অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

विदर्भ पर्यटन (भाग-७)

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगितेचे अजरामर महात्म्य.... शुचिता आणि सहिष्णुतेशी तादात्म्य... सातपुड्याच्या कुशीतला धबधबे-दऱ्या अशा अनोख्या रूपातला चिखलदरा...वऱ्हाडी भाषेचा ठसकेदार बाज आणि भक्तांना भावलेला माता अंबेचा साज अनुभवायला आता आपण वळुयात पश्चिम विदर्भातल्या पांढरे सोने पिकविणाऱ्या अमरावती जिल्ह्याकडे !

चिखलदरा



विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे चिखलदरा हे पर्यटनस्थळ सातपुड्याच्या कुशीत विसावलेले आहे. अमरावती शहरापासून ९० कि.मी अंतरावरील हे ठिकाण समुद्रसपाटीपासून ३५६४ फूट उंचीवर आहे. या ठिकाणाचा उल्लेख थेट पुराणात आढळतो मात्र त्यासाठी आपणास वळावे लागेल महाभारतातल्या एका घटनेकडे. महाभारतातल्या भीमाने कीचकाशी कुस्ती करून त्याचा इथे वध केला व त्याला बाजूच्या दरीत फेकून दिले अशी कथा आहे. कीचकाची दरी म्हणजे कीचकदरा. चिखलदरा हा कीचकदरा या शब्दाचा अपभ्रंश आहे असे मानले जाते.

चिखलदऱ्याच्या परिसरात बरीच प्रेक्षणीय स्थळे असून गाविलगडचा किल्ला, किचकदरा, आणि विराटराजाचा महाल इत्यादी मुख्य आकर्षणाची ठिकाणे आहेत. वैराट हे येथील सर्वात उंच ठिकाण आहे. चिखलदर्‍याची समुद्रसपाटीपासूनची उंची ३५६४ फूट असल्यामुळे तेथील हवा कायम थंड आणि आरोग्यदायी असते. सातपुड्याच्या सात पर्वतरांगांपैकी मेळघाट रांगेत चिखलदरा येते. मेळघाट रांग ही व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केल्यामुळे येथे वाघांच्या शिकारीला बंदी आहे. चिखलदर्‍याच्या घाटात किंवा चिखलदर्‍याहून सेमाडोहला जाणार्‍या रस्त्यावर जंगलच्या राजाचे अलभ्य दर्शन होण्याची शक्यता असते. मोर, रानकोंबडा, अस्वले तर बर्‍याच मोठ्या प्रमाणात आहेत; मात्र सह्याद्रीतल्या सदाहरित जंगलांसारखी घनदाट हिरवीगार झाडी येथे दिसत नाही. येथील जंगल शुष्क पानझडीच्या अरण्याच्या प्रकारात मोडते. कॉफी हे येथील मुख्य उत्पादन आणि आकर्षण आहे. कॉफीला लागणारे ७० ते ८० फॅरनहाइट तापमान येथे लाभते.

चिखलदऱ्यातील पर्यटनाचे आकर्षक बिंदू



पौराणिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसा लाभलेल्या चिखलदरा येथील बहुतेक स्थळांची नावे ब्रिटिशकालीन आहेत. इको पॉईंट, देवी पॉईंट, नर्सरी गार्डन, प्रॉस्पेट पॉईंट, बेलाव्हिस्टा पॉईंट, भीमकुंड‎, मंकी पॉईंट, लॉग पॉईंट, लेन पॉईंट, वैराट पॉईंट, हरिकेन पॉईंट !च‍िखलदरा येथे विविध पॉइंट पर्यटकांचे स्वागत करत असतात. दरीच्या पायथ्याशी काही पायर्‍या उतरून गेले असता देवी पॉइंट आहे. डोंगराच्या एका भुयारात देवी वसलेली आहे. तेथून चंद्रभागा नदीचा उगम आहे. देवीच्या समोर एक कुंड आहे. कुंडातून पाणी‍ सरळ दरीत उडी घेते. देवीचे दर्शन झाल्यानंतर फेसाळलेला धबधबा मन मोहून टाकतो.

देवी पॉइंटहून जवळच मोझरी पॉइंट असून त्याच्या बाजूला हरिकेन पॉइंटही आहे. वनोद्यानात संध्याकाळी कुटुंबियांसोबत मित्रमंडळींसोबत फिरायला मज्जा येते. रात्री वाघांच्या डरकाळ्या ऐकण्यात एक वेगळेच रोमांच असते. लहान मुलांसाठी गार्डन रेल्वेचीही सोय येथे करण्यात आली आहे. भर पावसाळ्यात ढगांनी वेढलेला चिखलदरा क्षीरासम शुभ्र पाणी जेव्हा धबधब्यांमधून खळाळते तेव्हा मन या अद्भुत रम्य स्थळी नकळत कवी व्हायला लागते आणि मनातली गाणी खळाळत्या पाण्यासारखी ओठांवर येतात. या क्षणांना आठवणींसह नजरेत कैद करण्यासाठी सुसज्ज कॅमेरा मात्र अवश्य बाळगावा. अलिकडच्या काळात पर्यटकांमधे पॅराग्लाइडिंगचे आकर्षण वाढल्याने तशी खास व्यवस्था येथे उपलब्ध केल्याचे आढळते.

पंचबोल पॉइंट (ईको पॉइंट)



हा पॉइंट पर्यटकांना काहीसा गोंधळून टाकणाराच ! चारही डोंगरांनी वेढलेली ही खोल दरी आहे. येथे मोठ्याने आवाज केल्यास पाच वेळा प्रतिध्वनी ऐकू येतो. आपल्या लाडक्या-लाडकीचे नाव असे प्रतिध्वनित ऐकण्यास पर्यटक फार उत्सुक असतात.

विराट देवी



विराट देवी हा इथला प्रसिद्ध पॉइंट. चिखलदऱ्यापासून ११ किलोमीटर दूर डोंगरावर विराट देवीचे मंदिर बांधलेले आहे. खरी देवीचे मंदीर पश्‍चिमेकडील खोल दरीत एका भुयारात आहे. तेथे जाणे अशक्‍य असल्याने नवे मंदिर बांधण्यात आले.

गाविलगड किल्ला



गाविलगड हा महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा किल्ला चिखलदऱ्याजवळ, मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये आहे. किल्ल्याच्या भोवती घनदाट जंगल आहे. १२ व्या १३ व्या शतकात गवळ्यांनी बांधलेला हा किल्ला नंतर बलाढ्य गोंडानी घेतला. गाविलगड हा वैभवशाली बांधकाम असलेला किल्ला विदर्भाचे भूषण आहे. हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारचा असून तो अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यामध्ये आहे. हा भूभाग बहमनी सुलतानांच्या ताब्यात होता. तत्पूर्वी या डोंगरावर गवळी लोकांनी मातीचा कोट उभारला होता, अशी वदंता आहे. बहमनी सुलतानाच्या काळात सातपुड्याच्या संरक्षणासाठी शहाबुदीन अहमदशहाने हा बलदंड किल्ला बांधून उत्तरेकडून होणाऱ्या आक्रमणाला पायबंद घालण्याचा प्रयत्न केला. पुढे हा किल्ला औरंगजेबाकडे आला. नंतरच्या काळात हा भोसल्यांच्या ताब्यात असताना यावर बेणीसिंह नावाचा किल्लेदार होता. त्यावेळी झालेल्या इंग्रजांबरोबरच्या युद्धात बेणीलिंगाने अतुलनीय पराक्रम केला. त्याच्या या पराक्रमाची प्रशंसा जनरल सर जेस्पर निकोलस यांनी आपल्या नोंदवहीत करून ठेवली आहे.

किल्ल्यावर निजामकालीन कोरीव मूर्ती पाहण्यासारख्या आहेत. गडावर २ तलाव आहेत. साधारणत: १० तोफा नाजूक स्थितीमधे असल्या तरी अजूनही शाबूत आहेत. घोडे, हत्ती इत्यादींचे कोरीव काम व हिंदुस्तानी, उर्दू, अरबी या भाषांमधील मजकूर तोफांवर आढळतो.मात्र, किल्ल्याची तटबंदी, बुरूज ढासळण्याच्या मार्गावर आहेत. किल्ल्याच्या आतील राणीमहाल, दरबार व तलाव आजही तत्कालीन वैभवाच्या खुणा जपून आहेत. या किल्ल्यापासून ४५ किलोमीटर अंतरावर असलेला आमनेर येथील छोटा किल्ला म्हणजे विदर्भाचे प्रवेशद्वार; पण तोही दुर्लक्षित आहे.

