অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रोझा लुक्संबुर्ख

रोझा लुक्संबुर्ख

रोझा लुक्संबुर्खरोझा लुक्संबुर्ख : (५ मार्च १८७१-१५ जानेवारी १९१९). पोलिश क्रांतिकारक आणि जर्मनीतील कम्युनिस्ट पक्षाची एक प्रमुख संस्थापक. तिचा जन्म मध्यमवर्गीय ज्यू कुटुंबात पोलंडमधील झामॉश्च या रशियाव्याप्त गावी झाला. लहानपणापासून ती अशक्त व पंगू होती; वॉर्सा येथील कन्याशाळेत तिने सुरुवातीचे शिक्षण घेतले. विद्यार्थिदशेतच भूमिगत चळवळ करणाऱ्या काही गुप्तसंघटनांनी तिचे लक्ष वेधले.त्या काळी फक्त झुरिक येथेच स्त्रियांना विद्यापीठात प्रवेश मिळत असल्याने तिने त्या विद्यापीठात (स्वित्झर्लंड) प्रवेश घेतला (१८८९). तेथे तिने १८८९-९८ दरम्यान संशोधन करून ‘द इंडस्ट्रियल डेव्हलपमेन्ट ऑफ पोलंड’ हा प्रबंध सादर केला आणि डी. लिट्. ही पदवी मिळविली (१८९८). त्यानंतर ती जर्मनीमध्ये गेली आणि सोशल डेमॉक्रॅटिक पक्षाचे कार्य तिने अंगीकारले. तिने गुस्टॉव्ह ल्युबेक याबरोबर काल्पनिक लग्नाचा घाट घालून तेथील नागरिकत्वही मिळविले. कार्ल कौटस्की याच्यासमवेत ती एस्. पी. डी. पक्षाच्या दुरुस्तीवादासंबंधीच्या वादविवादात सामील झाली. अल्पकाळातच तिच्या नेतृत्वाची छाप आंतरराष्ट्रीय समाजवादी चळवळीवर पडली. ते दोघे एदुआर्त बेर्नश्टाईन या पक्षनेत्याच्या विरोधात उभे राहिले.

मार्क्सवाद कालबाह्य झाला असून समाजवाद रूढ होईल, असे एदुआर्तचे मत होते. तिने एदुआर्तच्या उपपत्तीचे खंडन सोशल रिफॉर्म ऑर रेव्हलूशन या पुस्तिकेद्वारे केले.याशिवाय तिने समाजवादी वृत्तपत्रांतून बेर्नश्टाईनवर टीका करणारे लेख लिहिले. एक व्युत्पन्न वादविवादपटू म्हणून तिचा सर्वत्र नावलौकिक झाला. १९०५ च्या रशियन क्रांतीत सहभागी होण्यासाठी ती पुन्हा वॉर्साला गेली. तेथे तिला काही काळ तुरुंगात टाकले. तेथील अनुभवातून तिने द मास स्ट्राइक व द पोलिटिकल पार्टी अँड ट्रेड युनिअन्स (इं. भा. १९०६) हे ग्रंथ लिहिले. त्यानंतर ती पुन्हा बर्लिनला आली आणि तेथे तिने सोशल डेमॉक्रॅटिक पक्षाच्या विद्यालयात शिक्षिकेचा पेशा पतकरला (१९०७-१४). या काळात मार्क्सवादाविषयी तिने सखोल अभ्यास व चिंतन केले. त्यातून तिची सामूहिक कृतीविषयीची सैद्धांन्तिक विचारप्रणाली तयार झाली.

पहिल्या महायुद्धकाळात (१९१४-१८) सोशल डेमॉक्रॅटिक पक्षाने शासनाच्या धोरणास पाठिंबा दर्शविला, तेव्हा तिने पक्षत्याग करून जर्मनीच्या युद्धविषयक धोरणावर टीका केली आणि कार्ल लिप्कनेख्ट याच्याबरोबर कामगारांना सरकारविरोधी धोरणास चेतविले. यासाठी तिने लिप्कनेख्टच्या मदतीने स्पार्टाकस लीग ही क्रांतिकारक संघटना स्थापन केली. या संघटनेतून पुढे जर्मन कम्युनिस्ट पक्ष उदयास आला. त्याच्या रोटफान या मुखपत्राचे ती संपादन करू लागली. तिच्या क्रांतिकारक कारवायांमुळे तिला पुन्हा तुरुंगात टाकले. तरीसुद्धा तिने द क्रायसिस इन द जर्मन सोशल डेमॉक्रॅसी (इं. भा.) आणि स्पार्टाकस लेटर्स (इं. भा.) ही दोन पुस्तके प्रसिद्ध केली. कारावासातून बाहेर आल्यावर नाइलाजाने ती या स्पार्टासिस्ट चळवळीत पुन्हा सहभागी झाली (जानेवारी १९१९). तिला व लिप्कनेख्ट यांना पकडण्यात आले. दोघांना तुरुंगाकडे नेत असताना सैनिकांनी ठार केले.

रोझा लुक्संबुर्ख तिच्या क्रांतिकारक कारवायांमुळे तिला पुन्हा तुरुंगात टाकले. तरीसुद्धा तिने द क्रायसिस इन द जर्मन सोशल डेमॉक्रॅसी (इं. भा.) आणि स्पार्टाकस लेटर्स (इं. भा.) ही दोन पुस्तके प्रसिद्ध केली. कारावासातून बाहेर आल्यावर नाइलाजाने ती या स्पार्टासिस्ट चळवळीत पुन्हा सहभागी झाली (जानेवारी १९१९). तिला व लिप्कनेख्ट यांना पकडण्यात आले. दोघांना तुरुंगाकडे नेत असताना सैनिकांनी ठार केले.

रोझाचा पिंड क्रांतिकारकाचा असला, तरीत्याला एक तात्त्विक बैठक होती. मार्क्सच्या भांडवलशाहीसंबंधीच्या विचारात तिने आधुनिक साम्राज्यवादाचा विस्तार लक्षात घेऊन काही फेरफार सुचविले. ॲक्युम्युलेशन ऑफ कॅपिटल (इं. भा. १९१३) या ग्रंथात तिने आधुनिक साम्राज्यवादाचे अस्तित्व जोपर्यंत आहे, तोपर्यंत भांडवलशाही अस्तित्वात राहणार आणि जेथे जेथे साम्राज्यवाद जाईल, तेथे ती निर्माण होणार, असे प्रतिपादन केले; मात्र तिच्या या उपपत्तीत जनसमूहाच्या संभाव्य क्रांतिकारक ऊर्जेचे महत्व प्रतिपादन केले आहे. तिला लेनिनची पक्षरचना अमान्य होती. त्याऐवजी पक्षांतर्गत लोकशाही व तीत लोकांचा सहभाग असावा, असे तिचे मत होते. म्हणूनच तिने बोल्शेव्हिक हुकूमशाहीस विरोध केला, पण त्याबरोबरच रशियाप्रमाणे सोव्हिएट सदृश मंडले जर्मनीत स्थापन व्हावीत आणि त्यांचे शासन यावे, या मताची ती होती. खुद्द लेनिनच्या काळात स्वतंत्रपणे विचार मांडणारी विदुषी म्हणून तिचे कम्युनिस्ट चळवळीतील स्थान महत्त्वाचे आहे. अलीकडे तिला दुरुस्तीवादी विचारवंत मानत नाहीत; कारण लेनिनशी तिचे असलेले मतभेद मूलभूत स्वरूपाचे नव्हते व पक्षाने क्रांतीचे नेतृत्व करण्याच्या भूमिकेला तिचा मूलतः पाठिंबा होता, असे मानण्याकडे अभ्यासकांचा कल दिसतो.

 

संदर्भ : 1. Basso, Le Lio, Rosa Luxemburg, New York, 1975.

2. Geras, Norman, The Legacy of Rosa Luxemburg, New Jersey, 1976.

लेखक - सु. र. देशपांडे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate