অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पूर्व विदर्भातील भटकंती

पूर्व विदर्भातील भटकंती

विदर्भात निसर्गरम्य अशी अनेक ठिकाणे आहेत. या लेखातून आपण पूर्व विदर्भातील पर्यटनाबाबतची माहिती देणार आहोत. पूर्व विदर्भातील 'तलावांचा जिल्हा' म्हणून गोंदिया ओळखला जातो. तसेच या जिल्ह्याची 'धानाचे कोठार' म्हणून देखील ख्याती आहे. या जिल्ह्यातील धानाची शेती ही विशेषत्वाने ओळखली जाते ती विदेशात निर्यात होणाऱ्या उच्च प्रतीच्या तांदुळाकरिता!

हा जिल्हा वनराई व वन्यजिवांनी समृद्ध असून जिल्ह्यात नवेगावबांध - नागझिरा व्याघ्र प्रकल्प, हाजरा फॉल, चुलबंद, बोदलकसा, मांडोदेवी यासह अनेक पर्यटन व तीर्थस्थळे आहेत. या स्थळांची माहिती राज्यभर व्हावी व जास्तीतजास्त पर्यटक व वन्यजीवप्रेमी पर्यटनासाठी व सारस पक्ष्यांसह वन्यप्राण्यांना बघण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात यावे, याकरिता जिल्हा पर्यटन समितीने तयार केलेला ‘गोंदिया इसेन्स ऑफ इंडिया’ हा माहितीपट तयार करण्यात आलेला आहे.

गोंदियाचे विशेष आकर्षण म्हणजे इथले पक्षीवैभव! राज्यात केवळ गोंदियातच सारस पक्षी आढळून येतो. जिल्ह्यातील मालगुजारी तलावांवर येणाऱ्या स्थलांतरित व विदेशी पक्ष्यांवर जिल्हा माहिती कार्यालयाने ‘सारस वैभव गोंदियाचे’ हा वृत्तपट तयार केला आहे. यामध्ये सारस पक्ष्यांचे सौंदर्य, प्रेमाचे प्रतीक म्हणून दिलेली उपमा, ऐतिहासिक काळापासून आदिवासी बांधवांमध्ये सारस पक्ष्यांचे करण्यात येत असलेले पूजन, सारस महोत्सव, सारस संवर्धनासाठी उभी झालेली लोकचळवळ, पर्यटन आदींचे वर्णन करण्यात आले आहे.

मांडोदेवी

ह स्‍थळ गोरेगाव तालुक्‍यात आहे. गोंदिया पासून ३७ किमी अंतरावर असलेले हे ठिकाण भगवान सूर्यादेव, मांडोदेवी, टेकडीवरील शिव मंदीर अशा देवी-देवतांच्या मंदिरांमुळे पावन झाले आहे. उंच आणि हवेशीर अशा या ठिकाणी महाशिवरात्री, चैत्र नवरात्री व मकरसंक्रातीला यात्रा भरते. यावेळी महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ राज्यातील जवळपास १५,०००ते २०,००० पर्यंत भाविक या ठिकाणी येऊन पूजा अर्चना करतात. यावेळी प्रशासनामार्फत भाविकांची व्‍यवस्‍था केली जाते.

गोठणगाव

गोठणगावच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे भारतातून लोप पावत चाललेली एक अलीप्त अशी तिबेटी जमात! मंदिरासमोर हाताने मनीचक्र फिरविणारे निरागस तिबेटी बांधव.... तेवत रहाणारे मेणाचे लखलखते दिवे.... मानवतेचा संदेश देणारी भगवान गौतम बुद्धांची शांत प्रतिमा.... सारे काही निरामय! गोठणगावात राहण्याची काही व्यवस्था नाही मात्र तिथे जागोजाग बांधलेले मचाण फारच लोभसवाने! खास हिवाळ्यात आढळणाऱ्या सारस अर्थात क्रोंच पक्षाच्या दर्शनासाठी! नामशेष होत चाललेले हे क्रोन्च कदाचित आजही एखाद्या ऋषीची तपश्चर्या भंग करतील एवढे आसीम सुंदर!

नागझिरा वन्यजीव अभयारण्य

संस्कृत भाषेत नाग या शब्दाचा अर्थ हत्ती असाही आहे. फार पूर्वी या जंगलात हत्तींचे वास्तव्य जास्त असावे व त्यावरूनच 'नागझिरा' असे नाव या अभयारण्यास पडले असावे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या मधोमध असलेले नागझिरा अभयारण्य १५२.८१ चौ. कि. मी. क्षेत्रावर पसरलेले आहे. या अभयारण्याची विशेषत: म्हणजे यात विद्युत पुरवठा अजिबात नाही, हे जंगल नैसर्गिकच राखले गेलेले आहे. यात सुमारे २०० च्या जवळपास पक्षांची नोंद करण्यात आली आहे. इतर अभयारण्यांच्या मानाने छोट्या अशा अभयारण्यात वाघासमवेतच बिबळा, रानकुत्रा, लांडगा, अस्वल, रानगवा, रानडुक्कर, चौशिंगा, नीलगाय, चितळ, सांबर, काकर, रानमांजर, ऊदमांजर, ताडमांजर, उडणखार, सर्प गरुड, मत्स्य गरुड, टकाचोर, खाटीक, राखी धनेश, नवरंग, कोतवाल इत्यादी अनेक प्राणी आढळतात. नागझिरा वन्यजीव अभयारण्यात जाण्यासाठी 'पिटेझरी' व 'चोरखमारा' अशी २ प्रवेशद्वारं आहेत. अभयारण्यात प्रवेश करताच रस्त्याच्या दुतर्फा अनेक हरणे गवतामध्ये शांतपणे चरताना दिसतात. पावलागणित दिसणारी हरिणे आणि त्यांच्या आजूबाजूला हुंदडणारी माकडे हे दृश्य मन मोहून टाकते.

येथे ऐन, साग, बांबू, आवळा, बिब्बा, धावडा, तिवस, सप्तपर्णी यांसारखे असंख्य वृक्ष आहेत. अभयारण्यात गवताळ कुरणे मुबलक प्रमाणात असल्याने नीलगाय तसेच सांबर, चितळ, भेकर आणि गव्यांसारखे शेकडो तृणभक्षी आढळतात. येथे महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियाल, हळद्या, नीलपंखी, स्वर्गीय नर्तक, नवरंगी, तसेच तुरेवाला सर्पगरुड, मत्स्य गरुड, व्हाईट आईड बझार्ड सारखे शिकारी पक्षी अणि अनेक प्रकारची फुलपाखरे तसेच ठिकठिकाणी निरनिराळ्या प्रकारचे कोळी दिसून येतात. येथे हिंस्रक पशूंची संख्या देखील काही कमी नाही. पट्टेरी वाघाचा नैसर्गिक अधिवास येथे उत्तम आहे. तेथे सुमारे ८-१० वाघ, २०-२२ बिबट्या, जवळपास ५० अस्वले आणि रानकुत्रे मुक्तसंचार करीत असतात.असे हे नागझिरा अभ्यारण्य आणि तेथील अद्भुत..प्रसिद्ध असा तलाव जो निसर्गरम्य आणि जंगलसृष्टी साठी तेवढाच महत्त्वाचा!

नवेगांव बांध

गोंदिया जिल्‍ह्याच्‍या दक्षिणेस अजूर्नी मोरगांव तालुक्‍यात गोंदिया पासून ६५ कि.मी.वर हे स्‍थळ आहे. येथे जाण्‍यासाठी बस तसेच रेल्‍वेचे साधन आहे. यासाठी जवळचे रेल्‍वे स्‍टेशन देवूलगांव असून हे गोंदिया-चंद्रपूर या मार्गावर आहे. हे नागपूर पासून १५० कि.मी.अंतरावर आहे. येथे धरण असून बोटींगसाठी प्रसिध्‍द आहे. येथे जवळपास जंगलाचे प्रकार 5ए/सी3 असून याठिकाणी राष्ट्रीय उद्यान आहे यात २०९ प्रकारचे पक्षी, ९ प्रकारच्या सरपटणाऱ्या जाती, २६ प्रकारचे मांसाहारी जातीचे प्राणी राहतात. यात मुख्‍यत: वाघ, चित्ता, जंगली मांजर, हरीण, कोल्‍हा, लांडगा इत्‍यादीचा समावेश होतो. नवेगाव बांधचे वैशिष्ट्य म्हणजे इथला स्वच्छ निळ्याशार पाण्याचा बांध..... बांधाच्या पाण्यावर पडणारे टेकड्यांचे हिरवेगार प्रतिबिंब.....विदेशातून भ्रमंती करत फिरणारे विविधरंगी मनोवेधक पक्षी....बोटिंग...निसर्ग सानिध्याचा खरा आनंद देणारी लाकडी कुटी.....मचाण आणि अद्भुत अशा जंगल सफारी!

प्रतापगड

गोंदिया जिल्‍ह्याच्‍या दक्षिणेस अजुर्नी मोरगांव तालुक्‍यात गोंदिया पासून ७५ कि.मी.वर हे स्‍थळ आहे. येथे जाण्‍यासाठी बस तसेच रेल्‍वेचे साधन आहे. हे नागपूर पासून १७५ कि.मी.अंतरावर आहे. येथे टेकडी असून महादेवाचे प्रसिद्ध मंदीर आहे. येथे महाशिवरात्रीला यात्रा भरते. या यात्रेला जवळपास ३०००० यात्री दर्शनासाठी येतात. हे स्‍थळ अतिशय निसर्गरम्य आहे.

इटीयाडोह धरण

गोंदिया जिल्‍ह्याच्‍या दक्षिणेस अजुर्नी मोरगांव तालुक्‍यात गोंदियापासून ९० कि.मी.वर हे स्‍थळ आहे. येथे जाण्‍यासाठी बस तसेच रेल्‍वेचे साधन आहे. येथील भव्‍य जलाशयानजिक प्रसिद्ध मंदीर आहे. येथील निर्सगाचे रम्‍य स्‍थळ पाहण्‍यासाठी जवळ-जवळ १०००० ते १५००० पर्यटक दरवर्षी येतात आणि इथल्या थंडगार आणि स्वच्छ पाण्याला मनाच्या कुपीत सामावून घेतात!

शशिकरण पहाडी

गोंदिया जिल्‍ह्याच्‍या दक्षिणेस गोंदिया पासून ३० कि.मी.वर हे स्‍थळ आहे. येथे जाण्‍यासाठी बस तसेच रेल्‍वेचे साधन आहे. येथील भव्‍य जलाशय आणि प्रसिद्ध मंदीर मनास प्रसन्न करते. येथे शशीकरण देवाचे मंदीर आहे. येथे नवरात्र व दसरा या दिवशी यात्रा भरते. यावेळी पर्यटक आणि भाविक मोठ्या संख्येने येतात.

घुकेश्‍वरी माता मंदीर

गोंदिया जिल्‍ह्याच्‍या पूर्वेस देवरी तालुक्‍यात गोंदिया पासून ६५ कि.मी.वर हे स्‍थळ आहे. येथे जाण्‍यासाठी बसचे साधन आहे. येथील मंदीराचे मागील भागात अभयारण्‍य आहे तसेच आदिवासी लोकांची वस्‍ती आहे. या ठिकाणी चैत्र नवरात्रीचा सण यात्रेच्‍या उत्‍साहात मोठ्या हर्षोल्लासाने साजरा केला जातो. दरवर्षी या उत्सवात महाराष्ट्राच्या विविध भागातील भक्त सहभागी होतात.

सिरपूर धरण

गोंदिया जिल्‍ह्याच्‍या पूर्वेस देवरी तालुक्‍यात गोंदिया पासून ७५ कि.मी. वर हे स्‍थळ आहे. येथे जाण्‍यासाठी बसचे साधन आहे. चारही बाजूनी जंगल व टेकड्यांनी वेढले गेलेले हे धरण मनास मोहीनी घालते. म्हणूनच की काय याठिकाणी दर दिवशी किमान १०० यात्रेकरू येतात.

अशा तलावांनी वेढलेल्या... पक्षी गुंजनाने प्रफुल्लीत...वन्यजीवांचे अद्भुत वास्तव्य असलेल्या गोंदियाला अवश्य भेट द्या!

माहिती संकलन- तृप्ती अशोक काळे
नागपूर

स्त्रोत - महान्युज© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate