बल्गेरियाच्या ईशान्य भागातील एक औद्योगिक शहर, आंतरराष्ट्रीय विश्रामधाम व काळ्या समुद्रावरील बारमाही बंदर. ते देशातील तिसऱ्या क्रमांकाचे नगर असून त्याच नावाच्या जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण आहे.
लोकसंख्या ३,०६,३०० (१९८९). हे वार्ना उपसागराच्या उत्तर किनाऱ्यावर नॉव्हग्राडेत्सच्या आग्नेयीस सु. ४३ किमी. वर वसले आहे. दुतर्फा वृक्षांच्या रांगांनी नटलेले रुंद रेखीव मार्ग, निसर्गरम्य पुळणी व उद्याने, आल्हाददायक हवामान आणि खनिजोदक झरे यांमुळे ते पर्यटकांचे आकर्षण बनले आहे.
वार्नाचा अतिप्राचीन इतिहास ज्ञात नाही. ग्रीकांनी येथे ओडेसस नावाची वसाहत इ. स. पू. ५८० मध्ये स्थापन केली. इ. स. पहिल्या शतकात ते रोमनांनी घेतले. त्यानंतर वायझंटिन सम्राट चौथा कॉन्स्टंटीन व बल्गेरियन स्थानिक राजे यांत युद्ध होऊन कॉन्स्टंटीनचा पराभव झाला (इ. स. ६७९). बल्गेरियन राजा क्रम (कार. ८०२-१४) आणि सिमेऑन (कार. ८९३-९२७) यांच्या कारकीर्दींत नगराचा विकास झाला.
१०१९ ते ११८५ या काळात बल्गेरियावर बायझंटिनांचा अंमल होता. त्यानंतर बल्गेरियनांनी पुन्हा त्यावर सत्ता प्रस्थापित केली. या दुसऱ्या कालखंडात (११८६-१३९६) पहिला ईव्हान आसेन (कार. ११९०-९५) व दुसरा ईव्हान आसेन (कार. १२१८ - ४१) यांच्या कारकीर्दींत शहराचा विकास झाला आणि व्यापार वाढला; परंतु बल्गेरियनांना बाजूला सारून ऑटोमन सुलतानांनी तेथे सत्ता मिळविली (१३९१) ; तुर्की सुलतान दुसरा मुराद आणि हंगेरी-पोलंडचा राजा तिसरा लॅडिस्लॉस यांमध्ये १० नोव्हेंबर १४४४ रोजी निर्णायक धर्मयुद्ध होऊन त्यात लॅडिस्लॉस मारला गेला.
ख्रिस्ती यूरोपीयांचा तुर्की साम्राज्याला शह देण्याचा हा प्रयत्न अखेरचा ठरला. दुर्बल तुर्कांना बाजूला सारून रशियाने १८२८ मध्ये वार्ना घेतले; परंतु अल्पकाळातच तुर्कस्तानने त्यावर आपला अंमल बसविला. क्रिमियाच्या युद्धात (१८५४-५६) इंग्रज-फ्रेंचांनी येथे नाविक तळ केला (१८५४). १८७८ मध्ये वार्ना तुर्कस्तानच्या वर्चस्वातून मुक्त करण्यात यूरोपीय राष्ट्रांना यश आले आणि बर्लिनच्या तहानुसार ते नवनिर्मित स्वायत्त बल्गेरियात समाविष्ट करण्यात आले. १९४९-५७ दरम्यान याचे नाव स्टालिन ठेवण्यात आले होते.
वार्ना हे लोहमार्ग, रस्ते, हवाईमार्ग यांनी देशातील प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. १८६६ मध्ये रूसे-वार्ना रेल्वेमार्ग झाला व १८९९ मध्ये ते लोहमार्गाने सोफियाशी जोडण्यात आले. १९०६ मध्ये वार्नाच्या आधुनिक बंदराची बांधणी पूर्ण झाली. येथील बंदरात मोठ्या बोटी धक्क्यापर्यंत येतात. त्यामुळे देशातील अर्धाअधिक सागरी व्यापार येथून होतो. डबाबंद मांस, प्रक्रियित अन्न-धान्ये यांची या बंदरातून निर्यात होते.
शहरात देशातील सर्वांत मोठ्या कापड गिरण्यांपैकी एक मोठी गिरणी आहे. याशिवाय जहाजबांधणी उद्योग आणि डिझेल यंत्रनिर्मितिउद्योगही आहेत. जिल्ह्यात फलोद्याने, विशेषतः द्राक्षबागा, आहेत. त्यांपासून स्थानिक पातळीवर मद्य निर्मितिउद्योग चालतो. शहरात विद्यापीठ, नाविक अकादमी व उच्च तांत्रिक शिक्षणसंस्था आहेत.
बल्गेरियन नौसेनेचा तळही येथेच आहे. यांशिवाय शहरात महासागरविज्ञान आणि मत्स्योद्योग यांच्या संशोधन संस्था आहेत. येथील पुरातत्त्वीय संग्रहालयासह प्रेक्षागृह, ऑपेरा हाउस आणि कलावीथी यांतून बल्गेरियन संस्कृतीचे दर्शन घडते. बॅसिलिका व बायझंटिन किल्ला हे प्राचीन संस्कृतीचे प्रेक्षणीय अवशेष आहेत.
देशपांडे, सु. र.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/1/2020
फीओडोशिया : प्राचीन थीओडोशिया. रशियाच्या युक्रेन स...