অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सरोजिनी नायडू

सरोजिनी नायडू

सरोजिनी नायडू : (१३ फेब्रुवारी १८७९—२ मार्च १९४९). भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर कार्यकर्त्या, प्रभावी वक्त्त्या व कवयित्री. त्यांचा जन्म हैदराबाद येथे सधन कुटुंबात झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव सरोजिनी अघोरनाथ चट्टोपाध्याय (चतर्जी). अघोरनाथांचे मूळ घराणे पूर्व बंगालमधील व गाव ब्रह्मनगर. अघोरनाथ १८७८ मध्ये हैदराबादला शैक्षणिक संस्था स्थापन करण्याच्या उद्देशाने आले आणि पुढे निजाम महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. ते शिक्षणतज्ञ व कळकळीचे कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध होते. सरोजिनींच्या आई वरदासुंदरीदेवी मूळच्या बंगालच्याच. त्या बंगालीमध्ये कविता करीत. सरोजिनींवर अशा सुसंस्कृत पालकांचे संस्कार लहानपणीच झाले. यांतून त्यांचे कविमन घडले आणि लहानपणीच त्यांना कविता रचण्याचा छंद जडला व स्फूर्ती मिळाली. त्यांचे प्राथमिक शिक्षण घरीच खाजगी रीत्या झाले.

वयाच्या बाराव्या वर्षी त्या मद्रास इलाख्यात मॅट्रिक परीक्षेत पहिल्या आल्या (१८९२). त्यानंतर सु. तीन वर्षे प्रकृती ठीक नसल्यामुळे त्या घरीच राहिल्या. निजामाची छात्रवृत्ती घेऊन पुढे त्या इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी गेल्या (१८९५). लंडन आणि केंब्रिज येथे थोडे शिक्षण घेतल्यानंतर प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे अर्धवट शिक्षण सोडून इटली पाहून त्या मायदेशी परतल्या; पण या वास्तव्यात त्यांचा एडमंड गॉस या इंग्रज साहित्य-समीक्षकाशी चांगला परिचय झाला. त्यांनी आपल्या काही कविता त्यास दाखविल्या आणि पुढील काव्यलेखनात गॉस यांचे त्यांस चांगलेच मार्गदर्शन लाभले. द गोल्डन थ्रेशोल्ड (१९०५) या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहास गॉसनी प्रस्तावना लिहिली आणि हा काव्यसंग्रह त्या वेळच्या साहित्यक्षेत्रात चांगलाच गाजला. त्याला वृत्तपत्रांतून यथोचित प्रतिसाद मिळाला. रवींद्रनाथ टागोरांनीही सरोजिनींचे कौतुक केले.

भारतात परत आल्यानंतर १८९८ मध्ये त्यांनी डॉ. गोविंदराजुलू नायडू या निजामच्या संस्थानी विधुर डॉक्टरशी ब्राह्मोसमाजाच्या रीतिरिवाजानुसार लग्न केले. हा विवाह बंगाल व मद्रास असा आंतरप्रांतीय व आंतरजातीय होता. त्यामुळे त्या वेळी तो फार गाजला व येथूनच सरोजिनींच्या सामाजिक कार्यास सुरुवात झाली. त्यांना चार मुले झाली : जयसूर्या, पद्मजा, रणधीर आणि लैलामणी. रणधीर पुढे हैदराबादच्या राजकीय चळवळीत प्रसिद्धीस आला, तर पद्मजा बंगालच्या राज्यपाल झाल्या. सरोजिनींनी द गोल्डन थ्रेशोल्डनंतर द बर्ड ऑफ टाइम (१९१२) व द ब्रोकन विंग (१९१७) हे काव्यसंग्रह प्रसिद्ध केले. हिंदी महिलेने सुरेख इंग्रजीत लिहिलेल्या या कविता स्वरमाधुर्य, राष्ट्रीय दृष्टिकोण, प्रेमाचा पुरस्कार व क्रांतिकारक राष्ट्रवादी विचार इ. वैशिष्ट्यांनी लोकप्रिय झाल्या. पाश्चात्त्य तसेच पौर्वात्त्य देशांत त्यांस कीर्ती लाभली आणि कवयित्री म्हणून त्यांचा नावलौकिक वाढला.‘भारतीय कोकिळा’ म्हणून त्यांचा सर्वत्र उल्लेख होऊ लागला. मात्र त्यांच्या गीतरचनेचा सूर एलियटच्या नव्या काव्यप्रवाहाशी जुळला नाही व ती थांबली. लौकरच त्या देशसेवा, समाजसेवा इ. गोष्टींकडे वळल्या. याचे दुसरेही कारण असे होते की, १९०३ ते १९१७ च्या दरम्यान त्यांचा एम्. ए. जिना, गो. कृ. गोखले, रवींद्रनाथ टागोर, लोकमान्य टिळक, ॲनी बेझंट, सी. पी. रामस्वामी अय्यर, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी अशा एक एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ व्यक्तींशी या ना त्या निमित्ताने परिचय झाला. या व्यक्तींच्या विचार आचारांकडे त्या आकृष्ट झाल्या. त्यांनी होमरूल लीगसाठी ॲनी बेझंट आणि सी. पी. रामस्वामी अय्यर यांच्या बरोबर हिंदुस्थानभर दौरा काढला.

आपल्या भाषणांतून त्यांनी तरुणांचे कल्याण, श्रम, प्रतिष्ठा, स्त्रीस्वातंत्र्य व राष्ट्रवाद यांचा पुरस्कार केला. गोखल्यांना गुरुस्थानी मानले आणि म. गांधींचे नेतृत्व पूर्णतः स्वीकारले. हैदराबाद येथील प्लेगसाथीत त्यांनी फार परिश्रम घेऊन जनतेला सर्वतोपरी मदत केली. त्याबद्दल त्यांना कैसर – इ – हिंद हे सुवर्णपदक देण्यात आले; पण ते त्यांनी जालियनवाला बाग येथील हत्याकांडानंतर ब्रिटिश सरकारला त्याच्या निषेधार्थ परत दिले. रौलट कायदा, माँटेग्यू – चेम्सफर्ड सुधारणा, खिलाफत चळवळ, साबरमती करार वगैरे विविध चळवळींत त्यांनी काँग्रेसच्या ध्येयधोरणांनुसार प्रसार आणि प्रचार केला, मोहिमा काढल्या आणि गांधींच्या असहकार चळवळीत हिरिरीने भाग घेतला. सरोजिनींनी हिंदु – मुसलमान ऐक्य व स्त्रियांचे पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याचे हक्क आणि स्वातंत्र्य हेच आपले जीवनकार्य मानले. होमरूल लीगच्या निमित्ताने त्यांनी देशभर असंख्य व्याख्याने दिली. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाने गोखल्यांसारखी श्रेष्ठ माणसेही भारावून गेली. टिळकांच्या मृत्यूनंतर त्या पूर्णतः गांधीवादी झाल्या आणि पेहराव व राहणीमान यांत त्यांनी आमूलाग्र बदल केले. त्यांनी आपले वास्तव्य हैदराबादमधून मुंबईत हलविले. त्या मुंबई महानगरपालिकेत सभासद म्हणून निवडून आल्या आणि पुढे प्रांतिक काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या (१९२१). कानपूर येथील अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशनाच्या त्या अध्यक्षा म्हणून निवडल्या गेल्या (१९२५). काँग्रेस कार्यकारिणीच्या त्या सभासद झाल्या. काँग्रेसच्या सर्व धोरणांत त्या हिरिरीने भाग घेत. कलकत्ता येथे भरलेल्या १९०७ च्या बंगालच्या फाळणी विरोधी सभेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजाविली. १९०८ मध्ये विधवाविवाह परिषदेत त्यांनी स्त्रियांच्या चळवळीचा पाया घातला आणि येथूनच त्यांच्या स्त्रीविषयक चळवळीस खरा प्रारंभ झाला.

त्या द. आफ्रिकेच्या दौऱ्यावर तेथील भारतीयांची विचारपूस करण्याकरिता १९२३ मध्ये गेल्या. त्यांनी तेथील परिस्थितीचे अवलोकन केले. पुढे त्या मोंबासा येथील ईस्ट आफ्रिकन इंडियन काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या (१९२९). या वेळी जनरल स्मट्स आणि त्यांच्यात खूप वादावादी झाली. तत्पूर्वी १९२८ मध्ये त्यांनी अमेरिकन जनतेत भारतीय स्वातंत्र्याबद्दल सहानुभूती निर्माण करण्यासाठी सदिच्छा दौरा काढला. त्यानंतर त्या गांधींबरोबर लंडनमध्ये गोलमेज परिषदांना हजर राहिल्या. म. गांधीजींच्या बरोबर त्यांनी बहुतेक सत्याग्रहांत भाग घेतला आणि अनेक वेळा त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. १९३० च्या मिठाच्या सत्याग्रहात त्यांनी एका महत्त्वपूर्ण तुकडीचे नेतृत्व केले, तर छोडो भारत आंदोलनात १९४२ मध्ये इतर नेत्यांबरोबर त्यांना कैद झाली; त्यांची रवानगी आगाखान राजवाड्यात झाली. यावेळी आपल्या सहकारी कैद्यांची त्यांनी मातृवत सेवा केली. कस्तुरबा गांधी आणि महादेवभाई देसाई यांच्या मृत्यूने त्यांना धक्का दिला. स्वातंत्र्योत्तर भारतात त्यांना दोन गोष्टींनी मोठा तडाखा बसला : पहिली, हिंदुस्थानचे पाकिस्तान व भारत ही दोन शकले. त्या प्रथमपासून हिंदु – मुसलमान ऐक्याचा पुरस्कार करीत आणि दुसरी, महात्मा गांधींचा खून. १९४७ मध्ये दिल्लीला जी आशियाई राष्ट्रांची परिषद भरली, तिचे अध्यक्षस्थान त्यांना देण्यात आले. तसेच त्यांची इच्छा नसतानाही त्यांना उत्तर प्रदेशचे राज्यपालपद देण्यात आले; पण अल्पावधीतच त्या लखनौ येथे मरण पावल्या.

सरोजिनींनी तीन काव्यसंग्रहांव्यतिरिक्त अनेक स्फुट लेख लिहिले. त्यांची व्याख्याने पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली आहेत.

सरोजिनीबाईंचे मन हे हळव्या कवयित्रीचे, पूर्णार्थाने भावनाप्रधान स्त्रीह्रदय होते. तथापि राजकारणात त्या एक निःस्पृह देशभक्त होत्या आणि राजकारणी व्यक्तीला पोषक असे धाडस, दुसऱ्यावर छाप पाडणारे व्यक्तिमत्व आणि प्रभावी संभाषण हे त्यांचे विशेष. त्यांचा राष्ट्राभिमान जाज्वल्य होता व देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची त्यांची तयारी होती. पण याचबरोबर स्त्रीस्वातंत्र्य, हिंदु मुसलमान ऐक्य इ. गोष्टींचा त्यांनी आयुष्यभर पाठपुरावा केला आणि अखेरच्या दिवसांत त्यांच्या या तत्वांना अपयश आलेले पाहून त्या खचल्या.

 

संदर्भ : 1. Dastoor, P. E. Sarojini Naidu, Mysore, 1956.

2. Morton, Eleanor, Women Behind Mahatma Gandhi, Bombay, 1961.

3. Sengupta, Padmini, Sarojini Naidu : A Biography, London, 1966.

लेखक - सु. र. देशपांडे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate