(सु. दुसरे शतक). एक तमिळ महाकवी. शिलप्पधिकारम् या आद्य तमिळ महाकाव्याचा कर्ता. त्याची चरित्रपर अधिकृत माहिती उपलब्ध नसल्यामुळे त्याबाबत विद्वानांत बरेच मतभेद आहेत. इळंगो हा शेंगुट्टवन या चेर राजाचा कनिष्ठ बंधू. त्याचे मूळ नाव ज्ञात नाही. ‘इळंगो’ म्हणजे राजपुत्र, ‘अडिगळ’ म्हणजे पूज्यपाद. तरुण वयातच त्याने राज्यहक्क सोडून वैराग्य पतकरले आणि तत्त्वचिंतन, धर्म, कला व साहित्य यांत जीवन व्यतीत केले.
त्याच्या महाकाव्यात कण्णगी या महान पतिव्रता नायिकेचे जीवन रंगविले आहे. कोवलन नावाच्या एका धनाढ्य व्यापाऱ्याची ती पत्नी. परंतु एका कलानिपुण राजनर्तकीच्या नादी लागून कोवलन पत्नीचा तिरस्कार व त्याग करतो. सर्व संपत्ती गमावल्यानंतर आपल्या कृतकर्मांचा पश्चात्ताप होऊन, तो आपल्या पतिव्रताधर्माने वागणाऱ्या पत्नीकडे परत येतो व दोघे मिळून नशीब काढण्याकरिता मदुराईला जातात. तेथील पांड्य राजाच्या राणीचा मुक्तानूपुर चोरल्याचा आळ कोवलनवर येऊन त्यास देहान्ताची शिक्षा होते. आपल्या नवऱ्याला मृत्युदंड झाल्याचे कळताच कण्णगी राजाकडे जाते व आपल्या जवळील मुक्तानूपुर दाखवून, कोवलन मोठा घरंदाज व निरपराध असल्याचे सिद्ध करते. हे ऐकताच राजा, ‘मी राजा नव्हे, मीच चोर आहे’ असे उद्गार काढून बेशुद्ध होतो व मृत्यू पावतो. साध्वी कण्णगीच्या क्रोधांगारात राजाचे शहर जळून बेचिराख होते. या सतीची हकीगत चेर राजाच्या कानी पडते व तो आपल्या राजधानीत तिचे मंदिर उभारतो. महाकवी इळंगो अडिगळ याने या सतीला आपल्या महाकाव्यात अमर केले आहे.
शिलप्पधिकारम् याचा अर्थ ‘नूपुराची गाथा’ असा होतो. कवी स्वत: धर्माने जैन संन्यासी असला, तरी तो तत्कालीन इतर सर्व धर्मांबाबत सहिष्णू आहे. प्रस्तुत महाकाव्यात त्याच्या शैलीप्रभुत्वाचा आणि अद्भुतकाव्यशक्तीचा प्रत्यय येतो. त्याच्या महाकव्यात इतिहास व आख्यायिका यांचा सुरेख संगम झालेला आढळतो. त्याचे हे महाकाव्य म्हणजे तत्कालीन जीवनाची व प्रसंगांची एक उत्कृष्ट बखरच आहे. साध्वी कण्णगीच्या कथेच्या निमित्ताने तत्कालीन लोकांच्या चालीरीती, आचारविचार, सवयी, व्यापार-उदीम, विविध धर्मीयांचे जीवन आणि तेथे प्रचलित असलेले नृत्यसंगीत यांबाबतची विस्तृत माहिती त्यात आलेली आहे.
हा कवी ललित कलांचा, विशेषत: नृत्य व संगीताचा, मोठा चोखंदळ रसिक आहे. त्यांतील बारकावेही त्याने आपल्या महाकाव्यात दिले आहेत. लोकगीते व लोकनृत्य यांतही त्याला विशेष रुची होती. त्याच्या महाकाव्यात त्याच्या कलात्मकतेचे व आध्यात्मिक अधिकाराचे सुस्पष्ट दर्शन घडते. त्याची पराकोटीची मानवतावादी दृष्टी, त्याने चितारलेल्या पात्रांद्वारे त्याच्या या महाकाव्यात अप्रत्यक्षपणे सर्वत्र व्यक्त झालेली दिसते. आपल्या महाकाव्याच्या शेवटी तर तो वाचकांनाच प्रत्यक्ष आवाहन करतो, की त्यांनी सद्गुणसंपन्न आयुष्य जगावे आणि आध्यात्मिक उन्नती साधावी. तो म्हणतो, की आनंदमय अशा मोक्षप्राप्त्यर्थ चाललेल्या ह्या दीर्घ प्रवासातील सर्व मानव हे वाटसरू आहेत. तेव्हा ह्या वाटचालीत आपण ऐहिक जीवनातील सर्व प्रकारचे मोह व भ्रम दूर सारून मोक्ष हे ध्येय प्राप्त करून घ्यावयास हवे.
लेखक : मु. वरदराजन् (इं); द.स.शिरोडकर (म.)
स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/15/2019