অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कस्तुरभाई लालभाई

कस्तुरभाई लालभाई

कस्तुरभाई लालभाई : (१९ डिसेंबर १८९४ - २० जानेवारी १९८०). भारतातील एक प्रसिद्ध दानशुर उद्योगपती. अहमदाबाद येथील गुजरात महाविद्यालयात ते शिक्षण घेत असताना १९१२ साली अचानक त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि शिक्षण अर्धवट टाकून ‘रायपूर मॅन्युफॅक्चरिंग कं. लि.’ या कुटुंबाच्या मालकीच्या कापड उद्योगाची जबाबदारी त्यांना घ्यावी लागली. त्याच्या कार्यक्षम व्यवस्थापनाखाली रायपूर कापडगिरणीची प्रगती चालू राहिली. कापसाचा दर्जा ओळखण्याचे उपजत ज्ञान त्यांना होते आणि कापूस पिकविणाऱ्या प्रदेशांना स्वतः भेटी देऊन उत्तम कापूस खरेदी करण्यावर त्यांचा कटाक्ष होता. १९२० साली ‘अशोक मिल्स लि.’ आणि १९३० मध्ये ‘अरविंद मिल्स’ या आणखी दोन कापडगिरण्या त्यांनी स्थापन केल्या. दरम्यान १९२४ साली डबघाईला आलेली ‘सारसपूर मिल्स लि.’ ही कापडगिरणी त्यांनी ताब्यात घेतली आणि १९२८ मध्ये ती नव्याने सुरू केली. ‘अरूणा’, ‘नूतन’, आणि ‘अहमदाबाद न्यू कॉटन मिल्स’ या आणखी तीन कापड उद्योगांचे व्यवस्थापन त्यांच्याकडे आले. ‘अनिल स्टार्च प्राडॅक्ट्‌स’; कापडगिरण्यांना लागणारी यंत्रे निर्माण करणारी ‘अमित प्रॉडक्ट्‌स’; रंग, रसायने तयार करणारे बलसाड येथील ‘अतुल प्रॉडक्ट्‌स’ या सर्व कंपन्या कस्तुरभाईंच्या कुशल नेतृत्वामुळे लवकरच नावारूपाला आल्या.

ऐन तारुण्यात त्यांचा महात्मा गांधी, सरदार पटेल आणि अन्य राष्ट्रीय नेत्यांशी संबंध आला. भांडवलदार हे संपत्तीचे केवळ विश्वस्त आहेत, या गांधीजींच्या तत्त्वज्ञानाचा त्यांच्या जीवनावर खोल परिणाम झाल्याचे दिसते. कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी लवाद नेमण्याचा ते आग्रह धरीत. आपल्या कारखान्यांत त्यानी कामगारकल्याणासाठी सरकारी संस्था काढल्या, कारकून वर्गासाठी भविष्य निर्वाह निधीची तरतूद केली आणि पाळणाघरे सुरू केली. त्या वेळी तशी कायदेशीर तरतूद नसतानाही त्यांनी ते केले हे महत्त्वाचे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक म्हणून ते १९३७ मध्ये निवडून आले आणि त्या पदावर १९४९ पर्यंत राहिले. पुन्हा याच बँकेवर त्यांनी संचालक म्हणून १९५७ ते १९६१ पर्यंत काम केले.

अनेक संस्थांची अध्यक्षपदे कस्तुरभाई ह्यांनी भूषविली. ‘अहमदाबाद मिलओनर्स असोसिएशन’ (१९३३-३५), ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’ (१९३४-३५), ‘इंडियन कॉटन मिल्स फेडरेशन’ (१९५६-६०) ह्या त्यांपैकी काही महत्त्वाच्या संस्था होत. कैरो येथील आंतरराष्ट्रीय कापूस परिषदेस (१९४३) ते भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले. आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेच्या बैठकांना ते भारतीय प्रतिनिधी मंडळाचे सदस्य म्हणून आवर्जून जात असत.

सार्वजनिक कामाची त्यांना मनापासून आवड होती. गुजरातमध्ये १९१८ पासून ज्या ज्या वेळी दुष्काळ पडत असे, त्या त्या वेळी स्वतः पुढे होऊन ते निधी उभारीत. ‘गांधी मेमोरियल फंड’चे ते अध्यक्ष होते. १९३७ साली स्थापन झालेल्या ‘अहमदाबाद एज्युकेशन सोसायटी’चे ते प्रारंभापासून अध्यक्ष होते. या संस्थेतर्फे विविध ज्ञानशाखांची महाविद्यालये उघडण्यासाठी त्यांनी स्वतः लक्षावधी रुपयांच्या देणग्या दिल्या, तसेच गुजरात विद्यापीठाची भव्य वास्तु बांधण्यासाठी त्यांनी निधी गोळा केला.

भारत सरकारच्या प्रत्यक्ष कर सल्लागार समितीचे ते सदस्य होते. पंचवार्षिक योजनांचा पाठपुरावा करताना खाजगी क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी अविश्रांत श्रम घेतले. १९६८ मध्ये भारत सरकारने पद्मभूषण पदवी देऊन त्यांचा गौरव केला. अहमदाबाद येथे त्याचे हृदयविकाराने निधन झाले.

 

लेखक - वि. रा. गद्रे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate