অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नारायण मेघाजी लोखंडे

पूर्वायुष्य

१८४८-९ फेब्रुवारी १८९७. भारतीय कामगार चळवळीचे एक अग्रगण्य नेते व समाजसुधारक. मूळ गाव पुणे  जिल्ह्यातील सासवडजवळचे कन्हेरसर. फुलमाळी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या लोखंडे यांनी गरीब परिस्थितीतून माध्यमिक शिक्षण पुरे केले. सुरुवातीस रेल्वे खात्यात कारकून म्हणून व पुढे पोस्ट खात्यात काही काळ नोकरी केल्यावर, लोखंडे यांना मुंबईच्या मांडवी भागात एका कापड गिरणीत भांडारपालाची नोकरी मिळाली. तेथे त्यांना दहशतीच्या वातावरणात, दिवसातून १३-१४ तास काम करीत असलेले गिरणी कामगार आढळले; त्यांना आठवडयाची सुटीही मिळत नसे; परिणामी त्यांनी नोकरी सोडून स्वतःस कामगार चळवळीस वाहून घेण्याचे ठरविले. त्याकरिता ते कामगार वस्तीतच राहू लागले. लोखंडे यांच्या पत्नीचे नाव गोपिकाबाई व मुलाचे नाव गोपीनाथ असे होते.

सत्यशोधक समाजातील निष्ठावंत सहकारी

लोखंडे हे महात्माजोतीराव गोविंदराव फुले यांच्या सत्यशोधक समाजातील निष्ठावंत सहकारी होते. मुंबईतील कापड गिरणी कामगारांच्या आंदालनामुळे ब्रिटिश शासनाने १८७५ मध्ये कापड-गिरण्यांमधील कामगारांच्या कामाच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी व तीमध्ये सुधारणा सुचविण्यासाठी एक आयोग नेमला. १८८०  मध्ये पुण्यात बंद पडलेले दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे पहिले मुखपत्र लोखंडे यांनी मुंबईत सुरू केले. हे नियतकालिक शेतकरी-कामकरी वर्गाची बाजू हिरिरीने मांडे; त्यांच्या हालअपेष्टांना, दु:खाला वाचा फोडून सरकाचे व जनतेचे लक्ष वेधून घेत असे. लोखंडे यांनी गुराखी या नावाचे एक दैनिकही काढले होते. १८८१ साली इंग्रज सरकारला कारखाना कायद्यात सुधारणा करणे भाग पडले. कामगारांना महिन्यातून चार भरपगारी रजाही मिळू लागल्या.

टिळक-आगरकर यांची कोल्हापूरच्या बर्वे प्रकारणात झालेली १०१ दिवसांची शिक्षा पूर्ण झाल्यावर १८८३ साली त्यांची सुटका झाली. त्यानंतर त्यांना डोंगरी येथील तुरुंगापासून ते राणीच्या बागेसमोरील मेहेर मार्केटपर्यंत मिरवणुकीने आणण्यात लोखंडे यांनी पुढाकार घेतला होता. तसेच त्यांच्या सत्कार-समारंभांत लोखंडे हे अग्रभागी होते.

दुसरा कामगार कायदा आयोग १८८४

दुसरा कामगार कायदा आयोग १८८४ मध्ये नेमण्यात आला; तथापि या आयोगाद्वारे गिरणी कामगारांच्या कामाच्या स्थितीत फारशा सुधारणा घडून आल्या नाहीत. त्यामुळे सप्टेंबर १८८४ मध्ये मुंबई येथे लोखंडे यांनी पहिली मोठी कामगार परिषद भरवून कारखाना आयोगाकडे ५,५०० कामगारांचे लेखी निवेदन पाठविले. त्यात दर रविवारी पगारी सुटी, दररोज नियमित कामाच्या १४ तासांऐवजी १२ तास, मुलांचे नोकरीचे वय ७ वर्षांवरून ९ वर्षे करावे, दर महिन्याच्या १५ तारखेच्या आत वेतन मिळावे, कामगाराला दुखापत झाल्यास पगारी रजा मिळावी, तसेच फार मोठी शारीरिक इजा होऊन कामगार कामासाठी अपात्र ठरल्यास त्याच्या भावी जीवनासाठी आर्थिक तरतूद केली जावी. इ. मागण्यांचा समावेश करण्यात आला होता. या मागण्यांचे निवेदन कलकत्त्यास गव्हर्नर जनरलकडेही पाठविण्यात आले होते (१८८९).

‘मुंबई गिरणी कामगार संघ

लोखंडे यांनी १८९०  मध्ये ‘मुंबई गिरणी कामगार संघ’ (बॉम्बे मिलहँड्स असोसिएशन) नावाची भारतातील पहिली कामगार संघटना स्थापिली. एप्रिल १८९०  मध्ये दहा हजार स्त्री-पुरुष कामगारांची मोठी परिषद लोखंडयांनी मुंबईत भरविली. या परिषदेत स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. मुंबईतील औद्योगिक संघटनांच्या चळवळीतील ही महत्त्वाची घटना समजली जाते. त्यानंतर लगेचच १०जून, १८९०  रोजी शासनाने, कामगारांना दर रविवारी पगारी सुटी देण्याचा निर्णय जाहीर केला. १८९१ मध्ये कामगार कायदा संमत करण्यात येऊन लोखंडे यांच्या काही सूचनांचा त्यात समावेश करण्यात आला. सरकारने त्यांच्या कामगिरीची दखल देऊन त्यांना ‘जे.पी.’ हा किताब देऊन त्यांचा गौरव केला.

सक्तीचे शिक्षण, दारूबंदी, मागासलेल्यांना नोकरीत प्रवेश, विद्यार्थ्यांना सवलती, शेतकऱ्यांना जंगलच्या कायद्यामुळे होणारा त्रास, विधवांच्या केशवपनास बंदी वगैरे अनेक प्रश्नांना लोखंडे यांनी दीनबंधूमधून वाचा फोडली. रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची दुर्दशा झाली असल्याचा पहिला आवाज दीनबंधूने उठविला. लोखंडे यांनी मुंबईत १८९३ मध्ये झालेल्या हिंदू-मुसलमानांच्या दंगलीत शांतता प्रस्थापित करण्याचे काम केले. या कामगिरीबद्दल इंग्रज सरकारने त्यांना ‘रावबहादूर’ ही पदवी बहाल केली. लोखंडे मूलतः निर्भीड वक्ते, झुंझार लेखक, संपादक व मुद्रक होते. ‘शिक्षणाद्वारे समजासुधारणा’ हे त्यांच्या विचारांचे ध्येय होते.

मुंबईत १८९६ मध्ये प्लेगची मोठी साथ उसळली. या साथीत अनेक लोक मृत्युमुखी पडले. याही वेळी पुढाकार घेऊन लोखंडे यांनी सरकारी मदतीने प्लेग्रस्तांसाठी एक ‘मराठा इस्पितळ’ काढले; परंतु दुर्देवाने लोखंडे यांनाच प्लेगने पछाडले व त्यातच त्यांचा अंत झाला.

लेखक: रा. ना. चव्हाण

माहिती स्रोत:मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/20/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate