অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अर्व्हिंग फिशर

अर्व्हिंग फिशर

अर्व्हिंग फिशर : (२७ फेब्रुवारी १८६७-३० एप्रिल १९४७) . सुविख्यात अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ. जन्म सॉगर्टींझ (न्यूयॉर्क राज्य) येथे. १८८८ मध्ये येल विद्यापीठाची पदवी व त्याच विद्यापीठात गणिताचे अध्यापन (१८९२-९५) . पुढे १८९८ पासून १९३५ पर्यंत अर्थशास्त्राचा प्राध्यापक , गणिती, संख्याशास्त्रज्ञ, जनांकिकीशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ , व्यावसायिक, सुधारक व शिक्षक अशा बहुविध नात्यांनी त्याने वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केली. आर्थिक सिद्धांतापासून ते सार्वजनिक आरोग्यापर्यंत अनेकविध विषयांवर फिशरने विपुल लेखन केले. त्याच्या नावावर सु. ३० ग्रंथ व शेकडो लेख मोडतात.

फिशरने ‘कार्ड इंडेक्स फाइल सिस्टिम’ शोधून काढली व ती १९१० मध्ये बाजारात विक्रीला उपलब्ध करून भरपूर पैसा मिळविला. त्याने स्थापन केलेली कंपनी (निगम) इतर कंपन्यांबरोबरच १९२६ मध्ये ‘रेमिंग्टन रॅप्ड कॉर्पोरेशन’ या नवीनच औद्योगिक निगमामध्ये विलीन झाली. या निगमाचा फिशर आमरण संचालक होता. आर्थिक विश्लेषण व पूर्वानुमान करणाऱ्या अनेक संस्थांचा फिशर संस्थापक व संचालकही होता; इतरही अनेक कंपन्यांचे संचालकत्व त्याने सांभाळले. त्याचप्रमाणे सार्वजनिक व लोकोपयोगी कार्याबद्दल त्याला आस्था होती. ‘लीग ऑफ नेशन्स’चा तो पुरस्कर्ता होता, तसेच तो दारूबंदीचाही कट्टर समर्थक होता.

फिशर १८९८ मध्ये क्षयरोगाने आजारी असताना त्याला आरोग्यविषयक, सार्वजनिक स्वच्छताविषयक आणि सुप्रजाजननशास्त्रविषयक समस्यांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. १९१३ मध्ये फिशरने एच्.ए.ली व माजी राष्ट्राध्यक्ष टॅफ्ट यांच्याबरोबर ‘लाइफ एक्स्टेन्शन इन्स्टिट्यूट’ नावाची एक संस्था स्थापिली. फिशरने हाऊ टू लिव्ह (१९१५) हे पुस्तक प्रसिद्ध केले. या पुस्तकाच्या ९० आवृत्त्या निघाल्या आणि १० भाषांतून अनुवाद झाले.

फिशरच्या अर्थशास्त्रीय लेखनामध्ये विश्लेषणात्मक स्पष्टता जाणवते. आधुनिक अर्थशास्त्राचा, विशेषतः अर्थमितीचा, पाया घालणाऱ्यांमध्ये फिशरचा समावेश होतो. अर्थशास्त्रामध्ये शास्त्रीय पद्धती आणि गणितीय विचारसरणी यांची भर घालण्याचा फिशरने सर्वाधिक प्रयत्‍न केला. त्याचप्रमाणे सध्याच्या अर्थशास्त्रामधील पायाभूत अशा संकल्पना व सिद्धांत यांच्या विकासासाठीही त्याने मोठे प्रयत्‍न केले. गणितीय अर्थशास्त्राच्या विकासाकरिता त्याने फार परिश्रम घेतले. १९३० मध्ये चार्ल्स रूझ व ⇨ रांगनार फ्रिश या दोन अर्थशास्त्रज्ञांनी फिशरच्या सहकार्याने ‘इंटरनॅशनल इकॉनॉमेट्रिक सोसायटी’ ही संस्था स्थापन केली आणि फिशर त्या संस्थेचा अध्यक्ष झाला.

द नेचर ऑफ कॅपिटल अँड इन्कम (१९०६) ह्या फिशरच्या पुस्तकात लेखाशास्त्र व विमाविज्ञान या दोन शास्त्रांचा सैद्धांतिक पाया अंतर्भूत आहे. राष्ट्रीय उत्पन्न व संपत्ती यांच्या अभ्यासाचा पायाही या ग्रंथात दिसून येतो. या ग्रंथांत भांडवल व उत्पन्न या दोन संकल्पनांचे व्याजदराच्या माध्यमातून फिशरने स्पष्टीकरण केले असून त्यांचे पारस्परिक नातेही दाखवून दिले आहे. भांडवल म्हणजे वस्तूंचा (आर्थिक) केलेला साठा, उत्पन्न म्हणजे सेवांचा प्रवाह. भांडवलाचे मूल्य हे त्याच्यापासून भविष्यकाळात मिळणाऱ्या उत्पन्नाच्या वर्तमानकालीन मूल्यरूपाने मिळते. या दोहोंमधील कारणभावाची दिशा ही भांडवलापासून उत्पन्नाकडे अशी नसून उत्पन्नाकडून भांडवलाकडे अशी असते. म्हणजेच वर्तमानाकडून भविष्यकाळाकडे नसून भविष्यकाळाकडून वर्तमानाकडे असते. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे झाल्यास, भांडवलमूल्य म्हणजे अपेक्षित उत्पन्नाचे कमी केलेले मूल्य होय.

फिशरने असे स्पष्टपणे दाखवून दिले की, आर्थिक वर्तमान म्हणजे भविष्यकालीन भांडवलीकरण असून अर्थशास्त्रामध्ये केवळ भविष्यालाच महत्त्व असते; आणि घडून गेलेल्या परिव्ययांचा (भूतकाळातील परिव्ययांचा) मूल्याशी तसा प्रत्यक्ष संबंध नसतो. फिशरच्या संशोधनामुळे व्याज सिद्धांताचा आधार वा पाया सुस्पष्टपणे घातला गेला.

द परचेसिंग पॉवर ऑफ मनी (१९११) या आपल्या ग्रंथात फिशरने पैशाच्या सिद्धांताची म्हणजेच ‘द्रव्य राशी सिद्धांता’ची पूर्णपणे नव्याने मांडणी केली; पैशाच्या क्रयशक्तीचे निर्धारण करण्याचे सिद्धांत त्याने स्पष्टपणे विशद केले. बीजगणितातील समीकरणाच्या साहाय्याने पैशाच्या (द्रव्याच्या) परिमाणातील बदल आणि किंमतींच्या सर्वसाधारण पातळीतील बदल या दोहोंमधील संबंधांची आधुनिक संकल्पना काय आहे, ते वरील ग्रंथात फिशरने स्पष्ट केले आहे.

P =

MV + M1 V1

म्हणजेच

T

किंमत पातळी =

विधिग्राह्य पैसा  X त्याचा भ्रमणवेग + पेढीचा पैसा  X त्याचा भ्रमाणवेग

एकूण विनिमय व्यवहार

या ठिकाणी P =  किंमतीची पातळी; M = विधिग्राह्य पैसा; V = पैशाचा भ्रमणवेग; M1 = पेढीचा पैसा; V1 = त्याचा भ्रमणवेग; T = एकूण विनिमय व्यवहार.

PT = MV + M1 V1 म्हणजेच किंमत पातळी X व्यवहारांची संख्या = पैसा X त्याचा भ्रमणवेग + पत पैसा X त्याचा भ्रमणवेग, असे हे फिशरचे विनिमय समीकरण आहे.

द थिअरी ऑफ इंटरेस्ट (१९३०) या फिशरच्या महत्त्वाच्या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय जटिल विषयाचे अतिशय सुस्पष्ट विवेचन हे होय. अगदी प्रारंभी त्याने नाममात्र व्याज व वास्तव व्याज असे व्याजाचे दोन प्रकार सांगितले आहेत. अर्थातच ग्रंथाचा बहुतेक भाग (प्रकरणे ४-१८)  हा वास्तव व्याजदराच्या निर्धारण सिद्धांतासाठीच देण्यात आला आहे. त्यानंतर एकोणिसाव्या प्रकरणात व्याजाच्या पैसा (द्रव्य) व किंमती यांच्याशी असणाऱ्या संबंधाचे वर्णन आले आहे. फिशरचा वास्तव व्याजदर सिद्धांत म्हणजे ‘संयम सिद्धांत’ (ॲब्स्टिनन्स थिअरी) किंवा ‘प्रतीक्षा सिद्धांत’ (वेटिंग थिअरी) तसेच ‘मूल्याधिक्य सिद्धांत’ (ॲगिओ थिअरी) यांसारखे मनोवैज्ञानिक सिद्धांत आणि ‘उत्पादकता-सिद्धांता’सारखे (प्रॉडक्टिव्हिटी थिअरी) प्राकृतिक सिद्धांत या दोहोंचे मिश्रण आहे. फिशरचा व्याज सिद्धांत म्हणजे, बंबाव्हेर्कच्या व्याजसिद्धांताप्रमाणेच, भांडवलप्रणीत सिद्धांत असून तो भांडवल स्वरूपाच्या अभ्यासातून मांडला गेला आहे. तो केन्सने मांडलेल्या व्याजदराच्या मौद्रिक सिद्धांताच्या नेमका विरूद्ध बाजूचा आहे. फिशरने असे दाखवून दिले की, किंमती जेव्हा सर्वाधिक उच्च पातळीला पोचलेल्या असतात, तेव्हा व्याजदरही उच्च असतात; याचे कारण किंमतपातळी उच्च आहे असे नसून ती वाढत जाते हे आहे; त्याचप्रमाणे जेव्हा किंमती कमी असतात, त्यावेळी व्याजदरही कमी असतात; त्याचेही कारण किंमतपातळी कमी आहे हे नसून ती कमी होत जाते (कमी झालेली असते) हे आहे. फिशरने व्याजाचे केलेले विश्लेषण म्हणजे अर्थशास्त्रीय सिद्धांताच्या सर्वात कठीण वा जटिल अशा एका समस्येचे केलेले यशस्वी निरसन होय.

स्टॅबिलायझिंग द डॉलर (१९२०), स्टँप स्क्रिप (१९३३) आणि हंड्रेड पर्सेंट मनी (१९३५) या तीन ग्रंथांद्वारा फिशरने स्थिर पैशाच्या क्रयशक्तीचे निर्धारण करण्याचा प्रयत्‍न केल्याचे म्हणजेच चलनवाढ व चलनघट यांच्या निराकरणाने प्रयत्‍न केल्याचे दिसून येते. मुद्रानीतीवर फिशरचे आणखी तीन ग्रंथ प्रसिद्ध आहेत, ते म्हणजे द मनी इल्यूझन (१९२८), बूम्स अँड डिप्रेशन्स (१९३२) आणि इन्फ्‍लेशन (१९३३) हे होत. या तीन ग्रंथांपैकी बूम्स अँड डिप्रेशन्स हा ग्रंथ अधिक महत्त्वाचा आहे. त्यामध्ये त्याने आर्थिक चढउतारांबाबतच्या अतिशय जटिल सिद्धांताचे सुबोध विवेचन केले आहे.

पैशाच्या क्रयशक्तीमधील बदलांचा अभ्यास करण्यासाठी फिशरने किंमतींच्या निर्देशांक सिद्धांताचे विवेचन आपल्या द मेकिंग ऑफ इंडेक्स नंबर्स (१९२२) या ग्रंथात केले. समाधानकारक अशा किंमत-निर्देशाकांची गुणवैशिष्ट्ये ठरविण्यासाठी संशोधन करणे, या फिशरच्या विनिमय समीकरणाच्या विश्लेषणाचा एक भाग होता.

फिशर हा एकाच वेळी सैद्धांतिक व व्यवसायी होता. अर्थशास्त्राच्या विकासात फिशरला महत्त्वाचे स्थान आहे. सैद्धांतिक क्षमता व प्रत्यक्ष अवलोकन या दोहोंचा संगम त्याच्या ठिकाणी झालेला होता. सैद्धांतिक गणितीय प्रतिमाने तयार करून त्यांद्वारा वास्तवतेचे विश्लेषण करणे, हे अतिशय महत्त्वाचे कार्य त्याने केले. फिशरने भांडवल, व्याज आणि पसा यांविषयीच्या मूलभूत समस्यांचे निरसन करण्यात आपल्या अर्थशास्त्रीय मीमांसेचे फार मोठा हातभार लावला. शुंपेटर या प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञाने ‘फिशर हा अमेरिकेचा सर्वात मोठा वैज्ञानिक अर्थशास्त्रज्ञ’ या शब्दांत त्याचा गौरव केला आहे.

 

संदर्भ : Sudela, Amelia G. Lessons of Monetary Experience: Essays in Honour of Irving Fisher, New York, 1937.

 

लेखक - सुभाष भेण्डे / वि. रा. गद्रे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/9/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate