आर्नल्ड टॉयन्बी : (२३ ऑगस्ट १८५२–९ मार्च १८८३). सुप्रसिद्ध इंग्रज समाजसुधारक आणि अर्थशास्त्रज्ञ. लंडन येथे जन्म. लहानपणापासूनच आर्नल्डवर आपल्या शल्यचिकित्सक वडिलांच्या बुद्धिमत्तेचा व विचारांचा प्रभाव होता. नाजुक प्रकृतीमुळे त्याला उच्च शिक्षण घेणे जमले नाही. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी ऑक्सफर्डच्या ‘पेम्ब्रोक महाविद्यालया’त प्रवेश. तेथून तो बेल्यल महाविद्यालयात गेला. १८७८ मध्ये तेथेच अर्थशास्त्र व आर्थिक इतिहास या विषयांच्या अध्यापनास प्रारंभ.
उच्च पातळीची बुद्धिमत्ता, संतवत् चारित्र्य, सत्यावरील निष्ठा आणि कामगार व सार्वजनिक कल्याणाकरिता जीवन समर्पण करण्याची वृत्ती, ह्यांमुळे समकालीनांवर टॉयन्बीचा फार मोठा प्रभाव पडला. त्याचा ऑक्सफर्डमधील मित्र अॅल्फ्रेड मिल्नर याच्या मते धर्माकरिता टॉयन्बी समाजसुधारक झाला व समाजसुधारणांसाठी तो अर्थशास्त्रज्ञ झाला. आपल्या ३१ वर्षांच्या अल्प जीवनकाळात टॉयन्बीने कामगारांसाठी घरे व उद्याने, मुक्त वाचनालये आणि अन्य सुधारणा ह्यांचा सातत्याने पाठपुरावा केला. गरीबांच्या कायद्याचा पालक, सहकारी संस्थांचा आश्रयदाता व चर्चसुधारक म्हणून त्याने मोठे कार्य केले. त्याचे आणखी एक महत्त्वाचे कार्य म्हणजे सामाजिक सुधारणांवर न्यूकॅसल, शेफील्ड व लंडन या औद्योगिक शहरांमधून कामगारांसाठी त्याने दिलेली अनेक व्याख्याने. तीच त्याच्या मृत्यूनंतर लेक्चर्स ऑन द इंडस्ट्रियल रेव्होलूशन ऑफ द एटींथ सेंचरी इन इंग्लंड या नावाने ग्रंथबद्ध झाली (१८८४). १९५६ मध्ये याच ग्रंथाची दुसरी आवृत्ती द इंडस्ट्रियल रेव्होलूशन या शीर्षकाने प्रसिद्ध झाली असून तिला टॉयन्बीचा पुतण्या सुविख्यात इतिहासज्ञ आर्नल्ड जोसेफ टॉयन्बी, याची प्रस्तावना आहे. एका अत्यंत महत्त्वपूर्ण क्षेत्राची अतिकुशलतेने केलेली पूर्वपाहणी या दृष्टीने एका तरुण व्यक्तीने लिहिलेल्या ह्या आद्यग्रंथाचे महत्त्व कायम टिकणारे आहे, असा अभिप्राय इतिहासज्ञ टॉयन्बीने या ग्रंथाला लिहिलेल्या आपल्या प्रस्तावनेत व्यक्त केला आहे. इंडस्ट्रियल रेव्होलूशन (औद्योगिक क्रांती) ही संज्ञा प्रथम आर्नल्ड टॉयन्बीने वापरली व पुढे ती सर्वत्र रूढ झाली.
औद्योगिक इतिहासाचे समग्र समीक्षण करून आणि अॅडम स्मिथ, मॅल्थस व रिकार्डो यांच्या विचारांवर पडलेल्या तत्कालीन परिस्थितीचे परिणाम सुस्पष्ट करून टॉयन्बीने सनातन अर्थशास्त्रज्ञांच्या सिद्धांतांची सापेक्षता दाखविली आहे. आर्थिक धोरणांचे परिशीलन ऐतिहासिक परिस्थितीच्या संदर्भातून केले जावे, असे त्याचे मत होते. लोकशाही राज्यपद्धतीत संपत्तीची सुयोग्य विभागणी करता येईल की नाही, अशी समस्या मनुष्यापुढे निर्माण झाली असून ती सोडविणे त्याला भाग आहे, असे टॉयन्बीचे मत होते. तत्कालीन सामाजिक अवस्थेमध्ये एकूण सुधारणा होणे शक्य आहे असा आशावाद त्याने व्यक्त केला असून, १८४६ पासून खुला व्यापार, कामगारकायदे, कामगारसंघटना आणि सहकारी समित्या ह्यांमुळे कामगारांच्या वेतनात बऱ्याच प्रमाणात वाढ झाल्याचे दाखवून दिले आहे. नैतिक प्रगती व स्वावलंबन ह्यांची कास धरल्यास पुष्कळच मिळविता येईल, असाही आशावाद टॉयन्बीने व्यक्त केला असून सरकारी मालकी व सार्वजनिक गृहनिवसन ह्यांचा अधिक विस्तार झाला पाहिजे, असे म्हटले आहे. असे असले, तरी टॉयन्बी समाजवादी नाही; कारण खाजगी मालमत्तेस त्याची मान्यता आणि तिचा विध्वंस व नाश यांस त्याचा विरोध आहे. मार्क्सवादाला टॉयन्बीचा विरोध होता; कारण श्रम व भांडवल या दोन्ही उत्पादन घटकांचे हित सहकारातच आहे, असा त्याचा दृढ विश्वास होता.
वयाच्या अवघ्या एकतिसाव्या वर्षी मस्तिष्कज्वराने टॉयन्बी विंबल्डन येथे मृत्यू पावला. टॉयन्बीच्या स्मरणार्थ सॅम्युएल बार्नेट याने लंडनच्या पूर्व भागात व्हाइट चॅपल येथे १८८४ मध्ये एक सामाजिक वसाहत स्थापन करुन तिला ‘टॉयन्बी हॉल’ असे नाव दिले. या वसाहतीत ऑक्सफर्ड–केंब्रिज विद्यापीठांतील विचारवंतांना सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले; तेथे स्थानिक-सामाजिक परिस्थितीविषयक सांख्यिकीचे संकलन, प्रौढ शिक्षणाचा विकास इ. कार्यक्रमांना सुरुवात झाली. अलीकडे टॉयन्बी हॉल म्हणजे नागरिकांना सामाजिक आणि कायदेविषयक मोफत सल्ला देणारे केंद्र, अपंग बालसाहाय्य केंद्र, वृद्ध कल्याणसेवा केंद्र तसेच प्रौढांसाठी व बालांसाठी चित्रपटगृहे अशी बहु-उद्देशी कार्यसंस्थाच बनली आहे.
संदर्भ : 1. Milner, Alfred, Arnold Toynbee, London, 1901.
2. Montagu, Ashley, Ed. Toynbee and History, Boston, 1956.
लेखक - वि. रा. गद्रे
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/7/2020
भांडवल व व्याज यांविषयी मौलिक सिध्दांत मांडणारा सु...
सुविख्यात अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ. जन्म सॉगर्टींझ (...
जर्मन संख्याशास्त्रज्ञ व अर्थशास्त्रज्ञ. शिक्षण जर...
सुप्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ, साकलिक अर्थशास...