অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

टेम्स

टेम्स टॅमेसिस, टॅमेसा

लंडनमधून वाहणारी इंग्लंडची प्रमुख नदी. लांबी ३३८ किमी.; जलवाहन क्षेत्र १३,६५० चौ. किमी. ग्लॉस्टरशर परगण्यातील कॉट्सवोल्ड टेकड्यांत टेम्सहेड व सेव्हनस्प्रिंग्ज येथे चर्न आणि आयसिस प्रवाहांनी उगम पावून नऊ परगण्यांच्या सीमांवरून सामान्यतः पूर्वेकडे वाहत जाऊन द नॉअर या टेम्स खाडीतील वालुकाभित्तीजवळ ती उत्तर समुद्राला मिळते.

गॉरिंग गॅप खिंडीतून टेकड्यांची रांग भेदून ती ऑक्सफर्डला येते. तिच्यावरील उतारांच्या ठिकाणी ऑक्सफर्ड, ॲबिंग्डन, वॉलिंगफर्ड, रेडिंग, मार्लो, मेडनहेड, विंझर, स्टेन्झ, किंग्स्टन आणि शेवटी लंडन ही शहरे वसलेली आहेत.टेम्सच्या खोऱ्यात जुरासिक, मेसोझोइक, इओसीन काळांतील वाळू, माती, चुनखडक आणि हिमयुगानंतरचे वाळू व खडे यांचे थर आढळतात.

दोन लक्ष वर्षांपूर्वीची एका मुलीची कवटी, नवपाषाण युगातील भांडी, इतिहासपूर्व प्राचीन काळातील प्राण्यांचे अवशेष इ. महत्त्वाच्या वस्तू या खोऱ्यात सापडल्या आहेत. यूरोपातून आलेले लोक टेम्सच्या मुखातून इंग्लंडच्या अंतर्भागात जात. कोल्न, विंडरश, ईव्हनलोड, चार्वेल, टेम, केनेट, वे, मेडवे या टेम्सच्या प्रमुख उपनद्या होत.

टेम्स संथ नदी असून लंडनपर्यत ती एक विहारसरिताच आहे. तिच्या काठचे सृष्टिसौंदर्य प्रेक्षणीय असून हेन्ली, ऑक्सफर्ड व केंब्रिज येथे होणाऱ्‍या वार्षिक नौकास्पर्धा प्रसिद्ध आहेत. मुखापासून १०६ किमी. टेडिंग्टनपर्यंत भरतीचे पाणी येते. त्याच्या वरच्या बाजूस ४५ जलपाश बांधल्यामुळे लेचलेडपर्यंत ‘बार्ज’ नौका जाऊ शकतात.

लंडनपासून पुढे टेम्सवर अनेक गोद्या, कोठारे व शीतगृहे बांधलेली आहेत. दलदली बुजवून तेथे कारखाने व औद्योगिक इमारती उभ्या आहेत. टिलबरीला सागरागामी जहाजे येतात. टेम्सची रुंदी ऑक्सफर्डला ४६ मी., टेडिंग्टनला ७६ मी., लंडनब्रिजजवळ २४४ मी., ग्रेव्हर्झेडला ६४२ मी. व नोअरजवळ ८·८ किमी. आहे.

नदी ओलांडण्यासाठी सडकांचे व लोहमार्गाचे अनेक पूल व नदीखालून बोगदेही आहेत. उगमापासून टेडिंग्टनपर्यंत टेम्सचे नौकानयन, पाणीवापर, प्रदूषण, मासेमारी, पूरनियंत्रण, जहाजांची नोंद, प्रवाहमापन, संरक्षण इ. नियंत्रण १८५७ पासून ‘टेम्स कॉन्झर्व्हन्सी बोर्डा’कडे आहे.

एकोणिसाव्या शतकात नदीला गटाराचे स्वरूप आले होते. १९६३ पासून प्रदूषणाविरुद्ध कडक उपया योजिले जात आहेत. टेडिंग्टनच्या खालील भागाचे नियंत्रण १९०९ पासून ‘पोर्ट ऑफ लंडन ऑथॉरिटी’कडे आहे.

लंडनचा ६८% पाणी पुरवठा टेम्स करते. ग्रँड जंक्शन व ग्रँड युनियन कालव्यांनी मिडलँडमधील कारखानदारीची शहरे जोडली आहेत. लंडनच्या टॉवर ब्रिजपासून समुद्रापर्यंतची टेम्स नदी ही जगातील एक महत्त्वाचा व्यापारोपयोगी जलमार्ग आहे.

 

यार्दी, ह. व्यं.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate