कामाक्षी नटराजन : (२४ सप्टेंबर १८६८ – २९ एप्रिल १९४८). आधुनिक समाजसुधारक व पत्रकार. तमिळनाडूतील तंजावर येथे जन्म. कुंभकोणम्च्या सरकारी विद्यापीठातून अठराव्या वर्षी पदवीधर. वडील कामाक्षी अय्यर यांच्या मर्जीखातर टपाल खात्यात काही दिवस नोकरी. नंतर शिक्षकाचा व्यवसाय पतकरला. या काळात लागलेला वाचनाचा नाद शेवटपर्यंत टिकला. १८८८ साली त्यांनी मद्रासच्या द हिंदू या इंग्लिश वर्तमानपत्रात काम केले; परंतु संपादकाचे सनातनी धोरण पसंत न पडल्यामुळे ते त्यातून बाहेर पडले व १८९० साली त्यांनी इंडियन सोशल रिफॉर्मर या इंग्लिश वर्तमानपत्रात काम करण्यास सुरुवात केली. १८९८ साली मलबारी शेठ यांच्या गैरहजेरीत इंडियन स्पेक्टेटर चालविण्यास ते मुंबईत आले व तेथेच स्थायिक झाले. सहा महिन्यानंतर इंडियन सोशल रिफॉर्मर मुंबईहून काढण्यास सुरुवात केली. १९४० पर्यंत त्यांनी या पत्राचे संपादक म्हणून काम केले. त्यांच्या सामाजिक कार्यांचे महत्त्व जाणणारी त्यांची पत्नी शिवकामा सुंदरी १९१५ साली वारली. निरनिराळ्या वेळी भरलेल्या सामाजिक परिषदांचे अध्यक्षपद त्यांनी अनेक वेळी भूषविले. १९२२ ते १९२८ या काळात इंडियन डेलीमेलचे ते संपादक होते. १९३३ साली 'आधुनिक भारतातील सामाजिक चळवळ' यावर भाषण देण्याकरिता ते अमेरिकेस गेले.
गांधीजींनी आफ्रिकेतील चालविलेल्या लढ्यास त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे १९१५ पासून ते गांधीजींच्या निकट सहवासात आले. तरी पण गांधीजींचे आर्थिक तत्त्वज्ञान त्यांना पसंत नव्हते. नशाबंदी आणि अस्पृश्यता निवारण या दोन्हींचे ते कट्टर पुरस्कर्ते होते. त्यांच्या सुधारकी विचारांना आचाराची जोड होती. त्यांच्या मुलाने मुसलमान मुलीशी लग्न केले असता, तिचा धर्म न बदलता सून म्हणून त्यानी तिचा स्वीकार केला. 'हिंदू' या संज्ञेला धर्मापुरते मर्यादित न करता व्यापक राष्ट्रीय अर्थ प्राप्त व्हावा, म्हणून त्यांनी मदनमोहन मालवीय व हिंदू महासभेतील इतर पुढाऱ्यांबरोबर काम केले.
त्यांनी दोन पुस्तके लिहिली : (१) कॅथराईन मेयोच्या मदर इंडियाला उत्तर म्हणून लिहिलेले पुस्तक. (२) अवर ट्रिप टू अमेरिका हे अमेरिकेच्या प्रवासातील अनुभवांचे वर्णन करणारे पुस्तक.
लेखक - अच्युत खोडवे
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/12/2020
सुप्रसिद्ध इंग्रज समाजसुधारक आणि अर्थशास्त्रज्ञ. ल...
द्राविड आंदोलनाचे प्रमुख नेते व तमिळ जनतेत पेरियार...
राष्ट्रीय काँग्रेसच्या आद्यपर्वातील एक थोर मुस्लिम...
गुजरातमधील समाजसुधारक, ‘ठक्करबाप्पा’ या नावानेही त...