महाराष्ट्र राज्याच्या अकोला जिल्ह्यातील त्याच नावाच्या तालुक्याचे मुख्यालय. लोकसंख्या ३९,८०४ (१९८१). अकोला हिंगोली राज्य महामार्गावर अकोल्याच्या दक्षिणेस सु. ७५ किमी. वर ते वसले आहे. खांडवा-पूर्णा मध्यरेल्वे मार्गावरील ते प्रमुख स्थानक आहे. वत्स्यगुल्म, वत्स्यगुल्म, बासिम, वंशगुल्म वगैरे नावांनीही त्याचा उल्लेख आढळतो. महाभारत, वात्स्यायनाचे कामसूत्र, पद्मपुराण, राजशेखरची काव्यमीमांसा, वत्सगुल्ममाहात्म्य इ. प्राचीन ग्रंथांतून तसेच वत्सगुल्म शाखेतील वाकाटक घराण्याच्या कोरीव लेखांतून वत्सगुल्मचा उल्लेख आहे. वत्सऋषीच्या येथील वास्तव्यावरून नगराला हे नाव पडले असावे. पौराणिक कथेनुसार येथील पद्मतीर्थात वासुकी ऋषीने प्रथम स्नान केले, म्हणून त्यास ‘वासुकी नगर’ असेही नाव मिळाले. त्या शब्दाचे अपभ्रंश रूप वाशिम हे मुस्लिम राजवटीत रूढ झाले असावे.
वाशिमचा प्राचीन इतिहास सुस्पष्ट नाही; तथापि वाकाटक घराण्याच्या एका शाखेची येथे राजधानी होती. या घराण्यातील राजांनी ३३०-५०० पर्यंत सभोवतालच्या भूप्रदेशांवर राज्य केले. नवव्या शतकातील राजशेखर कवीने या शहराला विद्या, कला व संस्कृती यांचे केंद्र म्हटले आहे. यावर काही वर्षे राष्ट्रकूट व नंतर यादव (१२१० – १३१८) घराण्यांची सत्ता होती. मोगल काळात (१५३० ते १७५७) ते हैदराबादच्या निजामाच्या अखत्यारीत आले. येथे निजामाची टाकसाळ होती. अठराव्या शतकात बाळापूरप्रमाणेच वाशिमची कापड उद्योगात महाराष्ट्रात ख्याती होती. निजाम व मराठे यांच्या संघर्षात नागपूरकर भोसल्याने त्यावर स्वामित्व मिळविले; पण नागपूरकर भोसले, विशेषतः जानोजी भोसले, पेशव्यास जुमानीनासा झाला, तेव्हा थोरल्या माधवरावांनी त्याचा पराभव केला (१७६९) आणि कनकपूरच्या उभयतांतील तहानुसार भोसल्यांनी वाशिम आणि बाळापूर येथे विणलेल्या पाच हजार रुपये किंमतीचे कापड पेशव्यांकडे दरवर्षी पाठवावे, असे ठरले. या तहाच्या सर्व वाटाघाटी वाशिममध्येच झाल्या. पुढे १८०९ मध्ये पेंढाऱ्यांनी ते लुटले. नागपूर संस्थान खालसा झाल्यानंतर (१८५३) बेरार प्रांत ब्रिटिश राज्यात समाविष्ट झाला. १८५७ मध्ये वाशिम हा जिल्हा होता. पुढे त्याचे वाशिम आणि मंगरूळपीर हे दोन तहसील करण्यात आले.
गावात पद्मेश्वर, बालाजी, राम, मध्यमेश्वर, गोदेश्वर, नारायण महाराज इ. प्रमुख मंदिरे असून दोन जैन वस्त्या आहेत. वत्सगुल्ममाहात्म्यात येथील १०८ पवित्र तीर्थ-कुंडांचा उल्लेख आहे, परंतु त्यांपैकी फारच थोड्यांचे अवशेष आढळतात. शहाराच्या उत्तर भागातील पद्मतीर्थ प्रसिद्ध असून त्या जलाशयाच्या तीरावर विष्णूने शिवलिंगाची स्थापना केली व तो शिव पद्मेश्वर झाला, अशी पौराणिक कथा आहे. पूर्वीपासून पद्मतीर्थात अस्थींचे विसर्जन करण्याची प्रथा आहे. पद्मतीर्थाचा उत्सव कार्तिक शुद्ध एकादशीला होतो. रामनारायण तोष्णीवाल या सधन गृहस्थाने या कुंडाच्या मध्यभागी एक कलात्मक शिवमंदिर बांधले आहे. बालाजी मंदिर पेशवेकालीन असून मंदिरात चतुर्भुज जनार्दनमूर्ती प्रतिष्ठित आहे. हे मंदिर व त्याजवळील जलक्रीडेसाठीचे देवतळे नागपूरकर भोसल्यांचा दिवाणजी भवानी काळू याने १७७९ मध्ये बांधले. मंदिरातील स्तंभावर एक कोरीव लेख आहे. येथे अश्विन महिन्यात बालाजीचा उत्सव असतो. देवतळ्याच्या एका बाजूला व्यंकटेश्वर बालाजीचे मंदिर आणि दुसऱ्या बाजूस रामाचे मंदिर आहे. देवतळे‘बालाजी तलाव’ या नावानेही प्रसिद्ध असून हा चौकोनी आकाराचा दगडी कठड्याने बंदिस्त केला आहे. मध्यमेश्वराचे मंदिर १९७० मध्ये बांधण्यात आले असून त्याच्या गर्भगृहात शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे. शहरात नारायण महाराजांचे वास्तव्य होते. त्यांच्या स्मरणार्थ शुभ्र संगमरवरी दगडांत मंदिर बांधले असून समाधीवर त्यांची मूर्ती आणि वेदीमध्ये दत्तात्रेयाची मूर्ती आहे. गावाच्या पश्चिम भागात जुने पडझड झालेले गोदेश्वर मंदिर आहे. करुणेश्वर या ठिकाणी असलेल्या वत्स मुनींच्या आश्रमात शिव करुणेश्वर या नावाने राहत असे, अशी वदंता आहे. या ठिकाणी महाशिवरात्रीस व वैकुंठचतुर्दशीला मोठे उत्सव होतात. वाशिमजवळच्या लोणी (बुद्रुक) येथे सखाराम महाराज या साधुपुरुषाच्या स्मरणार्थ बांधलेल्या मंदिरात कार्तिक अमावस्येला जिल्ह्यातील सर्वांत मोठी यात्रा भरते.
शहरात तेलगिरण्या, कापूस वटवणी व दाबणीच्या गिरण्या असून हातमाग कापडाचा मोठा उद्योग चालतो. वाशिमची लुगडी, रजया, जाजमे प्रसिद्ध आहेत. यांशिवाय सूत रंगविणे हा उद्योगही चालतो. येथे धान्य व गुरे यांचा मोठा बाजार भरतो. बाशिम येथे १८६९ मध्ये नगरपालिका स्थापण्यात आली. शहरात तालुका पातळीवरील शासकीय कार्यालये असून नगरपालिकांच्या प्राथमिक विद्यालयांव्यतिरिक्त शासकीय बहूद्देशीय विद्यालय तसेच महाविद्यालयीन शिक्षणापर्यंतच्या सोयी आहेत. शहरातील रेल्वे रुग्णालय आणि मिशन रुग्णालय रुग्णसेवेसाठी पंचक्रोशीत ख्यातनाम आहेत
मगर, जयकुमार
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 1/30/2020
वाशिम जिल्ह्यातील सुदी (ता. मालेगाव) हे सुमारे दीड...