(१५ मे १९०३– २१ फेब्रु. १९७७). एक श्रेष्ठ मराठी समीक्षक. जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज या गावी. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून संस्कृत व मराठी घेऊन मुंबई विद्यापीठाचे बी.ए. (१९२३) व एम्.ए. (१९२५) झाले. एम्.ए. ला संस्कृतची भगवानदास पुरुषोत्तम शिष्यवृत्ती मिळाली. १९२६–६३ या काळात हं. प्रा. ठा. कॉलेज, नासिक; विलिंग्डन कॉलेज, सांगली व फर्ग्युसन कॉलेज, पुणे येथे संस्कृत व मराठी ह्या विषयांचे प्राध्यापक होते.
त्यांनी ‘निशिगंध’ ह्या टोपण नावाने कवी म्हणून साहित्यक्षेत्रात प्रथम पदार्पण केले. ज्योत्स्नागीत (१९२६) व निशागीत (१९२८) हे त्यांचे दोन काव्यसंग्रह. सरल भावाविष्कार हे त्यांतील कवितांचे वैशिष्ट्य. पुढे मात्र त्यांनी साहित्यशास्त्र व काव्यसमीक्षा हेच आपले कार्यक्षेत्र मानले. अभिनव काव्यप्रकाश (१९३०) या ग्रंथात संस्कृत काव्यशास्त्राची तत्त्वे साररूपाने मराठीत आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अशा प्रकारचा हा पहिलाच सुव्यवस्थित उपक्रम असल्याने त्याला महाविद्यालयीन पाठ्यपुस्तकांत अग्रस्थान मिळाले. या ग्रंथाच्या पुढील परिवर्धित आवृत्त्यांतून त्यांनी संस्कृत काव्यशास्त्रातील तत्त्वांशी पाश्चात्त्य वाङ्मयविचारांची सांगड घालण्याचा पुष्कळ यशस्वी प्रयत्न केलेला आहे. त्यांचा दुसरा महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे सौंदर्यशोध आणि आनंदबोध (१९४३). या ग्रंथाच्या पूर्वाधात ललितकलांतील सौंदर्याच्या घटकांचा विचार आलेला असून उत्तरार्धात सौंदर्य हे वस्तुगत असून त्याची अनुभूती व्यक्तिगत असते या दृष्टिकोणातून सौंदर्यानंदाची व तदनुषंगाने काव्यानंदाची चर्चा करण्यात आली आहे. वृत्ते व अलंकार ही काव्यशरीराहून अलग राहणारी नसल्याने त्यांना अनुक्रमे गतिविभ्रम व स्थितिविभ्रम संबोधावे, अशी भूमिका त्यांचा काव्यविभ्रम (१९५१) या पुस्तकात मांडलेली आहे.
मुंबई मराठी साहित्यसंघाच्या वा. म. जोशी व्याख्यानमालेत त्यांनी केशवसुतोत्तर आधुनिक मराठी कवितेतील प्रवृत्तिपरंपरांचा जो आढावा घेतला, तो अर्वाचीन मराठी काव्य (केशवसुत आणि नंतर) (१९४६) म्हणून ग्रंथरूपाने प्रसिद्ध झालेला आहे. संस्कृत काव्यवाङ्मय (१९४५) या त्यांच्या ग्रंथांत संस्कृत काव्याचा धावता परिचय करून देण्यात आला आहे. केशवसुत (काव्यदर्शन) (१९४७) हा त्यांचा ग्रंथ केशवसुतांच्या कवितेचा तपशीलवार परामर्श घेणारा आहे. पुणे विद्यापीठाच्या केळकर व्याख्यानमालेत त्यांनी ज्ञानेश्वर ते शाहीर या कालखंडातील बदलत्या अभिरुचीचे समालोचन केले होते. ते पुढे मराठी वाङ्मयाभिरुचीचे विहंगमावलोकन (१९५९) या ग्रंथात समाविष्ट झालेले आहे. चर्वणा (१९६०), विचक्षणा (१९६२) व दक्षिणा (१९६७) हे त्यांच्या साहित्यविषयक स्फुट लेखांचे संग्रह होत. मराठी साहित्य परिषदेच्या मराठी वाङ्मयेतिहासयोजनेत संपादक म्हणून ते सहभागी असून ह्या योजनेतील तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या खंडांच्या संपादनाची जबाबदारी त्यांनी उत्कृष्टपणे पार पाडली. नवकाव्यातील दुर्बोधतेची चर्चा करणारे ‘मुख्यार्थाची कैफियत’ हे त्यांचे व्याख्यान, विरहतरंगाची मेघदूताशी तुलना करणारे समीक्षण व डांगी बोलीविषयीचा प्रदीर्घ निबंध हे त्यांचे लेखन अत्यंत विचारप्रवर्तक व म्हणून वादविषय झाले असले, तरी एकंदरीत तपशिलाविषयी दक्ष असणारे साक्षेपी व समतोल समीक्षक म्हणून जोगांचा लौकिक आहे. ठाणे येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अधिवेशनाच्या बेचाळिसाव्या अध्यक्षपदाचा मान त्यांना मिळाला होता (१९६०) व विद्यापीठ अनुदान आयोगाकडून निवृत्त प्राध्यापकांच्या योजनेतही त्यांची नेमणूक झाली होती. महाराष्ट्र साहित्य परिषद व मराठी साहित्य महामंडळ यांच्या कार्याशी अनेक नात्यांनी त्यांचा दीर्घकाळ घनिष्ठ संबंध आहे.
संदर्भ : १) द. न. गोखले आणि इतर
२) संपा. प्रा. रा. श्री. जोग गौरवग्रंथ, पुणे, १९६४.
लेखक : म. ना. अदवंत
महिती स्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 3/21/2020