অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हिंगोली जिल्हा

हिंगोली हा जिल्हा राज्यातील अगदी अलीकडच्या काळात म्हणजे १९९९ साली अस्तित्त्वात आलेला हा जिल्हा असून, संत ज्ञानेश्वरांच्या समकालीन असलेल्या “पहिल्या ज्ञानेश्वर चरित्रकाराचा” म्हणजे संत नामदेवांचा हा जिल्हा प्रत्येक मराठी माणसाला वंदनीय आहे. औंढा नागनाथाचे ज्योतिर्लिंग मंदिर हे या जिल्ह्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

हिंगोली जिल्ह्याचा इतिहास

भारताच्या स्वातंत्र्यानंतरही हिंगोली जिल्ह्याचा भाग हा हैद्राबादच्या निजामाच्या ताब्यात होता. मराठवाड्यातील हैद्राबात मुक्तिसंग्रामात हिंगोली, बामणी इत्यादी गावे आघाडीवर होती. महाराष्ट्र राज्याच्या आग्नेय भागात मराठवाड्यात वसलेला हा या विभागातील आठवा जिल्हा ठरला. इतिहासात हिंगोलीचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. हे शहर स्वातंत्र्याआधी निजामाच्या अधिपत्याखाली होते. विदर्भाच्या सीमेवरील ठिकाण असल्यामुळे, निजामाचा महत्त्वाचा लष्करी तळ या जिल्ह्यात होता. त्या काळात सैन्यदलाला व पशुंना वैद्यकीय सेवा ह्या हिंगोलीतून कार्यरत होत्या. हिंगोलीने दोन मोठी युद्धे अनुभवली आहेत, पहिले १८०३ साली टिपू सुलतान व मराठा यांच्यातील युद्ध तर दुसरे १८५७ साली नागपूरकर व भोसले यांच्यातील युद्ध होय.

लष्करी ठाणे असल्यामुळे, हैद्राबाद राज्यातील हिंगोली हा भाग महत्त्वपूर्ण घटक मानला जात असे. स्वातंत्र्योत्तर काळात हा जिल्हा मुंबई प्रांताच्या अधिपत्याखाली आला. त्यानंतर १९६० मध्ये हा भाग परभणी जिल्ह्यात समाविष्ट होतो.तर ३९ वर्षांनंतर म्हनजे १ मे,१९९९ मध्ये हा स्वतंत्र जिल्हा बनविण्यात आला.

भौगोलिक माहिती

महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. भारताच्या पश्चिम-मध्य भागात असलेल्या महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची किनारपट्टी आहे. देशातील सर्वांत मोठे शहर, मुंबई हे महाराष्ट्राच्या राजधानीचे शहर आहे. तर नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या महाराष्ट्र भारताचे महत्वाचे राज्य आहे.
महाराष्ट्र राज्य हे भारतीय उपखंडाच्या साधारण पश्चिम-मध्य दिशेला स्थित आहे. महाराष्ट्राची जमीन प्राकृतिकदृष्ट्या एकसारखी आहे. महाराष्ट्रातील खूप मोठे क्षेत्र पठारी भागात मोडते. डेक्कन वा दख्खन असे या पठारांना संबोधले जाते. दख्खनचा पठारी प्रदेश विविध नद्यांनी व्यापलेला आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेस व अरबी समुद्राला समांतर अशा सह्याद्री पर्वतरांगा (किंवा पश्चिम घाट) आहेत ज्यांची उंची सुमारे २१३४ मी. (अंदाजे ७,००० फूट) आहे. या पर्वतरांगांमधून गोदावरी, नर्मदा आणि कृष्णेसह इतरही अनेक नद्या उगम पावतात. अरबी समुद्राच्या व सह्याद्री पर्वतरांगाच्या मध्ये असलेल्या भागास कोकण म्हणतात. कोकण भागाची रुंदी ५०-८० कि.मी आहे. राज्याच्या उत्तरेस सातपुडा तर पूर्वेस भामरागड-चिरोळी-गायखुरी पर्वतरांगा आहेत. राज्यात मौसमी पाऊस पडतो. महाराष्ट्रातील काळी बेसाल्ट मृदा कापसाच्या लागवडीसाठी उपयुक्त आहे.
महाराष्ट्र राज्य ३५ जिल्ह्यांत विभागले गेले आहे. या जिल्ह्यांचे ६ समूह अथवा महसुली विभाग आहेत. पुणे , नाशिक , औरंगाबाद , कोकण , नागपूर व अमरावती हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत राजस्व विभाग आहेत.
भौगोलिक, ऐतिहासिक व राजकीय-मतांनुसार महाराष्ट्रात पाच मुख्य विभाग आहेत. देश किंवा पश्चिम महाराष्ट्र विभाग (पुणे विभाग), उत्तर महाराष्ट्र विभाग (नाशिक विभाग), मराठवाडा (औरंगाबाद विभाग), विदर्भ किंवा बेरार (नागपूर आणि अमरावती विभाग) , आणि कोकण (कोकण विभाग).

दळणवळण सोयी


नांदेड-अकोला, परभणी-यवतमाळ व जिंतूर-नांदेड हे महत्त्वाचे राज्यमार्ग (रस्ते)हिंगोली जिल्ह्यातनं जात असून जिल्ह्याच्या मध्यभागातून अकोला-पूर्णा हा लोहमार्ग जातो.

उद्योगव्यवसाय

हिंगोली जिल्ह्यात व कळमनुरी येथे सहकारी तत्त्वावरील औद्योगिक वसाहती आहेत. हिंगोली येथे इंदिरा सहकारी साखर करखाना, वसमत तालुक्यात पूर्णा सहकारी साखर करखाना, कळमनुरी तालुक्यात डोंगरकडा येथील साखर कारखाना तसेच औंढा नागनाथ तालुक्यातील बाराशिव हनुमान सहकारी साखर कारखाना असे मिळून ४ साखर कारखाने आहेत.

हिंगोली जिल्ह्यात अनेक छोटे उद्योग असून त्यातील काही महत्त्वाचे :

हिंगोली येथील मेंढीच्या लोकरीपासून घोंगड्या विणण्याचा उद्योग, कातडी कमावून त्यापासून वस्तू तयार करण्याचा उद्योग व त्यासाठीचे प्रशिक्षण केंद्र, सिंचनासाठी लागणार्‍या नळ्यांचा (पाईप्सचा) कारखाना, कळमनुरी येथील हातमाग उद्योग, वसमत तालुक्यातील रेशीम किडे जोपासण्याचा उद्योग, प्लायवूड तयार करण्याचा उद्योग, औंढा-नागनाथ येथील जिनिंग-प्रेसिंग व्यवसाय चालतात. त्याचप्रममाणे गूळ तयार करणे, पशु व कुक्कुटपालन या सारखे अनेक शेतीप्रधान व्यवसायही जिल्ह्यात सुरु आहेत.

लोकजीवन

हिंगोली हा कृषिप्रधान जिल्हा असून येथे शेतकरी मोठ्या संख्येने राहतात. या जिल्ह्यात मराठी, हिंदीसह उर्दू भाषाही काही प्रमाणात बोलली जाते.

शैक्षणिकदृष्ट्या हिंगोली जिल्हा हा नांदेड येथील स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठास संलग्न अशा या जिल्ह्यात एकूण २० महाविद्यालये, १३० माध्यमिक विद्यालये व ८५० प्राथमिक विद्यालये आहेत. महाराष्ट्रातील लोककलांपैकी पोतराज, कलगीतुरा, गोंधळ या कला या जिल्ह्यात जोपासल्या गेल्या आहेत.

शेतीव्यवसाय

ज्वारी हे हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख अन्नधान्य पीक असून, ते खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात घेतले जाते. जिल्ह्यात वसमत तालुका हा ज्वारी उत्पादनात अग्रेसर आहे. कापूस हे नगदी आणि जिल्ह्यातील दुसरे महत्त्वाचे पीक असून कळमनुरी, हिंगोली, वसमत व सेनगाव या तालुक्यांत कापूस मोठ्या प्रमाणावर पिकवला जातो. केळी, द्राक्षे, मिरची व लसूण ही पिकेसुद्धा हिंगोलीत काही प्रमाणात घेतली जातात, तसंच जिल्ह्यात ऊसाची लागवड ही वाढत आहे. वसमत व कळमनुरी तालुक्यात सिंचनाची सोय असल्याने या तालुक्यांमध्ये हे पीक अधिक प्रमाणात घेतले जाते.हिंगोलीतील मोठे क्षेत्र डोंगराळ असून या भागातील जमीन मध्यम व हलक्या प्रतीची आहे. नदीखोर्‍यातील जमीन मात्र कसदार आहे.

जिल्ह्यातील काही भागातील जमीन ओलावा टिकवून ठेवणारी आहे. त्यामुळे रब्बी हंगामात ही जमीन (मृदा) उपयुक्त ठरते.जिल्ह्यातील विहिरींची मोठी संख्या व येलदरी आणि सिद्धेश्वर ह्या धरणांमुळे हिंगोली या शेतीप्रधान जिल्ह्याची सिंचनाची गरज काही प्रमाणात भागते.

पर्यटनस्थळे

भारतातील प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी आठवे औंढा- नागनाथ हिंगोली जिल्ह्यात आहे. येथे हेमाडपंती मंदिर असून ते द्वादशकोनी व शिल्पसमृद्ध आहे. धर्मराजाने हे मंदिर महाभारतकाळात बांधल्याचं एका आख्यायिकेत म्हटलं आहे.

३०० वर्षांपूर्वीचे मल्लीनाथ दिगंबर जैन मंदिर जिल्ह्यात शिरड-शहापूर येथे आहे. तर नरसी येथील नृसिंहाचे मंदिर प्रसिद्ध आहे. नरसी हेच संत नामदेवांचे जन्मगाव असल्याचे मानले जाते. तर जवळच बामणी येथील अन्नपूर्णा व सरस्वती देवीची देऊळंही प्रेक्षणीय आहेत.

नामवंत व्यक्तीमत्वे

हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी हे संत नामदेव महाराजांचे मूळ गाव असून बालपणापासूनच पंढरीच्या विठ्ठलाच्या भक्तीची गोडी लागलेल्या संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून औंढा-नागनाथास जाऊन विठोबा खेचरांकडून गुरूपदेश घेतला. संत नामदेवांचे गुरू विठोबा खेचर यांचेही वास्तव्य या जिल्ह्यात होते.

माहिती संकलक : अतुल पगार
स्त्रोत : http://www.marathisrushti.com/cityarticle/marathi/138/FIDS-138/14/Hingoli

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate