অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अब्दुल करीमखाँ

अब्दुल करीमखाँ

अब्दुल करीमखाँ : (११ नोव्हेंबर १८७२-२७ ऑक्टोबर १९३७). किराणा घराण्याचे सुविख्यात गायक. आज किराणा घराणे हे खाँसाहेबांच्या गानशैलीमधील वैशिष्ट्यांवरूनच ओळखण्यात येते. या घराण्याचे मूळ पुरूष नायक धोंडू. खाँसाहेबांचे घराणे हे तंतकारांचे होते. सुविख्यात बीनकार बंदे अलीखाँ हे खाँसाहेबांचे चुलत-चुलते. अब्दुल करीमखाँचे संगीतशिक्षण त्यांचे वडील कालेखाँ आणि चुलते अब्दुल्लाखाँ यांजपाशी झाले. खाँसाहेब स्वत: गात; तसेच ते सारंगी, सतार इ. वाद्येही चांगली वाजवीत आणि शिकवीत असत. या वादनामुळे त्यांच्या गायनावर आणि शैलीवर अतिशय मोहक आणि पोषक परिणाम घडून आला. तथापि गायन हेच त्यांचे खास वैशिष्ट्य होते. खाँसाहेबांचे मूळ गाव उत्तरभारतातील कुरुक्षेत्राजवळचे 'किराणा-(ना)' हे होय. संगीताचे शिक्षण झाल्यावर ते तेथून दक्षिणकडे प्रथम बडोद्यास आले. बडोदे-सरकारच्या आश्रयाला तीन वर्षे काढल्यानंतर ते जे १८९८ साली महाराष्ट्रात आले, ते बेळगाव, मुंबई, पुणे अशा ठिकाणी राहून शेवटी मिरजेस स्थायिक झाले.

अब्दुल करीमखाँमहाराष्ट्रात त्यांनी जी अत्यंत काळजीपूर्वक आणि रेखीव अशी संगीतसाधना केली, तिचा परिणाम रंगमंदिरांमध्ये त्यांनी सादर व लोकप्रिय केलेल्या अनेकविध जलशांमध्ये भरपूर दिसून आला. खाजगी स्वरूपाच्या कोठींमधून होणाऱ्या गायनाच्या बैठकींना त्यांनी रंगमंदिरात नेऊन त्यांना एक सार्वजनीन आनंदाचे समावेशक व मनोहर स्वरूप दिले. सर्वसाधारण श्रोत्यांच्या दृष्टीने हा एक मोठा लाभच म्हटला पाहिजे. पाँडिचरीला योगी श्री. अरविंदांना त्यांच्या इच्छेनुसार गाणे ऐकविण्यासाठी जात असताना, वाटेत सिंगापूर कोइलम् या स्टेशनावर त्यांना रात्री बाराच्या सुमारास अचानक मृत्यु आला. त्यांची कबर मिरजेला आहे.

खाँसाहेबांचे गाणे 'गौहरणबानी'चे व आलापप्रधान असून, तंतअंगाचा पराकाष्ठेचा सुरेलपणा व स्वाभाविक गोड आवाज यांमुळे अत्यंत कर्णमधुर होत असे. त्यावर करुणरसाची छाप विशेषत्वाने होती. आपल्या शेकडो सार्वजनिक जलशांच्या द्वारा त्यांनी उत्तर हिंदुस्थानी संगीत आणि विशेषत: ठुमरीप्रकार अत्यंत लोकप्रिय केला. बेळगाव, पुणे, मुंबई इ. ठिकाणी विद्यालये स्थापून त्यांनी शिष्यशाखा तयार केली; संगीत स्वरप्रकाश पुस्तक लिहिले; आयुष्यभर सूक्ष्म स्वरसंशोधनाचा ध्यास घेतला आणि निषादयुक्त तंबोऱ्याचा वापर मैफलीमध्ये रूढ केला. आज या तंबोऱ्याची गोडी गायकांना आणि श्रोत्यांना लागलेली आहे. देवल-क्लेमंट्स यांनी ज्या श्रुतिसिद्धांताची प्रस्थापना करण्याचा यत्‍न महाराष्ट्रात केला, त्यात खाँसाहेबांनी प्रायोगिक साहाय्य केले. त्यांचा त्या श्रुतिसिद्धांताच्या बाबतीत काही स्वत:चा असा दृष्टिकोन होता. कर्नाटक संगीताचेही त्यांचे ज्ञान सखोल होते. संगीतसंशोधनाबद्दल त्यांना म्हैसूर-दरबारातील गायकवादकांनी १९१९-२० साली 'संगीतरत्‍न प्राय:' ही बहुमानाची पदवी आणि रत्‍नजडित कंठा अर्पण केला.

खाँसाहेबांचा स्वभाव निगर्वी आणि सौम्य होता. त्यांच्या सर्वसमावेशक दृष्टीकोनामुळे खाँसाहेबांची शिष्य-प्रशिष्य-शाखा बरीच मोठी आणि लोकप्रिय झालेली आहे. तीत सवाई गंधर्व, बाळकृष्णबुवा कपिलेश्वरी, दशरथबुवा मुळे, शंकरराव कपिलेश्वरी, सुरेशबाबू माने, रोशनआरा बेगम इ. अनेक शिष्य आहेत आणि त्यांच्या प्रशिष्यांमध्ये भीमसेन जोशी, गंगूबाई हनगल, फिरोज दस्तुर, यशवंतराव पुरोहित अशा अनेक कलावंत मंडळींचा समावेश होतो.

 

लेखक - अरविंद मंगरूळकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate