आद्रीअँ मारी लझांद्र : (१८ सप्टेंबर १७५२ – १० जानेवारी १८३३). फ्रेंच गणितज्ञ, विवृत्तीय समाकल , संख्यासिद्धांत, गोलाभ पदार्थांतील परस्पर आकर्षण व लघुतम वर्ग पद्धती यांसंबंधीचे त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे. विवृत्तीय समाकलांसंबंधीच्या त्यांच्या कार्यामुळे गणितीय भौतिकीतील मूलभूत वैश्लेषिक साधने उपलब्ध झाली.
लझांद्र यांचा जन्म पॅरिस येथे झाला. माझारँ कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण झाले. १७७० मध्ये त्यांनी गणित व भौतिकी या विषयांतील आपला प्रबंध पदवीकरिता सादर केला. १७७५-८० या काळात ते पॅरिस येथील एकोल मिलिटेरमध्ये गणिताचे प्राध्यापक होते. फ्रेंच अॅकॅडेमी ऑफ सायन्सेसच्या सदस्यत्वावर १७८३ मध्ये त्यांची निवड झाली. पॅरिस व ग्रिनिच येथील वेधशाळांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या भूगणितीय कार्यात सहभागी होण्यासाठी अॅकॅडेमीने लझांद्र यांची १७८७ मध्ये नेमणूक केली. याच वेळी लंडनच्या रॉयल सोसायटीचे ते सदस्य झाले. त्यानंतर लझांद्र यांच्या अनेक किरकोळ सरकारी पदांवर नेमणुका झाल्या; तथापि प्रसिद्ध गणितज्ञ पी. एल्. लाप्लास या त्यांच्या सहकाऱ्यांच्या मत्सरी स्वभावामुळे लझांद्र यांना त्यांच्या योग्यतेला अनुरूप अशी पदे देण्यात आली नाहीत. लाप्लास यांनी लझांद्र यांच्या काही कार्याचा मुळीच ऋणनिर्देश न करता तसाच विनियोग केला. १८१३ मध्ये जे. एल्. लाग्रांझ यांच्या मृत्यूनंतर ब्युरो ऑफ लाँजिट्यूड्समधील त्यांच्या जागेवर लझांद्र यांची नेमणूक झाली व मग अखेरपर्यंत त्यांनी तेथेच काम केले.
प्रारंभीच्या काळात लझांद्र यांनी अभ्यास केलेल्या समस्यांत ग्रहीय गोलाभांच्या परस्पर आकर्षणासंबंधीच्या प्रश्नाचा समावेश होतो. या विषयावर त्यांनी प्रसिद्ध केलेल्या चार संस्मरणिकांतील पहिलीत त्यांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या फलनाचा अंतर्भाव आहे. १८०६ मध्ये त्यांनी धूमकेतूंच्या कक्षा निर्धारित करण्याच्या नवीन पद्धतींसंबंधी लिहिलेल्या ग्रंथाच्या पुरवणीत लघुतम वर्ग पद्धतीचे पहिलेच प्रसिद्ध झालेले स्पष्टीकरण आणि व्यापक विवरण दिले होते. त्यांनी भूगणितातही महत्त्वाचे कार्य केले. १७९४ मध्ये प्रसिद्ध झालेले त्यांचे Elements de geometrie हे भूमितीविषयीचे पाठ्यपुस्तक जवळजवळ शतकभर या विषयातील प्राथमिक अध्ययनात प्रभावी ठरले. या पुस्तकात त्यांनी यूक्लिड यांच्या अनेक विधानांची मोठ्या प्रमाणात फेररचना व सुलभीकरण करून अधिक परिणामकारक पाठ्यपुस्तक तयार केले. यूरोपात बहुतेक ठिकाणी यूक्लिड यांच्या Elements ची जागा लझांद्र यांच्या पाठ्यपुस्तकाने घेतली व त्याची नंतरची भाषांतरे अमेरिकेतही प्रचारात आली आणि पुढच्या भूमितीच्या पाठ्यपुस्तकांना ते आद्य नमुना ठरले. याच पुस्तकात त्यांनी π ही अपरिमेय संख्या (दोन संख्यांच्या गुणोत्तराच्या रूपात मांडता न येणारी संख्या) आहे याची सोपी सिद्धता दिली, तसेच π२ही संख्याही अपरिमेय असल्याची सिद्धता दिली. π हे परिमेय सहगुणक असलेल्या व परिमित घाताच्या कोणत्याही बैजिक समीकरणाचे मूळ नाही, असे अनुमानही त्यांनी मांडले होते.
लेनर्ड ऑयलर, जॉन लँडेन व जे. एल्. लाग्रांझ यांनी अगोदर केलेल्या कार्याच्या आधारावर प्रारंभ करून लझांद्र यांनी विवृत्तीय समाकलांच्या सिद्धांताचा विस्तार करण्यात सु. ४० वर्षे खर्च केली. Trait des functions eltiptiques (३ खंड, १८२१-२८) या त्यांच्या सर्वांत महत्त्वाच्या ग्रंथात त्यांनी विवृत्तीय समाकल तीन प्रमाणभूत रूपांत मांडले व ते त्यांच्याच नावाने ओळखले जातात. त्यांचे कार्य प्रसिद्ध झाल्यानंतर थोड्याच काळात नील्स हेन्रिक आबेल व कार्ल याकोबी यांनी स्वतंत्रपणे लावलेल्या शोधांमुळे या विषयात मोठी क्रांती झाली. लझांद्र यांच्या समकालीन गणितज्ञांनी त्यांच्या या विषयातील कार्याच्या फलांकडे केलेल्या दुर्लक्षाने खचून न जाता लझांद्र यांनी आपल्या मौलिक कार्याला लोपून टाकणाऱ्या या संशोधनाचे स्वागतच केले व त्यातच त्यांचा मोठेपणा दिसून येतो.
लझांद्र यांनी संख्या सिद्धांतातील आपले व पूर्वीच्या गणितज्ञांचे संशोधन पद्धतशीर रूपात Theorie des nombres (२ खंड, १८३०) या शीर्षकाखाली प्रसिद्ध केले. यात त्यांनी स्वतः शोधून काढलेल्या द्विघातीय व्युत्क्रमतेसंबंधीच्या नियमाची सिद्धता दिलेली होती. प्येअर द फेर्मा यांच्या संख्या सिद्धांतातील सतराव्या शतकामधील कार्यानंतर हा नियम सर्वांत महत्त्वाचा व व्यापक स्वरूपाचा असून त्या काळातील महान गणितज्ञ सी. एफ्. गौस यांनी त्याचा उल्लेख ‘अंकगणितातील रत्न’ असा केला होता.
लझांद्र यांना लिजन ऑफ ऑनरचे सदस्यत्व, शेव्हालिए द ला एम्पायर हा किताब वगैरे सन्मान मिळाले. ते पॅरिस येथे मृत्यू पावले.
लेखक - स. ज. ओक / व. ग. भद्रे
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/23/2020
इंग्लिश गणितज्ञ. गणितीय विश्लेषण व बीजगणित या विषय...
फ्रेंच भौतिकी विज्ञ व गणिती. विद्युत् शास्त्रात मह...
फ्रेंच गणितज्ञ. उच्च बीजगणितात महत्त्वाचे कार्य. त...
फ्रेंच गणितज्ञ.