शार्दुल दरवाजाचे भव्य आणि भक्कम बांधकाम चकित करण्यासारखे आहे. दरवाजावरील शार्दुलाची शिल्पे प्रेक्षणीय अशीच आहेत. लांबरुंद पायऱ्या संपल्या की दरवाजामधून किल्ल्यात प्रवेश होतो. आतील पहारेकऱ्यांच्या उभे राहण्याच्या जागा व घुमट पाहून पुढे गेल्यावर पुन्हा एक दरवाजा लागतो. हा दरवाजा म्हणजे चौथा दरवाजा आहे. हा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर गडाचा मुख्य असा दिल्ली दरवाजा वाट अडवून उभा असतो. हा या मार्गावरील पाचवा दरवाजा आहे. या भव्य दरवाजाच्या आतल्या बाजूला पहारेकऱ्यांच्या निवासाचे कक्ष आहेत. दरवाजाला लागूनच असलेले अशा प्रकारचे भव्य बांधकाम महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांवर सहसा आढळत नाही.

सहल नियोजन



चिखदऱ्यापासून मध्य रेल्वेचे बडनेरा हे जवळचे स्थानक ११० किलोमीटरवर आहे. त्याचे मुंबई पासूनचे अंतर ७६३ कि.मी आहे. राज्य परिवहन मंडळाच्या येथे येणाऱ्या गाड्या अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर येथून नियमित सुटतात. चिखलदरा येथे पोहोचण्यासाठी दोन मुख्य गाडीमार्ग आहेत. त्यापैकी एक जळगाव, भुसावळ, बऱ्हाणपूरकडून धारणी, हरिसाल, सेमाडोह व तेथून चिखलदरा असा येतो. हा मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून येत असल्यामुळे, हा गाडीरस्ता सूर्यास्त ते सूर्योदय या रात्रीच्या वेळात बंद करण्यात येतो.

दुसरा मार्ग अमरावती, अचलपूर, परतवडा, ते चिखलदरा असा आहे. या मार्गावर धामनगाव गढी ते चिखलदरा हा घाटरस्ता आहे. ऑक्टोबर ते जून या काळात येथील हवामान खूपच छान असते. मात्र भर पावसाळ्यात हे नंदनवन अधिकच अनोखे भासते. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची सुस्थित निवासस्थाने..खाजगी होटल्स...तेथे मिळणारे स्थानिक पद्धतीचे चटकदार जेवण...कॉफी आणि रसरशीत स्ट्रॉबेरी...वराचा भात..यामुळे चिखलदऱ्यातला मुक्काम अगदी सुखद होतो.

सालबर्डी



हे पर्यटनस्थळ मोर्शीपासून ८ कि.मी अंतरावर आहे. येथे महादेवाचे जागृत ठिकाण आहे. येथील गरमपाण्याचे झरे हे एक प्रमुख आकर्षण आहे. संत मारुतीमहाराजांची समाधी आणि महानुभाव पंथाचे प्रसिद्ध मंदिर ही येथील काही ठळक आकर्षणे आहेत.

कुंडीनपुर



विदर्भाची प्राचीन राजधानी म्हणून कुंडीनपूर हे प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. दरवर्षी कार्तिक पौर्णिमेस येथे मोठी यात्रा भरते. रिद्धपूर हे महानुभाव पंथीयांचे हे प्रमुख तीर्थस्थळ आहे.

गुरुकुंज आश्रम-मोझरी



ग्रामगितेचे निर्माता, ग्रामस्वच्छतेचे सच्चे पुजारी, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अविरत, अविश्रांत झटलेले समाजप्रबोधक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. तुकडोजी महाराजांच्या शिकवणीनुसार येथील आश्रम आणि मंदिर सर्व धर्म आणि पंथियांसाठी सदैव खुले आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर तुकडोजी महाराजांनी या आश्रमाच्या माध्यमातून ग्रामविकासावर विशेष भर दिला. गावांच्या पुर्नरचना आणि विकासकार्यासाठी विविध कार्यशाळा आणि शिबिरांचे आयोजन येथे करण्यात आले. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी आश्रमाच्या एका भव्य कार्यक्रमात तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत या उपाधिने सन्मानित करत त्यांच्या समाजसेवक प्रवृत्तीस खऱ्या अर्थाने सन्मानित केले. अशा राष्ट्रसंताच्या आठवणीने..सद्कार्याने पावन आश्रमास अवश्य भेट द्या.

बहिरम



अचलपूर तालुक्यातील बहिरम हे देवस्थान खूप प्रसिद्ध आहे. हे मंदिर सुमारे १२५ फूट उंचीवर आहे. चढण्यास १०८ पायऱ्या आहेत. येथे साडेसहा फूट उंच गणेशमूर्ती आहे. या मंदिरासमोर सहा टन वजनाची घंटा आहे. सातपुड्याच्या कुशीतील हे ठिकाण महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमेवर आहे. येथे बहिरम (भैरव) या देवाची पूजा केली जाते. येथे दरवर्षी महिनाभर जत्रा चालते. ती यात्रा डिसेंबर महिन्यात सुरू होते.

भातकुली



अमरावतीहुन अवघ्या १८ कि.मी.अंतरावरील जैनधर्मियांचे भातकुली हे क्षेत्र पर्यटकांना एक शांत, शुचिर्भूत आणि निरामय अनुभूती देते. भोजकूट अर्थात आजच्या भातकुली गावाची स्थापना श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणीचा भाऊ राजा रुक्मी याने केली. भगवान नेमिनाथ यांच्या धर्मोपदेशाने प्रभावी होऊन सर्व राज्य आणि पारिवारीक व्याप बाजूला सारून राजा रुक्मी याने भातकुली पासून एका मैलाच्या अंतरावर भव्य चैत्यालयाची निर्मिती करून भगवान १००८ श्री आदिनाथ यांच्या काळ्या पाषाणाच्या मूर्तिची प्रतिष्ठापना केली होती असे मानले जाते. पुढे मुघल काळात ही मूर्ति बचाव म्हणून एका किल्ल्यात जमीनदोस्त करण्यात आली होती. अठराव्या शतकात या गावाच्या प्रमुखास एका रहस्यमय स्वप्नात या मूर्तिचे रहस्य उलगडले आणि त्या स्थळी उत्खनन केले असता आदिनाथ भगवंताची ती मूर्ती तेथे आढळून आली. बऱ्याच कालावधीनंतर जैन मुनि नेमसागर महाराजांनी या ठिकाणास भेट दिली असता त्यांना ही मूर्ती जैन धर्माचे पहिले तीर्थंकर भगवान आदिनाथ यांची असल्याचे उमगले आणि त्यांनी गावकऱ्यांना जैन धर्म आणि २४ तीर्थंकर याबद्दल इतंभूत माहिती दिली. गावकऱ्यांनी मोठ्या आस्थेने चैत्यालयाची स्थापना केली आणि इतिहासाच्या काळ्या पडद्याआड दडलेले मंदिर पुनश्च ऊभे राहिले. काळ्या पाषाणाची भव्य पौराणिक मूर्ती असलेले हे क्षेत्र मनःशांती देऊन जाते यात शंका नाही.

अमरावतीच्या सुंदर परिसराला भेट देताना औदुंबरवती ऊर्फ अमरावती शहराला भेट देणे मात्र विसरू नका. जुन्या अमरावतीमध्ये भाजी बाजारात बाळकृष्ण मंदिर, सोमेश्वर मंदिर,महराज मंदिर. लक्ष्मी नारायण मंदिर, जैन मंदिर, काळा मारोती मंदिर इत्यादी मंदिरे आहेत. नीलकंठ मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, एकवीरा देवी मंदिर ही बुधवार्‍यामध्ये आहेत. अंबा देवी मंदिर हे अंबा गेटवर आहे. तिथेच मृगेंद्रस्वामी मठही आहे. जामा मशीद साबनपुरा येथे आहे. आणि हो निसर्गरम्य परिसरात वसलेले संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ जेथुन दरवर्षी हजारो विद्यार्थी विविध शाखांमधुन विद्याविभूषित होतात ! अशा माता अंबेचे आशीष लाभलेल्या अमरावतीचे दर्शन कसे वाटले हे मात्र या पर्यटक लेखक सखीस अवश्य कळवा !

संकलन -तृप्ती अशोक काळे,नागपुर

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate