অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भुलाभाई देसाई

भुलाभाई देसाई

भुलाभाई देसाई : (१३ ऑक्टोबर १८७७–६ मे १९४६). भारतातील एक प्रसिद्ध विधिज्ञ व राष्ट्रीय पुढारी. भुलाभाईंचे वडील जीवनजी सरकारी वकील (मुख्तियार) होते. सुरुवातीस त्यांची आर्थिक परिस्थिति सामान्य होती; पण पुढे त्यांनी जमीनजुमला घेतला व बलसाडला घर बांधले. त्यांची आई रमाबाई निरक्षर व धार्मिक वृत्तीची होती.

भुलाभाईंचा जन्म बलसाडला झाला. प्राथमिक शिक्षण बलसाड येथे. १८९५ मध्ये मॅट्रिक झाल्यावर त्यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयातून एम्. ए. ही पदवी घेतली (१९०१) व अहमदाबाद येथील गुजरात महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी पतकरली. तत्पूर्वी १८८२ मध्ये विद्यार्थिदशेतच इच्छाबेन या युवतीशी त्यांचे लग्न झाले. त्यांना धीरूभाई नावाचा एकच मुलगा झाला.

हे धीरूभाई देसाई काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते व पुढे ते भारताचे स्वित्झर्लंडमध्ये राजदूत म्हणून गेले व तेथेच त्यांचे निधन झाले. अहमदाबादला असतानाच भुलाभाई एल्एल्. बी. झाले वे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाची वकिली परीक्षा दिली (१९०५). त्यांनी मुंबईस वकिलीस सुरुवात केली व अल्पावधीतच तज्ञ वकील म्हणून नाव मिळविले.

पुढे मुंबई राज्यात ते ॲडव्होकेट जनरल झाले. त्यांनी पुढे होमरूलच्या चळवळीत भाग घेतला. गांधीजींच्या असहकारीतेच्या चळवळीपासून ते बदलू लागले. १९२५ साली ते ब्रूमफिल्ड समितीपुढे बार्डोलीच्या शेतकऱ्यांतर्फे उभे राहिले. १९३१ साली गांधी-आयर्विन कराराप्रमाणे बार्डोलीच्या शेतकऱ्यांची बाजू मांडली. १९३२ साली त्यांना कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल एक वर्ष शिक्षा व १०,००० रु. दंड झाला.

तुरुंगात त्यांची प्रकृती ढासळली व सुटका झाल्यावर ते वकिलीच्या काही कामानिमित्त इंग्लंडला गेले. तेथून परत आल्यावर त्यांनी काँग्रेसतर्फे पार्लमेंटरी बोर्ड स्थापण्याचा प्रयत्न केला. ते त्या बोर्डाचे सचिव व पुढे अध्यक्ष झाले. ते मध्यवर्ती कायदे मंडळात गुजरातमधून निवडून आले व विरोधी पक्षाचे नेते झाले. ते काँग्रेस वर्किंग कमिटीचे काही वर्षे सभासद होते. दुसरे महायुद्ध संपल्यावर आझाद हिंद सेनेच्या नेत्यांवर दिल्लीच्या लाल किल्ल्यात जे खटले झाले, ते भुलाभाईंनी अत्यंत काळजीपूर्वक हाताळले. त्यांत त्यांना पूर्ण यश आले.

भुलाभाईंनी लियाकत अलींबरोबर जातीय प्रश्नांबाबत एक करारही केला होता. हा देसाई-लियाकत करार अमंलात आला नाही. काँग्रेस वर्किंग कमिटीने भुलाभाईंवर गांधीजींचा विचार न घेता हा करार केला, असा आरोप ठेवला. पुढे हंगामी (इंटेरिम) मंत्रिमंडळातही भुलाभाईंचा समावेश केला नाही. शिवाय निवडणुकीसाठी त्यांचे नावही सुचविले नाही. यांमुळे अखेरच्या दिवसांत त्यांची उपेक्षा झाली. यातच ते आजारी पडले. त्यांचे मुंबईस निधन झाले. इंग्रजीवरील त्यांचे प्रभुत्व, अस्खलित वक्तव्य आणि वकिलीतील अशीलाची बाजू मांडण्याची हातोटी यांमुळे ते अत्यंत लोकप्रिय होते.

 

संदर्भ : Setalvad, M. C. Bhulabhai Desai, New Delhi, 1968.

लेखक - त्र्यं. र. देवगिरीकर

लेखक - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate