অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य

यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात कृष्णा नदीच्या खोऱ्यात सागरोबा डोंगरावर यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य वसले आहे. १९८५ मध्ये या वनक्षेत्राला अभयारण्याचा दर्जा मिळाला. महाराष्ट्रातील लहान अभयारण्यापैकी एक असलेल्या सागरेश्वर वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्रफळ १०.८७ चौ.कि.मी इतके आहे. हे मानवनिर्मित अभयारण्य आहे. धो.म. मोहिते या वृक्ष आणि वन्यजीव प्रेमीच्या ध्यासातून साकारलेलं आणि लोकसहभागातून आकाराला आलेले हे अभयारण्य त्यामुळेच वेगळं आहे. लोकांनी ठरवलं तर शासनासोबत राहून किती उत्तम काम करता येऊ शकतं याचं सुंदर उदाहरण म्हणजे सागरेश्वर अभयारण्य. भरपूर पाऊस, धुक्याची दाटी, गार वारा आणि हिरवागार परिसर मनाला प्रसन्न करून टाकतो. विविध पक्षांचा कुंजारव, डोंगरमाथ्यावरून कोसळणारे छोटे मोठे धबधबे आणि चिंब भिजण्यासाठी आतुरलेली माणसं... मनातल्या ओढीला तृप्तीचा समृद्ध अनुभव देणाऱ्या या अभयारण्यात सागरेश्वर महादेवाचं मंदिर आहे. येथे प्राचीन मंदिराचा समूह आहे. एकूण 47 मंदिरे व 13 ओवऱ्या आहेत. आंघोळीचे आणि पिण्याचे कुंड वेगवेगळे आहेत. या कुंडात वर्षभर पाणी असतं ते केव्हाच आटत नाही.

प्रवेश

सागरेश्वर मंदिरापासून पुढे एक - दीडकिलोमीटरचा यशवंत घाट ओलांडल्या‍नंतर सागरेश्वर अभयारण्याची सीमा सुरू होते. सागरेश्वर अभयारण्य हे कडेगाव, वाळवा व पलूस या तालुक्यांच्या सीमा जोडणाऱ्‍या सह्याद्रीच्या सागरेश्वर पर्वताच्या माथ्यावर आहे. देवराष्ट्र गावात पोचल्यानंतर डाव्या हाताला अभयारण्याचे प्रवेशद्वार लागते. तेथे शुल्क आकारून आत प्रवेश दिला जातो.

जैवविविधता

सागरेश्वर अभयारण्याच्या परिसरात विपुल वनसंपदा आहे. तेथे उष्ण-कोरड्या हवामानातील पानझडी, काटेरी वनस्पती जास्त प्रमाणात आढळतात. धावडा, चंदन, बाभूळ, सुबाभूळ, कशिद, गुलमोहर, अंजन, निलगिरी, आपटा, सीताफळ तसेच धायटी, घाणेरी आदी वृक्ष आणि झुडपे यासोबत अभयारण्यात करवंद, बोर या रानमेव्याच्या जाळी जागोजागी आहेत. वृक्षसंपदेत साग, वड, पिंपळ, लिंब, चेरी, औंदुबर सारख्या अनेक वनौषधी आहेत. सांबर, चितळ, काळवीट, ससा, खार, साळींदर, हनुमान लंगूर, खोकड, कोल्हा, लांडगा, तरस असे वन्यजीव आपण इथे पाहू शकतो. हे पक्षांचं नंदनवन आहे. पक्षी निरीक्षणाची हौस असलेल्यांसाठी हे एक उत्तम स्थळ आहे. शुष्क गवताळ झुडपी टेकड्यांचा अधिवास असलेल्या या छोटेखानी अभयारण्यात १४२ प्रजातींच्या पक्षांची नोंद करण्यात आली आहे. कोतवाल, हळद्या, साळुंखी, मैना, सुगरण, चष्मेवाला, मुनिया, सुर्यपक्षी, नाचण, सातभाई, राखी वटवट्या, दयाळ, सुभग, बुलबूल, भिंगरी, चंडोल, सुतारपक्षी, तांबट, राखी धनेश, वेडा राघू निलपंख, रातवा, पिंगळा, गव्हाणी घुबड, भारद्वाज, पावश्या, पोपट, कोकिळ, हरियाल, मोर, गाय बगळा अशा विविध रंगी पक्ष्यांचं मनोहारी दर्शन आपल्याला खूप आनंद देऊन जातं. भारतात आढळणारे सर्वात लहान फुलपाखरू ग्रास ज्यूवेल या अभयारण्यात निवांत विहार करतं. जगात स्थलांतरासाठी प्रसिद्ध असलेलं पेंटेड लेडी हे फुलपाखरू आपल्याला येथे भेटून जातं. हे अभयारण्य विविध प्रकारचे साप, बेडूक, पाली, सरडे, यांचा हक्काचा निवारा आहे.

वन्य प्राण्यांपासून होणारे शेतीचे नुकसान टाळण्यासाठी अभयारण्याभोवती तारेचे कुंपण लावण्यात आले आहे तर वन्यजीवांसाठी ठिकठिकाणी पाणवठे निर्माण करण्यात आले आहेत. पर्यटकांच्या सोयीसाठी बांबू हट, निसर्ग माहिती केंद्र, ओपन ॲम्पी थिएटर, लहान मुलांसाठी बगीचा, खेळणीचीही येथे व्यवस्था आहे. वन्यजीव आणि पशु-पक्ष्यांची माहिती देणारे फलक आपलं लक्ष वेधून घेतात.

यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्यात वन्यप्राण्यांना एक सुंदर अधिवास मिळाला आहे. बारमाही पाण्याची व्यवस्था अभयारण्यातच झाल्याने वन्यप्राण्यांचा पाण्यासाठी बाहेर वावर होतांना आढळत नाही.

बघण्यासारखे

अभयारण्यातील किर्लोस्कर पॉइंटवरून नजर फिरवली तर वाळवा, पलूस, खानापूर आणि कडेगाव तालुक्यातील विहंगम परिसर दिसतो. खालून नागमोडी वळणे घेत वाहणारी कृष्णा नदी दिसते. त्‍या पॉईंटजवळ एक गुहा आहे. काही अंतर पुढे गेल्यानंतर अभयारण्याच्या मध्यभागी काळभैरवाचे मंदिर लागते. डोंगरपायथ्याशी असलेल्या ताकारी गावाचे ते ग्रामदैवत आहे. त्यापुढे लागणारा रणशूळ पॉईंट हे अभयारण्यातील सर्वांत उंच ठिकाण आहे. सागरेश्वर अभयारण्य मिरज रेल्वे स्थानकापासून साठ किलोमीटर, कराडपासून तीस किलोमीटर तर ताकारी रेल्वे स्थानकापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. कराड हे पुणे - बंगळुरू महामार्गावर असून तेथून सागरेश्वर येथे पोहोचण्यासाठी बस सेवा उपलब्ध आहे. अभयारण्याला भेट देण्यासाठी पावसाळा उत्तम कालावधी आहे. वर्षा सहलीचा आनंद लुटायचा असेल तर हे अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे. खरी गरज आहे घराबाहेर पडण्याची

लेखक- डॉ. सुरेखा म. मुळे

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 4/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate