অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मरुथुर गोपाल रामचंद्रन

मरुथुर गोपाल रामचंद्रन

मरुथुर गोपाल रामचंद्रन : (१७ जानेवारी १९१७ –२४ डिसेंबर १९८७). भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार लाभलेले तमिलनाडूचे मुख्यमंत्री (१९७७ – ८७) आणि लोकप्रिय अभिनेते. एम्. जी. आर्. या नावानेच ते अधिक परिचित आहेत. जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात श्रीलंकेतील कँडी या गावी. त्यांचे वडील मरुथुर गोपाल मेनन प्राध्यापक होते. आईचे नाव सत्यभामा. वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर हे कुटुंब कुंभकोणम् गावी स्थायिक झाले. आर्थिक अडचणींमुळे रामचंद्रन यांनी मदुराई बॉइज ड्रामा कंपनीत एक सेवक म्हणून प्रवेश केला. या कंपनीच्या काही नाट्यप्रयोगांतून काम करण्याची संधीही त्यांना लाभली. पुढे मक्कल थिलगम (१९३६) या तमिळ चित्रपटातील कामामुळे त्यांना प्रसिद्धी लाभली. चित्रपटांतून लहान-मोठी कामेही मिळू लागली. जेमिनी कंपनीच्या एस्. एस्. वासन यांनी सथी लीलावथी (१९५४) या चित्रपटात त्यांना काम दिले. पुढे राजकुमारी या चित्रपटातील भूमिकेमुळे त्यांची लोकप्रियता वाढली. त्यांनी १९७७ पर्यंत एकूण १३६ चित्रपटांत (तमिळ १३३, तेलुगू १, मलयाळम् १ व हिंदी १) काम केले. तसेच चित्रपट-दिग्दर्शन व निर्मिती क्षेत्रांत त्यांनी नावलौकिक मिळविला, त्यांना कीर्ती व अमाप संपत्ती मिळाली. रिक्षावकरन, मलईकल्लन, अदिमई-पेन्, उलगम सुत्रुम वलिभन, अली बाबा व चाळीस चोर, एन्गा वित्तू पिलाई, नम्मनाडू, कवलकरन, कुडिथिरून्थ, कोहल, एंगल थंगम इ. त्यांचे उल्लेखनीय चित्रपट. अभिनय, दिग्दर्शन वा निर्मिती यांबद्दल त्यांना अनेक शासकीय व इतर सांस्कृतिक पुरस्करा लाभले.

एम्. जी. आर्. यांच्याबरोबर जानकी, पद्मिनी, सरोजादेवी, लता, जयललिता वगैरे प्रसिद्ध अभिनेत्रींनी नायिकेच्या भूमिका केल्या. त्यांपैकी जानकीबरोबर ते विवाहबद्ध झाले. त्यांना संतती नव्हती, म्हणून त्यांनी एक मुलगा (रवि) आणि मुलगी दत्तक घेतली. जयललिता पक्षीय राजकारणात विशेष सचिव म्हणून अखेरपर्यंत त्यांच्याबरोबर होती. चित्रपटांतून जुगार, मद्यसेवन आणि बलात्कार ही दृश्ये ते कटाक्षाने टाळीत. गोरगरिबांचा कैवारी अशीच त्यांची प्रतिमा जनमानसात होती. तिचा लाभ त्यांनी पुढे द्रविड मुन्नेत्र कळघम् पक्षाच्या राजकारणात पुरेपूर घेतला. प्रारंभी ते म. गांधीचे अनुयायी व निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ते होते. सी. एन्. अण्णादुराईंची वक्तव्ये आणि लेखन यांमुळे त्यांचे परिवर्तन झाले आणि १९५३-५४ मध्ये ते द्रविड मुन्नेत्र कळघम् पक्षाचे सक्रिय सभासद झाले. या पक्षात दुराई व करुणानिधी यांच्या खालोखाल त्यांचे स्थान होते. १९६७ मध्ये ते द्र. मु. क. तर्फे विधानसभेवर प्रथम निवडून आले. पक्षाचे खनिजदार आणि अल्पबचत खात्याचे उपाध्यक्ष ही पदे त्यांनी सांभाळली. अण्णादुराईंच्या निधनानंतर (१९६९) त्यांनी करुणानिधींना सर्वतोपरी सहकार्य दिले; परंतु १९७२ मध्ये करुणानिधींशी मतभेद होऊन त्यांनी अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम् हा नवीन पक्ष काढला. ते त्याचे अध्यक्ष झाले आणि अण्णा नावाच्या मुखपत्राचे संपादकपदही त्यांनी अंगीकारले. या पक्षाला तत्काळ लोकप्रियता लाभली. पुढे पक्षाचे त्यांनी ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम् हे नाव घोषित केले. १९७७ मध्ये त्यांच्या पक्षाचे विधानसभेत बहुमत होऊन रामचंद्रन तमिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. या पदावर पाच महिने वगळता ते आमरण (१९८७) होते. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने १९७७, १९८० व १९८४ च्या सार्वत्रिक निवडणुका जिंकल्या.

आपल्या मुख्यमंत्रिमपदाच्या काळात त्यांनी अनेक उपक्रम राबविण्याचा संकल्प सोडला आणि सु. २०० कोटी रुपयांच्या योजना जाहीर केल्या. त्यांपैकी विद्यार्थ्यांना दुपारचे मोफत भोजन, ही योजना कार्यान्वित झाली; परंतु स्त्री व मुले यांना मोफत पादत्राणे, झोपडपट्टीवासीय व अल्पभूधारक यांना मोफत वीजपुरवठा, भांडी, कपडेलत्ते आणि मुलांना गणवेश व पुस्तके इ. गोष्टी कागदावरच राहिल्या. हा केवळ त्यांचा कल्पनाविलास होता, अशी टीका झाली. दारूबंदीचे धोरण त्यांनी सुरुवातीस अत्यंत कठोरपणे अंमलात आणले; पण नंतर त्यातही शिथिलता आली. राष्ट्रीय पातळीवर राजकीय धोरणात अनेकदा त्यांची धरसोड वृत्ती दिसून आली. कधी ते इंदिरा काँग्रेसला मदत करीत तर कधी विरोधी पक्षांना पाठिंबा देत; पण दिल्लीतील सत्ताधारी पक्षास पाठिंबा हे त्यामागील सूत्र होते. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात फारसा प्रभाव ते निर्माण करू शकले नाहीत; तथापि वाचा गेली होती व ते पक्षाघाताने अंथरुणाला जखडलेले असूनसुद्धा त्यांच्याकडेच मुख्यमंत्रिपद होते. त्यातच भारत-श्रीलंका करारात समझोत्याची व शांततामय सहजीवनाची भूमिका घेऊन त्यास पाठिंबा दिला. त्यांच्या राजकीय कार्याबद्दल त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला (२६ जानेवारी १९८८) तमिळनाडूतील एक अनन्यसाधारण लोकप्रिय नेता व अभिनेता म्हणून त्यांचे स्थान मोठे आहे; पण लोकरंजनवादी धोरणांचा पाठपुरावा केल्यामुळे त्यांच्या काळात विकासयोजनांना खीळ बसली.

 

संदर्भ : 1. Barnouw, Erik; Krishnaswamy, S. Indian Film, New York, 1980.

2. Kasturi, G. Ed. Frontline, February-6-19, 1988, Madras.

 

लेखक - सु. र. देशपांडे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/27/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate