्तीच्या अवस्थेत जीव व ब्रह्म यांचे द्वैत स्वीकरतात. म्हणूनच ते शंकराचार्यांप्रमाणे अद्वैती आहेत, की रामानुजाचार्यांप्रमाणे विशिष्टाद्वैती आहेत, याबद्दल विद्वानांत मतभेद आहेत. ते भक्तिमार्गी असल्याबद्दल मात्र वाद नाही.

तुलसीदासांचा भक्तिमार्ग

तुलसीदासांचा भक्तिमार्ग रामाच्या अनन्यभक्तीवर अधिष्ठित आहे. त्यांच्या भक्तिमध्ये राम व भक्त यांचे नाते सेव्य–सेवक भावाचे आहे. तुलसीदासांनी रामाची भक्ती करताना नवविधा भक्तिचा पुरस्कार केला. रामनामाचे माहात्म्यही त्यांनी अपरंपार मानले आहे. या भक्तिमार्गात रामाची उपासना रामाच्या सगुण रूपावर केंद्रित आहे. राम सर्वथा स्वतंत्र आहे; पण तो लीला करण्यासाठी अनेक रूपे घेतो, असेही तुलसीदास सांगतात. तुलसीदासांच्या भक्तीमध्ये विनयाला पराकोटीचे स्थान आहे. अहंकाराचे निराकरण होऊन दासाने विनम्र झाल्याशिवाय भगवद्‌भक्तिचे द्वार खुले होत नाही, अशी त्यांची श्रद्धा आहे. या अहंकाराच्या निराकरणासाठीच आत्मपरिक्षण व आत्मदोषांची तीव्र जाणीव त्यांनी आवश्यक मानली आहे. भक्तीसाठी सत्संग, ज्ञान, वैराग्य, तप. संयम, श्रद्धा, प्रेम, भगवत्‌कृपा, शरणागती या गोष्टीही महत्त्वाच्या मानल्या आहेत. एका तऱ्हेने तुलसीदासांच्या भक्ताचे व्यक्तिमत्त्व एका आदर्श मानवाचे व्यक्तिमत्त्व होऊन जाते.

तुलसीदासांनी मानवतावादी धर्म शिकवला. त्याचे सूत्र ‘परहित सरिस धरम नहिं भाई’ असे सांगता येईल. माणसाला संकुचिततेकडून विराटतेकडे वळविण्याचा त्यांनी आपल्या काव्यातून प्रयत्न केला.

तुलसीदासांना प्रचंड लोकप्रियता मिळाली याचे कारण त्यांनी जो नवा मार्ग सांगितला त्याला परंपरेची भक्कम बैठक दिली, हे होय. वेद, उपनिषदे, गीता, भारतीय दर्शने, वाल्मीकि रामायण यांच्या आधाराने त्यांनी आपले विचार लोकांच्या पुढे ठेवले. तुलसीदास समन्वयवादी होते; पण त्यांच्या समन्वयवादाला विचारांची, दूरदृष्टीची बैठक होती. हजारीप्रसाद द्विवेदी म्हणतात, ‘तुलसीच्या काव्यांत लोक व शास्त्र यांचाच समन्वय आहे असे नाही, तर वैराग्य आणि गृहस्थधर्म, भक्ती आणि सगुण, पुराण आणि काव्य, भावावेग आणि अनासक्त चिंतन, ब्राह्मण आणि चांडाळ, पंडित आणि अपंडित यांतील समन्वय आहे’. तुलसीदासांचे काव्य सर्व मतांच्या लोकांना आपलेसे वाटते. तुलसीदासांनी आदर्श गृहस्थधर्माचे, आदर्श कुटुंबव्यवस्थेचे चित्र रेखाटले. माणसाची कुटुंबातील व समाजातील कर्तव्ये आणि मर्यादा यांचा आदर्श त्यांनी सांगितला. हे सर्व रामकथेच्या माध्यमातून सांगितल्यामुळे, हा ग्रंथ उत्तर भारताच्या सामाजिक जीवनात पुष्कळ वर्षांपर्यंत उच्च नीतिमूल्यांचे संस्कार घडविणारा एक संस्कृतिग्रंथ म्हणून आदरणीय ठरला.

तुलसीदासांनी व्रज व अवधी दोन्ही भाषांचा उपयोग केला. वीरगाथेतील छप्पयपद्धती, विद्यापती व सूरदास यांची गीतपद्धती, गंग इ. भाटांची कवित्त–सवैयपद्धती, कबीराची दोहापद्धती, ईश्वरदासाची दोहा चौपाईपद्धती या पूर्वसूरींच्या पाचही पद्धतींचा त्यांनी आपल्या साहित्यात उपयोग करून काव्यरचना केली. त्यांच्या काव्यात संस्कृत शब्दांचा विपुल उपयोग आहेच आणि त्यामुळे त्यांच्या भाषेत अभिजातपणा जाणवतो; पण अवधी व व्रज भाषांची लोकप्रचलित रूपे व त्यांचा थाटही त्यांच्या काव्यांत आलेला आहे.

हिंदी कवी

तुलसीदासांना कवी म्हणून हिंदी साहित्यात श्रेष्ठ स्थान आहे. उत्कृष्ट प्रबंधकाव्य रचण्याची योजकता त्यांच्यामध्ये होती, तसेच उत्कट भावना पदांच्या व गीतांच्या रूपाने व्यक्त करण्याची आत्मनिष्ठाही त्यांच्या ठायी होती. कथेतील चरित्रे, प्रसंग, घटना, वस्तुवर्णने, संवाद इ. विविध अंगांची कुशल रचना, कथेतील मार्मिक व रसात्मक सौंदर्यस्थळे वर्णन करण्याची हातोटी, प्रसंगानुकूल भाषेचे रूप राखण्याचे सामर्थ्य, छंद व अलंकारांचा औचित्यपूर्ण उपयोग, संवादांतील नाट्यात्मकता या सर्वच बाबतींत तुलसीदासांची प्रतिभा महाकवीची होती, असे मानावे लागेल. तुलसीदासांच्या शेकडो अनुभवगर्भ व विदग्ध उक्ती नंतर लोकजीवनात व साहित्यात भाषेतील म्हणींप्रमाणे प्रचलित झाल्या. मात्र त्यांच्या प्रतिभेला एक मर्यादाही होती. परिचित प्रसंगांना काव्यात्मक साज चढवणारी प्रतिभा त्यांना लाभलेली होती; पण कल्पित प्रसंगांची निर्मिती करण्याकडे त्यांचा कल नव्हता. वस्तुस्थिती जशी आहे तशी स्वीकारून त्यांतील मार्मिक रूपांची मांडणी ते करू शकत असत; पण संपूर्ण नवी सृष्टी कल्पनेने निर्माण करणे, हा त्यांच्या प्रतिभेचा धर्म नव्हता.

तुलसीदासांनी रामकथेला ज्या उंचीवर नेले, त्यापेक्षा अधिक उंचीवर कोणत्याही हिंदी कवीला जाता आले नाही. भक्तमालमध्ये नाभादासाने त्यांना ‘कलिकाल का वाल्मीकि’ म्हटले आहे. व्हिन्सेन्ट स्मिथ याने ‘मोगल काळची सर्वांत महान व्यक्ती’ असे त्यांचे वर्णन केले आहे. ग्रीअर्सनने ‘बुद्धदेवानंतरचा सर्वांत मोठा लोकनायक’ या शब्दात त्यांना गौरविले आहे. हजारीप्रसाद द्विवेदी म्हणतात ‘क्वचित प्रसंगी असा शुभयोग जुळून येतो, की जेव्हा माणसाचे ‘सर्वोत्तम’ प्रकट होण्यास अशा तऱ्हेने भाव आणि भाषा उपलब्ध होते ... तुलसीदास असेच असाधारण शक्तिशाली कवी, लोकनायक आणि महात्मा होते’. तुलसीदासांचा प्रभाव लोकजीवनावर अतिशय पडला. भक्तिमार्गाच्या रूपाने त्यांनी निराश जीवनात आशा आणि उदात्त, पवित्र, मानवतावादी मूल्यांची चाड निर्माण केली. प्रेम, परस्पर सौहार्द्र, सहिष्णुता, क्षमाशीलता, दया, करुणा, सहानुभूती यांवर आधारित कौटुंबिक व सामाजिक संबंध वाढीस लागले.

हिंदी साहित्यात तुलसीदासांचे स्थान अनन्यसाधारण असल्यामुळे तुलसीदासांच्या जीवनकार्यावर व साहित्यावर प्रचंड लेखन हिंदीमध्ये झाले आहे व होत आहे. अत्यंत आधुनिक दृष्टीतून तुलसीदासांच्या साहित्याचा अभ्यास करण्याचाही मोठा प्रयत्न विद्वान करीत आहेत.

संदर्भ : १. गुप्त, माताप्रसाद, तुलसीदास, अलाहाबाद, १९४२.

२. चतुर्वेदी, परशुराम, उत्तर भारत की संतपरंपरा, अलाहाबाद, १९५१.

३. त्रिपाठी, रामनरेश, तुलसी और उनका काव्य, दिल्ली, १९५३.

४. दास, श्यामसुंदर, गोस्वामी तुलसीदास, अलाहाबाद, १९३१.

५. बूल्के, फादर कामिल, रामकथा, अलादाबाद, १८५०.

६. भारद्वाज, रामदत्त, गोस्वामी तुलसीदास : व्यक्तित्त्वदर्शन, दिल्ली, १९६१.

७. मिश्र, बलदेवप्रसाद, तुलसीदर्शन, अलाहाबाद, १९३८.

८. मिश्र, भगीरथ, तुलसी रसापन, लखनौ, १९५४.

९. युगेश्वर, तुलसी आज के संदर्भ में, अलाहाबाद, १९६८.

१०. शुक्ल, रामचंद्र, गोस्वामी तुलसीदास, बनारस, १९४९.

लेखक : चंद्रकांत बांदिवडेकर

माहिती स्रोत : मरठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate