অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अल्वा मीर्दाल

अल्वा मीर्दाल

अल्वा मीर्दाल : (३१ जानेवारी १९०२–१ फेब्रुवारी १९८६). स्वीडनमधील प्रसिद्ध समाजसेविका व जागतिक निःशस्त्रीकरणाची खंबीर पुरस्कर्ती. एका शेतकरी कुटुंबात लोवा रीमर व ॲल्बर्ट या दांपत्याच्या पोटी अप्साला गावी त्यांचा जन्म झाला. स्टॉकहोम व अप्साला या विद्यापीठांतून शिक्षण घेऊन त्यांनी ए. बी. व ए.एम्‌. या पदव्या मिळविल्या. १९२४ मध्ये त्यांचा विवाह प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ कार्ल गन्नार मीर्दाल यांच्याबरोबर झाला. गन्नारांच्या व्यक्तिमत्वामुळे त्यांच्या सामाजिक कार्यास प्रगल्भता लाभली. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. अल्वा मीर्दालांचे प्रारंभीचे आयुष्य शैक्षणिक कार्यात, विशेषतः अध्ययन-अध्यापनात गेले. त्यांनी स्टॉकहोम येथील प्रशिक्षण महाविद्यालयात काही काळ अध्यापनाचे काम केले (१९३६–४८) व नंतर त्या तेथेच संचालिका झाल्या (१९४९–५०).

शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी अनेक मानाची पदे भूषविली. या सुमारास संयुक्त राष्ट्रे या जागतिक संख्येत त्यांचा सामाजिक घडामोडींसंबंधीच्या विभागात संचालिका या नात्याने प्रवेश झाला. तिथेच त्या यूनेस्को या सांस्कृतिक संस्थेत सामाजिक शास्त्रे या विषयाच्या संचालिका झाल्या (१९५१–५५). तिथे जागतिक राजकीय वर्तुळातील थोर व्यक्तींशी त्यांचा परिचय वाढला आणि त्या सक्रिय राजकारणाकडे आकृष्ट झाल्या. पुढे त्या स्वीडनच्या संसदेवर निवडून आल्या. तेव्हा त्यांची नियुक्ती भारत, ब्रह्मदेश, श्रीलंका या पूर्वेकडील देशांच्या परराष्ट्रविषयक खात्याच्या मंत्री म्हणून झाली (१९५५–५६). त्यानंतर त्यांनी भारतात स्वीडनचे परराष्ट्रीय वकील म्हणून काम केले (१९५६–६१). १९६२ मध्ये त्या स्वीडनच्या सिनेटवर निवडून आल्या व १९७० पर्यंत सिनेटर म्हणून त्यांनी काम केले. या काळात त्यांनी निःशस्त्रीकरण समस्येचा अभ्यास केला. त्यांना स्वीडनच्या जिनीव्हा येथील निःशस्त्रीकरण परिषदेस उपस्थित राहणाऱ्या स्वीडिश पथकाचे अध्यक्षपद दिले.

काही दिवस बिनखात्याचे मंत्री म्हणून काम केल्यावर १९६६ पासून त्यांच्याकडे निःशस्त्रीकरण खाते सुपूर्त करण्यात आले. त्यांनी हे पद १९७३ पर्यंत सांभाळले. या पदावर असताना त्यांनी शांततेच्या प्रसार-प्रचारार्थ अनेक परदेश दौरे केले आणि निःशस्त्रीकरणाने जागतिक शांतता निश्चितपणे प्रस्थापित होऊ शकेल, असे प्रांजल मत प्रकट केले. निःशस्त्रीकरण परिषदेतील त्या जगातील पहिल्या महिला प्रतिनिधी होत. त्यांनी या परिषदेत अण्वस्त्रांच्या स्पर्धेबद्दल बड्या राष्ट्रांना दोष दिला आणि स्वीडन हे ह्या स्पर्धेत नाही. याबद्दल सार्थ स्वाभिमान व्यक्त केला.

अल्वा मीर्दाल यांना शैक्षणिक समस्या, स्त्रियांचे हक्क, अपंग आणि त्यांचे प्रश्न यांविषयी सतत आस्था होती. हे प्रश्न लोकांसमोर मांडून काही उपाय वा मार्ग शोधावे असे त्यांना वाटत असे. सुरुवातीस त्यांनी स्त्रीविषयक समस्यांचा अभ्यास करण्यासाठी तत्संबंधीच्या शासकीय आयोगाने सचिवपद भूषविले होते (१९३५–३८). त्यानंतर त्यांची अपंगांच्या शासकीय आयोगावर व शिक्षणविषयक सुधारणांच्या सरकारी आयोगावर सदस्य म्हणून नेमणूक झाली (१९४३–५०). यांशिवाय त्यांनी पॅरिस (१९४५) व जिनीव्हा (१९४७) येथील आंतरराष्ट्रीय मजूर संघटनांत स्वीडिश प्रतिनिधी म्हणून भाग घेतला. तसेच विद्यालय-पूर्व जागतिक शिक्षण मंडळाच्या त्या अध्यक्षा होत्या (१९४७–४९). हे सामाजिक कार्य करीत असतानाच त्यांना जागतिक शांततेचे कार्य करण्याची संधी लाभली. तेव्हा त्यांनी स्टॉकहोममध्ये इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट स्थापण्यात पुढाकार घेतला. या संस्थेच्या त्या १९६४–६६ दरम्यान सचिव होत्या. जगातील अनेक मान्यवर विद्यापीठांनी त्यांना डॉक्टर ऑफ लॉज ही सन्मान्य पदवी देऊन त्यांचा गौरव केला.

त्यांच्या या जागतिक शांततेच्या पुरस्कारार्थ केलेल्या कार्याचा गौरव आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक प्रतिष्ठित शांतता पारितोषिके देऊन करण्यात आला. त्यांपैकी पश्चिम जर्मनी प्रजासत्ताकाने गन्नार यांच्याबरोबर दिलेला शांतता पुरस्कार (१९७०), हेग शांतता ॲकॅडमीचे पारितोषिक (१९७३), वॉटलर शांतता पारितोषिक (१९७३), ॲल्बर्ट आइन्स्टाइन शांतता पारितोषिक (१९८०), आंतरराष्ट्रीय शांतता आणि सामंजस्यासाठी असलेला नेहरू पुरस्कार (१९८१) व नॉर्वेजियन पीपल्स शांतता पुरस्कार (१९८२) हे बहुमानाचे व ख्यातनाम आहेत. नोबेल समितीने रॉब्लेस आल्‌फॉन्सा गार्सिया (मेक्सिको) यांच्याबरोबर शांततेचे नोबेल पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान केला (१९८२). संयुक्त राष्ट्रांनी निःशस्त्रीकरण तज्ञ म्हणून त्यांची खास नियुक्ती केली होती.

अल्वा मीर्दाल यांनी स्फुटलेखांबरोबर काही महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले. या ग्रंथांतून त्यांनी दारिद्र्य निर्मूलन, भेडसावणारी जागतिक लोकसंख्या, बेकारी आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील उणिवा यांविषयी काही मौलिक सूचना दिल्या आहेत. तसेच जागतिक शांततेस बडीराष्ट्रे (सुपर पॉवर्स) कशी जबाबदार आहेत, त्याचे मार्मिक चित्रणही केले आहे. क्रायसिस इन द पॉप्युलेशन क्वेश्चन, सिटी चिल्ड्रेन, नेशन अँड फॅमिली, कॉमेंटस्‌ ऑन द वर्ल्ड अफेअर्स, पोस्ट–वॉर प्लॅनिंग, आर वुई टू मेनी ?, वुमेन्स टू रोल्स (सहलेखक व्होला क्लीन), द गेम ऑफ डिसआर्मामेंट (१९७६), वॉर्स, वेपन्स अँड एव्हरी-डे व्हायोलन्स (१९७७), डायनॅमिक्स ऑफ यूरोपियन न्यूक्लिअर डिसआर्मामेंट (१९८१) इ. काही पुस्तके वरील विचारांची द्योतक असून मान्यवर आहेत. त्यांचे लेखन स्वीडिश, इंग्रजी आणि जर्मन या तीन भाषांत आहे.

अल्वांनी जरी निःशस्त्रीकरण आणि सामाजिक समस्यांवर लेखन केले असले, तरी त्यांचा मूळ पिंड शिक्षिकेचा होता. त्यामुळे पुढील पिढीला काहीतरी चांगले शिकवावे अशी त्यांची धारणा होती. त्यांचे सर्व जीवन खडतर समाजसेवेत व्यतीत झाले. अखेरची दोन वर्षे त्या आजारी असून स्टॉकहोमच्या रुग्णालयातच त्यांचे निधन झाले.

 

संदर्भ : रेगे, मे. पुं. संपा. नवभारत, जानेवारी १९८३.

लेखक - रुक्साना शेख

स्त्रोत - मराठी विश्वकोश© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate