অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ई. व्ही. रामस्वामी नायकर

ई. व्ही. रामस्वामी नायकर

ई. व्ही. रामस्वामी नायकर : (१७ सप्टेंबर १८७९–२४ डिसेंबर १९७३). द्राविड आंदोलनाचे प्रमुख नेते व तमिळ जनतेत पेरियार (थोर आत्मा) व थानथाई (पिता) म्हणून गौरविलेले समाजसुधारक. एरोड येथे कन्नडा नायकर जमातीतील संपन्न कर्मठ हिंदू कुटुंबात जन्म. शालेय शिक्षण फक्त तीन वर्षेच झाले. एकोणिसाव्या वर्षी त्यांचा पहिला विवाह नात्यातील नागमल्ल या तरुणीशी झाला. गरीब आणि अस्पृश्य यांची परिस्थिती पाहून त्यांचे मन क्षुब्ध झाले व त्यांनी धर्मग्रंथांचा चिकित्सापूर्ण अभ्यास केला. त्यामुळेच त्यांची हिंदू धर्मावरील श्रद्धा डळमळली आणि त्यांनी सामाजिक समानतेचा व अस्पृश्योद्धाराचा प्रसार सुरू केला. चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्या सल्ल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. असहकार आंदोलनाचे १९२० मध्ये त्यांनी नेतृत्व केले व त्याकरिता त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. अस्पृश्यांवरील निर्बंध दूर करण्यासाठी त्रावणकोरमध्ये झालेल्या वैक्कोम सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला.

काँग्रेसमधील वरिष्ठ वर्णियांच्या धोरणाबद्दल असंतोष निर्माण होऊन त्यांनी पक्षत्याग केला. पददलित समाजाच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी १९२५ साली स्वाभिमान आंदोलन सुरू केले. १९३१ मध्ये रशिया व यूरोपचा दौरा करून १९३३ मध्ये त्यांनी लोकांना ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड करण्याचे आवाहन केले आणि त्यामुळे पुन्हा त्यांना बंदीवास भोगावा लागला. पहिल्या काँग्रेस मंत्रिमंडळाचे वेळी १९३७ मध्ये त्यांनी प्रथम हिंदीविरोधी आंदोलन सुरू केले. त्यासाठीही त्यांना पुन्हा तुरुंगवास भोगावा लागला. १९४४ साली त्यांनी जुन्या जस्टिस पक्षाचे रूपांतर द्रविड कळघम या नवीन पक्षात केले. सार्वभौम व वर्णभेदरहित द्रविडनाडूची स्थापना हे त्यांच्या द्रविड कळघम पक्षाचे ध्येय होते. पुढे रामस्वामी नायकर यांनी पहिली पत्‍नी वारल्यानंतर मणिअम्माई या आपल्या २८ वर्षांच्या स्वीय सहायिकेसोबत दुसरे लग्‍न केले (१९४९). त्याच्या निषेधार्थ आण्णादुरै यांच्या नेतृत्वाखाली काही अनुयायांनी त्यांचा पक्ष सोडून द्रविड मुन्नेत्र कळघम हा नवा पक्ष स्थापन केला. निवडणुका लढविण्यासाठीच मुख्यतः नवा पक्ष अस्तित्वात आला होता.

पक्षात फूट पडली, तरी रामस्वामी यांचा तमिळ जनतेवरील वैयक्तिक प्रभाव कमी झाला नव्हता. १९७१ साली त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन संमेलन भरवून धर्म, जात व भाषा यांच्या आधारावर होणारा सर्व प्रकारचा पक्षपात दूर करण्याचे सरकारला आवाहन केले, तसेच हिंदी भाषेला विरोध केला.

१९३४ पासूनच त्यांनी सामाजिक क्रांतीला वाहून घेतले होते. हिंदू धर्म हे ब्राह्मणांच्या वर्चस्वाचे व मक्तेदारीचे एक साधन आहे, मनुस्मृति ही अमानुष आहे आणि पुराणे म्हणजे परीकथा आहेत, अशी त्यांची मते होती. वर्णव्यवस्था, बालविवाह, सक्तीचे वैधव्य यांविरुद्ध ते सतत प्रचार करीत. त्यांनी अनेक पुस्तिका लिहिल्या व अनेक वृत्तपत्रेही चालविली. उत्तरेकडील नेहरूंसारखे लोक त्यांच्या कृत्यांस रानटी म्हणत, तर इतर त्यांस ब्राह्मणेतर व मूर्तिभंजक म्हणत. वेल्लोर येथे ते वयाच्या ९४ व्या वर्षी मरण पावले. त्यांनी रामप्रतिमा व रामायण जाळले. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर रावणलीला साजरी करण्यात येऊ लागली.

 

लेखक - दिनकर साक्रीकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate