অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रवींद्रनाथ टागोर

रवींद्रनाथ टागोर

रवींद्रनाथ टागोर

(७ मे १८६१ – ७ ऑगस्ट १९४१). जगप्रसिद्ध भारतीय कवी, कलावंत, शिक्षणतज्ज्ञ आणि तत्त्वचिंतक. रवींद्रनाथांचा जन्म कलकत्ता येथे पिरालीनामक ब्राह्मणांच्या ठाकूर उपनावाच्या कुटूंबात झाला. त्यांचे वडील देवेंद्रनाथ (१८१७–१९०५) आणि आई शारदादेवी (१८२६/२७–१८७५). त्यांच्या एकूण पंधरा अपत्यांपैकी रवींद्रनाथ चौदावे. ठाकूर कुटुंबाचे मूळ आडनाव कुशारी. वर्धमान जिल्ह्यातील ‘कुश’ हे त्यांचे मूळ गाव. तेथून यशोहर गावी स्थलांतर. जातिबहिष्कारामुळे आपले यशोहर (जेसोर) गाव सोडून महेश्वर व शुकदेव हे त्यांचे पूर्वज कलकत्त्याच्या दक्षिणेला गोविंदपूर गावी स्थायिक झाले. पुढे पंचानन कुशारी ह्या पूर्वजाने ईस्ट इंडिया कंपनीच्या कामाचे ठेके घ्यायला सुरुवात केली. त्या काळी ब्राह्मणेतर लोक ब्राह्मणांना ‘ठाकूर मोशाय’ अशा बहुमानार्थी नावाने संबोधीत. इंग्रज कप्तानांनी ‘ठाकूर’ चा ‘टागोर’ असा उच्चार केला. ईस्ट इंडिया कंपनीच्या बरोबर टागोर कुटुंबाचीही भरभराट झाली. इंग्रज व्यापारी, राज्यकर्ते आणि ज्ञानोपासक ह्यांच्यात वावर असणाऱ्‍या नव्या सरंजामदारांत टागोर घराण्याचाही अंतर्भाव झाला. त्यांपैकीच राजा राममोहन रॉय (१७७२–१८३३) यांनी बंगालच्या सामाजिक प्रबोधनाची चळवळ सुरू केली. त्यांच्या भूमिकेशी रवींद्रनाथांचे आजोबा द्वारकानाथ एकरूप झाले. सार्वजनिक कार्याला त्यांनी केवळ आर्थिकच नव्हे, तर स्वतः उत्तम कायदेपटू आणि व्यासंगी असल्यामुळे वैचारिक परिवर्तनाच्या कार्यातही भाग घेऊन साहाय्य केले. त्यांचे ज्येष्ठ पुत्र देवेंद्रनाथ हे रवींद्रनाथांचे तीर्थरूप. बंगाली ब्राह्मसमाजाच्या स्थापनेत आणि प्रसारात त्यांचा फार मोठा वाटा आहे. ब्राह्मसमाजाचे अनुयायी त्यांचा महर्षी देवेंद्रनाथ असा उल्लेख करीत. सर्व प्रकारच्या ऐहिक सुखसंपत्तीची अनुकूलता असूनही उपनिषदांतील तत्त्वज्ञानाच्या गाढ व्यासंगामुळे आणि जन्मजात ईशप्रेमामुळे देवेंद्रनाथांच्या अंगी विरक्ती बाणलेली होती.

रवींद्रनाथांचे बंधू द्विजेंद्रनाथ (१८४०–१९२६) हे कवी आणि तत्त्वचिंतक; सत्येंद्रनाथ (१८४२–१९२३) हे पहिले भारतीय आय्. सी. एस्. अधिकारी व व्यासंगी लेखक; ज्योतिरिंद्रनाथ (१८४९–१९२५) हे नाटककार, संगीतरचनाकार व भाषांतरकार; भगिनी स्वर्णकुमारी (१८५५–१९३२) ह्या कादंबरीकर्त्या. जोडासाँको भागातील वाड्यात पहिल्या मजल्यावरच्या आपल्या खिडकीतून बाहेरची निसर्गशोभा पाहत बसणे, हा रवींद्रनाथांचा बालपणीचा विरंगुळा होता. ‘जॉल पॉडे पाता नॉडे’ (पाणी पडे-पान झुले) ह्या लहानशा ओळीतल्या छंदाने व यमकाने त्यांच्या बालमनात शब्दांचे नृत्य सुरू झाले. घरात काव्य, शास्त्र, विनोद, नाट्य, संगीत यांचे अप्रत्यक्ष संस्कार घडत होते. त्यामुळे पाठशाळेतील आनंदशून्य शिक्षण त्यांना रुचेना. १८७४ साली कलकत्त्याच्या सेंट झेवियर्स स्कूलमधील परीक्षा ते उत्तीर्ण झाले नाहीत. त्यानंतर त्यांचे शिक्षण त्यांचे बंधू हेमेंद्रनाथ (१८४४–८४), द्विजेंद्रनाथ आणि ज्योतिरिंद्रनाथ यांच्या देखरेखीखाली मातृभाषेतून सुरू झाले. रवींद्रनाथांना निसर्गतः लाभलेल्या रूपसौंदर्याइतकीच मधुर आवाजाचीही उपजत देणगी होती. ‘मला कधी गाता येत नव्हते असे आठवत नाही’, असे त्यांनी म्हटले आहे. आदी ब्राह्म समाजाचे गायक विष्णुचंद्र चक्रवर्ती (१८०४–१९००) हे त्यांचे पहिले गायनगुरू. यदुभट्ट यांच्याहीपाशी त्यांचे संगीतशिक्षण झाले. मात्र संगीताच्या कुठल्याही विशिष्ट प्रणालीत त्यांनी स्वतःला बांधून घेतले नाही. त्यामुळे नंतरच्या काळात त्यांनी रचलेल्या शेकडो गीतांत चालींची विविधता आढळून येते. तिचे मूळ ह्या चोहोकडून मिळवलेल्या गाण्यांत आहे. जे संगीतात तेच साहित्यात. ज्येष्ठ बंधूंच्या ग्रंथसंग्रहातील थोर लेखकांचे ग्रंथ, अबोधबंधु, वंगदर्शन यांसारखी नियतकालिके, बालवयात वाचीत असताना नोकरचाकरांच्या सहवासात चाणक्य श्लोक, कृत्तिवासाचे रामायण, महाभारातांतील कथा, विद्यापती, चंडिदास यांची काव्ये यांचेही श्रवण चालत असे. लहानपणी त्यांना इंग्रजी शिकवायला येणाऱ्‍या अघोरबाबू नावाच्या शिक्षकामुळे साहित्याइतकीच रवींद्रनाथांना विज्ञानाचीही गोडी उत्पन्न झाली आणि ती आयुष्याच्या अखेरीपर्यत टिकली.

बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील बोलपूरजवळ एक विस्तीर्ण माळ रायपूरच्या जमीनदाराकडून देवेंद्रनाथांनी विकत घेऊन तेथे एक कुटिर बांधले. पुढे त्याचीच दुमजली इमारत केली. तिचे नाव ‘शांतिनिकेतन’. जवळच असलेल्या सप्तपर्णीच्या विशाल वृक्षाखाली महर्षी देवेंद्रनाथ ध्यानाला बसत. रवींद्रनाथांचा संस्कृत, इंग्रजी भाषांचा अभ्यास स्वतः देवेंद्रनाथांनी इथल्या वास्तव्यात करून घेतला. ज्योतिर्विद्येची त्यांना गोडी लावली. रवींद्रनाथांचे काव्यलेखन बालवयातच सुरू झाले होते.तत्त्वबोधिनी पत्रिका नावाच्या नियतकालिकात त्यांची ‘अभिलाष’ ही कविता प्रसिद्ध झाली. त्या वेळी ते बारा वर्षाचे होते. देशप्रेम, सामाजिक सुधारणांचा प्रचार यासाठी टागोर कुटुंबियांच्या साहाय्याने नवगोपाळ मित्र, राजनारायण बसू वगैरे समाजसुधारक कलकत्त्यात ‘हिंदु मॅला’ नावाने एक उत्सव साजरा करीत. त्याच्या नवव्या अधिवेशनात रवींद्रनाथांनी वयाच्या चौदाव्य वर्षी (१८७४) देशप्रेमाने प्रेरित होऊन लिहिलेली ‘हिंदु मॅलाय उपहार’ ही कविता वाचली. ह्याच सुमाराला त्यांच्या मातोश्रीचे निधन झाले. नंतर बंधू ज्योतिरिंद्रनाथ आणि वहिनी कादंबरी देवी यांचे छत्र त्यांना लाभले.

बंगालमध्ये ब्रिटिश विरोधी चळवळींनी जोर धरला होता. अशा वेळी इटालियन देशभक्त मॅझिनी याच्या ‘कार्बोनारी’ सारख्या क्रांतिकारकांच्या ‘संजीवनी सभा’ नावाच्या गुप्त मंडळात ते दाखल झाले. राजनारायण बसू ह्या मंडलाचे सूत्रचालक होते. हे मंडळ फार काळ टिकले नाही. इथून पुढे रवींद्रनाथांच्या लेखनाने खूप वेग घेतला. १८७६ सालापासून ज्ञानांकुर ओ प्रतिबिंबह्या नियतकालिकातून त्यांच्या कथा, कविता, निबंध तसेच भाषांतरित लेख प्रसिद्ध होऊ लागले. आठ सर्गांचे बनफूल(१८८०) हे खंडकाव्यही याच काळातले. वैष्णव संत कवींच्या धर्तीवर ‘भानुसिंह’ ह्या टोपणनावाने ब्रजबुलीत त्यांनी गीत लिहिली. मात्र कुमारवयातील आपल्या या साहित्यरचनेतील अपरिपक्वतेची रवींद्रनाथांना जाणीव होती. भारती ह्या टागोर कुटुंबातर्फे प्रसिद्ध होणाऱ्‍या मासिकातून १८७३ नंतर त्यांनी पुष्कळ लेखन केले. १४ ते १६ वर्षे वयातील त्यांच्या कविता त्यानंतर बऱ्‍याच वर्षांनी शैशव-संगीत (१८८४) ह्या नावाच्या संग्रहात प्रसिद्ध झाल्या. भारतीतून प्रसिद्ध झालेल्या साहित्यातकविकाहिनी नावाचे काव्य-नाट्य होते. १८७८ साली ते ग्रंथरूपाने छापून प्रसिद्ध झाले. रवींद्रनाथांचा हा पहिला मुद्रित ग्रंथ. याच सुमाराला त्यांचे बंधू सत्येंद्रनाथ यांनी रवींद्रनाथांना बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला पाठवायचे ठरविले. विलायती रीतिरिवाज आणि इंग्रजी भाषेतील संभाषणात अधिक सफाई येण्यासाठी त्यांनी रवींद्रनाथांना अहमदाबादेतील आपल्या प्रासादतुल्य सरकारी बंगल्यात मुक्कामासाठी आणले. वाचन, लेखन, गीतरचना, त्या गीतांना चाली देणे ह्या कार्यासाठी रवींद्रनाथांनी येथील निवांततेचा उपयोग करून घेतला. ‘क्षुधित पाषाण’ ह्या त्यांच्या सुप्रसिद्ध कथेचे बीज ह्या ऐतिहासिक वास्तूवरून त्यांच्या मनात रुजले. उत्तम इंग्रजी ग्रंथांचे अध्ययन आणि कालिदासाच्या काव्याचा त्यांचा अभ्यास येथेच झाला.

सत्येंद्रनाथांनी त्यानंतर इंग्रजी रीतिरिवाजाच्या अभ्यासासाठी त्यांची सोय मुंबईला डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खड यांच्या बंगल्यात सधन, सुशिक्षित आणि पाश्चात्त्य धाटणीची रहाणी असलेल्या कुटुंबात केली. तत्कालीन बंगालमधील श्रीमंत घराण्यातील स्त्रिया अंतःपुरातच असत. स्त्रियांच्या बाबतीत पुरुषातही एक प्रकारचा संकोच असे. तर्खडांच्या घरातील मोकळ्या वातावरणाने आणि विशेषतः डॉ. तर्खड यांची कन्या अन्नपूर्णा (आन्ना) हिच्या सहवासाने रवींद्रनाथांचा हा बुजरेपणा गेला. ह्या स्नेहबंधनातून निर्माण झालेली अनेक गीते शैशष–संगीत ह्या संग्रहात आहेत. १८७८ साली ⇨ सत्येंद्रनाथ टागोरांच्या बरोबर रवींद्रनाथ इंग्लंडला गेले. तेथे लंडन युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये हेन्री मॉर्ली यांच्यापाशी त्यांनी इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला. तेथून भारतीमध्ये त्यांची ‘यूरोपयात्री कोनो वंगीय तरुणेर पत्र’ ह्या शीर्षकाखाली यूरोपीय जीवन आणि संस्कृतीसंबंधीची पत्रे प्रसिद्ध होऊ लागली. इंग्लंडमधील समाजजीवनासंबंधी त्यांत प्रतिकूल टीका असल्यामुळे इंग्रज धार्जिण्या उच्चभ्रू बंगाली समाजाचा त्यांच्यावर रोष झाला. १८८० साली त्यांना परत बोलावून घेण्याचे हेही एक कारण असावे असे म्हणतात. मात्र इंग्लंडमधील वास्तव्यात तेथील स्त्रीवर्गाला मिळणाऱ्‍या सामाजिक व्यवहारातील स्वातंत्र्याचा त्यांच्या मनावर अनुकूल परिणाम झाला. यूरोप प्रवासातील पत्रे १८८१ साली युरोप प्रवासीर पत्र नावाने प्रसिद्ध झाली. बंगालीच्या लोकव्यवहारातील (चलित) भाषेतील हा पहिला ग्रंथ मानला जातो. त्यानंतरच्या काळात रवींद्रनाथांनी बंगाली ग्रांथिक (साधू) भाषेला सहज भाषेचे वळण देण्यात फार मोठे यश मिळविले. इंग्लंडमधून रवींद्रनाथ कोणतीही शैक्षणिक पदवी न मिळवता परतले. मात्र तिथल्या वास्तव्यात चौतीस प्रवेशांचे व चार हजार ओळींचे भग्नहृदय (१८८१) हे अपुरे नाट्य-काव्य त्यांनी लिहिले. भारतात आल्यावर ते पुरे केले. पौगंडावस्थेतील बुजऱ्‍या रवींद्रनाथांचे, पाश्चात्त्य जगातील गतिशीलता, स्वतंत्रता यांसारख्या सद्‌गुणांच्या प्रभावामुळे एका धीट, स्पष्टवक्त्या तरुणात रूपांतर झाले होते. १८८१ साली त्यांनी वाल्मिकी प्रतिभा ही पहिली संगीतिका लिहून तिचा जोडासाँको येथील टागोर वाड्यात पहिला प्रयोग केला. त्या संगीतिकेतील गीतांत भारतीय मार्गी व देशी संगीताप्रमाणे यूरोपीय ललित संगीताचाही वापर केला होता. जे सूर भावनेच्या अभिव्यक्तीला अधिक परिणामकारक वाटतील, त्यांचा गीतगायनात मुक्तपणाने उपयोग करण्याच्या ह्या प्रवृत्तीतूनच ⇨ रवींद्रसंगीत निर्माण झाले.

रवींद्रनाथांची साहित्य, संगीत, कलासाधना उत्साहाने चालू असताना त्यांना पुन्हा एकदा इंग्लंडला पाठवून बॅरिस्टर करण्याचा कुटुंबातील वडील मंडळींनी प्रयत्न केला; परंतु विलायतेच्या बोटीत चढण्यापूर्वी मद्रास बंदरातूनच ते परतले आणि कलकत्त्याला आपले बंधू ज्योतिरिंद्रनाथ आणि वहिनी कादंबरी देवी यांच्या बिऱ्‍हाडी राहू लागले. येथे त्यांच्या कलासाधनेला अधिक पोषक वातावरण लाभून त्यांच्या निर्मितिक्षम प्रतिभेचे उन्मेश जोमाने प्रकट होऊ लागले. स्पेन्सरच्या ‘द ऑरिजिन अँड फंक्शन ऑफ म्यूझिक’ ह्या निबंधाने प्रभावित होऊन त्यांनी ‘संगीताची उत्पत्ती आणि उपयोगिता’ ह्या विषयावरचा निबंध लिहिला. भारतीय संगीतातील रागप्रधान संगीत भावनाशून्य झाल्याची चिंता त्यात व्यक्त झाली आहे. त्या विवेचनात त्यांचा ओढा गीतगायनाकडे अधिक असला, तरी त्यानंतर तीस वर्षांनी त्यांनी स्वरप्रधान संगीताचे ऐश्वर्य व स्वयंसिद्ध स्थान मान्य केले. त्या काळी त्यांच्या काव्यरचनेचा मूलस्त्रोत संगीत हाच होता. त्यांच्या तत्कालीन काव्यसंग्रहांची नावेदेखील संध्या संगीत(१८८२), प्रभात संगीत (१८८२), शैशवसंगीत, छबि ओ गान (१८८४), कडि ओ कोमल (१८८६, म. शी. तीव्र आणि कोमल) अशी संगीताशी नाती सांगणारी आहेत. बंधू ज्योतिरिंद्रनाथांच्या बंगल्यात रहात असताना आलेल्या साक्षात्कारासारख्या एका विलक्षण अनुभवातून त्यांची ‘निर्झरेर स्वप्नभंग’ ही अप्रतिम कविता निर्माण झाली. जीवनस्मृति(१९१२) ह्या ग्रंथात त्या अनुभूतीचे सविस्तर वर्णन त्यांनी केले आहे. इथून पुढे त्यांच्या काव्यजीवनातील विषादपर्व संपून आनंदपर्व सुरू झाले.

सत्येंद्रनाथांबरोबर काही काळ कारवारलाही ते राहिले. तिथल्या निसर्गरम्य आणि शांत वातावरणात त्यांच्या प्रतिमेला खूप बहर आला. प्रकृतीर प्रतिशोध (१८८४) ही नाटिका त्यांनी येथील मुक्कामात लिहिली. १८८३ साली कारवारहून कलकत्त्याला परतल्यानंतर, महर्षी देवेंद्रनाथांच्या जमीनदारीची व्यवस्था पाहणाऱ्‍या कारकुनांपैकी वेणीमाधव रायचौधुरी ह्या सामान्य परिस्थितीतील पिराली ब्राह्मण गृहस्थाची मुलगी भवतारिणी (जन्म १८७३) हिच्याशी त्यांचा विवाह झाला. नूतन वधूचे नाव ‘मृणालिनी’ असे ठेवण्यात आले. देवेंद्रनाथांनी तिच्या शिक्षणाची व्यवस्था लॉरेटा हाऊस ह्या विद्यालयात केली. मृणालिनी देवींनी रवींद्रनाथांच्या जीवनात एक अत्यंत कर्तव्यपरायण गृहिणी होऊन त्यांच्या संसाराचा भार वाहिला. १८८४ साली ज्योतिरिंद्रनाथांच्या पत्‍नी कादंबरी देवी यांनी आत्महत्या केली. रवींद्रनाथांच्या मनावर ह्या घटनेचा फार मोठा आघात झाला. रवींद्रांच्या तरुण काळात झालेले हे दुःख त्यांच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांना जाणवत राहिले होते; पण त्यांनी आपल्या जीवनात कुठलीही अवस्था अखेरची मानली नाही. म्हणून ह्या मृत्युशोकानेही त्यांना आपल्या कर्तव्यापासून परावृत्त केले नाही. त्याच वर्षी ते आदी ब्राह्म समाजाचे कार्यवाह झाले आणि ज्येष्ठ बंगाली कादंबरीकार बंकिमचंद्र चतर्जी यांच्याशी हिंदू धर्मातील आदर्शांबद्दल त्यांचा जाहीर वादविवाद झाला.

१८८५ साली ठाकूर परिवारातर्फे निघणाऱ्‍या बालक ह्या मासिकाच्या संपादिका ज्ञानदानंदिनी देवी (सत्येंद्रनाथांच्या पत्नी) यांना त्यांनी संपादनात साहाय्य करायला सुरुवात केली. त्याच वर्षी रविच्छाया हा त्यांचा गीतसंग्रह प्रसिद्ध झाला. १८८६ साली त्यांची ज्येष्ठकन्या माधुरीलता (बेला) हिचा जन्म झाला. डिसेंबर महिन्यात कलकत्त्याला राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन भरले. ह्या प्रसंगी ‘आमरा मिले छि आज मायेर डाके’ (आईच्या हाकेच्या आज आपण जमलो आहोत) ह्या त्यांच्या कवितेच्या गायनाने अधिवेशनाला जमलेले प्रतिनिधी अत्यंत प्रभावित झाले होते. त्यांचा कडि ओ कोमल हा संग्रहही याच काळातील. आदी ब्राह्म समाजाच्या कार्यातही त्यांनी उत्साहाने भाग घेऊन समाजाच्या माघोत्सवासाठी धर्मसाधकाच्या अंतरातील व्याकुळ भाव व्यक्त करणारी सव्वीस नवीन गाणी रचून त्यांना चाली दिल्या होत्या.

ह्या वर्षीच्या इतर रचनांमध्ये धार्मिक आणि सामाजिक कालबाह्य आचार विचारांचा पाठपुरावा करणाऱ्‍याचे विडंबन करणाऱ्‍या काही विनोदी नाटिका लिहून त्यांनी विरोधकांचा रोषही ओढवून घेतला. साहित्यदृष्ट्या ह्या नाटिकांना विशेष महत्त्व नसले, तरी तरुण रवींद्रनाथांची धर्मसुधारणेच्या बाबतची तडफ यांतून प्रत्ययाला येते. १८८७ ते १८९० ह्या काळातील मानसी (१८९०) हा काव्यसंग्रह, मायार खेला (१८८८) ही संगीतिका आणि राजा ओ रानी (१८८९) हे नाटक अशासारखी रचना पाहिल्यानंतर त्यांच्या साहित्यनिर्मितीत एक निराळे परिवर्तन आढळते.

ही कलासाधना चालू असताना सामाजिक परिवर्तनासाठी बंगालमध्ये चालू असलेल्या चळवळीशी त्यांनी संबंध ठेवला होता. १८८८ साली त्यांचे ज्येष्ठ पुत्र रथींद्रनाथ यांचा जन्म झाला. १८८९ साली सोलापुरातील आपले बंधू सत्येंद्रनाथ यांच्या घराचा मुक्काम आटोपून परतताना त्यांनी पुण्याला पंडिता रमाबाईंचे व्याख्यान ऐकले. पुराणमतवादी लोकांनी आरडाओरडा करून ते व्याख्यान बंद पाडलेले पाहून ते अत्यंत व्यथित झाले. त्यांनी स्त्री स्वातंत्र्यासंबंधीच्या विचारांना चालना देणारा लेख लिहिला. नंतरच्या काळात स्त्रियांच्या आर्थिक स्वातंत्र्याचाही त्यांनी पुरस्कार केला. नव-वंग-आंदोलनावरही एक निबंध याच सुमाराला लिहिला आणि लॉर्ड क्रॉस ह्याच्या भारतविरोधी धोरणाचा समाचार घेतला. १८९० साली इंग्लंडचा तीन महिन्याचा दौरा आटपून ते परतले. याच वर्षी जोडासाँको येथील वाड्यात त्यांनी लिहिलेल्या विसर्जन (१८९०) नाटकाचा प्रयोग झाला. त्यातील रघुपतीची भूमिका त्यांनी स्वतः केली होती. देवेंद्रनाथांनी उत्तर बंगालमधील तीन परगण्यांत पसरलेल्या जमीनदारीची व्यवस्था आता त्यांच्यावर सोपवली. जमिनदारीची कामे पाहताना रवींद्रनाथांनी रयतेच्या हिताची नवीन कामे सुरू केली. १८९० ते १९०० अशी दहा वर्षे त्यांनी ग्रामीण विभागात काढली. १८९१ साली शिलाइदह ह्या गावी त्यांची दुसरी कन्या रेणुका हिचा जन्म झाला. जमिनदारीच व्यवस्था पाहण्याच्या कामामुळे बंगालच्या ग्रामीण जीवनाशी त्यांचा खूप जवळून परिचय झाला. त्या अनुभवातूनच त्यांच्या उत्कृष्ट कथांचा जन्म झाला. हितवादी नावाच्या साप्ताहिकातून त्या दर आठवड्याला प्रसिद्ध होत गेल्या. १८९१ साली त्यांनी साधना मासिक सुरू करून आपला पुतण्या सुधींद्रनाथ याला संपादक नेमले. त्यातूनशोनार तरी (१८९४), पंचभूतेर डायरी (पंचभूत–१८९७) यांसारखे त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले, १८९४ साली त्यांनी संपादनाची सूत्रे स्वतःकडे घेतली आणि ती १८९५ साली ते मासिक बंद पडेपर्यंत सांभाळली. आपली पुतणी इंदिरा देवी हिला लिहिलेली आणि त्यानंतर छिन्नपत्र (१९१२) या नावाने संगृहित झालेली त्यांची अप्रतिम पत्रे ह्याच मासिकातून प्रथम प्रसिद्ध झाली.

मीरा हिचा १८९३ साली आणि कनिष्ठ पुत्र शमींद्र याचा १८९४ साली जन्म झाला. १८९३ साली बंकिमचंद्र चतर्जींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका जाहीर सभेत ‘राष्ट्रीय विकासाचा मूलभूत पाया ग्रामीण विकास हा आहे’ हा विचार त्यांनी ‘इंग्रज ओ भारतवासी’ ह्या आपल्या लिखित भाषणातून मांडला. मातृभाषेतून शिक्षण, स्वावलंबन आणि स्वाभिमान हा स्वदेशी चळवळीचा कणा आहे, हा विचार त्यांनी या प्रसंगी सांगितला. कथा ओ काहिनी (१९०८) मध्ये भारतीय इतिहासातील वीरकथा त्यांनी कवितेत गुंफल्या. बंगाली ‘शब्द व छंद’ ह्या संबंधातील त्यांचे बहुमोल लेखनही ह्याच काळातील आहे. १८९६ च्या डिसेंबर महिन्यात कलकत्त्याच्या काँग्रेसच्या अधिवेशनात बंकिमचंद्राच्या ‘वंदेमातरम्’ ह्या गीताला रवींद्रनाथांनी चाल दिली व ते गीत स्वतः म्हटले. राष्ट्रीयसभेत ‘वंदेमातरम्’ गायिले जाण्याचा हा पहिला प्रसंग. पुढल्याच वर्षी नटोर येथे काँग्रेसचे प्रादेशिक अधिवेशन भरले असताना रवींद्रनाथांनी बंगालीतून भाषण करून प्रतिनिधींना आश्चर्याचा धक्का दिला.

मुक्त वातावरणात, निसर्गसान्निध्यात आणि गुरुजनांबरोबर राहून उपनिषदांच्या काळात जसे शिक्षण चालत असे, त्या पद्धतीचा प्रयोग करण्याच्या विचारातून महर्षी देवेंद्रनाथांनी बोलपूरजवळ बांधलेल्या ‘शांतिनिकेतन’ बंगल्यात १९०१ साली त्यांनी आश्रमशाळेची स्थापना केली. ती इमारत व सारी जमीन महर्षींनी एक विश्वस्त निधी स्थापून शाळेला देऊन टाकली. नैवेद्य(१९०२) ह्या कविता संग्रहातील त्यांच्या कवितांतून हा मुक्त मनाने सारे जीवन समजून घेण्याचा ध्येयवाद प्रकट झाला आहे (‘चित्त जेथा भयशून्य उच्च जेथा शिर’ ही सुप्रसिद्ध प्रार्थना ह्याच संग्रहात प्रसिद्ध झाली). ह्या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनीवंगदर्शन ह्या बंकिमचंद्रांनी स्थापन केलेल्या नियतकालिकांचे संपादकत्व स्वीकारले. चोखेर बाली (१९०३) ही त्यांची भारतीय भाषांतली पहिली म्हणता येईल अशी मनोविश्लेषणात्मक कादंबरी वंगदर्शनातूनच क्रमशः प्रसिद्ध झाली. चिरकुमार सभा(१९२६) हे विनोदी नाटकही याच वर्षी लिहून त्यांनी भारतीतून प्रसिद्ध केले. ऑक्टोबर महिन्यात ते शिलाइदहहून सहकुटुंब शांतिनिकेतनात आले आणि तपोवन पद्धतीची शाळा सुरू करण्याच्या कार्याला अधिक नेटाने लागून २२ डिसेंबर १९०१ ह्या दिवशी वडिलांचा आशिर्वाद घेऊन त्यांनी आश्रमशाळेची स्थापना केली. त्यांच्या बरोबर आलेल्या पहिल्या शिक्षकांत ब्रह्मबांधव उपाध्याय, रेवाचंद, जगदानंद राय, शिवधन विद्यारण्य आणि लॉरेन्स हे इंग्रज गृहस्थ होते.

नवीन आश्रमशाळा सुरू झाल्याच्या काळात त्यांना अनेक आर्थिक आणि कौटुंबिक आपत्तींना तोंड द्यावे लागले. १९०२ मध्ये नोव्हेंबर महिन्यात त्यांच्या पत्नींना गंभीर दुखणे झाले आणि २३ नोव्हेंबर रोजी वयाच्या अवघ्या एकोणतिसाव्या वर्षी त्यांचे निधन झाले. पुढल्याच वर्षी त्यांची कन्या रेणुका वारली (१९०३). सतीशचंद्र राय ह्या बुद्धिमान आणि त्यागी सहकारी मित्रालाही तरुण वयात मृत्यू आला. ह्या साऱ्‍या आपत्तींना तोंड देत असताना देशातील राजकीय चळवळींत त्यांचे सहकार्य चालू होते. ‘स्वदेशी समाज’ हा ग्रामीण पुनर्रचनेसंबंधीचा सुप्रसिद्ध निबंध याच वर्षी त्यांनी लिहिला. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून ‘शिवाजी उत्सव’ सुरू केला आणि ‘शिवाजी’ ही देशभक्तीला प्रेरणा देणारी स्फूर्तिदायक दीर्घ कविताही लिहिली. विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी पुस्तके लिहिली. नौकाडुबी (१९०६) ही कादंबरीही ह्याच काळात क्रमशः प्रसिद्ध होत होती. १६ मार्च १९०५ रोजी महर्षी देवेंद्रनाथांचे निधन झाले.

लॉर्ड कर्झन यांनी १९०५ मध्ये केलेल्या वंगभंगाच्या निर्णयाविरुद्ध देशभर प्रतिकाराची चळवळ सुरू झाली होती. बंगालच्या अभेद्यतेचे प्रतिक म्हणून रवींद्रनाथांनी ‘रक्षाबंधना’चा विराट कार्यक्रम हाती घेतला. याच वर्षी ‘प्रिन्स ऑफ वेल्स्’ यांनी भारताला भेट दिली. त्यांच्या स्वागत समारंभावर कठोर टीका करणारे लेखही त्यांनी लिहिले.

वंगभंगाच्या चळवळीला घातपाताचे स्वरूप येऊ लागल्यामुळे त्यांनी त्यातून लक्ष काढून घेऊन ग्रामीण भागातील विधायक कार्य व शांतिनिकेतनातील जीवनशिक्षणकार्याकडे ते केंद्रित केले. १९०७, साली वंगीय साहित्य संमेलनाच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली. ह्या काळात सुप्रसिद्ध बंगाली संपादक रामानंद चतर्जी यांच्याशी त्यांचा स्नेह वाढत गेला आणि प्रवासी ह्या त्यांच्या मासिकातून त्यांची गोरा (१९१०) ही पुढे जागतिक लौकिक मिळवलेली कादंबरी प्रसिद्ध होऊ लागली. याच वर्षी त्यांचा कनिष्ठ पुत्र शमींद्रनाथ वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी कॉलरा होऊन वारला. १९०९ साली लिहिलेल्या प्रायश्चित ह्या नाटकात धनंजय बैरागी ह्या पात्राकरवी त्यांनी असहकार आणि अहिंसात्मक प्रतिकाराचे जे तत्त्वज्ञान सांगितले आहे, ते नंतरच्या काळातील गांधीजींच्या तत्त्वज्ञानाशी जुळणारे आहे. राजा (१९१०) हे रुपकात्मक नाटकही त्यांनी याच वर्षी लिहिले. ज्येष्ठपुत्र रथींद्रनाथ १९१० साली अमेरिकेहून परतल्यावर त्याचा प्रतिमा देवी ह्या बालविधवेशी विवाह केला.

शांतिनिकेतनातील रहिवाशांनी त्यांचा पन्नासावा वाढदिवस १९११ साली साजरा केला. प्रवासीमधून त्यांच्या जीवनस्मृती क्रमशः प्रसिद्ध होत होत्या आणि गीतांजलीतून (१९१२) संगृहीत झालेल्या मूळ कविता व डाकघर (१९१२) हे नाटकही याच काळात लिहिले गेले. २७ डिसेंबर १९११ रोजी कलकत्त्यात राष्ट्रीय सभेचे सव्विसावे अधिवेशन भरले असताना ‘जणगणमन-अधिनायक जय हे भारत-भाग्यविधाता’ हे त्यांनी रचलेले आणि संगीतबद्ध केलेले गीत पहिल्या प्रथम गायले गेले. त्यानंतर माघोत्सवांत हे गीत ब्रह्मसंगीत म्हणून गात असत. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ह्या गीताचा ‘राष्ट्रगीत’ म्हणून अधिकृतपणे स्वीकार झाला.

इंग्लंडमधील स्नेह्यांकडून त्यांना समानशील इंग्रज साहित्यप्रेमी लोकांना भेटण्याविषयी आग्रहाची निमंत्रणे येत होती. त्यांनी जाण्याचे ठरवले; परंतु ऐनवेळी आजारी पडल्यामुळे बेत रद्द केला व ते शिलाइदह येथे हवापालट करण्यासाठी गेले. ह्या ठिकाणी त्यांनी गीतांजलीत आलेल्या बंगाली कवितांचे स्वतः इंग्रजीतून भाषांतर केले. १९१२ च्या मे महिन्यात ते इंग्लंडला गेले. तेथे सुप्रसिद्ध चित्रकार रोदेन्‌स्टाइन यांनी ते वाचायची इच्छा प्रकट केल्यावरून ते त्यांच्या हाती दिले. त्यांनी श्रेष्ठ कवी डब्ल्यू. बी. येट्स ह्यांच्याकडे त्या रत्नाची पारख सोपवली. येट्स कविता वाचून मुग्ध झाले [⟶ बंगाली साहित्य]. पुढे अनेक नामवंत इंग्रज साहित्यिकांशी त्यांचा परिचय झाला. दीनबंधू सी. एफ्. अँड्र्यूज यांची पहिली भेट याच वेळी झाली आणि पुढे ते त्यांचे आजन्म स्नेही आणि सहकारी झाले. रॉयल आल्बर्ट हॉल ह्या प्रख्यात नाट्यगृहात त्यांच्या ‘दालिया’ नावाच्या कथेवरून इंग्रजीत रचलेल्या ‘महारानी ऑफ आराकान’ ह्या एकांकिकेचा प्रयोग झाला.

लंडनहून ते अमेरिकेत गेले. गीतांजलीच्या इंग्रजी आवृत्तीचे उत्तम स्वागत झाल्याची वार्ता त्यांना कळली. येट्सनी त्या संग्रहाला प्रस्तावना लिहिली होती. १९१३ च्या नोव्हेंबरात शांतिनिकेतनला ते परतले. १३ नोव्हेंबरला त्यांच्या गीतांजलि ह्या काव्यसंग्रहाला स्वीडिश अकॅडेमीने नोबेल पारितोषिक दिल्याची वार्ता कळली. साहित्यासाठी हे पारितोषिक मिळवलेले रवींद्रनाथ हे पहिले आशियाई लेखक होत. रवींद्रनाथांना नोबेल पारितोषिक मिळण्यापूर्वीच कलकत्ता विद्यापीठाने डी. लिट्. ही सन्मानदर्शक पदवी देण्याचा ठराव केला होता. प्रत्यक्ष समारंभ २६ डिसेंबरला झाला. त्यांच्या पुस्तकांची यूरोपातील महत्त्वाच्या भाषांतून तसेच भारतीय भाषांतूनही भाषांतरे होऊ लागली. आंद्रे झीद (फ्रेंच), झेनोबिया येमेनेझ (स्पॅनिश) यांच्यासारखे श्रेष्ठ यूरोपीय लेखक त्यांना भाषांतरकार म्हणून लाभले.

यूरोपात ४ ऑगस्ट १९१४ रोजी पहिल्या जागतिक महायुद्धाचा वणवा पेटला. ५ ऑगस्टला ‘मा मा हिंसी :’ ह्या विषयावर जगावर कोसळत असलेल्या ह्या द्वेषमूलक विध्वंसासंबंधी त्यांनी तळमळीने भाषण केले. त्यानंतरच्या सेहेचाळीस दिवसांत त्यांनी गीताली (१९१४) साठी एकशेआठ गाणी रचून ती स्वरबद्ध केली. शबूज पत्र (हिरवी पाने) ह्या नियतकालिकाचे ⇨ प्रमथ चौधुरी यांच्या संपादकत्वाखाली प्रकाशन सुरू झाले. येथून बंगाली साहित्याला नवीनच वळण लागले. रवींद्रनाथांच्या प्रतिभेचा एक नवीनच आविष्कार शबूज पत्र ह्या नियतकालिकातून प्रसिद्ध होणाऱ्‍या बलाका (१९१६) ह्या काव्यसंग्रहात नंतर ग्रथित झालेल्या कवितांतून व ‘सबूजेर अभियान’ सारख्या काव्यातून; चतुरंग (१९१६), घरे बाइरे (१९१६) सारख्या कादंबऱ्‍यांतून व अनेक निबंधांतून प्रकट होऊ लागला.

त्यांना ब्रिटिश सम्राटाकडून १९१५ साली ‘सर’ (नाइटहुड) हा किताब देण्यात आला आणि याच वर्षी सी. एफ्. अँड्र्यूज यांनी शांतिनिकेतनात त्यांची आणि गांधीजींची भेट घडवून आणली. या वर्षीच्या परदेश दौऱ्‍यांत युद्धाची आसुरी धुंदी चढलेल्या जपान व अमेरिकेतील जनसमुदायांपुढे त्यांनी विश्वशांतीच्या प्रचाराची भाषणे केली. त्याबद्दल अवहेलनाही सहन केली. भारतात परतल्यानंतर ॲनी बेंझट ह्या भारताच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्‍या थोर आयरिश महिलेच्या अटकेविरुद्ध त्यांनी आवाज उठवला आणि अखिल भारतीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्षपद ॲनी बेंझटना मिळावे, यासाठी प्रचार केला. ह्या अधिवेशनात केलेल्या ‘कर्ताय इच्छाय कर्म’ ह्या त्यांच्या ओजस्वी देशभक्तिपर भाषणामुळे स्वदेशी युगातील राष्ट्रप्रेमी रवींद्रनाथांचे दर्शन जनतेला घडले. ह्या अधिवेशनात उत्साहाने भाग घेत असताना त्यांनी डाकघर ह्या नाटकाचा प्रयोग बसवून तो आपल्या वाड्यात, आमंत्रित सदस्यांपुढे करून दाखवला. हा प्रयोग पाहण्यासाठी लो. टिळक, पं. मदन मोहन मालवीय, गांधीजी प्रभृती थोर पुढारी हजर होते.

त्यांची सर्वांत थोरली कन्या माधुरीलता (बेला) हिचे १९१८ साली निधन झाले. त्यानंतर सु. चार महिने शांतिनिकेतनातील शिक्षणकार्यावर त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले. ‘यंत्र विश्वं भवत्येक नीडम्’ ह्या भावनेने स्थापन केलेल्या ‘विश्वभारती’ ह्या संस्थेंची २२ डिसेंबर १९१८ रोजी पायाभरणी झाली. ‘भारतवर्षातील शिक्षणपद्धतीने वैदिक, पौराणिक, बौद्ध, जैन, मुसलमान इ. सर्व विचार एकत्र आणले पाहिजेत व ही विचारसंपत्ती एका ठिकाणी संगृहीत करायला पाहिजे’, हा विचार ह्या स्थापनेच्या मुळाशी होता. केवळ भारतातीलच नव्हे, तर जगातील संस्कृतींच्या अभ्यासाचे आणि संशोधनाचे ते केंद्र व्हावे आणि देश, राष्ट्र इ. मर्यादांचे उल्लंघन करून भूत, वर्तमान आणि भविष्यकाळातील मानवाची प्रगती ही त्या केंद्राच्या विकासाची दिशा रहावी, हे त्यामागील ध्येय होते.

ब्रिटिश सरकारने १९१९ साली पंजाबातील जालियनवाला बागेत केलेल्या अमानुष हत्याकांडामुळे ‘दहशतीच्या धसक्याने मूक झालेल्या माझ्या कोट्यवधी देशबांधवांच्या निषेधाला वाचा फोडण्यासाठी’ आपण हा किताब परत करीत आहोत असे व्हाइसरॉयना कळवून ‘सर’ हा किताब त्यांनी परत केला. विश्वभारतीला आर्थिक साहाय्याची मागणी करण्यासाठी त्यांनी भारताचा दौरा सुरू केला. देशातील प्रमुख शहरांतून व्याख्याने दिली, नाट्यप्रयोग केले, वयाची साठी उलटली असतानाही स्वतः त्यातून भूमिका केल्या. २० सप्टेंबर १९२२ रोजी पुण्यातील किर्लोस्कर नाट्यगृहात ‘भारतीय प्रबोधना’वर त्यांचे भाषण झाले आणि सार्वजनिक जाहीर सभेत त्यांनी लो. टिळकांना श्रद्धांजली वाहिली. विश्वभारतीच्या कार्यासाठी काढलेल्या यूरोप-अमेरिकेच्या दौऱ्‍याप्रमाणे आग्नेय आशियातील देशांतही त्यांनी दौरा काढला व जाव्हा, बाली वगैरे बेटांपर्यंत जाऊन तेथील नृत्य, नाट्य, गायन, धार्मिक पूजाविधी यांतून लाभलेले सांस्कृतिक धन त्यांनी गोळा करून आणले. तेथील ‘बाटिक’ कला रवींद्रनाथांनी आपल्या बरोबरचे चित्रकार सुरेंद्रनाथ कार यांना शिकायला लावून शांतिनिकेतनात त्या कलेचे शिक्षण देणारा विभाग उघडला. तो अद्यापही चालू आहे.

विश्वभारतीत फ्रेंच प्राच्यविद्यापंडित सिल्व्हँ लेव्ही, श्रीलंकेतील बौद्ध तत्त्वज्ञानविशारद धर्माधार राजगुरू महास्थविर, विधुशेखर भट्टाचार्य (संस्कृत पंडित), दिनेंद्रनाथ टागोर (रवींद्रसंगीतज्ञ), भीमराव शास्त्री हसूरकर (अभिजात हिंदुस्थानी संगीतज्ञ), ⇨नंदलाल बोस (चित्रकार), रवींद्रनाथ टागोर (कृषितज्ज्ञ) यांच्यासारख्यांनी कला आणि ज्ञानाच्या विविध शाखांचे नेतृत्व स्वीकारले. तिबेटी, चिनी यांसारख्या आशियाई भाषांचा अभ्यास सुरू झाला.

अहमदाबादला १९२० साली गुजराती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले. त्या रात्री त्यांचा मुक्काम साबरमतीला गांधीजींच्या आश्रमात होता. १९२१ साली गांधीजींनी असहकाराची चळवळ सुरू केली. जनतेच्या आंदोलनाला जर तितक्याच प्रबळ विधायक कार्याची जोज नसली, तर त्या आंदोलनाला अनिष्ट वळणे लागतात, अशी रवींद्रनाथांची धारणा होती. ह्या बाबतीत त्यांचा गांधीजींशी मतभेद होता. बोलपूर जवळील सुरूल गावी ‘श्रीनिकेतन’ ही शेतकी शिक्षणाचे कार्य करणारी संस्था १९२२ मध्ये सुरू केली. सांस्कृतिक पुनरुत्थानाच्या कार्याबरोबर श्रीनिकेतनात ग्रामीण विकासाचे विधायक कार्य पिअर्सन आणि लेओनार्ड एल्महर्स्ट ह्या ध्येयवादी इंग्रज शेतकी तज्ज्ञांच्या साहाय्याने त्यांनी सुरू केले होते. खेड्यापाड्यांत पसरलेल्या मलेरिया रोगाच्या उच्चाटणापासून तो जपानी तज्ज्ञांच्या साहाय्याने चर्मोद्योग, कुटिरोद्योग चालवण्यापर्यंत ग्रामीण जनतेच्या स्वास्थ्य आणि सुखासाठी आवश्यक असणाऱ्‍या अनेक कार्यांचे प्रयोग श्रीनिकेतनात रवींद्रनाथांच्या देखरेखीखाली चालू होते. त्याचबरोबर मुक्तधारा (१९२२), रक्तकरवी (१९२४) यांसारख्या नवीन नाटकांचे प्रयोग, निरनिराळ्या ऋतूंच्या उत्सवांचे आयोजनही ते करीत होते. एवढेच नव्हे, तर आत्मसंरक्षणार्थ शांतिनिकेतनातील विद्यार्थी-विद्यार्थीनींना जपानी तज्ज्ञांकडून ⇨जूदो ह्या कुस्तीचे शिक्षणही सुरू केले होते. रवींद्रनाथांनी होमिऑपथी आणि जीवरसायनशास्त्र यांचा उत्तम अभ्यास करून स्वतः रोगनिवारणाच्या कार्यात भाग घेतला होता. जीवनातील मानवहिताचे कुठलेही अंग त्यांनी गौण मानले नाही. १९३० साली ऑक्सफर्डला ‘मानवाचा धर्म’ ह्या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. त्याच वेळी त्यांच्या चित्रांचे प्रदर्शनही भरविले गेले. उतार वयात त्यांनी चित्रकलेची आराधना सुरू केली. त्यातूनही रंगरेषांतील अभिव्यक्तीचे त्या कलेच्या क्षेत्रात त्यांनी नवीन दालन उघडले. हे प्रदर्शन यूरोपातील फ्रान्स, इंग्लंड, जर्मन, सोव्हिएट रशिया आणि अमेरिकेतील अनेक प्रमुख शहरांतून भरवले गेले.

कलकत्यातील अनेक संस्थांतर्फे १९३१ साली त्यांचा सत्तरावा वाढदिवस साजरा झाला. पुढल्याच वर्षी त्यांनी इराण व इराकचा दौरा केला. तेथून परतल्यानंतर कलकत्ता विद्यापीठाच्या रामतनू लाहिरी अध्यासनाच्या प्राध्यापक पदावर त्यांची नियुक्ती होऊन विद्यापीठाने ६ ऑगस्ट रोजी त्यांना मानपत्र दिले. याच सुमारास बंगाली कवितेत त्यांनी नव्यानेच मुक्तछंदाचा प्रयोग सुरू केला होता. त्या कवितांचा पुनश्च (१९३२) हा संग्रह होय. देशातील अल्पसंख्यांकांचे स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करण्याच्या ब्रिटीश सरकारच्या निर्णयाविरुद्ध गांधीजींनी वीस सप्टेंबरपासून येरवड्याच्या तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले. इतर राजकीय नेतेही बंदिवासात होते. रविंद्रनाथांनी गांधीजींच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला. त्यांना गांधीजींच्या उपोषणाची चिंता वाटून ते पुण्याला गेले. त्याच वेळी येरवडा तुरुंगात पंतप्रधान मॅक्डॉनल्ड यांनी वाटाघाटी करण्याचे मान्य केल्याची बातमी आली. गांधीजींनी उपोषण सोडले त्या प्रसंगी रवींद्रनाथ तेथे हजर होते. दुसऱ्‍या दिवशी तिथीप्रमाणे गांधीजींचा जन्मदिन होता. पुण्यातील शिवाजी मंदिरात पंडित मालवीय ह्यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या अभिनंदनपर प्रचंड सभेत रवींद्रनाथांचे ‘जातीयता आणि अस्पृश्यतेचे निर्मूलन’या विषयावर भाषण झाले.

संगीत-नृत्य आणि मूकाभिनय ह्या तिन्ही कलांच्या एकत्रीकरणातून चित्रांगदा (१८९२) नाटकाचे पुनर्लेखन करून त्यांनी प्रयोग केला (१९३३). ‘परिशोध’ कवितेला संगीत-नाट्यरूप दिले आणि श्यामा (१९३९) हे नवीन नृत्यनाटक लिहून त्याचा कलकत्त्याच्या रंगमंचावर प्रयोग केला. कठोर राज्यशासनामुळे माणसाचे आवडीनिवडीचे स्वातंत्र्य जाऊन त्याचे जीवन शुष्क होते. माणसे अल्पसंतुष्ट आणि भित्री होतात. जीवनाला अवकळा येते. हा विचार सांगणाऱ्‍या ताशेर देश (१९३३, म. शी. पत्त्यांचा देश) ह्या त्यांच्या प्रयोगदृष्ट्या यशस्वी अशा संगीत नाटकाचा प्रयोगही याच वर्षी कलकत्त्यात झाला. १९३७ साली कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाच्या प्रवक्तेपदावरून, तोपर्यंतची इंग्रजीतून भाषण करण्याची प्रथा मोडून, त्यांनी बंगालीतून भाषण केले. १९३६ मध्ये जवाहरलाल नेहरूंच्या विनंतीवरून, माणसाचे जन्मसिद्ध हक्क जतन करण्यासाठी स्थापन केलेल्या व्यक्तिस्वातंत्र्य संघाचे त्यांनी अध्यक्षपद स्वीकारले.

हिटलरने १९३८ साली चेकोस्लोव्हाकियावर हल्ला केला. प्राग येथील आपले मित्र व्ही. लेस्नी यांना पत्र पाठवून रवींद्रनाथांनी ह्या आक्रमणाचा कडाडून निषेध केला. जपानेही चीनवर हल्ला केला होता. त्यासंबंधी तीव्र निषेध व्यक्त करणारी पत्रे त्यांनी जपानमधील श्रेष्ठ कवी नोगुची यांना पाठवली.

दुसऱ्‍या महायुद्धाने १९४० सालापासून अतिशय उग्र स्वरूप धारण केले. विश्वशांतीच्या आणि मानवतेच्या कल्पनांचा वृद्ध रवींद्रनाथांना त्यांच्या डोळ्यापुढे विध्वंस होताना दिसत होता. याच वर्षी गांधीजींनी शांतिनिकेतनला भेट दिली. गांधीजींना निरोप देताना रवींद्रनाथांनी त्यांच्या हाती एक पत्र दिले. ‘माझ्या आयुष्यातल्या अमोल धनाचा साठा वाहून नेणाऱ्‍या जहाजासारख्या असणाऱ्‍या विश्वभारतीचा भार माझ्यामागून आपण सांभाळा’ अशी त्या पत्रात गांधीजींना विनंती केली होती. गांधीजींनी ते पत्र मौलाना अबुल कलाम आझाद यांना दिले. १९५१ साली मौलाना अबुल कलाम आझाद स्वतंत्र भारतातील केंद्रीय शिक्षणमंत्री झाल्यानंतर विश्वभारतीचा आर्थिक भार भारत सरकारने स्वीकारला. १९४० च्या ऑक्टोबरात ऑक्सफर्ड विद्यापीठाने शांतिनिकेतनात आपले प्रतिनिधी पाठवून सर मॉरिस ग्वियर (तत्कालीन सरन्यायाधीश) यांच्या हस्ते त्यांना ‘डॉक्टरेट’ची सन्माननीय पदवी देण्याचा खास समारंभ घडवून आणला.

त्यांचा ऐंशीवा वाढदिवस १४ एप्रिल १९४१ रोजी शांतिनिकेतनात साजरा झाला. मूत्रपिंडाच्या विकारामुळे प्रकृती खूपच ढासळली होती. तरीही ह्या प्रसंगी आपला संदेश म्हणून ‘सभ्यतार संकट’ (संस्कृतीवरील गडांतर) ह्या शीर्षकाखाली त्यांनी एक निबंध लिहिला. ऐंशीव्या वर्षी प्रकृती आणि भोवतालची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असतानाही रुग्णशय्येवरील रवींद्रनाथांनी आपल्या बालपणाच्या स्मृतींचा छेलेबेला (१९४०, म. शी. बालपण) हा अत्यंत हृदयंगम असा छोटेखानी ग्रंथ लिहिला. ‘ऐकतान’ ही त्यांची सुप्रसिद्ध कविता त्याच काळातील आणि जन्मदिने (१९४१) हा शेवटला कवितासंग्रहही याच काळातील होय.

त्यांची प्रकृती १९४१ च्या जून अखेरीला फारच ढासळली. डॉक्टरांनी कलकत्त्याला उपचारासाठी नेण्याचा सल्ला दिला. ३० जुलैला शस्त्रक्रिया होण्याच्या काही तास आधी त्यांनी आयुष्यातील शेवटची कविता लिहून घ्यायला सांगितली. आपल्या जीवनदेवतेला गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी दिलेले हे शेवटचे अर्घ्य. कृती आणि उक्ती यांतील अद्वैत आचरणातून सिद्ध करणाऱ्‍या, उपनिषदांच्या अभ्यासाला अनुसरून पिंडी ते ब्रह्मांडी पाहणाऱ्‍या, साहित्य, संगीत, कला, आणि विचारांचे बहुविध आणि बहुमोल भांडार अवघ्या मानवतेला देणाऱ्‍या, ह्या विश्वकवीची प्राणज्योत ७ ऑगस्ट १९४१ रोजी दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी मालवली.

त्यांच्या जन्मशताब्दीचा उत्सव १९६१ साली जगभर साजरा झाला. त्या प्रसंगी देशोदेशींच्या तत्त्वज्ञांनी, कवी-कलावंतांनी आणि राष्ट्र धुरीणांनी त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारे लेख लिहिले. त्या प्रसंगी जवाहरलाल नेहरूंनी म्हटले आहे, ‘प्राचीन काळातील ज्ञानातून स्फूर्ती घेऊन अर्वाचीन काळाला उपयुक्त असा साज देणारे आणि ते ज्ञान सार्थ करणारे असे भारतीय द्रष्ट्यांच्या परंपरेतील ते एक ऋषी होते. त्यांनी अस्सल भारतीय परंपरेतील संदेश आजच्या युगधर्माला अनुरूप असणाऱ्‍या नव्या भाषेत दिला. हा थोर आणि उत्कट संवेदनाशीलता असणारा माणूस केवळ भारताचाच कवी नव्हता, तर साऱ्‍या मानवतेचा व सार्वजनिक स्वातंत्र्याचा कवी होता. त्याचा संदेश आपण सर्वांसाठी आहे’. (चित्रपत्र).

 

संदर्भ : 1. Bose, Buddhadeva, Tagore: Portrait of a Poet, Bombay, 1962.

2. Chatterji, Suniti Kumar, World Literature and Tagore, Calcutta, 1971.

3. Sahitya Academy, Rabindranath Tagore, 1861–1961, A Centenary Volume, Delhi, 1961.

4. Sen Gupta, S. C. Ed., Rabindranath Tagore : Homage from Vishva-Bharati, Santiniketan, 1962.

५. कालेलकर, काकासाहेब; अनु. रवींद्र-वीणा : रवींद्रनाथ टागोरांच्या ३६ बंगाली गीतांचे मनन व भाषांतर, मुंबई, १९६१.

६. खानोलकर, गं. दे., रवींद्रनाथ जीवनकथा, पुणे, १९६१.

७. जोशी, श्रीपाद, संपा. रवींद्रनाथ आणि महाराष्ट्र, पुणे, १९६१.

८. ठाकूर, रवींद्रनाथ, छिन्नपत्र (बंगाली), कलकत्ता, १९४८.

९. ठाकूर, रवींद्रनाथ, छेलेबेला (बंगाली), कलकत्ता, १९४८.

१०. बोरकर. बा. भ. आनंदयात्री रवींद्रनाथ, मुंबई, १९६४.

११. भागवत, अ. के. संपा. टागोर - साहित्य, कला, विचार, सांगली, १९६१.

१२. मुखोपाध्याय, प्रभात कुमार, रबींद्र जीवनकथा (बंगाली), कलकत्ता, १९५९.

१३. मुखोपाध्याय, प्रभात कुमार, रबींद्रजीवनी ओ-रबींद्र-साहित्य-प्रबेसक, ४ खंड (बंगाली), कलकत्ता, १९६१.

लेखक - पु. ल. देशपांडे

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 11/14/2019© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate