অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

विदर्भ पर्यटन (भाग ६)

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पावन झालेला सेवाग्राम आश्रम पूर्व विदर्भातील वर्धा जिल्हा आजही आपल्या आठवणी जपतो आहे. ही भूमी विनोबाजींच्या भूदान आंदोलनाच्या पदचिन्हाची साक्षी आहे. सुप्रसिद्ध निर्माता-निर्देशक राजदत्त, संजय सुरकर, मूर्तिकार आणि चित्रकार बी विठ्ठल, हरिहर पांडे, टी.जी. पाटणकर, प्रसिद्ध लेखक वामनराव चोरघडे, वऱ्हाडी शब्दकोश निर्माता प्रा.देविदास सोटे, संगीतकार डॉ.प्रकाश संगीत, बासरीवादक नरेंद्र शाह अशा असामींनी आपल्या कलात्मक कार्याची सुरुवात याच जिल्ह्यातून झालेली होती. प्रा.शाम मानव यांनी अंधश्रद्धा निर्मुलनाचे कार्य वर्धा जिल्ह्यामधून सुरु केले आणि आता त्याचे मूर्त रूप संपूर्ण भारतभर दिसत आहे. अशा वर्धा नदीच्या तिरावर वसलेल्या आणि बोर अभयारण्याचे अद्भुत निसर्ग सौंदर्य लाभलेल्या वर्धा जिल्ह्याची आज आपण सफर करूया.

बोर अभयारण्य


वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्य हा प्रकल्प जंगल सफारीची आवड असलेल्यांना जणू पर्वणीच. ३२३६ हेक्टर क्षेत्रात या जंगलाचा विस्तार आहे. त्यापैकी २२१३ हेक्टर क्षेत्र हे अभयारण्य म्हणून घोषित केलेले आहे. या भागात जवळपास १५ वाघ आहेत, पट्टेदार वाघ, बिबटे, वायसन, नीलगाय, सांबर, हरीण, चिंकारा, माकडं, जंगली कुत्रे, अस्वलं हे प्राणी सुद्धा इथले आकर्षण आहेत .तसेच इतर वन्य प्राण्यांनी समृद्ध असा प्रदेश आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या २६ प्रजाती या भागात आढळतात, तसेच पक्ष्यांच्या १६० प्रजाती येथे आहेत. प्राणी प्रेमींना येथे आपल्या सुट्या अगदी मजेत घालवता येतील. कारण एप्रिल-मे महिन्यांचा कालावधी येथे भ्रमंती करण्यास सर्वात उत्तम मानला जातो. पावसाळ्यात तर इथले वातावरण अत्यंत रम्य असते. या भागातील पिसारा फुलवलेले मोर मन मोहरतात. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने येथे एक रिसॉर्ट उभं केलंय. येथे जायचे असल्यास वर्धा हे येथील जवळचे रेल्वे स्टेशन आहे. वर्धा येथून ३५ किमी अंतरावर आहे. हिंगणी हे बस स्टेशन येथून ५ किमी अंतरावर आहे. या भागात प्राणीदर्शनासाठी... सफारीसाठी जावयाचे असल्यास सकाळी ६ ते ९ ची वेळ उत्तम आहे, तसेच दुपारी २ ते ५ या वेळात पण आपण तेथे जाऊ शकतो.

बोर तलाव


ज्याप्रमाणे पावसाळ्यात फिरायला आपण पश्चिम महाराष्ट्र किंवा इतर ठिकाणे निवडतो त्याचप्रमाणे उन्हाळ्यात पर्यटनासाठी विदर्भ हा उत्तम पर्याय ठरू शकतो. जर तुम्हाला एक रोमांचक आणि अविस्मरणीय जंगल सफारीचा अनुभव घ्यायचा असेल तर नक्की भेट द्या बोर अभयारण्याला. जंगल आणि सुंदर असा बोर तलाव तुमची आतुरतेने वाट बघतोय.

सेवाग्राम आश्रम आणि परिसर


महात्मा गांधीजी यांच्या वास्तव्याने पुनित झालेले सेवाग्राम वर्धेपासून अवघे सात किलोमिटर अंतरावर आहे. पूर्वी सेवाग्रामसाठी जाणे व येण्याची सुविधा नसल्यामुळे अनेकांना कष्ट सहन करावे लागत होते. परंतू आता मात्र वर्धेवरुन पर्यटकांसाठी मोठ्या प्रमाणावर सुविधा उपलब्ध असल्यामुळे परदेशातील व देशातील असंख्य पर्यटक व शैक्षणिक सहली या ठिकाणी भेटी देत असतात. महात्मा गांधीजींच्या या प्रेरणादायी स्थळातून त्यांचे स्मृती दर्शन होते. गांधीजी ३० एप्रिल १९३६ ला पहिल्यांदा सेवाग्रामला आले. पूर्वी सेवाग्रामचे नांव शेगांव असे होते. दांडी यात्रा प्रारंभ करण्यापूर्वी गांधीजीनी निर्धार केला होता की पूर्ण विजय प्राप्ती नंतर साबरमती आश्रमात परत येतील, दरम्यान वर्धेचे जमनलाल बजाज यांच्या विनंतीवरुन ते वर्धेला आले.

आदि निवास


भारत छोडो आंदोलनाची पहिली सभा १९४२ मध्ये आदि निवासात झाली होती तसेच १९४०च्या व्यक्तीगत सत्याग्रहाची प्राथमिक तयारी सुध्दा याच निवासस्थानातून झाली. आश्रमवासियांच्या परिश्रमाने व स्थानिक कारागीराच्या मदतीने आदि निवास बांधण्यात आले. या निवास्थानामध्ये बापू बा, प्यारेलालजी, संत तुकडोजी महाराज, खानअब्दुल गप्फार खॉ व इतर दूसरे आश्रमवासी तसेच आमंत्रीत सुध्दा राहत असे. याठिकाणी लेखन, पठन, कताई आणि इतर सर्व कामे केल्या जात होते. गांधीजीच्या इच्छेनुसार व त्यांच्या देहांतानंतर या ठिकाणाला आदि निवास संबोधण्यात येतआहे.

बापुकुटी


आदि निवासात लोकांची गर्दी वाढल्यामुळे गांधीजींच्या नियमित कार्यात अडथळा येऊ लागला हे लक्षात आल्यानंतर मीराबहन यांनी त्यांच्यासाठी दोन कुट्या तयार केल्या होत्या. आज त्याला बापूकुटी व बापू दप्तर या नावाने ओळखले जाते. या बापूकुटीत गांधीजीचे बसावयाचे आसन, बाजूला कंदिल, पेटीत चष्मा व इतर साहित्याची जपणूक करुन त्याच्या आठवणी जपून ठेवण्यात आलेल्या आहेत. बापू-कुटि ही माती, बांस तथा देशी कवेलू आदि साहित्याने बनलेली आहे. खजूरच्या पानाने बनविण्यात आलेल्या चटईवर बसून गांधीजी आपले अविश्रांत काम करीत असत. बैठकीच्या उजव्या बाजूला काचेच्या आलमारीत ते चरखा, थुंकदानी, पाणी पिण्याची बाटली तसेच छोट्या लाकडी पेटीमध्ये प्रथोपचाराचे साहित्य ठेवीत असत. चिनी मातीची तीन बंदरवाली मूर्तीसुद्धा यामध्ये ठेवण्यात येत असे. काचेच्या आलमारीमध्ये गांधीजी आपल्या खडाऊ आणि लांबअशी काठी ठेवीत असत. या बापूकुटीमध्ये राष्ट्रीय नेत्यासोबत राजनैतिक चर्चा सुद्धा ते करीत होते. या कुटीच्या दुसऱ्‍या खोलीत गांधीजींचा सेप्टीक टँकवाला संडास, बाजूला लाकडी पेटी आहे. वृत्तपत्र वाचणे व त्यात सुधारणा करण्यासाठी या पेटीचा उपयोग केला जात होता. बाजूला मालिश टेबल व झोपण्यासाठी खाट ठेवलेली आहे, ते त्याचा नियमीतपणे उपयोग करायचे यावरुन त्यांची साधी राहणी, साधे विचार यावरुन त्याचे जिवनातील कलेचे मर्म समजून येतो.

गांधीजींचे कार्यालय


गांधीजीच्या कार्यालयामध्ये महादेवभाई, प्यारेलाल आणि सुश्री राजकुमारी अमृतकौर तथा अन्य सहयोगी कार्य करीत होते. या कार्यालयात टेलीफोन, सर्प पकडण्याचा पिंजरा आहे.

`बा ` कुटी


गांधीजीच्या सोबतीला कस्तुरबा गांधी राहत होत्या परंतू त्यांना असुविधांचा अनेक वेळा सामना करावा लागल्यामळे अखेरीस जमनालालजी बजाज यांनी `बा ` साठी वेगळी कुटी बनवली त्याला बा-कुटी संबोधण्यांत आले. आजही ही कुटी आश्रमांच्या परिसरात आहे.

आखरी निवास


जमनालालजी बजाज यांनी स्वत:साठी आखरी निवास बांधले. या कुटीत शांतीदास तथा लार्ड लोधियन राहत होते. प्रारंभी डॉ. सुशीला नैयर यांनी या गावातील लोकांचे उपचार केले त्यानंतर आखरी निवास कुटीमध्ये कस्तूरबांनी दवाखाना सुरु केला. तो आजही कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्या नावाने प्रसिध्दीस आहे. गांधीजी १९४६ च्या ऑगस्ट महिन्यात खोकला व सर्दीने आजारी झाले डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना कुटीमध्ये रहावे लागले आणि त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली. २५ ऑगस्ट १९४६ रोजी ते दिल्लीला गेले. तेथून ते नौआखाली या गावाला गेले. परतीत ते दिल्लीला आले. २ फेब्रुवारी १९४८ रोजी सेवाग्रामला परत येणार होते परंतु दुर्दैवाने ३० जानेवारी १९४८ रोजी त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर गांधीजी परत आले नाही म्हणून या कुटीला आखरी निवास म्हणून संबोधण्यात येत आहे. याच ठिकाणी बौद्ध धर्म साधक धर्मानंद कोसंबी यांनी आमरण उपोषण करुन आपले प्राण त्यागले.

सेवाग्रामच्या परिसरात प्रार्थना स्थळ, रसोई घर, भोजन स्नान, महादेव कुटी, किशोर निवास, परचूटे कुटी, रुस्तम भवन, नई तालीम परिसर, गौशाला, शांती भवन आंतरराष्ट्रीय छात्रावास, डाकघर, यात्री निवास व गांधी चित्र प्रदर्शनी आदि सेवाग्रामच्या वैभवात व स्मृतीत भर घालणाऱ्या वास्तु ऊभ्या आहेत. सेवाग्रामची ख्याती अंतराष्ट्रीय स्तरावर पोहचलेली आहे. सेवाग्राम हे विचारांचे शक्तीस्थळ म्हणून गणल्या जाते. येथील सत्य-अहिंसा आणि शांतीचा संदेश सर्वदूर पोहचलेला आहे.

गीताई मंदिर


गीता + आई = गीताई किंवा गीतामाता या विषयी आचार्य विनोबा भावे यांचे अथक चिंतन होते. सन १९१५ मध्ये त्यांची माता रुख्मीनीदेवी यांच्या इच्छेनूसार मुळ गीतेचे मराठीत रुपांतर करण्याचा त्यांनी निश्चय केला होता. ७ ऑक्टोबर १९३० मध्ये गीतेचे मराठीत रुपांतर करण्याचे काम सुरु केले. १९३२ मध्ये मराठीतील गीता श्लोकाचे प्रकाशन झाले. त्या पुस्तकाचे प्रकाशक जमनालालजी होते. मातृस्मरणार्थ केलेल्या या कृतीला विनोबाजींनी नाव दिले 'गिताई'. कमलनयन बजाज यांच्या कल्पनेतून साकारणाऱ्या गिताई मंदिराचे भुमिपुजन जमनालालजी यांच्या ७५ व्या जन्मदिनी ४ नोव्हेंबर १९६४ मध्ये स्वत: विनोबाजींच्या हस्ते संपन्न झाले. नविनतम आणि मौलीक कल्पनेच्या आधारावर या प्रकल्पाचे प्रारुप तयार करण्यात आले. याप्रसंगी विनायक पुरोहीत यांचे या प्रकल्पाला मोठ्याप्रमाणावर योगदान मिळाले. त्यांनी देश व विदेशातील विभिन्न स्मारकाचा अभ्यास करुन व अवलोकन करुन स्थापत्यकला विशेषज्ञांशी सल्ला मसलत करुन या प्रकल्पाला पूर्णरुप दिले.

शिला लेख


गीताई मंदीरात उभारण्यात आलेले शिलालेख हे देशातील चारही बाजूने येथे आणलेले आहेत त्यामध्ये देशाच्या पूर्वेकडील उत्तर प्रदेशातून चूनार, महाराष्ट्राच्या पश्चिम क्षेत्रातून कोल्हापूर, उत्तर मध्यप्रदेश व राजस्थानातून क्रमश: करोल व बुंदी दक्षिण भारताच्या आंध्रप्रदेश, कर्नाटक व तामिलनाडू या राज्यातून सुध्दा शिला लेख आणले गेले.त्यामुळे हे मंदिर संपूर्ण देशाच्या एकतेचे प्रतीक म्हणून सुध्दा समजल्या जाते.
या शिलालेखाची निवड विशेषज्ञांच्या सल्ल्यानुसार व प्रमाणित प्रयोगाच्या आधारावर करण्यात आली आहे. शिलालेखावर वारा, सुर्य व पाण्याचा परिणाम होणार नाही याचाही विचार करण्यात आला होता. शिलालेखाची ऊंची ९ फुट, लांबी २ फुट व जाडी १ फुट असुन शिलालेख २ फुट जमिनीच्या आत आहे. प्रत्येक शिला लेखावर गिताईचा एक श्लोक लिहिण्यात आला आहे. पर्यटकांना ८ ते १० फुटाच्या अंतरावरुन सुध्दा गिताईचे श्लोक वाचता येतात. शिलालेखाच्या परिघाला चरखा व गायीचा आकार देण्यात आला आहे. पुढील बाजूला चरख्याचा आकार हे गांधीजीच्या स्मृतीचे प्रतीक असून गायीचे चिन्ह जमनालालजीच्या स्मृतीचे प्रतीक मानल्या गेले आहे. या शिलालेख मंदिराला परंपरागत अशी छत अथवा फरशी नसून भिंतीसुध्दा नाहीत. दोन शिलालेखाचे अंतर ३ इंचांचे असून प्राकृतिक हवेचा संचार व भरपूर उजेड असतो. याठिकाणी विनोबाजींची गिताई अमर झाली.

गीताई मंदिराचे मुख्य प्रवेशव्दार आकर्षक पध्दतीने बनविण्यात आले असून त्या समोरच स्वस्तिकच्या आकाराचा स्तंभ आहे. या स्तंभावर विनोबाजींनी आपल्या हस्ताक्षरात 'गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेणता, पडता रडता घेई उचलू कडेवर' अशा भावपूर्ण ओव्या लिहिल्या आहेत. हे मंदिर परंपरागत पूजेचे स्थान नसून ते ध्यान चिंतनाचे साधनाकेंद्र आहे. मंदिराच्या परिघामधील वातावरण शांत व सात्विक आहे. मंदिराच्या आत एक छोटे तळे बनविण्यात आले आहे ते नेपाल त्रिशुल नाटीच्या एकाभागाची प्रतिकृती आहे. गीताई मंदीर कमलनयन बजाज चॅरिटेबल ट्रस्ट दिल्ली यांच्या मार्फत बनविण्यात आलेले असून सर्व सेवासंघाकडून ३५ एकर जमीन या कार्यासाठी विनामुल्य देण्यात आली. या मंदिराचे उद्घाटन ७ ऑक्टोबर १९८० मध्ये स्व.विनोबाजींच्या हस्ते करण्यात आले.

पवनार


पवनार हे गाव वर्धा-नागपूर महामार्गावर असून, ते वर्ध्यापासून सुमारे सहा कि.मी. अंतरावर आहे. येथील धाम नदीच्या काठावर स्व.विनोबा भावे यांचा आश्रम असून, यालाच परमधाम आश्रम म्हणतात. विनोबाजींनी वयाच्या ५५ ते ६८ काळात भू-दान पदयात्रा केली. तत्पूर्वी आंध्र प्रदेशातील रामचंद्र रेड्‌डी या जमीनदाराने १०० एकराचे भुमीदान केले. जगाच्या इतिहासात पहिला क्षण असा होता की रक्ताचा एकही थेब न सांडता हजारो एकराचे भूदान मिळाले. या पदयात्रेनंतर १९७० साली विश्रांतीसाठी वर्धा जवळील पवनार येथील परमधाम आश्रमात परतले. गोपुरी येथे विनोबाजी भावे बरेच दिवस वास्तव्याला होते. गिताप्रवचने असंख्य स्फुटविचार मागे ठेवून परावाणीने `रामहरी ` म्हणत १५ नोव्हेंबर १९८२ मध्ये अनंतात विलीन झाले. धामनदीत आचार्य विनोबा भावे यांच्या पार्थिव शरीराला अग्नी देण्यात आला होता. यावेळी शासनातर्फे एक स्मारक बांधण्यात आले आहे. हे ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून घोषित झाल्याने अनेक देश विदेशातील पर्यटक व शैक्षणिक सहली या ठिकाणी येऊन प्रेरणा घेतात.

विश्वशांती स्तुप


महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या या कर्मभुमीत विश्वशांती स्तुपाची निर्मिती झाली. ४ ऑक्टोबर १९३३ रोजी जमनालालजी बजाज यांच्या परिचयाचे जपानी बौद्ध भिक्षू महास्यवीर निचिदात्सु फुजीई हे महात्मा गांधी यांना वर्धा येथे भेटण्यासाठी आले. श्री.फुजोई हे प्रतीदिन गांधीजीच्या सत्याग्रह आश्रमच्या आजूबाजूला ड्रम वाजवून ‘ना-म्यु-म्यो-हो-रे-गे-क्यो’ अशी प्रार्थना म्हणत होते. या प्रार्थनेचे कारण विषद करतांना भिक्षू म्हणाले की, भारताची स्वातंत्र्यता व विश्वशांतीसाठी ही प्रार्थना म्हटली जाते. ही प्रार्थना आजही विश्वशांती स्तुपाच्या परिसरातील बौद्ध मंदिरात पहाटे साडेपाच व सायंकाळी सहा वाजता म्हटल्या जातात. 

पुज्य फुजीई गुरुजींची अंतिम इच्छा होती की गांधी व विनोबांच्या कर्मभुमीत एक विश्वशांती स्तूप असावा. कमलनयन बजाज चॅरीटेबल ट्रस्ट यांनी फुजीई गुरुजींच्या स्मृती व सन्मानार्थ वर्धा येथे विश्वाशांती स्तुपाची स्थापना केली. विश्वशांती स्तुप ९ एकर जागेच्या विस्तीर्ण परिसरात आहे. विश्वशांती स्तुपाच्या घुमटाच्या आच्छादनावर सुवर्णाने बनविलेल्या भगवान गौतम बुद्धाच्या प्रतिकृतीच्या ४ दिशांनी उत्तम विविध मंदिरांच्या आकर्षक पद्धतीने ठेवलेल्या प्रतिकृती आहेत. तसेच याच परिसरात भगवान बुद्धाचे मंदीर सुद्धा आहे. या मंदिरात सुवर्णकृत अलंकाराने बुद्धाची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली आहे. हे बौद्ध मंदीर जापानी बौद्ध मंदिरासारखे वाटते. मंदिरामध्ये निरव शांतता पसरलेली असते. देश विदेशातील पर्यटक या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. तेव्हा आपणही या विश्वाचा सैर-भैर रहाडा विसरून ही मनःशांती काही काळ अवश्य अनुभवू !

प्रहार


ही एक अशी संस्था आहे जी शाळा ,महाविद्यालये मधील तरुण विद्यार्थ्यांमध्ये प्रकृती बद्दल, निसर्गाबद्दल प्रामाणिकपणा, सैनिकी मानसिकता, देशभक्ती या सारखे गुण निर्माण करण्याकरिता मदत करते. ले.कर्नल सुनील देशपांडे यांनी नागपूर येथे प्रहार महासंघाची स्थापना केली होती. प्रा. मोहन गुजर यांनी प्रहारची उपशाखा वर्धा येथे स्थापन केली. प्रहार ही फक्त तरुण विद्यार्थी वृन्दांमध्ये सैनिकी मानसिकता निर्माण करते असे नव्हे तर प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन देखील करते. आणि त्या प्रशिक्षणामध्ये राष्ट्रीय अखंडता, मौलीकाधिकार, आदर्श नागरिकता, शहरी सुरक्षितता, देखरेख, घोडेस्वारी, जंगल भटकंती, पर्वतारोहण, इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच मौलिक अधिकार, आदर्श नागरिकता, राष्ट्रीय अखंडता, धर्मानिरपेक्षता, उन्हाळी कथा, थोर नेत्यांची गाथा, सन्मान, निबंध प्रतियोगिता, समूह चर्चा, नेतृत्व, स्फुर्तीदायक गायन याबद्दल चे घडण प्रहारमध्ये केले जाते. अशा व्यक्तिमत्व घडविन्यास पुरक प्रहारच्या उपशाखेला अवश्य भेट द्या.

अशा सांस्कृतिक, ऐतिहासिक, नैसर्गिक, साहित्यिक महत्त्व असलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे राज्यातील एक मुख्यालय असलेल्या वर्धा या पावन नगरीसह परिसरास अवश्य भेट द्या !

संकलन- तृप्ती अशोक काळे

स्त्रोत - महान्युज© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate