मध्यप्रदेश राज्यातील सर्वांत मोठे शहर आणि व्यापारी, औद्योगिक व शैक्षणिक केंद्र. लोकसंख्या ५,७२,६२२ (१९७१). क्षिप्रेची उपनदी खान आणि सरस्वाती ह्यांच्या काठांवर इंदूर वसले असून मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मुंबईपासून ७०४ किमी. ईशान्येस समुद्रसपाटीपासून सु. ५३० मी. उंचीवर आहे. खांडवा-अजमीर रेलमार्ग येथून जातो, तर इंदूर-उज्जैन रेल्वेमुळे इंदूर नागदा-भोपाळ रेलमार्गाशी जोडलेले आहे.
कंपालच्या जमीनदाराने प्रथम १७१५ च्या सुमारास येथे वस्ती केली. १७४१ मध्ये येथे बांधण्यात आलेल्या इंद्रेश्वर मंदिरावरून शहरास इंद्रपूर-इंदूर-इंदोर-इंदौर संज्ञा पडल्या. १८१८ मध्ये होळकरांनी आपली राजधानी महेश्वरहून येथे हलविली. समृद्ध माळव्यातील मोक्याच्या जागेवर वसल्याने आणि होळकरांची राजधानी आल्यामुळे इंदूरची भरभराट झाली.
धान्य (मुख्यतः गहू व बाजरी) आणि कापूस यांची मध्यप्रदेशातील ही महत्त्वाची बाजारपेठ असून येथे अनेक सूत व कापड गिरण्या आहेत. इंदूरी साड्या विशेष प्रसिद्ध आहेत. यांशिवाय येथे होजिअरी, कांबळी, तेल, अफू, आटा, रसायने, यंत्रे, फर्निचर, खेळसाहित्य, धातुकाम, दुग्धपदार्थ, बॉबिन इत्यादींचे उद्योग चालतात.
पूर्वी राजकुमारांसाठी संगमरवरात बांधलेले डेली कॉलेज, तसेच शेती, अभियांत्रिकी, वैद्यक इ. अनेक महाविद्यालये येथे असून १९६४ पासून इंदूर विद्यापीठाचे कार्य सुरू झाले आहे. होळकरांचे प्रासाद, नद्यांकाठच्या नक्षीदार छत्र्या, उद्याने, उत्तुंग हवेल्या यांमुळे इंदूरचे वैभव वाढले असून काच, आरसा व रंगीत मणी यांचा सुरेख उपयोग करून बांधलेले येथील जैनांचे काचमंदिर भारतातील प्रेक्षणीय वास्तूपैकी एक समजले जाते.
शाह, र. रू.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/22/2020
भाज्या, कडधान्ये, तृणधान्ये, बिया वेगवेगळया जीवनोप...
बनवावयाच्या वस्तू किंवा त्यांच्या उत्पादनाचे विधी ...
कामावर असताना झालेल्या अपघातामुळे वा आजारपणामुळे क...
दोन सार्वभौम राष्ट्रांमध्ये राजकीय, आर्थिक, औद्योग...