অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चाळीसगावातील ऐतिहासिक व निसर्गसंपन्न पर्यटन

चाळीसगावातील ऐतिहासिक व निसर्गसंपन्न पर्यटन

आजच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणावापासून मुक्ती मिळण्याचे साधन म्हणजे भटकंती करणे आणि निसर्गाशी संवाद साधणे. चार वेगवेगळी ठिकाणे पाहिल्याने नवीन गोष्टी कळतात, नवीन माहिती मिळत जाते. आपली समज, संवेदना वाढीस लागतात म्हणूनच आपला प्राचीन इतिहास जाणून घेण्याबरोबरच पर्यटनाचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी या धार्मिकस्थळाला आजही लोक मोठ्या संख्येने भेट देतात.

या ठिकाणी असलेल्या गौताळा अभयारण्याची स्थापना 1986 साली झाली. पर्यावरण व निसर्गप्रमींना आनंददायी, आल्हाददायक असा परिसर या अभयारण्यात अनुभवास मिळतो. पावसाळ्यात हिरवाईने नटलेला परिसर, पक्षांचे आवाज मनाला प्रसन्न करुन टाकतात. हा परिसर पर्यटनासोबत अध्यात्मिक आनंदही देतो. चाळीसगाव... सुख संपन्नता, विद्वत्तेचा समृद्ध वारसा लाभलेले, महर्षी वाल्मिकींचे, जगविख्यात चित्रकार केकी मुस यांचे गाव. चित्रकार केकी मूस यांचे हे कलासंग्रहालय पाहण्यासारखे आहे. टेबल टॉप फोटोग्राफीचे जनक म्हणूनही ओळख असलेल्या केकी.

मुस तथा बाबूजींच्या पुण्यतिथी दिवशी सर्वधर्म प्रार्थनेचे आयोजन केले जाते. अशा किती तरी वैशिष्ट्यांनी नटलेल्या चाळीसगावला हिंदू -मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेला बामोशी बाबांचा दर्गा, गौताळा अभयारण्य, अध्यात्मिक श्री. क्षेत्र ऋषीपांथा, वालझरी येथील वाल्मिक ऋषींचे मंदिर, महादेव मंदिर, वाघळीचे प्राचीन मुधाईमाता मंदिर तसेच बहाळ येथीलही भास्कराचार्य यांचे नातू चंगदेव यांची प्राचीन गढी आणि शिलालेखाचा उपजत वारसाही आहे. पाटण्यात चंडिकादेवीचे पुरातन मंदिर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी उंच चौथाऱ्यावर धवल तिर्थापासून उगम पावलेल्या डोंगरी नदीच्या किनारी आहे. मंदिराजवळचा परिसर अतिशय नयनरम्य आणि मनमोहक अशा निसर्गसौंदर्याने बहरलेला आहे. तिन्हीबाजूने अर्धचन्द्राकार सह्याद्री पर्वताचे उंच कडे, विविध वृक्ष, वनस्पती, डोंगरातून खळखळ वाहणारे ओढे यामुळे मन मोहून जाते.

भास्कराचार्य यांच्या लीलावती ग्रंथाबद्दलची माहिती असलेला शिलालेखही येथे आहे. पावसाळ्यात ऑगस्ट सप्टेंबरमध्ये येथील वातावरण मनाला प्रसन्न करणारे, शांत व आल्हाददायक असते. घनदाट जंगलातच पर्यटकांना मोहात टाकणारे केदारकुंड सर्वांनाच आकर्षित करते. येथूनच जवळ केदारेश्वर प्राचीन मंदिरही पाहण्यासारखे आहे. पावसाळ्यात उंच कड्यावरून कोसळणारा धवलतिर्थ धबधबा निसर्गप्रेमींना भुरळ घातल्याशिवाय राहत नाही, नागार्जुन गुंफा व सितान्हाणी या गुंफा तसेच नवव्या शतकात कोरलेल्या जैन लेण्या आहेत. या लेण्यांच्या पुढे सीतेची न्हाणी नावाची हिंदू लेणी आहे. ही लेणी प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झाल्याची येथील भाविकांची श्रद्धा आहे.

दक्षिणेतील पुरातन लेणी पितळखोरेसुद्धा याच ठिकाणी आहे. अशा विविधतेने नटलेल्या या तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या या उपक्रमासाठी आवश्यकता आहे ती राज्य शासनाच्या पर्यटन विभागाच्या सहकार्याची. बदलत्या जीवनशैलीमुळे विरंगुळा म्हणून अनेकजण वीकएंडला शांत आणि रम्य ठिकाणी पर्यटनास जाण्यासाठी पसंती देतात. त्यातूनच ॲग्रो टुरिझमचा उदय झाला आहे. धार्मिक, कृषी पर्यटनाचे व्यवस्थापनासाठी राज्य शासनामार्फत महाराष्ट्र व्हिजिट-2017 हे हेरीटेज धोरण तयार करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील पर्यटकांची संख्या वाढून रोजगार वाढावा यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे. जगातील 40 देशांची अर्थव्यवस्था पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसायाला मोठी संधी असतानाही दुर्लक्ष झाले आहे.

आगामी काळात पर्यटन व्यवसायाच्या वृध्दीतून रोजगार निर्मीतीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागणार असल्याने पर्यटन उद्योग वाढीसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यटन फ्रेंडली धोरण स्वीकारले आहे. साहित्य क्षेत्रात खान्देशातील कवयित्री बहिणाबाई, ज्येष्ठ कवी ना.धो.महानोर आणि नुकतेच ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले ख्यातनाम साहित्यिक भालचंद्र नेमाडे असो, प्रत्येक तालुक्याने आपले महत्त्व राज्यभरात अधोरेखित केले आहे. एकंदर नैसर्गिक, धार्मिक, सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारा हा तालुका आता, या नवीन संकल्पनेने पर्यटनाच्या दृष्टीने एक नवा अध्याय महाराष्ट्राच्या इतिहासात जोडला जाऊन पुनः एकदा राज्याच्या नकाशावर अधोरेखित होणार आहे. तो म्हणजे भास्कराचार्य मॅथ सिटीमुळे. अहमदाबादच्या सायन्स सिटीच्या धर्तीवर मॅथेमॅटिक्स सिटीचा प्रयोग अस्तित्वात आल्यास चाळीसगावच्या पर्यटनाला नवी भरारी मिळेल.

 

संकलन : मनोहर पाटील प्र.माहिती सहाय्यक,

उप माहिती कार्यालय, चाळीसगाव

स्त्रोत - महान्युज

 © 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate