অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गंगाधर बाळकृष्ण देशपांडे

गंगाधर बाळकृष्ण देशपांडे

गंगाधर बाळकृष्ण देशपांडे : ३१ मार्च १८७१–३० जुलै १९६०). भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील ‘कर्नाटक सिंह’ या नावाने प्रसिद्ध असणारे एक निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ते. पूर्वीच्या कोल्हापूर संस्थानातील जलालपूर या गावी वतनदार घराण्यात जन्म. बेळगाव आणि पुणे येथे शिक्षण घेऊन ते बी. ए.; एल्एल्. बी. झाले (१८९७). तत्पूर्वी त्यांनी १८८४ मध्ये लग्न केले. त्यांना चार मुली होत्या. त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई (पूर्वाश्रमीचे नाव द्वारकाबाई) १९१२ मध्ये मरण पावल्या. सुरुवातीला काही वर्षे त्यांनी बेळगाव येथे वकिली केली (१८९७–१९०५). राजकीय बाबतीत प्रथमपासून त्यांचा ओढा रानडे, आगरकर, गोखले, टिळक यांच्याकडे होता. रानड्यांच्या विचारांची त्यांच्या विचारसरणीवर विशेष छाप होती. तथापि ते टिळकांच्या राजकारणाकडे अधिक आकृष्ट झाले व पुढे तर ते त्यांच्या निकटवर्ती सहकाऱ्यांपैकी एक बनले. त्यांनी धूरीण (१८९९), राष्ट्रमत (१९०७) व लोकमान्य (१९२०) ही वृतपत्रे चालविली.

एवढेच नव्हे तर स्वदेशी डेक्कन भांडार, राष्ट्रीय वित्त व बैंकिंग निगम यांची स्थापना केली. लखनौ करार, काँग्रेस स्वराज्य पक्ष व होमरूल लीग याबाबतीत ते टिळकांबरोबरच राहिले. टिळकांनंतर ते पूर्णतः गांधीवादी झाले. टिळकांचेच असहकाराचे राजकारण गांधी चालवीत आहेत, असे त्यांचे मत होते. नागपूर काँग्रेसचा आदेश मानून त्यांनी राष्ट्रीय शाळा, टिळक फंड व स्वातंत्र्य चळवळ यांस वाहून घेतले आणि पुढे आपली बरीच संपत्ती गांधी सेवासंघाला दिली (१९२९). टिळकांप्रमाणेच ब्रिटिश सरकारने त्यांना त्रास दिला. त्यांची मालमत्ता जप्त केली, बेळगावची प्रांतिक परिषद संघटित करण्याचे कार्य त्यांनी केले. माँटेग्यू शिष्टमंडळात त्यांनी भाग घेतला. बेळगावच्या १९२४ च्या काँग्रेस अधिवेशनाचे ते स्वागताध्यक्ष होते. अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य, काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष या पदांवरही त्यांनी काम केले. खादी केंद्रे आणि चरखासंघ उभारण्याच्या कार्यात त्यांनी विधायक काम केले.

गांधी सेवा संघाचे प्रसिद्ध संमेलन हुदली येथे (१९३७) झाले. या संमेलनातच गांधींनी ‘पार्लमेंटरी मेंटॅलिटी हॅज कम टू स्टे’ असे उद्‌गार काढले होते. संमेलनाची सर्व जबाबदारी व ओझे एकट्या गंगाधररावांनी स्वीकारले होते. त्यांना १९२१,१९३० व १९४२ या साली विविध चळवळींच्या संदर्भात कारावास भोगावा लगला. वंगभंग, होमरूल लीग व छोडो भारत आंदोलन या सर्व चळवळीत ते आघाडीवर होते. एक प्रभावी वक्ता म्हणून त्यांची ख्याती होती. कर्नाटकातील राजकारणावर त्यांची छाप होती व त्यांचा शब्द अखेरचा मानीत. त्यांचे स्फुट लेखन मुख्यतः राजकीय स्वरूपाचे असले, तरी शि. म. परांजपे यांच्या चरित्राला त्यांनी महत्त्वाची प्रस्तावना (१९४५) लिहिली. अनुग्रह हा त्यांचा पत्रसंग्रह त्यांचे शिष्य व एक निकटवर्ती पुंडलीकजी कातगडे यांनी प्रसिद्ध केला (१९६४). याशिवाय माझी जीवनकथा हे त्यांचे आत्मचरित्र त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले, पण त्याची सर्व मुद्रिते त्यांनी स्वतः पाहिली होती.

स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी राजसंन्यास घेतला. ते हृदयविकाराने बेळगाव येथे मरण पावले.

 

संदर्भ : कातगडे, पुंडलीकजी, संस्मरणीय पर्व, बेळगाव, १९६४.

लेखक - सु. र. देशपांडे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate