अशोक मेहता : (२४ ऑक्टोबर १९११–१० डिसेंबर १९८४). भारतातील एक समाजवादी क्रियाशील विचारवंत नेते. सौराष्ट्रातील भावनगर येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील रणजितराम आणि आई शांतिगौरी. सतराव्या वर्षापासून राष्ट्रीय आंदोलनात भाग घेण्यास त्यांनी आरंभ केला. मुंबईच्या विल्सन कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतली आणि काही काळ मुंबई विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेत अध्ययन केले; पण नंतर असहकाराच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला (१९३२) व शिक्षणाला कायमचा रामराम ठोकला. अविवाहित राहून त्यांनी हेतुपूर्वक राष्ट्रकार्याला वाहून घेतले. या कार्याची प्रेरणा त्यांनी रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर आणि म. गांधी यांच्यापासून घेतली. पुढे हॅरल्ड लास्की आणि कार्ल मार्क्स यांच्या विचारांचाही त्यांच्यावर प्रभाव पडला. अशोक मेहता हे मूलतः लोकशाहीवादी आणि व्यक्ति स्वातंत्र्यवादी होते. स्वातंत्र्य चळवळीत त्यांना अनेक वेळा तुरुंगात टाकले. तुरुंगात त्यांची जयप्रकाश नारायण, अच्युत पटवर्धन अशा समाजवादी विचारवंतांशी गाठ पडली आणि त्यांनी १९३४ मध्ये जयप्रकाश नारायण, अच्युत पटवर्धन प्रभृतींबरोबर काँ ग्रेस पक्षाच्या अंतर्गत इंडियन सोशॅलिस्ट पार्टी स्थापन केली.
शेतकरी व कामगारांच्या प्रश्नांविषयी त्यांना विशेष आस्था होती. त्यांचा अनेक मजूर संघटनांशी घनिष्ठ संबंध होता. हिंद मजदूर सभा ही संस्था त्यांच्या प्रेरणेने स्थापन झाली. तिचे ते सचिव होते. गुजरातमधील स्वातंत्र्योत्तर शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. १९३४ ते १९३९ या काळात काँग्रेस सोशॅलिस्ट विकलीचे ते संपादन करीत. प्रजासमाजवादी पक्ष स्थापण्यात त्यांनी पुढाकार घेतला. काही वर्षे तेच पक्षाचे अध्यक्ष होते. व्यक्ति शः व शासनाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी यूरोप, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया इ. देशांत प्रवास केला व तेथील राजकीय-सामाजिक परिस्थितीचा बारकाईने अभ्यास केला. लोकसभेत दोनवेळा ते निवडून गेले होते (१९५४ व ५७). १९६२ नंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्या सखोल ज्ञानाचा आणि अनुभवाचा नियोजन मंडळाचे उपा ध्यक्ष (१९६३–६६) आणि नियोजनमंत्री (१९६६) या नात्याने देशाला चांगला उपयोग झाला. काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी संघटना काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
अंतर्बाह्य समाजवादी असलेल्या या नेत्याने राजकारण, अर्थकारण, लोकशाही, समाजवाद, नियोजन इ. अनेक विषयांवर वैचारिक भेदक लेखन केले आहे. १८५७ च्या क्रांतियुद्धाचे एक नवा अर्थ सांगणारे छोटे पुस्तकही त्यांनी लिहिले. मेहता यांचे काही महत्त्वाचे अभ्यसनीय ग्रंथ असे-कम्युनल ट्रॅंगल इन इंडिया (१९४२), व्हू ओन्स इंडिया (१९५०), डेमॉक्रॅटिक सोशॅलिझम (१९५१), द पोलिटिकल माइन्ड ऑफ इंडिया (१९५२), सोशॅलिझम अँड पीझन्ट्री (१९५३), पॉलिटिक्स ऑफ प्लॅन्ड इकॉनॉमी (१९५३), स्टडीज इन एशियन सोशॅलिझम (१९५६), ए डेकड ऑफ इंडियन पॉलिटिक्स (१९६६), पर्सेप्शन ऑफ एशियन पर्सनॅलिटी (१९८०).
ते आणीबाणीनंतर जनता पक्षात सामील झाले (१९७७). पुढे जनता पक्षाच्या पराभवानंतर त्यांनी सक्रिय राजकारणातून अंग काढून घेतले. त्यांचे दिल्लीला निधन झाले.
लेखक - म. श्री. दीक्षित
स्त्रोत- मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/8/2020
फ्रेंच सामाजिक विचारवंत आणि ख्रिस्ती समाजवादाच्या ...
संयुक्त राष्ट्रे या जागतिक संघटनेचे तिसरे महासचिव ...
महात्मा गांधींचे एक निष्ठावंत अनुयायी, राजकीय नेते...
महाराष्ट्रातील एक विचारवंत व शिक्षणतज्ञ. पारीख कुट...