অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सत्येंद्रनाथ बोस

सत्येंद्रनाथ बोस

सत्येंद्रनाथ बोस : (१ जानेवारी १८९४ - ४ फेब्रुवारी १९७४).

भारतीय भौतिकीविज्ञ. ‘बोस –आइन्स्टाइन सांख्यिकी’ या नावाने ओळखण्यात येणाऱ्या सांख्यिकीय यामिकीतील [⟶ सांख्यिकीय भौतिकी] सिद्धांताकरिता विशेष प्रसिद्ध.

बोस यांचा जन्म कलकत्त्याला झाला. त्यांचे शिक्षण तेथील प्रेसिडेन्सी कॉलेजात व कलकत्ता विद्यापीठात झाले. १९१५ मध्ये शुद्ध गणितातील एम्.एस्‌सी. पदवी मिळविल्यानंतर त्यांनी कलकत्ता विद्यापीठाच्या नवीनच स्थापन झालेल्या सायन्स कॉलेजात अध्यापक (१९१६-२१), डाक्का विद्यापीठात प्रपाठक (१९२१-२४) व प्राध्यापक (१९२६-४५) आणि पुन्हा कलकत्ता विद्यापीठात खैरा प्राध्यापक (१९४५-५६) म्हणून काम केले.१९५६-५८ या काळात ते शांतिनिकेतनमधील विश्वभारती विद्यापीठाचे कुलगुरू होते. १९२४-२५ मध्ये त्यांनी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ मारी क्यूरी यांच्या पॅरिस येथील प्रयोगशाळेत मॉरिस व ल्वी द ब्रॉग्ली यांच्या बरोबर काम केले. नंतर १९२५-२६ मध्ये त्यांनी बर्लिन येथे ॲल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या समवेत संशोधन केले. तेथे त्यांना आइन्स्टाइन यांच्याखेरीज त्या काळातील माक्स प्लांक, एर्व्हीन श्रोडिंजर, व्होल्फगांग पाउली, व्हेर्नर हायझेनबेर्क वगैरे नामवंत भौतिकीविज्ञांबरोबर चर्चा करण्याची संधी मिळाली.

वायूंच्या रेणूंच्या समूहाच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी जे. सी. मॅक्सवेल (१९३१-७९) व लूटव्हिख बोल्टस्‌मान (१८४४-१९०६) यांनी योजलेले सांख्यिकीय तंत्र ⇨फोटॉन (प्रकाश पुंजकण) व इलेक्ट्रॉन यांसारख्या अधिक मूलभूत कणांना लावण्याचे प्रयत्न शास्त्रज्ञांनी केलेले होते; तथापि ते निष्फळ ठरले. बोस यांनी आइन्स्टाइन यांच्या सल्ल्यानुसार या तंत्रात सुधारणा करून नवीन तंत्र विकसित केले. ‘फोटॉन हे एकरूपच असून त्यात व्यक्तिगत भेद करता येत नाही एखादी दिलेली पुंज स्थिती [⟶ पुंज सिद्धांत] कितीही फोटॉनांना प्राप्त होऊ शकते’ या गृहीतकावर त्यांनी प्लांक यांचा प्रारण नियम [⟶ उष्णता प्रारण] सिद्ध केला. याकरिता त्यांनी प्रारणांचे फक्त कणात्मक रूप लक्षात घेतलेले होते. १९२४ मध्ये त्यांनी हे आपले कार्य प्लांक्स लॉ अँड लाइट क्वांटम हायपॉथिसिस या शीर्षकाखालील निबंधाद्वारे प्रसिद्ध केले. या निबंधाद्वारे बोस यांनी फोटॉनांच्या सांख्यिकीय वर्तनाचा मूलभूत नियम मांडून पुंज सांख्यिकीचा पाया घातला. हा निबंध त्यांनी आइन्स्टाइन यांना पाठविला. आइनस्टाइन यांनी या कार्याचे महत्त्व चटकन ओळखून त्याचे जर्मनमध्ये भाषांतर केले व ते Zeitschriff Fur Physik या नियतकालिकात प्रसिद्ध केले. आइन्स्टाइन यांनी बोस यांच्या कार्याचा भारी कणांकरिता विस्तार केला आणि अशा प्रकारे बोस-आइन्स्टाइन सांख्यिकीचा जन्म झाला. बोस यांची संकल्पना सत्य असल्याचे नंतरच्या काळातील प्रायोगिक कार्यावरून सिद्ध झाले. ज्यांतील कोणत्याही दोन कणांची अदलाबदल झाली, तरी ज्यांच्या तरंग फलनात [⟶ पुंजयामिकी] बदल होत नाही, असा गुणधर्म असलेल्या एकरूप कणांच्या प्रणालींकरिता बोस-आइन्स्टाइन सांख्यिकी वापरण्यात येते. बोस-आइन्स्टाइन सांख्यिकीचे पालन करणाऱ्या कणांना (उदा., फोटॉन, पाय मेसॉन, ज्यातील कणांची संख्या सम आहे अशी अणुकेंद्रे इ.) ‘बोसॉन’ असे म्हणतात. [⟶ मूलकण]. विद्युत् चुंबकीय, गुरुत्वीय व उप-आणवीय प्रेरणा क्षेत्रांचे एकाच नियम-संचाद्वारे (अथवा समीकरण-संचाद्वारे) वर्णन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकीकृत क्षेत्र सिद्धांताविषयी [⟶ सापेक्षता सिद्धांत] बोस यांनी १९५३-५५ या काळात एक निबंधमाला प्रसिद्ध केली; परंतु शास्त्रीय जगतात या निबंधमालेची फारशी दखल घेतली गेली नाही.

लंडनच्या रॉयल सोसायटीने १९५८ मध्ये बोस यांची सदस्य म्हणून निवड केली. त्याच वर्षी भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण व राष्ट्रीय प्राध्यापकपद हे बहुमान दिले. १९५२-५८ या काळात ते भारताच्या राज्यसभेचे सदस्य होते. त्यांना मेघनाद साहा स्मृती सुवर्णपदकाचा सन्मानही मिळालेला होता. अनेक विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डी.एस्‌सी. पदव्या देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केलेला होता. १९४४ साली ते भारतीय विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस ऑफ इंडिया या संस्थेचेही ते अध्यक्ष होते. बंगाली या आपल्या मातृभाषेतून वैज्ञानिक ज्ञानाचा प्रसार करण्याच्या हेतूने त्यांनी १९४८ साली बंगीय विज्ञान परिषद स्थापन करण्यात व तिच्यातर्फेज्ञान ओ विज्ञान हे बंगाली वैज्ञानिक नियतकालिक सुरू करण्यात पुढाकार घेतला. कलकत्ता विद्यापीठात पदव्युत्तर वर्गांतही ते बंगालीतून शिकवीत असत. ते कलकत्ता येथे मृत्यू पावले.

लेखक: व. ग. भदे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate