बद्रुद्दीन तय्यबजी : (१० ऑक्टोबर १८४४–१९ सप्टेंबर १९०६). राष्ट्रीय काँग्रेसच्या आद्यपर्वातील एक थोर मुस्लिम पुढारी आणि मुस्लिम समाजात निधर्मवादी भूमिका घेणारे व गोषा पद्धतीविरुद्ध प्रचार करणारे पहिले समाजसुधारक. त्यांचा जन्म मुंबई येथे अरबमुसलमान कुटुंबात झाला. त्यांची आई अमीना आणि वडील भाई मियान हे सनातनी सुलेमानी मुसलमान कुटुंबातील होत, तरीही बद्रुद्दीननी पुढील आयुष्यात पाश्चात्य शिक्षणाची कास धरली आणि लंडनमध्ये पुढील शिक्षणासाठी वास्तव्य केले; पण शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर नेत्ररोगामुळे त्यांना मुंबईस परतावे लागले. आपल्या लंडनमधील वास्तव्यात नेहमीच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त त्यांनी फ्रेंच, उर्दू, फार्सी, अरबी वगैरे भाषांचा अभ्यास केला. भारतात एक वर्षभर राहून पुन्हा ते इंग्लंडला बॅरिस्टर होण्यासाठी गेले. तत्पूर्वी त्यांनी रहत–उन–नफ्स या युवतीबरोबर विवाह केला. १८६७ मध्ये ते बॅरिस्टर होऊन भारतात परत आले आणि मुंबईस कायदेपंडित म्हणून त्यांनी लवकरच नावलौकिक मिळविला. सु. दहा वर्षे त्यांनी वकिली केली. १८७१ मध्ये त्यांनी सार्जवनिक कार्यास प्रारंभ केला आणि १८८२ मध्ये ते मुंबईच्या कायदेमंडळावर निवडून आले. १८८५ मध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई येथे भरले. त्यात बद्रुद्दीन यांनी सर्व सहकार्य दिले; पण अधिवेशनास ते हजर राहू शकले नाहीत. मात्र १८८७ मध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या मद्रास अधिवेशनाचे ते अध्यक्ष म्हणून निवडले गेले. १८७८ मध्ये पडलेल्या दुष्काळात तसेच १८९८ मधील प्लेगच्या साथीच्या वेळी त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले व जनतेस सर्वतोपरी मदत दिली. १८७६ मध्ये भावाच्या सहकार्याने त्यांनी मुसलमानांच्या शिक्षणाकरिता अंजुमन-ई-इस्लाम या शिक्षणसंस्थेची स्थापना केली. मुसलमान समाजाचा मागासलेपणा घालविण्यासाठी त्यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रांत महत्त्वाचे कार्य केले. गोषा पद्धतीविरुद्ध त्यांनी मोहीम काढली. त्यांनी आपल्या घरातून पडदापद्धती बंद करून मुलींना शिक्षणासाठी परदेशात पाठविले. संमतिवयाच्या कायद्याला हिंदू आणि मुसलमान यांचा विरोध असतानासुद्धा त्यांनी १८९१ मध्ये पाठिंबा दिला.
मुंबईच्या उच्च न्यायालयाचे १९०२ मध्ये ते न्यायाधीश झाले. हा मान मिळविणारे ते पाहिले भारतीय होते. न्यायालयात राष्ट्रीय काँग्रेसची निंदा करण्यास त्यांनी मज्जाव केला; तसेच लो. टिळकांना तीन न्यायाधीशांनी जामीन नामंजूर केला असता, त्यांनी तो मंजूर केला. एक निस्पृह व निःस्वार्थी न्यायाधीश म्हणून त्यांनी लौकिक मिळविला. महात्मा गांधींनी ‘काँग्रेसच्या सर्व सभांमधील एक महत्त्वाचा निर्यायक दुवा’ असे त्यांचे वर्णन हरिजन (१८ नोव्हेंबर १९३९) मध्ये केले होते. तय्यबजी लंडन येथे मरण पावले.
संदर्भ : Tyabji, Husain B. Badruddin Tyabji : A Biography, Bombay, 1952.
लेखक - इंदुमति केळकर
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/10/2020
आधुनिक समाजसुधारक व पत्रकार. तमिळनाडूतील तंजावर ये...
गुजरातमधील समाजसुधारक, ‘ठक्करबाप्पा’ या नावानेही त...
अखिल भारतीय काँग्रेसच्या मूळ संस्थापकांपैकी एक निष...
द्राविड आंदोलनाचे प्रमुख नेते व तमिळ जनतेत पेरियार...