इंडोनेशियातील याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय. लोकसंख्या ५,१२,००० (१९८०). हे पूर्व जावा प्रांतात असून सुराबायाच्या दक्षिणेस ८० किमी.वर वसले आहे.मालांग हे सस. पासून सु. ४३० मी. उंचीवर असून ते ज्वालामुखींनी वेढलेले आहे. मालांग हे मुख्यत्वे निवृत नोकरवर्ग व सुराबाया येथील व्यापारी वर्गाचे राहण्याचे ठिकाण आहे. याचा आसमंतीय प्रदेश सुपीक असून मुख्यतः भाजीपाला, फळे व फुले यांसाठी प्रसिद्ध आहे. कॉफी, रबर, तंबाखू, भात इ. पिकेही याच्या परिसरात घेतली जातात.शहरात कापडगिरण्या, लाकूड कापण्याच्या गिरण्या, लोहमार्ग कर्मशाळा असून साबण, सिगारेटी, मृत्तिका वस्तू बनविण्याचे उद्योगही येथे चालतात. हे सुराबायाशी रस्ते व लोहमार्ग यांनी जोडलेले आहे.
समेरू पर्वतपायथ्याशी असलेल्या या शहरात फेब्रुवारी १९४७ मध्ये प्रथम संसद भरविण्यात आली होती. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात हे संसदभवन जाळण्यात आले.शहराच्या सभोवताली प्राचीन राजांच्या (दिनाया, तुमापेल, सिंगहासारी) राजवाड्यांचे अवशेष असून पर्यटनदृष्ट्या ते महत्त्वाचे आहेत.विद्यमान मालांगच्या पूर्व भागालगतच इंडोनेशियन वायुसेनेचा तळ असून खुद्द मालांग हे इंडोनेशियन भूदलाच्या एका विभागाचे मुख्यालय आहे. शहरात माध्यमिक व उच्च शिक्षणाच्या सुविधा असून एक कृषिमहाविद्यालयही आहे.
लेखक- दळवी, र. कों.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/30/2019
जावा : इंडोनेशियातील सर्वांत महत्त्वाचे बेट. क्षेत...
मोलकाझ बेटे : मोलूकू. इंडोनेशियातील एक द्वीपसमूह व...
जाकार्ता : द्जाकार्ता. इंडोनेशिया प्रजासत्ताकाची ...
अनेक प्रकारच्या परराष्ट्रीय धोरणांपैकी अलिप्तता हे...