অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ऑइगेन फोन बंबाव्हेर्क

ऑइगेन फोन बंबाव्हेर्क

ऑइगेन फोन बंबाव्हेर्कऑइगेन फोन बंबाव्हेर्क : (१२ फेब्रुवारी १८५१–१९१४). भांडवल व व्याज यांविषयी मौलिक सिध्दांत मांडणारा सुप्रसिध्द ऑस्ट्रियन अर्थशास्त्रज्ञ. ऑस्ट्रियातील बुन-आम-गबिर्गा येथे जन्म. त्याचे वडील मोरेव्हीया प्रातांचे उपराज्यपाल होते. व्हिएन्ना विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतल्यानंतर काही काळ त्याने शासकीय नोकरी केली. १८८१ ते १८८९ या काळात इन्सब्रुक विद्यापीठात अर्थशास्त्राचे अध्यापन केल्यानंतर, ऑस्ट्रियाच्या शासकीय सेवेत प्रत्यक्ष-करांची योजना तयार करण्याचे कार्य त्याने केले. १८९५, १८९७ व १९०० अशा तीन वेळा ऑस्ट्रियाचे अर्थमंत्रिपद बंबाव्हेर्कने भूषविले. पक्षातीत राहून ऑस्ट्रियाला आर्थिक स्थैर्य व संपन्नता प्राप्त करवून देण्यात त्याने महत्त्वाचा वाटा उचलला.मार्क्सवादी मूल्यसिध्दांतावरील कार्ल मार्क्स अँड द क्लोज ऑफ हिज सिस्टम हा त्याचा टीकात्मक लेख गाजला.

१९०५ नंतरचे उर्वरित आयुष्य त्याने व्हिएन्ना विद्यापीठात अर्थशास्त्राचे अध्यापन, अध्ययन व ग्रंथरचना  यात घालविले. आपले गुरू, प्रख्यात ऑस्ट्रियन अर्थशास्त्रज्ञ कालै मेंगर (१८४०–१९२१) यांच्या उपयुक्तता सिध्दांताला परिपूर्ण रूप देण्याचा बंबाव्हेर्कने प्रयत्न केला. मेंगरच्या प्रतिपादनात अनुपस्थित असलेला व्याजसिध्दांत म्हणजे बंबाव्हेर्कच्या मते भांडवलशाही समजून घेण्याची गुरूकिल्ली. कोणत्याही व्यक्तीची भांडवलविषयक विचारसरणी ही व्याज व नफा यांबाबतच्या तिच्या मतांवरून कळून येते, अशी बंबाव्हेर्कची धारणा होती. भांडवलशाहीचे स्वरूप हे तिच्या अंगभूत ध्येय उद्दिष्टांशी सुसंगत असल्याने ती सर्वोत्तम व्यवस्था असल्याचेही त्याचे मत होते. बंबाव्हेर्कच्या लिखाणावर विल्यम स्टॅन्ली जेव्हन्झ (१८३५-८२) व जॉन रे (१७९६-१८७२) यांच्या विचारांची छाप होती. मूल्यसिध्दांत, किंमत, उत्पादन काळ व संभाव्य वस्तूंमधील कसर ह्याबाबतच्या मेंगरप्रणीत विचारांच्या आधारे बंबाव्हेर्कने आपले सिध्दांत मांडले.

बंबाव्हेर्कच्या मौलिक कल्पना व भांडवलदारी पध्दतीच्या विवेचनाची वैचारिक बीजे, व्हेदर लीगल राइटस अँड रिलेशनशिप्स आर इकॉनॉमिक गुडस् या त्याच्या १८८१ च्या पुस्तकेत आढळतात. बंबाव्हेर्कला यामुळेच व्हिएन्ना विद्यापीठातील अध्यापकपद मिळाले. १८८६ मध्ये त्याने ‘द स्कूल’ (इ .शी.) हा निबंध लिहून ऑस्ट्रियन संप्रदायाचा मुख्य प्रवर्तक व समर्थक म्हणून आपले स्थान निश्चित केले. कॅपिटल अँड इंटरेस्ट (१८८४-१९१२) या आपल्या त्रिखंडात्मक ग्रंथात भांडवल व व्याज यासंबंधीच्या प्रत्येक सिध्दांताचे अंतरंग त्याने शास्त्रीय चिकित्सेद्वारे विशद केले.

भांडवलदार, कामगार व जमीनदार हे तिन्ही वर्ग कोणत्याही अर्थव्यवस्थेला आवश्यक असले, तरी भूमी व श्रम हे उत्पादनांच मुख्य घटक असून त्यांपासून अनुक्रमे खंड व वेतन यांची निर्मिती होते. वेतन व खंड यांचे आकलन मूल्यसिध्दांताद्वारे होते. नफा व व्याज हे बाह्य घटकांपासून उद्भवतात. या महत्त्वाच्या कल्पना बंबाव्हेर्कने मांडल्या. नफा हा व्यवसायाच्या अपूर्णत्वामुळे उदभवतो. तर व्याज हे ‘काळ’ या तत्वापासून उद्भवते .त्याचा ‘समय प्राधान्य सिध्दांत’ अर्थशास्त्रात मोलाची भर घालणारा ठरला.

बचत करणे म्हणजे आजचा उपभोग उद्यावर ढकलणे. मनुष्य भविष्यकाळाचे अधोमूल्यन करीत असतो. भविष्यकालीन वस्तूंचे मूल्य वर्तमानकालीन वस्तूंच्या मूल्यापेक्षा कमी वाटणे ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे. वर्तमानकाळातील उपभोग भविष्यकाळात घेण्याबद्दल उपभोक्त्याला द्यावा लागणारा वट्टा अथवा कसर म्हणजे व्याज होय अशी व्याजाबाबतची कल्पना बंबाव्हेर्कने मांडली. व्याजासंबंधीची कल्पना मेंगरच्या कल्पनेहून भिन्न होती. व्याजाकडे सूक्ष्मलक्षी दृष्टीने, व्यक्तिगत भांडवलदाराच्या अर्थरचनेतील एक घटक म्हणून पहिले, तर अधिक्य निर्माण होत नसल्याचा भार होतो. कारण त्या ठिकाणी वस्तूची किंमत ही खंड व वेदन समाविष्ट असलेल्या उत्पादन परिव्ययाबरोबर असते; परतु समग्रलक्षी दृष्टीने एकूण भांडवलदार वर्गाला निश्चितपणे निव्वळ वाढाव्याची प्रगती होते.

‘बंबाव्हेर्क हा मध्यम वर्गाचा (व्यापार उदीम करणांरांचा) मार्क्स होता’, असे शुंपेटर ह्यांनी म्हटले आहे; परंतु मार्क्सप्रमाणेच बंबाव्हेर्कच्या विचारांतही अनेक दोष आढळतात. चलांमधील कार्यिक संबंध विशद करण्यात आणि कारणे व त्यांचे परिणाम यांच्यातील भेद स्पष्ट करण्यात आलेले अपयश; असंख्य बदल (इन्फिनिटेसिमल चंज) व अमूर्त संख्यामध्ये होणारे बदल (शिप्टस इन डिस्क्रीट क्वाँटिटीज) यांत त्याने केलेली गल्लत, आपल्या सिध्दांताली तर्कशास्त्रीय संभाव्यता ओळखण्यातील अपयश, ही दोषस्थळे उदाहरणादाखल सांगता येतील.

बंबाव्हेर्कच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रियन संप्रदायाने अर्थशास्त्राला विश्लेषणात्मक शास्त्राचा दर्जा मिळवून दिला. भांडवल हे खरोखरीच लाभदायक (आवश्यक) आहे काय, स्थायवर जंगम मालमत्ता ही न्याय्य आहे काय, शोषणात व्याजाचा उगम होतो हे खरे आहे काय किंवा भांडवलशाहीत वर्गकलह अटळ असतोच का? यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नाची मूलभूत उत्तरे शोधण्याचे कार्य बंबाव्हर्कने केले. ‘काळ’ तत्त्वावर त्याने दिलेला भर ही त्याची महत्त्वपूर्ण कामगिरी मानली जाते. समाजवादी अर्थव्यवस्थेतही व्याजाचा उगम होऊ शकतो. ही त्याची कल्पना उपयुक्त ठरली. नट विकसेलचा भांडवल-सिध्दांत व लेआँ व्हालरा याचा समतोल सिद्धांत यांच्या समन्वयात बंबाव्हेर्कचा प्रभाव प्रकर्षाने दिसून येतो.

 

लेखक - वि. रा. गद्रे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate