অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तुर्कस्तान

तुर्कस्तान

(अधिकृत त्यूकींये कुम्हुरियेती). मुख्यतः आशियात व काही अंशी यूरोपात समाविष्ट असलेला मध्यपूर्वेतील देश. क्षेत्रफळ ७,८०,५७६ चौ. किमी. पैकी ९,२४३ चौ. किमी. पाण्याखाली. लोकसंख्या ३,५६,६६,५४९ (१९७०). विस्तार ३५° ५०′ उ. ते ४२° ५′ उ. आणि २५° ४०′ पू. ते ४४° ५०′ पू. यांदरम्यान.

तुर्कस्तानचे भौगोलिक स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

आशिया व यूरोप या खंडांना जोडणारा दुवा म्हणून हा देश ओळखला जात असून याच्या दक्षिणेस भूमध्य समुद्रापलीकडे आफ्रिका खंड आहे. तुर्कस्तानची सीमा ईशान्येस रशिया, पूर्वेस इराण, आग्नेयीस इराक, दक्षिणेस सिरिया, वायव्येस ग्रीस व बल्गेरिया या देशांना भिडलेली आहे.

तुर्कस्तानच्या उत्तरेस काळा समुद्र, पश्चिमेस इजीअन समुद्र व दक्षिणेस भूमध्य समुद्र आहे. १९२३ च्या लोझॅन करारानुसार दार्दानेल्स व बॉस्पोरस या सामुद्रधुन्या तुर्कस्तानला मिळालेल्या आहेत. बॉस्पोरस सामुद्रधुनी काळा समुद्र व मार्मारा समुद्र जोडते तर भूमध्य समुद्र व मार्मारा समुद्र दार्दानेल्यच्या सामुद्रधुनीने जोडलेले आहेत.

मार्मारा समुद्र पूर्णतः तुर्कस्तानच्या सरहद्दीच्या आत आहे. रशियाच्या दृष्टीने हे दोन्ही चिंचोळे समुद्रमार्ग महत्त्वाचे आहेत. दार्दानेल्स आणि बॉस्पोरस या दोन सामुद्रधुन्यांमुळे तुर्कस्तानला आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्त्वाचे स्थान आहे.

बॉस्पोरस सामुद्रधुनीच्या पश्चिमेकडील व दार्दानेल्सच्या उत्तरेकडील सु. २३,७२० चौ. किमी. चा भाग यूरोप खंडात आहे. याला ट्राकाई किंवा थ्रेस असे म्हणतात. दार्दानेल्सच्या सामुद्रधुनीलगतची इमरॉझ आणि बोझजाआदा ही बेटे तुर्कस्तानच्या मालकीच्या आहेत. भूमध्य समुद्रातील सायप्रस बेटाचा तुर्की वस्तीचा भाग तुर्कस्तानने १९७५ मध्ये व्यापला आहे.

भूवर्णन

प्राकृतिक दृष्ट्या तुर्कस्तान हा देश एक लहान खंड म्हणून ओळखला जातो. तुर्कस्तानमधील भूमीस्वरूपे व भूस्तरीय घडण यांची रचना गुंतागुंतीची आणि क्लिष्ट आहे. तुर्कस्तानची निर्मिती टेथिसच्या भूद्रोणीतून झालेली असावी. वलीकरण, प्रस्तरभंग, ज्वालामुखीचे उद्रेक, भूमीचे उद्‌गमन व निम्मजन आणि खननक्रिया यांमुळे तुर्कस्तानचे, विशेषतः पूर्व आणि आग्नेय भागांतील भूरूप तयार झालेले असावे.

बॉस्पोरस व दार्दानेल्स या सामुद्रधुन्या प्रस्तरभंगामुळे निर्माण झाल्या.

ट्राकाई म्हणजे यूरोपीय तुर्कस्तान हे एक उंचसखल मैदान असून त्याच्या ईशान्य भागात इस्त्रांजा नावाची लहान पर्वतश्रेणी आहे. या पर्वतश्रेणीतील माया शिखर १,०३१ मी. उंच आहे. ट्राकाईच्या नैर्ऋत्य भागातही डोंगराळ प्रदेश आहे. ट्राकाईच्या पश्चिम भागात एर्गेने नावाची पश्चिमवाहिनी नदी आहे.

आशियाई तुर्कस्तान विस्ताराने ट्राकाईपेक्षा खूपच मोठा असून उत्तुंग पठारे व पर्वतश्रेण्या यांनी बनलेला आहे. आशियाई तुर्कस्तानमध्ये सखल प्रदेश कमी आहेत. आडानाजवळचे सिलिशन मैदान विस्तृत व सुपीक आहे. इजीअन किनाऱ्यालगत गेदिझ आणि ब्यूयूक मेंडेरेस या नद्यांची खोरी आहेत. यांशिवाय डालामान, कॉजा, आक्सू आणि कप्‌ऱ्यू या दक्षिणवाहिनी व भूमध्य समुद्राला येऊन मिळणाऱ्या नद्या असून त्यांनी सखल प्रदेश तयार केलेले आहेत.

सिलिशनचा सखल प्रदेश सेहान व जेहान या नद्यांमुळे तयार झालेला असून त्याच्या वायव्य भागात ऐतिहासिक कालापासून लष्करी महत्त्व असलेली सिलिशनगेट ही खिंड आहे. आशियाई तुर्कस्तानचे पुढील प्राकृतिक विभाग आहेत : उत्तरेकडील पाँटस पर्वतश्रेणी, दक्षिणेकडील टॉरस व अँटिटॉरस पर्वतश्रेण्या, पूर्वेकडील व आग्नेयीकडील डोंगराळ प्रदेश आणि पश्चिमेकडील विभंग खोऱ्यांचा प्रदेश, पाँटस व टॉरस पर्वतराजींच्या दरम्यानचे अ‍ॅनेतोलियाचे पठार.

उत्तरेकडील पाँटस पर्वत हा घडीचा पर्वत असून तो काळ्या समुद्राच्या दक्षिणेकडे आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे या पर्वाताची उंची वाढत जाते. या पर्वताला क्यूरे, चानिक, पूर्व काळा समुद्र पर्वत अशी वेगवेगळी नावे देशाच्या वेगवेगळ्या भागांत आहेत. या पर्वतात अनेक सांरचनिक खोरी आहेत. किझिलइर्मांक आणि येशिलइर्मांक हे दोन उत्तर मध्य किनाऱ्यावरील त्रिभुज प्रदेश सोडता इतरत्र उत्तुंग समुद्रकडे आढळतात.

तुर्कस्तानच्या दक्षिणेस भूमध्य समुद्राच्या किनाऱ्याने पसरलेली टॉरस पर्वतश्रेणी आहे. २६° पूर्व रेखांशापासून ३५° पूर्व रेखांशापर्यंत या पर्वतश्रेणीस टॉरस म्हणतात. ३५° पूर्व रेखांशापासून तुर्कस्तानच्या पूर्व सरहद्दीपर्यंत अँटिटॉरस म्हणतात.

पाँटस आणि टॉरस पर्वतश्रेण्या आरास पर्वतातील मौंट अ‍ॅरारात (उंची ५,१५६ मी.) येथे मिळतात. हा भाग आर्मेनियन नॉट म्हणून ओळखला जातो. पूर्व तुर्कस्तान भूस्तरीय दृष्ट्या अतिशय अस्थिर भाग आहे व या प्रदेशात भूकंपाचे वारंवार धक्के बसतात. प्रस्तरभंग आणि ज्वालामुखीक्रिया यांमुळे तयार झालेली अनेक भूमीस्वरूपे या भागात आहेत. तुर्कस्तानमध्ये ११० गिरिशिखरे ३,००० मी. पेक्षा जास्त उंच आहेत.

याच पूर्वेकडील प्रदेशात लाव्हारसामुळे खोलगट भागात बांध तयार होऊन निर्माण झालेले वान या नावाचे सरोवर आहे. त्याचा विस्तार ३,७५६ चौ. किमी. आहे. हे जगातील एक अत्यंत खारट सरोवर असून त्याची क्षारता दर हजारी ३३० आहे. वान सरोवराच्या पश्चिमेस घडीच्या पर्वतात टायग्रिस व युफ्रेटीस या नद्यांची उगमस्थाने आहेत. तुर्कस्तानात या नद्यांना अनुक्रमे डीजले व फिरात म्हणतात.

अ‍ॅनातोलियाचे पठार आयताकृती असून ते १,४४० किमी. पूर्व–पश्चिम व ४८० किमी. उत्तर–दक्षिण पसरलेले आहे. या पठाराच्या मध्यवर्ती भागाची सरासरी उंची स. स. पासून ९०० मी. असून मध्यवर्ती भागाच्या चार कोपऱ्यांत अंकारा, काइसेरी, कोन्या आणि आफ्यॉनकाराहिसार ही शहरे वसलेली आहेत.

पठाराच्या पश्चिम व नैर्ऋत्य भागात भूस्तरीय हालचालींमुळे तयार झालेली अनेक खोरी व खोलगट भाग आहेत. यांपैकी काही भागात सरोवरे तयार झालेली आहेत. स्थानिक भाषेत या खोलगट भागांना ओवा म्हणतात. तूझ हे या भागातील आणखी एक खाऱ्या पाण्याचे मोठे सरोवर आहे.

बेशेहिर व एरिडिर ही दोन सरोवरेदेखील मोठी आहेत. पश्चिम अ‍ॅनातोलिया हा गट विभंगाचा खडकाळ प्रदेश आहे. या प्रदेशाची सरासरी उंची ७०० मी. असून या भागात अनेक नतिलंब खोरी आढळतात. इजीअन किनारपट्टी प्रस्तरभंगामुळे खंडित झालेली आढळते. दार्दानेल्स व बॉस्पोरस या सामुद्रधुन्या प्रस्तरभंगामुळे तयार झालेल्या दऱ्या समुद्रात बुडून निर्माण झालेल्या असाव्यात.

काळ्या समुद्राची किनारपट्टी सरळ असून भूमध्य सागरी किनाऱ्यावर मात्र पश्चिमेकडे आंताल्या आणि पूर्वेकडे इस्केंदेरून अशी दोन आखाते आहेत.

अ‍ॅनातोलियाचे पठार आशिया व यूरोप यांमधील दुवा म्हणून ओळखले जाते. त्याला काटकोनात असलेल्या दार्दानेल्स व बॉस्पोरस सामुद्रधुन्यांचा कबजा घेण्यासाठी रशिया, ग्रीस इ. राष्ट्रांबरोबर तुर्कस्तानची अनेक वेळा युद्धे झाली.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/29/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate