অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ओब

ओब

ओब

(ओबी). पश्चिम सायबीरियातील प्रमुख नदी. बीया व काटून या अल्ताई पर्वतावरून येणाऱ्या नद्यांच्या व्यीस्क येथील संगमापासून समुद्रापर्यंतच्या सु. ३,६६० किमी. लांबीच्या नदीस ओब म्हणतात. काटूनसह लांबी ३,९९० किमी.; इर्तिश या प्रमुख उपनदीसह लांबी ७,५३८ किमी. जलबाहनक्षेत्र सु. २९,४०,६०० चौ. किमी. त्यापैकी सू. १५% क्षेत्र अंतर्गत जलवाहनाचे आहे. व्यीस्कपासून बर्नऊलपर्यंत ओब वाळूच्या व दगडगोट्यांच्या बांधांच्या प्रदेशातून अनेक प्रवाहांनी वाहते. तेथून सामान्यत: वायव्येकडे ती कॅम्येनवरून नोव्होसिबिर्स्क जलाशयातून, समृद्ध शेतीप्रदेशातून, नोव्होसिबिर्स्कपर्यंत जाते. ओबवर दुसरा एक मोठा बंधारा १९६२ नंतर कॅम्येन-ना-ओबी येथे बांधला आहे. नोव्होसिबिर्स्क या सायबीरियाच्या सर्वांत मोठ्या शहराजवळ ट्रान्ससायबीरियन रेल्वे ओबला ओलांडून जाते. येथे अल्ताईच्या उपत्यकेचा प्रदेश संपतो व ओब विस्तीर्ण, सपाट, मैदानी प्रदेशात येते. येथून टॉम्स्क प्रांतातील दलदली अरण्यातून काल्पशॉव्ह, नरिन व सुर्गूटवरून अनेक नागमोडी वळणे, असंख्य उपप्रवाह, नालाकृती सरोवरे यांतून, विस्तीर्ण पूरमैदानातून, ती वायव्येकडे व पश्चिमेकडे जाऊन खँटिमॅन्सिस्कला येते. तेथे तिला तिची सर्वांत महत्त्वाची, सु. ४,२२४ किमी. लांबीची इर्तिश ही उपनदी मिळते. या भागात ओबचे पात्र सु. ३ किमी. पेक्षा जास्त रुंद आहे. नंतर ओबचे अनेक फाटे होऊन ती कंडीन्स्क्‌या, कूशिवात, सल्येखार्त व अस्कार्कावरून जाऊन ओबच्या आखातास मिळते. ओबचे आखात म्हणजे ८०० किमी. लांबीचा व ८० किमी. रुंदीचा ओबच्या खालच्या टप्प्याचा कारा समुद्रात बुडलेला भागच होय, ओबचे खोरे इतके सपाट आहे की टॉम संगमानंतर उतार फक्त ४०,००० मध्ये एक एवढाच आहे; म्हणून नदी अत्यंत संथ वाहते. ओबला उजवीकडून टॉम, चूलिम, केट, व्हाख व कझिम आणि डावीकडून व्हस्यूगान, इर्तिश, कंडा व उत्तर सस्वा या प्रमुख उपनद्या मिळतात. ओबमधून सरासरी दर सेकंदाला १२,२९३ घ. मी. पाणी समुद्रात जाते. सल्येखार्त येथे जास्तीत जास्त दर सेकंदास ३६,५७५ घ. मी. व कमीत कमी २, २४९ घ. मी. पाणी वाहते. नोव्हेंबर ते एप्रिल नदी गोठलेली असते.

एप्रिलअखेरीस बर्फ वितळू लागते व बर्फखंड जागोजाग अडकतात आणि पूर येतात. नदी वाहत असते तेव्हा जलमार्ग म्हणून उपयोगी पडते. ट्रॉन्ससायबीरियन रेल्वे होईपर्यंत पश्चिम सायबीरिया ओलांडण्यास ओब-इर्तिश हा जलमार्गच फक्त होता. हा जलमार्ग सु. ४,२७० किमी. आहे. त्यावरून धान्य, दुभत्याचे पदार्थ, गुरेढोरे, लोकर, मांस यांची वाहतूक होते. ओब स्टेपचा गवताळ प्रदेश, समशीतोष्ण कटिबंधातील पानझडी वृक्षांची अरण्ये, तैगाची सूचिपर्णी वृक्षांची अरण्ये व टंड्रा या नैसर्गिक विभागांतून वाहत जाते. त्यामुळे तिच्या खोऱ्यात शेती, पशुपालन, जंगलव्यवसाय, रेनडियर पाळणे, वाहतूक इ.व्यवसाय चालतात.


कुमठेकर, ज. ब.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/10/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate