भारतीय द्वीपकल्पावरील महाराष्ट्र–मध्य प्रदेश या राज्यांदरम्यानची एक पर्वतश्रेणी. विंध्य पर्वताच्या दक्षिणेस विंध्यला साधारण समांतर अशी ही पर्वतश्रेणी आहे. मध्य भारतातील पूर्व-पश्चिम गेलेल्या या दोन पर्वतश्रेण्यांनीच उत्तर भारतीय मैदान व दक्षिणेकडील दख्खनचे पठार हे भारताचे दोन मुख्य प्राकृतिक विभाग अलग केले आहेत. गुजरातमधील अरबी समुद्रकिनाऱ्यापासून सुरू होऊन पूर्वेस महाराष्ट्र, मध्य प्रदेश व छत्तीसगढ राज्यांपर्यंत या श्रेणीचा विस्तार आढळतो. उत्तरेकडील नर्मदा व दक्षिणेकडील तापी या एकमेकींना साधारण समांतर वाहत जाणाऱ्या दोन पश्चिमवाहिनी नद्यांच्या खचदऱ्या या श्रेणीमुळे अलग झाल्या आहेत. म्हणजेच सातपुड्याची उत्तर सीमा नर्मदेने व दक्षिण सीमा तापी-पूर्णा या नद्यांनी सीमित केली आहे.
सातपुडा पर्वतश्रेणीला ‘सातपुडा’ हे नाव कसे पडले याविषयी अनेक आख्यायिका आहेत. या पर्वतात एकामागे एक अशा सात डोंगररांगा किंवा सातपुडे (सातवळ्या) ६०० मी. उंचीपर्यंत चढत जातात व नर्मदा नदीकडे एकदम उतरताना दिसतात. त्या रांगा एकमेकींना समांतर व घडीसदृश दिसतात. त्यावरून त्यांस सातपुरा-सातपुडा (सेव्हन फोल्ड्स) असे म्हणतात. या सात डोंगररांगा म्हणजे विंध्य पर्वताचे सात पुत्र आहेत असे मानले जाते; म्हणून त्यास सातपुत्र (सेव्हन सन्स) संबोधतात, अशी एक आख्यायिका आहे. सांप्रत या संपूर्ण श्रेणीस सातपुडा म्हणतात.
गुजरातमधील रतनपूरपासून पूर्वेस अमरकंटकपर्यंत पसरलेल्या सातपुडा या श्रेणीची लांबी सु. ९०० किमी. असून कमाल रुंदी सु. १६० किमी. पेक्षा अधिक आढळते. भारतातील सर्वांत प्राचीन पर्वतश्रेण्यांपैकी ही एक आहे. ही भारतीय द्वीपकल्पावर पूर्व-पश्चिम पसरलेली व अधिक उंचीची प्राचीन भूसांरचनिक पर्वतश्रेणी आहे. तिच्यातील अनेक शिखरे १,००० मी. पेक्षा अधिक उंचीची आहेत. अगदी काही भागच ५०० मी. पेक्षा कमी उंचीचा आहे. या श्रेणीचा आकार साधारणपणे त्रिकोणाकृती असून तिचा पाया अगदी पूर्वेस उत्तर-दक्षिण पसरलेल्या मैकल डोंगररांगेचा असून शिरोभाग पश्चिमेस रतनपूर येथे येतो. सातपुड्याने एकूण सु. ७५,००० चौ. किमी. क्षेत्र व्यापले आहे. काही वेळा, परंतु चुकीने विंध्य पर्वतांतर्गतच सातपुडा पर्वताचा समावेश केला जातो. सह्याद्री (पश्चिम घाट) व सातपुडा हे एकमेकांशी काटकोनात पसरलेले पर्वत असून सातपुडा हा सह्याद्रीचाच विस्तारित भाग असल्याचा एक मतप्रवाह आहे.
सातपुड्याचा काही भाग वलीकरण व ऊर्ध्वगामी भूहालचालीतून निर्माण झाल्याचे काही पुरावे मिळतात. मुख्य सातपुड्याचे भूकवच दक्षिण ट्रॅप खडकांनी आच्छादलेले आहे; काही ठिकाणी स्फटिकी खडकांचे आच्छादन आढळते. पंचमढीच्या परिसरात वालुकाश्म खडक उघड्या स्वरूपात दिसून येतात, तर मंडलामधील उंच शिखरे जांभ्या खडकांतील आढळतात. सातपुडा पर्वताचे पश्चिमेकडून पूर्वेकडे स्पष्टपणे तीन भाग दिसतात. अगदी पश्चिमेकडे सातपुडा किंवा राजपीपला टेकड्या, मध्य भागात बेतूल पठार, महादेव व गाविलगड टेकड्या तर पूर्वेकडे मैकल श्रेणी असे हे तीन भाग आहेत. त्यांची सरासरी उंची ९०० मी.च्या दरम्यान असून कमी उंचीच्या पठारी प्रदेशांनी ते एकमेकांना जोडले आहेत. प्रामुख्याने असिरगड येथील, तसेच जबलपूरच्या दक्षिणेकडील अशा दोन खंडांनी (गॅप) सातपुडा पर्वतश्रेणीचा संपूर्ण प्रदेश खंडित झाला आहे.
या पर्वतश्रेणीचा अगदी पश्चिमेकडील भाग मुख्यतः सातपुडा नावाने ओळखला जात असला, तरी राजपीपला टेकड्या हे स्थानिक नाव पश्चिम भागासाठी प्रचलित आहे. राजपीपला टेकड्यांमुळे नर्मदा व तापी नद्यांची खोरी स्पष्टपणे अलग झालेली दिसतात. हा उंच भाग बेसॉल्ट खडकांपासून तयार झालेला असून सुळके व तीव्र उताराचे कटक असे त्याचे स्वरूप आहे. पश्चिम भागातील मुख्य सातपुडा म्हणजे लाव्हापासून बनलेले अगदी तीव्र उताराचे गटपर्वत दिसतात. महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील सातपुडा
पर्वतश्रेणीत असलेल्या तोरणमाळ पठाराची उंची सु.१,००० मी. आहे. याच भागात तोरणमाळ (१,०३६ मी.) हे गिरिस्थान आहे. येथील गोरखनाथ मंदिर प्रसिद्घ आहे. बऱ्हाणपूर-खांडवा दरम्यान ही श्रेणी खंडित झालेली असून त्या खंडातील सस.पासूनची उंची ३६५ मी. आहे. या खंडभागातून मुंबई-आग्रा लोहमार्ग जातो. याच भागात अशिरगड हा डोंगरी किल्ला आहे. हा खंड एकेकाळी नर्मदा नदीखोऱ्याने व्यापला असावा, असा अंदाज वर्तविला जातो. नर्मदा खोऱ्याकडे विशेषतः तिच्या देवगंगा व गोई या उत्तरवाहिनी उपनद्यांच्या दरम्यान ही रांग अधांतरी किंवा झुकल्याप्रमाणे दिसते.
सातपुडा पर्वतश्रेणीत असलेल्या उंच पठारी प्रदेशांतील बेतूल व मैकल ही दोन पठारे महत्त्वाची आहेत. सातपुड्याचा मध्यभाग बेतूल या लाव्हाजन्य पठाराने व्यापला असून तो उत्तरेस महादेव टेकड्यांनी, तर दक्षिणेस गाविलगड टेकड्यांनी सीमित केलेला आहे. बेतूल पठाराची उंची १,२०० मी. पर्यंत वाढत गेली असून त्याचा माथा घरंगळणी स्वरूपाचा व गवताळ आहे. सातपुड्याची मध्य भागातील रुंदी बऱ्यापैकी वाढलेली असून तेथे अरीय स्वरूपाची नदीप्रणाली निर्माण झाली आहे. यातील महादेव टेकड्या म्हणजे आर्कियन व मध्य गोंडवनकालीन एक मोठी भूसांरचनिक खिडकी (टेक्टॉनिक विंडो) आहे.
महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील डोंगरांना मेळघाट, गाविलगड टेकड्या असे म्हणतात. तापी नदीच्या खिंडारानंतरचा (गॅप) मेळघाट हा सातपुड्याचाच विस्तारित भाग आहे. येथील चिखलदरा पठाराची उंची सु. १,२०० मी. आहे. चिखलदरा (१,११५ मी.) हे यातील प्रमुख थंड हवेचे ठिकाण आहे. गाविलगड टेकड्या म्हणजे दख्खनी लाव्ह्यातील एक ‘हॉर्स्ट’ (ठोकळ्या पर्वतसदृश भूविशेष) असल्याचे मानले जाते. गाविलगड हा इतिहासप्रसिद्घ किल्ला येथे आहे. येथे तांबड्या वालुकाश्मातील अनेक लहानलहान पठारी भाग आहेत. त्यांचे उत्तरेकडील उतार मंद, तर दक्षिणेकडील उतार कड्यांसारखे तीव्र स्वरूपाचे आहेत.
उताराची दक्षिणेकडील उंची १,२०० मी. वरून एकदम ३०० मी. पर्यंत कमी झालेली दिसते. तेथील कडे पूर्वईशान्य दिशेत दूरपर्यंत पसरलेले आढळतात. सातपुड्यातील सर्वोच्च शिखर धूपगढ (१,३५८ मी.) हे महादेव डोंगररांगांत असून ते पंचमढी (१,०६७ मी.) या गिरिस्थानापासून ८ किमी.वर आहे. चौरागढ (१,३१६ मी.) हे दुसरे शिखर याच भागात असून ते आदिवासींचे धार्मिक ठिकाण आहे. पंचमढी (मध्य प्रदेश) परिसरात मोठ्या प्रमाणात वैविध्यपूर्ण वनस्पती व प्राणिजीवन आढळते. नद्यांची खोरी, शिखरे, खडकाळ भूप्रदेश यांमुळे मार्गनिरीक्षण (ट्रेकिंग), मासेमारी व इतर पर्यटनविषयक गोष्टींच्या उपलब्धतेमुळे पंचमढीचा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने प्रसिद्घ आहे.
प्रस्तरभंग झाल्याचे स्पष्ट पुरावे आढळले नसले, तरी कड्यांच्या रेखीय स्वरूपावरून येथील कड्यांच्या निर्मितीस काही प्रमाणात भ्रंशमूलक हालचाली कारणीभूत असल्याचे स्पष्ट होते. येथील खडकरचना दक्षिण ट्रॅप प्रकारची असून काही ठिकाणी त्याखाली नीस खडक आहेत. मंडलामधील तसेच छिंदवाड्याच्या उत्तरेकडील सातपुडा पठारी प्रदेश ज्वालामुखी क्रियेतून तयार झालेल्या ओबडधोबड टेकड्यांचा विस्तृत भाग आहे. त्यातील बऱ्याचशा भागात ओबडधोबड टेबललँड, उघडे खडकाळ कटक व नद्यांची अरुंद सुपीक खोरी आढळतात. नद्यांच्या संचयन कार्यातून ही सुपीक खोरी तयार झालेली आहेत. बेतूलजवळील माचना व सिपना खोऱ्यांसारख्या काही सपाट पट्ट्यात तसेच सिवनी व छिंदवाडा दरम्यानच्या उघड्या मैदानात विस्तृत अशी उत्पादक भूमी आहे. मैदानी भागाकडून एकदम उंच वाढत गेलेल्या सपाट माथ्याच्या टेकड्या पठारी भागावर विखुरलेल्या व एकाकी स्वरूपात आढळतात. येथील रस्त्यांवरून जाताना उत्तरेकडील तसेच दक्षिणेकडील वनाच्छादित टेकड्यांचे सौंदर्य विशेष नावीन्यपूर्ण दिसते.
सातपुड्याच्या अगदी पूर्व भागात जबलपूर खंडाच्या पूर्वेस मैकल पठार हा एका मोठ्या बुरुजासारखा पर्वतीय भाग आहे. या पठाराची उंची ४५०–९०० मी. च्या दरम्यान आहे. पठाराची पूर्वकड मैकल पर्वतरांगेच्या पूर्वाभिमुख अशा तुटलेल्या कड्यांच्या मालिकांनी सीमित केलेली आहे.
राजनांदगाव ते अमरकंटक पठार अशी ईशान्य दिशेत मैकल श्रेणी पसरली आहे. त्यानंतर ही श्रेणी पुढे वायव्येस वळून जबलपूरच्या उत्तरेस विंध्य पर्वताला मिळते. मुख्य मैकल श्रेणी म्हणजे भारताची प्राचीनकालीन पूर्व किनारपट्टी असावी. तसेच येथील प्राचीन कडाप्पा समुद्रात गाळाचे संचयन झाल्यामुळेच ट्रॅपकालीन लाव्हारस आणखी पूर्वेस वाहत जाण्यास अडथळा निर्माण झाला असावा, असाही एक मतप्रवाह आढळतो. मैकल श्रेणीतच अमरकंटक (१,०६५ मी.) व बहमनगड (१,१२४ मी.) ही गिरिशिखरे आहेत. अमरकंटक पठारावरच सस.पासून १,०५७ मी. उंचीवरील एका झऱ्यातून नर्मदा नदीचा उगम होतो. नर्मदा व तिच्या उपनद्यांनी या श्रेणीचे खनन करून खोल दऱ्या निर्माण केल्या आहेत.
अगदी पूर्व भागात एका लाव्हाजन्य अरुंद कटकाने जोहिला (शोणची उपनदी) या वैशिष्ट्यपूर्ण नदीचे खोरे शोण नदीच्या रुंद खोऱ्यापासून अलग केले आहे. तसेच मैकल श्रेणीचा एक बाह्यकटक अमरकंटकपासून नैर्ऋत्येस सु. १६० किमी. अंतरावर असलेल्या बालाघाट जिल्ह्यातील सालेटेक्री टेकड्यांपर्यंत विस्तारलेला आहे. या पठारी भागाचा उतार वायव्येकडे आहे. छत्तीसगढच्या बाजूला ९१५–१,०६७ मी. च्या दरम्यान असलेली उंची मंडलाजवळ सु. ६१० मी. पर्यंत कमी झालेली दिसते. पूर्वेस छोटा नागपूर पठारावरील डोंगररांगांना सातपुडा पर्वतश्रेणी मिळते.
सातपुडा पर्वताच्या उत्तरेकडील श्रेणीत सर्वाधिक उंचीची शिखरे आढळतात. येथील उल्लेखनीय भूवैशिष्ट्य असे की, या टेकड्यांमधून अधिक उंचीचे अनेक लहानलहान टेबललँड आढळतात. पंचमढी, धूपगढ, चौरागढ, असिरगड, अमरकंटक, गाविलगड, जंबुद्वीप, बी फॉल, चिखलदरा, तोरणमाळ इ. अनेक गिरिस्थाने व पर्यटनकेंद्रे सातपुड्यात आहेत. तोरणमाळ हा पठारी भाग म्हणजे एक लांबट व अरुंद टेबललँड असून त्याचे क्षेत्रफळ ४१ चौ. किमी. आहे. याच्या पश्चिमेस उत्तरेकडील नर्मदा व दक्षिणेकडील तापी या दोन्ही नद्यांच्या खोऱ्यांकडील पर्वतीय श्रेणी तटासारखी अगदी तीव्र उताराची दिसते. पूर्वेकडील तासदीन खोऱ्याकडील प्रदेश निसर्गसुंदर दिसतो. बालाघाट जिल्ह्यातील रायगड (६७७ मी.), बेतूल जिल्ह्यातील आमला (१,१८५ मी.) हे पशुपालनाच्या दृष्टीने महत्त्वाचे गवताळ प्रदेश आहेत.
भारतातील हिमालयाखालोखाल विंध्य-सातपुडा हा प्रमुख जलोत्सारक आहे. अमरकंटक पठारावरून नर्मदा, शोण, महानदी, वैनगंगा या नद्यांचे शीर्षप्रवाह बाहेर पडतात. या पर्वताच्या उत्तर उताराचे नर्मदा व शोण नद्यांनी, तर दक्षिण उताराचे जलवाहन तापी, वर्धा, वैनगंगा, ब्राह्मणी व इतर नद्यांनी केलेले असून त्यांची उगमस्थाने याच पर्वतश्रेणीत आहेत. त्यांपैकी नर्मदा नदी उगमानंतर बेसॉल्ट खडकातील कड्यांवरून वेगाने १५० मी. पर्यंत खाली उतरते. मंडलापर्यंत नागमोडी वळणाने वाहत गेल्यावर पुढे उत्तरवाहिनी होऊन जबलपूरच्या दिशेने खडकाळ पात्रातून निर्माण झालेल्या द्रुतवाहांवरून ती वाहत जाते. त्यानंतर पश्चिमवाहिनी होऊन गुजरातमधील भडोचजवळ खंबायतच्या आखातामार्गे अरबी समुद्राला मिळते. नर्मदा नदीच्या उगमस्थानापासून जवळच शोणभद्र येथे शोण नदी उगम पावते. अमरकंटक उच्चभूमीच्या खडकाळ प्रदेशातील सोपानी प्रपातांवरून ती खाली उतरत जाते.
नर्मदा नदीच्या उगमस्थानापासून जवळच अर्पा ही शिवनाथ नदीची उपनदी उगम पावते. शिवनाथ ही महानदीची उपनदी आहे. दख्खनच्या पठारावरील तापी व नर्मदा वगळता इतर सर्व नद्या पूर्ववाहिनी आहेत. या दोन नद्यांनी इतर नद्यांप्रमाणे खननाने स्वतःची पात्रे स्वतः तयार केलेली नसून त्या प्रदेशाच्या नैसर्गिक उताराच्या विरुद्घ दिशेने खचऱ्यांमधून वाहतात. मध्य तसेच पूर्वेकडील पर्वतश्रेणींचे जलवाहन गोदावरी व तिच्या उपनद्यांनी, तर अगदी पूर्वेकडील भागाचे जलवाहन महानदीने केलेले आहे. गोदावरी व महानदी या दोन्ही पूर्ववाहिनी नद्या आहेत.
सातपुडा पर्वतीय प्रदेशातून वाहणाऱ्या वेगवेगळ्या नद्यांवर अनेक लहानमोठी धरणे बांधण्यात आली आहेत. त्यांपैकी नर्मदेच्या खोऱ्यातील धरणांना विशेष महत्त्व आहे.स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच नर्मदा खोऱ्यातील प्रकल्प चर्चेत आहेत. सरदार वल्ल्भभाई पटेल यांनी १९४७ मध्ये नर्मदेवरील सरदार सरोवराचा उच्चार केला होता. पं.जवाहरलाल नेहरू यांनी १९६१ मध्ये नर्मदा प्रकल्पाची कोनशिला बसविली. सन १९६९ मध्ये नर्मदा आयोगाची स्थापना झाली. दहा वर्षांनी म्हणजे १९७९ मध्ये आयोगाचा अहवाल आला.
भारत सरकारने १९८७ मध्ये या योजनेला, तर १९८८ मध्ये या योजनेच्या खर्चास मंजुरी दिली. आयोगाने मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र व राजस्थान या चार राज्यांसाठी नर्मदेच्या पाण्याची वाटणी केली. नर्मदा खोरे प्रकल्पांतर्गत या राज्यांसाठी जलसिंचन व जलविद्युत्निर्मितीसाठी नर्मदेवर तसेच तिच्या उपनद्यांवर एकूण ३० मोठी व १३५ मध्यम आकाराची धरणे आणि सु. ३,००० छोटे बांध असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यांमध्ये सरदार सरोवर (भडोच जिल्हा, गुजरात); नर्मदा सागर, ओंकारेश्वर धरण (खांडवा जिल्हा, मध्य प्रदेश) व महेश्वर (खरगोण जिल्हा, मध्य प्रदेश) हे चार विशेष महत्त्वाचे प्रकल्प असून चिनकी, बार्गी, बस्तनिया, रोसरा, राघवपूर व अप्पर नर्मदा हेही तसेच मोठे प्रकल्प आहेत. जलसिंचन व जलविद्युत्निर्मितीबरोबरच या प्रकल्पांपासून उद्योगधंद्यांसाठी, लोकांना पिण्यासाठी व घरगुती वापरासाठीही पाणी उपलब्ध होणार आहे. त्याशिवाय पुरापासून संरक्षण आणि अनेकांना रोजगार मिळणार आहे.
नवागाव येथील सरदार सरोवर हे यांतील सर्वांत मोठे धरण आहे. त्याची लांबी १,२१० मी., उंची १२१·९२ मी. (नियोजित १३६·५ मी.) आहे. त्याच्या उत्सारण मार्गावर २३ दरवाजे बसविले आहेत. धरणापासून भिजणारे क्षेत्र ३·५ लाख हे. असून ९५० मेवॉ. वीजनिर्मिती होते. पुनखा येथे असलेल्या नर्मदा (इंदिरा) सागर प्रकल्पाची लांबी ६५३ मी., उंची ९२ मी., जलसिंचन क्षेत्र १·२३ लाख हे. व वीजनिर्मिती १,००० मेवॉ. आहे. मांधाता येथील ओंकारेश्वर प्रकल्पाची लांबी ९४९ मी., उंची ७३ मी., जलसिंचन क्षेत्र १·४७ लाख हे. व वीजनिर्मिती ५२० मेवॉ. आहे. मंडलेश्वर येथे ८२५ मी. लांबीचे व ३५ मी. उंचीचे महेश्वर धरण असून त्यापासून ४०० मेवॉ. वीजनिर्मिती होते.
नर्मदेवरील सरदार सरोवर या धरणाच्या उंचीतील वाढीविरोधात नर्मदा बचाव आंदोलकांनी १९९४ मध्ये सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यांच्या मते या धरणाची उंची वाढविली गेल्यास अनेक लोक विस्थापित होणार असून धरणापासून होणाऱ्या लाभापेक्षा पर्यावरणाचा ऱ्हास अधिक होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने सन २००० मधील आपल्या न्यायनिर्णयात या धरणाची उंची वाढविण्यास परवानगी देताना, या प्रकल्पाच्या उपयुक्ततेसंदर्भात अनुकूल मत नोंदविताना असे स्पष्ट केले आहे की, या प्रकल्पामुळे जे मानवी नुकसान व पर्यावरणाची हानी होणार आहे; त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक लाभ मिळणार आहेत. दीर्घकालीन व भावी पिढ्यांचा विचार करता हे धरण आवश्यक आहे. अवर्षणप्रवण क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने तसेच वीज टंचाईवर मात करण्याच्या दृष्टीने नर्मदेचे समुद्राला जाणारे पाणी अडविणे गरजेचे असून अशा प्रकल्पांशिवाय अन्य पर्याय नाही.
सातपुडा पर्वतश्रेणीचा परिसर पूर्वी दाट अरण्यांनी आच्छादलेला होता. वनसंवर्धनाचे धोरण अवलंबिण्यापूर्वी झालेली बेसुमार जंगलतोड, आदिवासींकडून स्थलांतरित शेतीसाठी जाळली जाणारी वने व केली जाणारी जंगलतोड यांमुळे बरीच वने विरळ किंवा नष्ट झालेली आहेत. तथापि अजूनही सातपुडा पर्वतश्रेणीतील डोंगररांगा व त्यांच्या उतारावरील हजारो चौ. किमी. क्षेत्र वनाच्छादित आहे; परंतु ही वने आर्थिकदृष्ट्या विशेष उपयुक्त नाहीत.
सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये साग, साल, हिरडा, महुआ, खैर, शिसवी, पळस, सालई, अंजन, ऐन (साजा), धावडा, बांबू, लिंब, आंबा, जांभूळ, चिंच, करंज, बाभूळ इ .वृक्षप्रकार आढळतात. पूर्वेकडील डोंगररांगांतील साल वृक्षांची व पश्चिमेकडच्या प्रदेशातील साग वृक्षांची वने हीच काय ती आर्थिक दृष्ट्या विशेष महत्त्वाची आहेत. सातपुड्याच्या पश्चिम भागापेक्षा पूर्व भागात अधिक पाऊस पडतो. त्यामुळे पश्चिम भागात उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी, तर पूर्व भागात आर्द्र पानझडी वने आढळतात. याशिवाय मिश्र अरण्येही येथे आहेत. बांबूची वने सर्वत्र पहावयास मिळतात.
सातपुड्यातील वनांमध्ये गवा, हरिण, वानर, ससे, काळवीट, रानडुकरे, चित्ता, तरस, लांडगा, कोल्हा, अस्वल, बिबळ्या, नीलगाय, सांबर, चितळ (ठिपक्यांचे हरिण) इ. प्राणी तसेच कारंड, हंस, मोर, जलकपोत, घार, गिधाड, खंड्या, ससाणा, गरुड, तितर, कबूतर, पोपट, लावा, बुलबुल, पाणकावळा, शिंपी इ. पक्षी आढळतात. यावल, आंबाबरवा, व्हॅन, नर्नाळा, गुगामल, मेळघाट, पेंच, कान्हा, सातपुडा नॅशनल पार्क, पंचमढी व बोरी यांसारखे काही संरक्षित प्रदेश सातपुडा पर्वतीय भागात आहेत.
सातपुड्यातील महादेव टेकड्यांच्या दक्षिण भागात काही प्रमाणात मँगॅनीजचे उत्पादन घेतले जाते, तर छिंदवाडाजवळील पेंच नदीच्या खोऱ्यात दगडी कोळशाचे साठे आहेत. याशिवाय बॉक्साइट, ग्रॅफाइट, डोलोमाइट, चुनखडी, जिप्सम, निकेल, अभ्रक, लोह धातुक इ. खनिजांचे साठे सातपुडा परिसरात आहेत.
आर्थिकदृष्ट्या संपूर्ण सातपुडा प्रदेशच काहीसा मागासलेला आहे. लाकूडतोड, पशुपालन, शेती, लाकडापासून कोळसा तयार करणे, डिंक, लाख, मध, मोहाची फुले व तेंदूची पाने गोळा करणे हे येथील लोकांचे व्यवसाय आहेत. महादेव टेकड्यांच्या दक्षिणेकडील वैनगंगा व पेंच नद्यांच्या वरच्या टप्प्यातील लहानलहान मैदानी प्रदेशांत गहू, ज्वारी, बाजरी, मका, भात तसेच काही प्रमाणात कापूस व ऊसाचे उत्पादन घेतले जाते. बऱ्हाणपूर खंड वगळता इतरत्र शेतीचे स्वरूप तुकड्यातुकड्यांचे आहे. पूर्वेकडील अधिक उंचीच्या प्रदेशात गोंड आदिवासी जमाती स्थलांतरित स्वरूपाची शेती करतात. सातपुड्याच्या काही भागांत लाकूडतोड व पशुपालन व्यवसाय विशेष महत्त्वाचे आहेत. खांडवा-इटारसी लोहमार्गावरील काही छोट्या छोट्या नगरांत लाकडाच्या वखारी व लाकडी कोळसा तयार करण्याच्या भट्ट्या आढळतात.
आर्य लोकांच्या आगमनानंतर त्यांनी येथील आर्येतर रहिवाशांना मैदानी प्रदेशातून पिटाळून लावले, तेव्हा त्यांनी सातपुडा पर्वतश्रेणीतील वनाच्छादित टेकड्यांमध्ये आश्रय घेतला. त्यांनी येथील खडकाळ, ओसाड डोंगर उतारांवर शेती व्यवसायास सुरूवात केली. अजूनही बेताचा पाऊस पडणाऱ्या या प्रदेशात ते बारीक तृणधान्य, बार्ली यांसारखी पिके घेतात. स्थलांतरित शेतीबरोबरच ते उदरनिर्वाहासाठी जंगलातील फळे, कंदमुळे गोळा करतात, तसेच शिकार करतात. गोंड, कोरकू, भिल्ल, बैगा, कोल, कातकरी, मावची, पावरे, धनका, कमार, मुडिया, माडिया, भराई, हलवा ह्या येथील आदिवासी जमाती आहेत. तसेच भटके बंजारी, मेंढपाळ करणारे ठेलारी आणि शिकार करणारे फासेपारधी लोकही या प्रदेशात आढळतात. लगतच्या प्रदेशातील पुढारलेल्या लोकांच्या संपर्कात आल्यामुळे आदिवासी लोकांचा आर्थिक व सामाजिक विकास होऊ लागला आहे.
तसेच शासनाच्या आदिवासी विकासाच्या विविध योजनांच्या माध्यमातून येथील आदिवासी जमातींचा विकास घडून येत आहे. सातपुडा पर्वतात अनेक खिंडी आहेत. त्यांपैकी काही खिंडींतून रस्ते व लोहमार्ग जातात.या खिंडींमार्गे धान्य, मोहाची फुले, मध, मेण, डिंक, लाख, राळ इ. अरण्योत्पादनांचा मोठा व्यापार चालतो. अलीकडच्या काळात या पर्वतीय प्रदेशांतून बांधण्यात आलेल्या पक्क्या रस्त्यांमुळे तसेच लोहमार्गांमुळे लोकांना प्रवास करता येऊ लागला असून येथील व्यापारात वृद्घी झाली आहे. तापी व नर्मदा खोऱ्यांत दाट वस्ती आहे; मात्र पर्वतीय प्रदेशात वस्ती विरळ आहे. खांडवा व बऱ्हाणपूर वगळता फार मोठी नगरे सातपुडा प्रदेशात आढळत नाहीत.
लेखक - वसंत चौधरी
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/26/2020
कार्पेथियन : मध्य व पूर्व यूरोपातील पर्वतश्रेणी. ह...
चलेन : नॉर्वे व स्वीडन यांच्या सीमेवरील पर्वतश्रेण...
अॅपालॅचिअन पर्वत : उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनार्...
खांगाई : मंगोलिया प्रजासत्ताकाच्या पश्चिममध्य भागा...