অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गोपाळ कृष्ण गोखले

गोपाळ कृष्ण गोखले

गोपाळ कृष्ण गोखले: (९ मे १८६६–१९ फेब्रुवारी १९१५). आधुनिक भारताचे एक महान नेते आणि नेमस्त पक्षाचे अध्वर्यु. त्यांचा जन्म कात्‌लुक (रत्नागिरी जिल्हा) येथील एका सामान्य कुटुंबात झाला. अत्यंत गरिबीत गोखले यांचे पहिले दिवस गेले. अठराव्या वर्षी पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी सरकारी नोकरीचा मार्ग व स्वीकारता स्वार्थत्यागपूर्वक देशसेवा करण्याचे व्रत घेतले. विसाव्या वर्षी ते फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक झाले आणि त्यांनी सुधारक पत्राचे सहकारी संपादक म्हणून काम सुरू केले. ते सार्वजनिक सभेचे चिटणीस (१८८७) व सभेच्या त्रैमासिकाचे संपादक झाले आणि पुढे १८९१ मध्ये ते परिषदेचे चिटणीस तसेच राष्ट्रसभेचे चिटणीस झाले. वेल्बी आयोगासारख्या महत्त्वाच्या आयोगापुढील प्रमुख साक्षीदार म्हणून त्यांनी एकतिसाव्या वर्षी साक्ष दिली. प्रांतिक विधिमंडळात प्रवेश केल्यानंतर चार वर्षांतच ते केंद्रीय विधिमंडळात निवडून गेले. १९०५ साली ते वाराणसी येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते. येथे १९०६ मध्ये त्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. महात्मा गांधीनीही पुढे भारत सेवक समाजाचे अध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली होती.

लोकमान्य टिळक व गोखले यांचे सार्वजनिक जीवन एकाच वेळी सुरू झाले व तेही एकाच व्यासपीठावरून. क्रॉफर्ड प्रकरणातील मामलेदारांवरील अन्यायाला गोखले यांनी सार्वजनिक सभेचे चिटणीस गोपाळ कृष्ण गोखलेगोपाळ कृष्ण गोखले या नात्याने वाचा फोडली व टिळकांनी हे प्रकरण धसास लावले. १८८९ मध्ये मुंबईत काँग्रेसचे अधिवेशन भरले, तेव्हा दोघांनीही एकाच उपसूचनेवर भाषण केले. पण यानंतर दोघांचा मार्ग वेगळा झाला. टिळक जहाल राजकारणाकडे वळले. गोखले यांनी लोकशिक्षणाच्या द्वारे समाजजागृती करण्याचा व राजकीय सुधारणांसाठी सतत प्रयत्न करून ज्या सवलती मिळतील, त्या राबविण्याचा मार्ग स्वीकारला. गोखले यांचे नाव सर्वत्र प्रथम गाजले ते वेल्बी आयोगापुढील त्यांच्या साक्षीने. हिंदुस्थानात राज्यकारभाराचा खर्च कसा वाढत आहे व त्यामुळे करवाढ कशी डोईजड होत आहे; हे त्यांनी सप्रमाण दाखवून राजकीय सुधारणांची आवश्यकता प्रतिपादन केली. गोखले यांच्या या अभ्यासपूर्व साक्षीचा बराच प्रभाव पडला. न्यायमूर्ती रानडे यांचे शिष्यत्व पत्करून त्यांच्याकडे त्यांनी अर्थशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादींचा जो अभ्यास केला, त्याचा उपयोग त्यांना या साक्षीच्या वेळीच नव्हे, तर नंतरच्याही जीवनात झाला. ‘अभ्यासेचि प्रकटावे’ या समर्थांच्या उक्तीचे मूर्तिमंत रूप म्हणजे नामदार गोखले.

सार्वजनिक जीवनाला गोखले यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक व नंतर प्राचार्यपदापासून सुरुवात केली. पण त्यांच्या कर्तृत्वाला ते श्रेय अपुरे होते. १९०२ मध्ये गोखले मध्यवर्ती कायदेमंडळावर निवडून गेल्यावर त्यांनी अर्थसंकल्पांवर जे भाषण केले, त्यामुळे त्यांचे कर्तृत्व न नेतृत्व देशमान्य झाले. त्या विधिमंडळात त्यांनी अर्थसंकल्पावर बारा भाषण केली. त्यांतून तत्कालीन भारताच्या राजकीय, आर्थिक, शैक्षणिक वगैरे प्रश्नांचा उत्कृष्ट ऊहापोह त्यांनी केला. भारताची शेती, शेतकऱ्यांच्या अडचणी, आयातनिर्यात, करभार, उद्योग, रुपयाचे पौंडाशी नाते, लष्करावरील खर्च असे अनेक विषय त्यांनी व्यासंगपूर्वक हाताळले. उपहास वा घणाघाती घाव हा त्यांच्या भाषणाचा विशेष नव्हे, तर प्रतिपक्षाचे मत समर्पक युक्तिवाद करून वळविण्यावर त्यांचा कटाक्ष असे. गोखले बोलू लागले, की आपल्यापुढे गुलाब पुष्पांचा सडा पडल्यासारखा वाटे, असे सी. वाय्. चिंतामणी यांनी म्हटले आहे. १९०६ सालच्या अर्थसंकल्पावरील गोखले यांचे भाषण ऐकल्यावर, असे भाषण इंग्लंडच्या पार्लमेंटमध्येही क्वचितच ऐकावयास मिळते, असा अभिप्राय व्हाइसरॉय लॉर्ड मिंटो यांनी दिला. इंग्लंडमधील नेशन या त्या वेळच्या नामवंत पत्राचे संपादक मॅसिंगहॅम यांनी गोखले हे तेव्हाचे पंतप्रधान अ‍ॅस्क्विथ यांच्या पेक्षाही श्रेष्ठ असल्याचे मत दिले होते.

आपल्या समाज स्वायत्ततेचा उपयोग घेण्यास लायक बनवायचा, तर निःस्वार्थ अशा समाज सेवकांची एक संख्या तयार केली पाहिजे, असे गोखले यांना वाटत होते. समाजाचे अंतर्बाह्य स्वरूप बदलल्याखेरीज तो स्वातंत्र्याला पात्र होणार नाही, ही रानडे यांची धारणा होती आणि त्याच उद्देशाने त्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली (१९०५).

वंगभंगामुळे जो प्रक्षोभ माजला, त्यामुळे गोखले व तत्सम नेत्यांच्या सनदशीर राजकारणाला मोठा धक्का बसला. पण गोखले यांनी राजकीय सुधारणा मिळविण्यासाठी ब्रिटिश राज्यकर्त्यांचे मत वळविण्याच्या आपल्या प्रयत्नांत कसूर केली नाही. मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा (१९१९) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कायद्याच्या जडणघडणीत गोखले यांचा फार मोठा हात होता. इंग्लंडमध्ये वास्तव्य करून या कामी त्यांनी बरीच शिष्टाई केली होती. सनदशीर राजकारणाचे गोखले प्रवर्तक खरे; पण अखेरच्या काळात कायदेभंगाच्या चळवळीसही त्यांचा विशिष्ट मर्यादेपर्यंत पाठिंबा होता. म. गांधींनी त्यांना गुरू मानले होते. राजकारणातील त्यांच्या कार्याव्यतिरिक्त एक थोर समाजसुधारक म्हणूनही गोखल्यांचे नाव प्रसिद्ध आहे. भारत सेवक समाजाच्या कार्याबरोबर अस्पृश्यता व जातिव्यवस्था यांचे निर्मूलन व्हावे, म्हणून ते नेहमी प्रयत्नशील होते. स्त्रीस्वातंत्र्याचा तसेच त्यांच्या शिक्षणाचा त्यांनी हिरिरीने पुरस्कार केला आणि तत्संबंधीचे आपले विचार वृत्तपत्रकार या नात्याने सुधारक, सार्वजनिक सभा, राष्ट्रसभा समाचार इ. वृत्तपत्रांतून स्पष्ट मांडले. सर्व स्तरांतील लोकांना शिक्षण घेणे सुलभ जावे, म्हणून प्राथमिक शिक्षण मोफत असावे, असे ते म्हणत. याकरिता त्यांनी प्रयत्नही केले.

हायलँड या लेखकाने गोखले यांची तुलना इटलीतील काव्हूरशी केली आहे. काव्हूरप्रमाणेच शक्य कोटीतील काय आहे, प्रस्थापित यंत्रणेतील दोष कसे दूर करता येतील, याचा विचार करून त्या दिशेने प्रयत्न करण्याची त्यांची वृत्ती होती. दोघेही सनदशीर राजकारणावर भिस्त ठेवणारे होते. या राजकारणाची जहालांकडून अतिशय निर्भर्त्सना झाली. पण गोखले यांचे कर्तृत्व, देशसेवा, स्वार्थत्याग, अभ्यास यांबद्दल सरकारप्रमाणेच लोकपक्षाचे नेतेही आदर बाळगीत. लोकमान्यांनी गोखल्यांवरील मृत्युलेखात त्यांच्या या गुणांची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. लोकपक्ष व सरकार या दोघांकडून मान्यता मिळणारा असा पुरुष विरळाच सापडतो.

 

संदर्भ : 1. Gandhi, M. K.Gokhale, My Political Guru, Ahmedabad.1955. 2. Mathur, D. B. Gokhale : A Political Biography, Bombay, 1966. 3. Sastri, V. S. S. Life of Gopal Krishna Gokhale, Bangalore, 1933. 4. Wolpert, Stanley, Tilak and Gokhale: Revolution and Reform in the Making of Modern India, London, 1962. ५. फाटक, न. र. आदर्श भारतसेवक, मुंबई, १९६७.

लेखक - गोविंद तळवलकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate