गोवा, दमण, दीव : पोर्तुगीजांच्या सत्तेतून १९६१ मध्ये मुक्त झालेले भारताचे भाग. लोकसंख्या ८,५७,७७१ (१९७१). पैकी गोवा ७,९५,१२०; दमण ३८,७३९; दीव २३,९१२. क्षेत्रफळ ३,८१३ चौ. किमी. पैकी गोवा ३,७०१ चौ.किमी., दमण ७२ चौ. किमी., दीव ४० चौ. किमी. आता हे भाग उपराज्यपालद्वारा केंद्रशासित आहेत.
थरचे वाळवंट : भारतीय उपखंडातील सर्वांत मोठे वाळवंट. क्षेत्र सु. २,५९,००० चौ. कीमी. असून हे कच्छच्या रणापासून उत्तर वायव्येकडे ८०५ किमी. आणि अरवली पर्वतापासून वायव्येस ४८३ किमी. सिंधू नदीच्या खोऱ्यापर्यंत पसरलेले आहे. भारत–पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय सीमा या वाळवंटातून जाते. पूर्वी या वाळवंटाला ‘मरुस्थली’ म्हणत. यालाच ‘भारताचे मोठे वाळवंट’ म्हणतात.
मलबार : भारताच्या पश्चिम किनारपट्टीपैकी साधारणतः गोव्याच्या दक्षिणेकडील किनाऱ्याला ‘मलबारचा किनारा’ असे म्हटले जाते. लांबी सु. ८८५ किमी. व कमाल रुंदी ११३ किमी. यांच्या पूर्वकडे पश्चिम घाटाच्या पर्वतरांगा, तर पश्चिमेस अरबी समुद्र आहे.
गोवा केंद्रशासित प्रदेशातील एक उत्कृष्ट बंदर
माले : हिंदी महासागरातील मालदीव प्रजासत्ताकाची राजधानी व देशातील प्रमुख शहर. लोकसंख्या ३७,३०० (१९८३ अंदाज) माले या बेटावरील हे शहर प्रमुख व्यापारी केंद्र असून येथून भारत व श्रीलंका या देशांशी जलमार्गाने वाहतूक चालते. देशाच्या प्रशासकीय कारभाराचे हे केंद्र आहे.
माहे बेट : पश्चिम हिंदी महासागरातील सेशेल द्वीप प्रजासत्ताकातील सर्वांत मोठे बेट. लोकसंख्या जवळपासच्या बेटांसह ५४,५७२ (१९७७). लांबी २६ किमी. व क्षेत्रफळ १४८ चौ. किमी. देशातील ८८% लोक या बेटावर राहतात. बेटावर सर्वदूर अंतर्गंत वाहतुकीसाठी फरसबंदी रस्ते आहेत.