एर्न्स्ट एंगेल : (१६ मार्च १८२१ – ८ डिसेंबर १८९६) जर्मन संख्याशास्त्रज्ञ व अर्थशास्त्रज्ञ. शिक्षण जर्मनी आणि फ्रान्स येथे. काही वर्षे बेल्जियममध्ये घालविल्यानंतर तो जर्मनीला परतला आणि सॅक्सनी (१८५० ते १८५८) व प्रशिया (१८६१ ते १८८२) येथील 'स्टॅटिस्टिकल ब्यरो' मध्ये त्याने संचालक म्हणून काम केले. वेगवेगळ्या देशांतील कौटुंबिक अंदाजपत्रके अभ्यासून, एंगेलने काढलेले निष्कर्ष अर्थशास्त्राच्या क्षेत्रात सर्वमान्य झाले आहेत. 'कुटुंबाचे उत्पन्न वाढले, तर कुटंबाचा वेगवेगळ्या बाबींवरील खर्च सारख्यात प्रमाणात न वाढता, अन्नावरील खर्चाचे शेकडो प्रमाण वाढते', हा महत्त्वाचा निष्कर्ष 'एंगेलचा कुटुंबखर्चाविषयीचा नियम' म्हणून ओळखला जातो.
आर्थिक पाहणीवर आधारलेल्या अर्थशास्त्रातील पहिल्या परिमाणात्मक नियम म्हणून त्यास महत्त्व आहे. मागणीवर प्राप्तीतील वाढीच्या होणाऱ्या परिणामाच्या अनुषंगाने सर्वसाधरण उत्पादकतेत वाढ होण्यासाठी, लोकांचा ओघ कृषीकडून निर्मितिउद्योगाकडे वळणे आवश्यक आहे, असे त्याने प्रतिपादन केले. अतिरिक्त लोकसंख्येविषयीची मॅल्थसची भीती फोल आहे, असे त्याचे म्हणणे होते. त्याने मुख्यतः सांख्यिकी विषयावर ग्रंथ लिहिले असून कर, विमा, उद्योग, बँकिंग यांसारख्या विषयांवरही स्फुट लेखन केले आहे. 'इंटरनॅशनल स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट' ह्या संस्थेचा तो एक संस्थापक होता. वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी तो ड्रेझ्डेनच्या राडेबॉइल ह्या उपनगरात मरण पावला.
लेखक - वि. रा. गद्रे
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 4/24/2020
सुविख्यात अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व कोशकर्ता. त्याच...
भांडवल व व्याज यांविषयी मौलिक सिध्दांत मांडणारा सु...
सुप्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ, साकलिक अर्थशास...
सुप्रसिद्ध इंग्रज समाजसुधारक आणि अर्थशास्त्रज्ञ. ल...