অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

डॉ. झाकिर हुसेन

डॉ. झाकिर हुसेन

(८ फ्रेब्रुवारी १८९७ – ३ मे १९६९ ). भारताचे तिसरे राष्ट्रपती व एक ख्यातनाम शिक्षणतज्ञ. त्यांचा जन्म अफ्रिडी अफगाण मुसलमान कुटुंबात हैदराबाद (सिंध) येथे झाला. त्यांचे वडील वकील होते; पण झाकिर हुसेन नऊ वर्षांचे होते, तेव्हा ते वारले. त्यामुळे शिक्षणासाठी त्यांस अनेक ठिकाणी हिंडावे लागले. इटावा, अलीगढ आणि बर्लिन या ठिकाणी शिक्षण घेऊन अखेर त्यांनी अर्थशास्त्र विषयात पीएच्.डी. ही पदवी मिळविली. ही पदवी मिळविण्यापूर्वी ते १९२० मध्ये ⇨जामिआ मिल्लिया इस्लामिया या शिक्षणसंस्थेकडे आकर्षित झाले होते. जर्मनीहून भारतात परत येताच, त्यांनी आपले सर्व जीवन या संस्थेस समर्पित केले. १९२५ मध्ये ही संस्था दिल्लीस हलविण्यात आली व तिचे झाकिर हुसेन १९२६ मध्ये कुलगुरू झाले. त्यांनी जवळजवळ बावीस वर्षे (१९२६–४८) या संस्थेचे कार्य केले व तिला एका अभिनव शिक्षणसंस्थेचे स्वरूप दिले. शैक्षणिक वाटचालीतील त्यांची स्फूर्तिस्थाने दोन होती : म. गांधी व जर्मन शिक्षणशास्त्रज्ञ केर्शेनस्टाइनर. विद्यापीठात बौद्धिक स्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य व भाषण स्वातंत्र्य पुरेपुर असावे आणि व्यासंगी विद्वानांचे ते सभास्थान व्हावे; कारण अशा वातावरणात विद्यार्थ्यांचे नीतिधैर्य विकास पावते अशी त्यांची धारणा होती. त्यांनी स्वयंशिक्षणावर भर देऊन नव्या शैक्षणिक कल्पना जामिआ मिल्लियामध्ये रुजविल्या. ते अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू झाले (१९४८–५६). १९५६ साली ते राज्यसभेवर निवडून आले. पुढे ते बिहारचे राज्यपाल झाले आणि नंतर उपराष्ट्रपती म्हणून निवडले गेले (१९६२). १९६७ मध्ये ते भारताचे राष्ट्रपती झाले.

अनेक शैक्षणिक समित्यांवर त्यांनी काम केले. त्यांपैकी यूनेस्को, विद्यापीठ अनुदान आयोग, मध्यवर्ती माध्यमिक मंडळ, विद्यापीठीय शैक्षणिक आयोग ह्या काही महत्त्वाच्या संस्था होत. त्यांना अनेक परदेशीय आणि भारतीय विद्यापीठांनी डी. लिट्. ही सन्माननीय पदवी देऊन गौरविले. भारत सरकारने त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा यथोचित गौरव पद्मविभूषण (१९५४) आणि सर्वोच्च असा भारतरत्न (१९६३) हा पुरस्कार देऊन केला. महात्मा गांधींचे ते प्रथमपासून निष्ठावान अनुयायी होते. महात्माजींनी त्यांना मूलोद्योग शिक्षण समितीचे १९३७ मध्ये अध्यक्ष केले. आयुष्यभर त्यांनी या शिक्षणपद्धतीचा पुरस्कार केला.

त्यांनी शिक्षण, अर्थशास्त्र वगैरे विषयांचे आपले विचार अनेक व्याख्यानांद्वारे मांडले. त्यांपैकी काही व्याख्याने द डायनॅमिक युनिव्हर्सिटी या नावाने प्रसिद्ध झाली आहेत. जर्मन भाषेमध्ये त्यांनी म.गांधींचे चरित्र लिहिले, तसेच प्लेटोच्या रिपब्लिकचे उर्दूत भाषांतर केले. लहान मुलांकरिता काही गोष्टीही त्यांनी लिहिल्या.

स्फटिकांचा आणि चित्रविचित्र खड्यांचा संग्रह करणे, हा त्यांचा आवडता छंद होता. ते ग्रंथप्रेमी होते व त्यांचे ग्रंथालय नव्या नव्या ग्रंथांनी नेहमी भरलेले असे. राष्ट्रपती असतानाच नवी दिल्ली येथे ते हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले. एक नेमस्त, चारित्र्यवान व शिक्षणतज्ञ असा राष्ट्रीय मुस्लिम नेता म्हणून त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे.


संदर्भ : Noorani, A. G. Zakir Husain, Bombay, 1967.

लेखक : मु. मा. घाणेकर

स्त्रोत : मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 2/12/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate