অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अभयारण्‍य पर्यटनातून आर्थिक सक्षमता

अभयारण्‍य पर्यटनातून आर्थिक सक्षमता

महाराष्‍ट्र राज्‍यातील बहुसंख्‍य आदिवासी ठाणे, नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, पुणे, नांदेड, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्‍ह्यातील आदिवासी हे वनक्षेत्राभेवती अथवा जवळपास राहतात. राज्‍याच्‍या भौगोलिक क्षेत्राच्‍या सुमारे 21 टक्‍के भाग म्‍हणजे 63 हजार 867 चौ.कि.मी. वनक्षेत्राने व्‍याप्‍त आहे.यापैकी 49 टक्‍के क्षेत्र म्‍हणजे 31 हजार 277 चौ.कि.मी. क्षेत्र आदिवासी उपयोजना क्षेत्रात येते. त्‍यामुळे आदिवासींच्‍या आर्थिक आणि सामाजिक विकासात वनविषयक कामे महत्‍त्‍वाची भूमिका बजावू शकतात, हे लक्षात घेऊन राज्‍य शासन वनविषयक योजना राबवित आहे.

नाशिक विभागांतर्गत वनपरिक्षेत्र वन्‍यजीव भंडारदरा येते. महाराष्‍ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसुबाई ते हरिश्‍चंद्रगडापर्यंत पसरलेला निसर्गरम्‍य, विलोभनीय, हिरव्‍यागर्द वनराईचा, गिरी शिखरांनी वेढलेल्‍या, प्रवरा, मुळा ह्या नद्यांचे उगमस्‍थान असलेला जंगलपट्टा म्‍हणजेच‘ कळसूबाई हरिश्‍चंद्रगड वन्‍यजीव अभयारण्‍य’ होय.

या निसर्गरम्‍य वनराईने व गिरीशिखरांनी वेढलेल्‍या सुंदर प्रदेशाचे संरक्षण व संवर्धन चांगल्‍या रितीने व्‍हावे यासाठी महाराष्‍ट्र शासनाने वन्‍यजीव (संरक्षण) अधिनियमानुसार हा परिसर अभयारण्‍य म्‍हणून घोषित केलेला आहे. या निसर्गरम्‍य परिसराचा आनंद घेण्‍यासाठी दरवर्षी शेकडो पर्यटक येत असतात. 2013-14 या वर्षामध्‍ये 14 हजार 436 पर्यटकांनी भेट दिली होती. 2014-15 या वर्षामध्‍ये 22 हजार 377 तर 2015-16 या वर्षामध्‍ये आक्‍टोबर अखेर 24 हजार 430 पर्यटकांनी भेट दिली होती.

भंडारदरा वनपरिक्षेत्रात पेंडशेत, पांजरे, उडदावणे, घाटघर, साम्रद, रतनवाडी व कोलटेंभे या सात गांवामध्‍ये ग्रामपरिस्थितीकी विकास समित्‍यांची स्‍थापना करण्‍यात आली आहे. या समित्‍यांद्वारे लोकसहभागाने वने आणि वन्‍यजीवांचे संरक्षण करण्‍यात येत आहे. तसेच स्‍थानिकांना पर्यटनातून मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत असल्‍याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी पी.टी. पाटील यांनी दिली.

घाटघर

भंडारदरा गावापासून 22 कि.मी. अंतरावर घाटघर येथे ‘इको सिटी’ हे निसर्गरम्‍य ठिकाणी नव्‍याने वसवलेले असून कोकणकडा, घाटनदेवी, उंबरदरा व्‍ह्यु पॉईंट, अलंग, मलंग, कुलंग गडाकडे जाणाऱ्‍या निसर्ग पायवाटा, इको सिटी सनसेट पॉईंट ही प्रेक्षणीय स्‍थळे इको सिटी लगत आहेत. पर्यटकांसाठी 10 पर्यटक निवासगृह उभारण्‍यात आले असून एकूण 30 पर्यटकांची राहण्‍याची उत्तम व्‍यवस्‍था आदिवासी विकास विभाग, जिल्‍हा वार्षिक नियोजन समिती, राज्‍य निसर्ग पर्यटन योजना (इको-टुरिझम) यातून करण्‍यात आलेली आहे. या उपक्रमातून मिळणारे उत्‍पन्‍न हे ग्रामपरिस्थितीकी विकास समिती, घाटघर यांच्‍या बचत खात्‍यात जमा करण्‍यात येते.

निसर्ग पर्यटन विकास कामामुळे घाटघर ग्रामपरिस्थितीकी विकास समितीला एप्रिल 2015 ते ऑक्‍टोबर 2015 या कालावधीत पुढीलप्रमाणे उत्‍पन्‍न व रोजगार प्राप्‍त झालेला आहे. घाटघर इकोसिटी पासून समितीला 5 लाख रुपये ठोक उत्‍पन्‍न प्राप्‍त झाले. कुटुंबांनी पर्यटकांना जेवण, नास्‍ता व चहा पुरविले त्‍यातून 9 लाख रुपये मिळाले. 10 गाईड यांनी पर्यटकांना मार्गदर्शन केल्‍याने 4 लाख रुपये उत्‍पन्‍न मिळाले. आदिवासी नृत्‍यकला सादरीकरणापासून 1 लाख 50 हजार रुपये, आदिवासी महिलांना शिवण कामापासून 15 हजार रुपये, स्‍पोर्ट अॅडव्‍हेंचर (रॅपलिंक व ट्रेकिंग) यातून 2 लाख रुपये तर चहा नास्‍ता, थंडपेय, लिंबू सरबत इ. लहान स्‍टॉल लावणे यातून 3 लाख 50 हजार रुपये प्राप्‍त झाले. टेंट व घरगुतीमुक्‍कामाची व्‍यवस्‍था केल्‍याने 2 लाख 25 हजार असे एकूण 27 लाख 40 हजार रुपये उत्‍पन्‍न प्राप्‍त झाले.

साम्रद

साम्रद येथे ज्‍वालामुखीमुळे निर्माण झालेली एक प्रचंड खोलीची दरी आहे. पर्यटक येथे वर्षभर विशेष करुन पावसाळ्यानंतर मोठ्या प्रमाणात येत असतात. गावात निसर्ग पर्यटन व आदिवासी उपयोजना प्राप्‍त निधीतून तंबू ओटे, व्‍ह्यु पॉईंट रॅलिंग तसेच शौचालय, पार्किंग व इकोशॉप इत्‍यादी पर्यटकांसाठी उपलब्‍ध करुन देण्यात आले आहेत.

गावातील जवळजवळ 15 ते 20 कुटुंबांना पर्यटनाच्‍या माध्‍यमातून रोजगार मिळत आहे. गावात एकूण 18 गाईड असून पर्यटकांना मार्गदर्शनाचे काम करतात. याशिवाय स्‍पोर्ट अॅडव्‍हेंचरच्‍या माध्‍यमातून गाईड यांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्‍ध होत आहे. गावात 6 कुटुंबे पर्यटकांची जेवणाची व मुक्कामाची व्‍यवस्‍था करतात. ग्रामपरिस्थितीकी विकास समितीमार्फत येणाऱ्‍या पर्यटकांकडून वाहन पार्कींग वसुली करण्‍यात येते. निसर्ग पर्यटन विकास कामातून साम्रद गावासाठी रोजगार उपलब्‍ध झाला आहे.

रतनवाडी

भंडारदरा पासून 15 कि.मी. अंतरावर रतनवाडी येथे 11 व्‍या शतकातील हेमाडपंथी शिवमंदीर आहे. तसेच जवळच इतिहास प्रसिद्ध रतनगड हा शिवकालीन किल्‍ला आहे. येथे मोठ्या प्रमाणात गिर्यारोहक तसेच शिवभक्‍त येतात. गावात 10 गाईड असून पर्यटकांना मार्गदर्शनाचे काम करतात. गृहपर्यटनातून रोजगार उपलब्‍ध झाला आहे. 10 कुटुंबे घरगुती जेवण व्‍यवस्‍था करतात. ग्रामपरिस्थितीकी विकास समितीमार्फत वाहन पार्किंग शुल्‍क वसूल केले जाते.

सध्‍या अनेक नागरिक सुट्टयांच्‍या काळात पर्यटनासाठी बाहेर पडतात. त्‍यामुळे अभयारण्‍य क्षेत्रातही पर्यटकांची दिवसेंदिवस संख्‍या वाढत आहे. पर्यटनातून स्‍थानिक बेरोजगार, ग्रामस्‍थांना उत्‍पन्‍न मिळत आहे. या उत्‍पन्‍नामुळे काही प्रमाणात का होईना आर्थिक सक्षमता प्राप्‍त होत आहे.

 

लेखक - राजेंद्र सरग,
जिल्‍हा माहिती अधिकारी, अहमदनगर

स्त्रोत : महान्युज© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate