অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ल्येझ

ल्येझ

ल्येझ

बेल्जियममधील लोकसंख्येने तिसऱ्या क्रमांकाचे शहर, व्यापारी बंदर आणि सांस्कृतिक केंद्र. ल्येज्ञ प्रांताच्या राजधानीचे हे ठिकाण जर्मन सीमेजवळ असून म्यूज व ऊर्त ह्या नद्यांच्या संगमावर, ब्रूसेल्सच्या आग्नेयीस सु. ८८ किमी. वर वसले आहे. लोकसंख्या हेर्स्टाल, उग्रे आणि ग्रीव्हन्ये या उपनगरांसह १०,०५,९०० व शहर २,२०,२०० (१९८०).

हाव्या शतकात येथे एक चर्च स्थापण्यात आले. त्याच्याभोवती वसती होऊन ल्येझ अस्तित्वात आले आणि पवित्र रोमन साम्राज्याचा ते एक भाग बनले. था साम्राज्याचा अंमल पुढे १७९२ पर्यंत होता. या काळात ल्येझला अनेक वेढ्यांना आणि परकीय हल्ल्यांना तोंड द्यावे लागले. येथील नागरिकांनी चर्चच्या सत्तेविरुद्ध अनेक उठाव केले. कामगारांनी संघटित होऊन सधन व्यापारी व सरदार ह्यांकडून काही सवलती मिळविल्या आणि नगराच्या शासनात भाग घेण्यास प्रारंभ केला.

बिशपवर्गाचे कार्य बावीस लोकांच्या कार्यकारिणीकडे सुपूर्त करण्यात आले (१३७३). त्यांपैकी चौदा लोक नगरवासी सदस्य होते. हा कारभार काही तुरळक अडथळे सोडता १७९२ पर्यंत टिकून होता. त्यांच्या कारकीर्दीत बर्गंडीच्या चार्ल्स द बोल्डने १४६८ मध्ये ते उद्ध्वस्त केले. प्रिन्स बिशप एव्हरार द ला मार्कच्या नेतृत्वाखाली येथे शस्त्रास्त्रांची निर्मिती होऊ लागली (सोळावे शतक). १७९४ मध्ये ते फ्रेंच क्रांतिकारकांनी घेतले व पुढे १८१५ मध्ये ते नेदर्लंड्सला जोडण्यात आले. १८३० च्या यूरोपीय क्रांतीत ल्येझच्या नागरिकांनी भाग घेतला आणि १८३९ च्या बेल्जियमच्या स्वातंत्र्याबरोबर (बेल्जियम नेदर्लड्सपासून विभक्त झाले) ते बेल्जियम मध्ये समाविष्ट झाले.

ल्येझ हे भक्कम तटबंदीयुक्त आहे. त्यामुळे सर्व यूरोपीय सत्तांचा त्यावर डोळा असे. पहिल्या महायुद्धात जर्मनीने बारा दिवसांच्या वेढ्यानंतर अल्पकाळ पादाक्रांत केले व तेथील वास्तूंची मोडतोड केली. दुसऱ्या महायुद्धात पुन्हा जर्मनीने मे १९४० मध्ये ते घेतले व मे १९४४ मध्ये  अमेरिकेने ते जर्मनीकडून मुक्त केले; तथापि ‘फुगवट्याच्या लढाईत’ (बॅटल ऑफ द बल्ज-डिसेंबर १९४४ ते जानेवरी १९४५) जर्मन अग्निबाणांनी त्याचे नुकसान केले. पुढे ते बेल्जियमच्या आधिपत्याखाली आले. तरीसुद्धा १९५०-७० यांदरभ्यान तेथे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांत अशांतता होती.

ध्याचे ल्येझ आधुनिक सुखसोयींनी सुसज्ज असून ॲल्बर्ट कालव्यामुळे ते जलमार्गाने अँटवर्प बंदराशी तसेच लोहमार्ग व रस्ते ह्यांनी देशातील इतर शहरांशी व जर्मनीशी जोडलेले आहे. ल्येझ प्रांतातील दगडी कोळशाच्या खाणीमुळे येथे टाचणीपासून मोठ्या यंत्रापर्यंतच्या सर्व वस्तूंचे-मोटारी, वाफेची यंत्रे तसेच शस्त्रास्त्रे, रबर, काचसामान, कागद तयार करणे-कारखाने आहेत. दारू गाळणे, वस्त्रनिर्मिती, कातडो कमावणे हे उद्योगही येथे चालतात.

शहरातील प्रेक्षणीय वास्तूंत सेंट डेनिसचे चर्च (१० वे शतक), सेंट पॉल कॅथीड्रल (स्था. ९७१), दोन कलासंग्रहालये व एक पुरातत्त्वीय संग्रहालय, गॉथिक राजवाडा, विद्यापीठ (स्था. १८१६) व नगरभवन ह्यांचा समावेश होतो. आंद्रे अर्नेस्ट ग्रेट्री व सेझार फ्रांक हे ख्यातनाम संगीतकार, ग्रॅम झेनोब हा शास्त्रज्ञ व यूजीन-ऑग्युस्त ईझाई हा व्हायलिनवादक यांची ती जन्मभूमी आहे. बेल्जियममधील सर्वाधिक फ्रेंच भाषिक येथे आढळतात.


देशपांडे, सु. र.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate