पृथ्वीतलावरील भारतीय उपखंड : एक नमुनाकृती
भारतातील सर्व घटकराज्ये व केंद्रशासित प्रदेश, भारतीय संविधान, भारतीय तत्त्वज्ञान, भारतीय कला, भारतीय वास्तुकला, प्रमुख भारतीय भाषा व त्याचे साहित्य इत्यादींवर स्वतंत्र नोंदी दिलेल्या आहेत. भारतातील पिके, उद्योगधंदे, शक्तिसाधने, रंगभूमी, चित्रपट, देशी-विदेशी खेळ इ. विषयांवरील नोंदीतून त्या त्या विषयाशी संबंधित अशी भारताची माहिती दिलेली आहे. उदा., चित्रपट या नोंदीत भारतातील विविधभाषी चित्रपटसृष्टीबद्दलची माहिती आली आहे. प्राचीन व अर्वाचीन काळातील विविध क्षेत्रांतील थोर आणि कर्तृत्वान अशा भारतीय व्यक्तींवरही स्वतंत्र नोंदी आहेत. वाचकाने विश्वकोशात भारतासंबंधीच्या इतरत्र आलेल्या नोंदी पाहिल्यास त्यातून भारतासंबंधीची अधिक माहिती मिळू शकेल.
देशनाम
भारतवर्ष (वर्ष म्हणजे आर्यपुराणप्रथेनुसार 'खंडा'चा विभाग) हे देशाचे प्राचीन नाव. त्याशिवाय अजनाभवर्ष, हैमवतवर्ष (वायुपुराण), कार्मुकुसंस्थान, कूर्मसंस्थान (मार्कंडेयपुराण) अशीही पौराणिक नावे आढळतात. ऋग्वेदात वर्णिलेल्या भरत नावाच्या मानववंशाचे वसतिस्थान व राज्य म्हणून किंवा भरत नावाचा ऋषभदेवाचा पुत्र अथवा दुष्यंत-शकुंतला यांच पुत्र या देशाचा सम्राट होता म्हणून याचे नाव भारत असे पडले असावे. नाभिपुत्र ऋषभाने आपला ज्येष्ठ पुत्र भरत याला राज्याभिषेक करून त्याला हैमवत नावाचे दक्षिणवर्ष राज्यकारभारासाठी दिले. हेच हैमवतवर्ष भरताच्या नावावरून भारत या नावाने ओळखले जाऊ लागले. वायुपुराणातील या उक्तीला भागवत आणि मार्कडेय ह्या पुराणातही पुष्टी दिलेली आहे. महाभारतात मात्र दुष्यंत-शकुंतलापुत्र भरत याच्या नावावरून या देशाला भारत हे नाव पडल्याचे म्हटले आहे. भारतामुळे येथील लोकांची कीर्ती झाली; त्यामुळे त्याच्या कुलाला भारतकुल व नंतर देशातले सर्व लोक याला भारत म्हणू लागले. डॉ. वासुदेवशरण अग्रवाल यांनी भारत या नावाविषयी दोन व्युत्पत्ती दिल्या आहेत : पहिल्या व्युत्पत्तीनुसार ऋग्वेदकाळात आर्याची भारत नावाची एक पराक्रमी शाखा होती. त्या शाखेने बिपाशा (सांप्रतची बिआस) व शतद्रु (सतलज) नद्या पार करून ज्या प्रदेशात आगमन केले व वसती केली, त्या प्रदेशाला ‘भरत जनपद’ असे म्हटले जाऊ लागले. या जनपदातल्या प्रजेला भारतीय प्रजा भारतीय म्हणून ओळखले जाई. या भरतजनांच्या आधारावर देशाच्या एका विशिष्ट भूभागाला भारत म्हटले जाऊ लागले. पुढे या भरतजनांनी ज्या प्रदेशावर आपली विस्तारली, त्या सर्व व्याप्त प्रदेशातलाही भारत हे नाव पडून पुढे संपूर्ण देशाचेच ते नाव रूढ झाले असावे. दुसऱ्या व्युत्पत्तीनुसार ऋग्वेदात यज्ञाग्नीला भारत असे म्हटले आहे. भारतजनांनी या भूमीवर प्रथम यज्ञाग्नी प्रज्वलित केला म्हणून या देशाला भारत हे नाव प्राप्त झाले असावे. शतपथ ब्राह्मणात व महाभारतातही अग्नीला भरत असे म्हटलेले आहे.
बौद्ध ग्रंथांमध्ये भारतास जंबुद्वीप (जंबू वृक्षांचा म्हणजे गुलाबी जांब असलेला खड) म्हटल्याचे आढळते. तथापि जंबुद्वीप हा एक मोठा भूप्रदेश असून त्याचा एक भाग म्हणजे भारत होय. पुराणातील उल्लेखानुसार भारत हा जंबुद्वीपाचा एक भाग असून तो नवखंडांत विभागलेला आहे. ही विभागणी गुप्तकाळात झाली असून याच काळात भारतीय संस्कृती, भाषा, धर्म, साहित्य यांचा विस्तार पूर्वेकडील बेटांतही झाला. भारताला पुराणात कुमारीद्वीप म्हटले असून भारताच्या दक्षिणेकडील कन्याकुमारी या देवीवरून ते पडलेले असावे. बृहत्तर भारतातील लोक मूळ भारताला कुमारीद्वीप या नावाने ओळखत असावेत.
जंबुद्वीप : जगाची पौराणिक संकल्पना.
हिंदुस्थान या नावानेही भारताला ओळखले जात असून हे नाव सिंधू नदीवरून पडले आहे. इराणी लोक सिंधूच्या पूर्वेकडील लोकांना हिंदू म्हणत. पेहलवी भाषेतील एका शिलालेखातही भारतवर्षाला हिंदू म्हटल्याचे आढळते, तर जैनांच्या निशीथचूर्णीत ‘इंदुक देश’ असा याचा उल्लेख आढळतो. प्राचीन ग्रीक भूगोलतज्ञांनी ख्रिस्तपूर्व चौथ्या व पाचव्या शतकांत सिंधु-हिंदू याला अनुसरूनच या देशाला ‘इंडोस’ असे म्हटले असून त्यावरूनच इंडिया आणि इंडिका ही नावे रूढ झाली. चिनी साहित्यात ‘चिन्तू’ (देवांचा देश) असा भारताचा उल्लेख असून ‘शिन्तू’ हे सिंधूचे चिनी रूप आहे. विष्णुपुराणात भारताच्या सीमा सांगताना असे म्हटले आहे, की समुद्राच्या उत्तरेस आणि हिमालयाच्या दक्षिणेस असलेले वर्ष म्हणजे भारतवर्ष व येथील प्रजा ती भारती प्रजा होय. वायुपुराणातही याला पुष्टी देऊन असे म्हटले आहे, की कन्याकुमारीपासून गंगेच्या उगमस्त्रोतापर्यतचा देश तो भारत होय.
स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदुस्थान या नावाने देश ओळखला जाई. परंतु स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत तसेच 'इंडिया' हे इंग्रजी नावही स्वीकारण्यात आले. भारताच्या नावाविषयीच्या वरील विवेचनावरून असे दिसते, की भारतातील लोकांनी भरत या संज्ञेचा पुरस्कार केला, तर परकीयांनी सिंधू शब्दावरून बनलेल्या हिंदुस्थान, इंडिया इ. नावांचा स्वीकार केला.
राजकीय विभाग
शासकीय दृष्टया भारताचे २२ घटकराज्ये व ९ केंद्रशासित प्रदेश असे एकू ३१ विभाग आहेत. आंध्र प्रदेश, आसाम, उत्तर प्रदेश, ओरिसा, कर्नाटक, केरळ, गुजरात, जम्मू व काश्मीर, तामिळनाडू, त्रिपुरा, नागालँड, पंजाब, पश्चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, मणिपूर, महाराष्ट्रा, मेघालय, राजस्थान, सिक्कम, हरयाणा, हिमाचल प्रदेश ही २२ घटकराज्ये; तर अंदमान व निकोबार बेटे, अरुणाचल प्रदेश; गोवा, दमण व दीव; चंडीगढ, दाद्रा नगरहवेली, दिल्ली, पाँडिचेरी, मिझोराम व लक्षद्वीप हे ९ केंद्रशासित प्रदेश आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने मध्य प्रदेश हे सर्वात मोठे राज्य (४,४२,८४१ चौ. किमी.), तर सिक्कीम हे सर्वात लहान राज्य (७,२९९ चौ. किमी.) आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने (१९८१) उत्तर प्रदेश हे सर्वात मोठे (११,०८,५८०१९-भारताच्या लोकसंख्येच्या १६.२१%), तर सिक्कम हे सर्वात लहान (३,१५,६८२-भारताच्या लोकसंख्येच्या ०.०५%) राज्य आहे. लोकसंख्येची सर्वाधिक घनता केरळ राज्यात (दर चौ.किमी.ला ६५४) व सर्वात कमी सिक्कीम राज्यात (दर चौ.किमी.ला ४४) आहे (१९८१).
चौधरी, वसंत
कमळ : भारताचे राष्ट्रीय फूल.
राष्ट्रध्वज
भारताचा राष्ट्रध्वज तिरंगी असून त्यात वरील भागी केशरी, मध्य भागी पांढरा व त्याखाली गडद हिरवा अशा तीन रंगातील समप्रमाण आडवे पट्टे असतात. त्यांतील पांढऱ्या पट्टावर मध्य भागी चरख्याचे निदर्शक असे गडद निळ्या रंगातील २४ आऱ्यांचे चक्र असून ते सारनाथ येथील अशोकस्तंभावरील चक्रानुरूप रेखलेले आहे. भारतीय संविधान समितीने २२ जुलै १९४७ रोजी हा राष्ट्रध्वज समत केला. भारतीय ध्वजसंहितेत राष्ट्रध्वजाचे आकारमान, वापर इत्यादींसंबंधी नियम दिलेले आहेत.
राष्ट्रीय चिन्ह व प्रतीक
सारनाथ येथील अशोकस्तंभावरील सिंहशीर्ष हे भारताचे राष्ट्रचिन्ह आहे. या राष्ट्रचिन्हातील तीन सिंह दिसतात व मागच्या बाजूचा चौथा सिंह दिसत नाही. या राष्ट्रचिन्हाच्या खाली ‘सत्यमेव जयते’ हे मुंडकोपनिपदातील वचन देवनागरी लिपीत कोरलेले आहे. या राष्ट्रचिन्हाच्या खाली मध्य भागी चक्र असून त्याच्या उजव्या व डाव्या बांजूस अनुक्रमे बैल व घोडा यांच्या शिल्पाकृती आहेत. हे राष्ट्रचिन्ह २६ जानेवारी १९५० रोजी स्वीकारण्यात आले. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी, भोर राष्ट्रीय पक्षी व कमळ हे राष्ट्रीय फूल आहे.
राष्ट्रगीत
रवींद्रनाथ टागोरांचे ‘जनगणमन’ हे गीत २४ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान समितीने ‘राष्ट्रगीत’ म्हणून स्वीकृत केले. अखिल भारतीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात २७ डिसेंबर १९११ रोजी ते पहिल्यांदा म्हटले गेले होते. मूळ गीतात पाच कडवी असून त्यांपैकी पहिले कडवे हे पूर्ण राष्ट्रगीत मानले जाते. राष्ट्रगीताचा वादनसमय ५२ सेकंदांचा आहे. काही विशिष्ट प्रसंगी राष्ट्रगीताची पहिली आणि शेवटची ओळ म्हणण्याचा (वादनसमय सु. २० सेकंद) संकेत आहे.
बंकिमचंद्र चतर्जी यांचे ‘वंदे मातरम्’ यालाही 'जनगणमन' इतकाच राष्ट्रगीत म्हणून दर्जा आहे. १८९६ सालच्या अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनात वंदेमातरम् हे गीत पहिल्यांदा म्हटले गेले सामान्यपणे सरकारी सभा-संमेलनाच्या अखेरीस जनगणमन हे राष्ट्रगीत म्हटले जाते. सार्वजनिक सभा-समारंभांतून अखेरीस वरील दोन्हीपैकी एक गीत विकल्पाने म्हटले जाते.
राष्ट्रीय पंचांग
भारताने २२ मार्च १९५७ पासून राष्ट्रीय पंचांग स्वीकारले असून ते शालिवाहन शकावर आधारलेले आहे. राष्ट्रीय पंचांग हे सौरमानाला धरून बनविलेले आहे. त्यानुसार वर्षाचे ३६५ दिवस व चैत्रादी बारा महिने असतात. तथापि शकसंवत्सराबरोबरच सामान्यपणे सर्व जगात ज्याचा वापर रूढ झालेला आह, ते ग्रेगरियन पंचांगही भारतात अधिकृतपणे वापरले जाते [⟶ पंचांग].
राष्ट्रीय दिन
भारताचा १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन व २६ जानेवारी हा प्रजासत्ताकदिन होय. ३० जानेवारी म्हणजे ज्या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे निर्वाण झाले, तो दिवस ‘राष्ट्रीय हुतात्मा दिन’ म्हणून पाळला जातो व त्या दिवशी सकाळी ११ वाजता देशभर दोन मिनिटे शातंता पाळून देशातल्या हुतात्म्यांस श्रद्धांजली वाहण्यात येते.
राजभाषा
देवनागरी लिपीतील हिंदी ही भारतीय संघराज्याची राजभाषा होय. भारतीय संविधानातील तरतुदींनुसार २५ जानेवारी १९६५ पर्यत इंग्रजी ही केंद्र सरकारची भाषा राहील व त्यानंतर इंग्रजीची जागा हिंदी घेईल, असे ठरविण्यात आले होते. तथापि हे व्यवहार्य नाही म्हणून तसेच दक्षिणेतील तमिळनाडूसारख्या राज्यांनी हिंदीच्या स्वीकारास विरोध केल्यामुळे १९६३ साली राजाभाषा अधिनियम दुरूस्त करण्यात आला व हिंदीबरोबरच राजभाषा म्हणून इंग्रजीचाही वापर चालू ठेवण्याची तरतूद करण्यात आली. दुरुस्त केलेल्या वरील अधिनियमाच्या तरतुदीनुसार १९७६ साली राजभाषा नियमावली तयार करण्यात आली. या नियमावलीनुसार उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, हरयाणा आणि दिल्ली ('अ' प्रदेश राज्ये) यांच्याशी केंद्र सरकारने करावयाचा पत्रव्यवहार हिंदीत असावा; पंजाब, गुजरात, महाराष्ट्र, चंडीगढ, अंदमान व निकोबार बेटे ('ब' प्रदेश राज्ये) यांच्याशी हिंदीतच किंवा विकल्पाने इंग्रजीतही पत्रव्यवहार असावा आणि यांच्याव्यतिरिक्त उरलेल्या घटकराज्यांशी केंद्र सरकारचा असणारा पत्रव्यवहार इंग्रजीत असावा, असे ठरविण्यात आले. केंद्र सरकारचा स्वतंत्र राजभाषा विभाग असून तो हिंदीच्या प्रसाराचे काम पाहतो.
नागरिकत्व
भारतीय संविधानातील अनुच्छेद ५ ते ११ अन्वये भारतीय नागरिकत्वविषयी तरतुदी करण्यात आल्या आहेत. २६ जानेवारी १९५० रोजी जी व्यक्ती भारतात राहत होती किंवा जन्मास आली अथवा आई-वडिलांपैकी कोणीतरी भारतात जन्मले, किंबहुना तत्पूर्वी पाच वर्षे जी व्यक्ती देशाच्या कोणत्याही भागात वास्तव्य करीत होती, अशी व्यक्ती भारताची नागरिक समजण्यात येते. १९५५ सालच्या नागरिकत्व अधिनियमानुसार भारतीय नागरिकत्व मिळण्याचे वेगवेगळे निकष नमुद केले आहेत [⟶ नागरिकत्व].
जाधव, रा. ग.
कोष्टक क्र. १ भारतरत्न पुरस्कार विजेते
|
नाव |
वर्षे |
चक्रवर्ती राजगोपालाचारी
|
१९५४
|
सर्वपल्ली राधाकृष्णन्
|
१९५४
|
चंद्रशेखर रमण
|
१९५४
|
भगवान दास
|
१९५५
|
मोक्षगुंडम् विश्वेश्वरैया
|
१९५५
|
जवाहरलाल नेहरू
|
१९५५
|
गोविंदवल्लभ पंत
|
१९५७
|
धोंडो केशव कर्वे
|
१९५८
|
बिधनचंद्र रॉय
|
१९६१
|
पुरुषेत्तमदास टंडन
|
१९६१
|
राजेंद्रप्रसाद
|
१९६२
|
पां. वा. काणे
|
१९६३
|
झाकिर हुसेन
|
१९६३
|
लालबहादुर शास्त्री
|
१९६६
|
इंदिरा गांधी
|
१९७१
|
बराहगिरी वेंकटगिरी
|
१९७४
|
के. कामराज
|
१९७६
|
मदर तेरेसा
|
१९८०
|
विनोबा भावे
|
१९८३
|
राष्ट्रीय पुरस्कार
राष्ट्रीय पुरस्कारांचे स्थूलमानाने चार गट पडतात : (१) नागरी पुरस्कार, (२) शौर्य पुरस्कार, (३) विशेष सेवा पुरस्कार व (४) अर्जुन पुरस्कार.
नागरी पुरस्कारांत भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण व पद्मश्री हे चार प्रकार आहेत. त्यांपैकी भारतरत्न हा देशातील सर्वोच्च असा नागरी पुरस्कार होय (कोष्टक क्र. १). १९५४ पासून हे नागरी पुरस्कार देण्यास सुरूवात झाली. १९७७ मध्ये केंद्रीय जनता शासनाने हे नागरी पुरस्कार देणे बंद केले होते; तथापि १९८० पासून काँग्रेस (इं.) शासनातर्फे हे पुरस्कार पुन्हा सुरू करण्यात आले.
शौर्य पुरस्कारांत परमवीर चक्र, महावीर चक्र, वीर चक्र, अशोक चक्र, कीर्ती चक्र, शौर्य चक्र असे प्रमुख प्रकार आहेत. यांशिवाय सेना पदके, नौसेना पदके व वायुसेना पदकेही दिली जातात. विशिष्ट सेवा पुरस्कारांत परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक विशिष्ट सेवा पदक असे प्रकार आहेत. खेळ, क्रीडा आणि शरीरसौष्ठव इत्यादींतील खास नैपुण्याबद्दल अर्जुन पुरस्कार दिले जातात. यांशिवाय राष्ट्रीय स्तरावर काही शासकीय विभागांतर्फे त्या त्या क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना पुरस्कार दिले जातात. इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च, साहित्या अकादमी, ललित कला अकादमी, संगीत-नाटक अकादमी, नॅशनल ॲकॅडेमी ऑफ मेडिकल सायन्सेस इ. शासकीय विभागांतर्फे असे पुरस्कार दिले जातात. भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार हा साहित्याच्या क्षेत्रातील खाजगी संस्थेमार्फत देण्यात येणारा देशातील सर्वोच्च वाङमयीन पुरस्कार होय. कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा या क्षेत्रांत श्रेष्ठ प्रतीचे कार्य करणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रपतींकडून भारतरत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. जानेवारी १९५४ पासून हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. याखेरीज देशातील घटकराज्यशासनांनार्फत विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींना शासकीय पुरस्कार देण्यात येतात.
स्त्रोत - मराठी विश्वकोश