दक्षिण आफ्रिका सरकारची विधान-राजधानी व केप ऑफ गुड होप प्रांताची राजधानी. लोकसंख्या १०,९६,५९७ (१९७०). यांपैकी ३,७८,५०५ गोरे, ११,२६३ आशियाई, १,०७,८७७ आफ्रिकी व ५,९८,९५२ इतर कृष्णवर्णी होते. केपटाउन टेबल मौंटनच्या उत्तरेस वसलेले असून, त्याच्या पूर्वेस डोंगरशिखरे व पश्चिमेस टेबल बे उपसागर आहे.
या बंदरात सर्व आधुनिक सुखसोयी व मोठ्या गोद्या असून माल व उतारू यांची सुलभ चढउतार होते. येथे अन्नप्रक्रिया, मुरंबे, डबाबंद फळे व भाजीपाला, मासे, सुकीफळे, मद्य, कापड, प्लॅस्टिक कातड्याच्या वस्तू इत्यादींचे व्यवसाय चालतात व फळे, मद्य, धान्य, लोकर, सोने, हिरे, मासे यांची निर्यात होते.
याचे निसर्गसुंदर स्थान व उत्साहवर्धक भूमध्यसागरी हवामान यांमुळे हे एक आकर्षक प्रवासी केंद्र झाले असून, येथून दोरगाडीने टेबल मौंटनवर जाऊन सुंदर देखावा पाहता येतो. केप—कैरो लोहमार्गाचे व हवाईमार्गाचे हे अंत्य स्थानक आहे.
संसदगृहे, संग्रहालये, वनस्पतिउद्याने, कलावीथी, ख्रिस्ती प्रार्थनामंदिरे, जुन्या डच वास्तुशिल्पाचे व चित्रकलेचे नमुने, जुनी वेधशाळा, सार्वजनिक उद्याने, केपटाउन विद्यापीठ या येथील प्रमुख प्रेक्षणीय गोष्टी होत. बारथॉलोम्यू डीअश व वास्को द गामा यांच्या काळापासून यूरोपहून पौर्वात्य देशांकडे व नंतरच्या काळात ऑस्ट्रेलियाकडे जाणारी जहाजे येथे थांबू लागली.
डच ईस्ट इंडिया कंपनीचा यान व्हान रीबेक याने १६५२ मध्ये येथे पहिली गोऱ्यांची वसाहत स्थापन करून किल्ला बांधला, हे गाव वसविले आणि जहांजास विविध वस्तूंचा पुरवठा सुरू केला. १८०६ मध्ये ब्रिटिशांनी याचा ताबा घेतला. १९१० मध्ये ही दक्षिण आफ्रिकेची राजधानी झाली.
कुमठेकर, ज. ब.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020