ऊंच ऊंच पर्वत रांगा, खळाळत वाहणाऱ्या वारणा-कोयना सारख्या नद्या आणि हिरवीगार वनराई यामुळं पश्चिम घाटाचं क्षेत्र हे नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण राहिले आहे. नैसर्गिक जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेले हे क्षेत्र आहे. येथे सुंदर अशा विविध फुलांनी नटलेले कास पठार आहे, कोयना- राधानगरी अभयारण्य आणि चांदोली राष्ट्रीय उद्यानाचा हा परिसर जैवविविधतेच्यादृष्टीने समृद्ध तर आहेच पण पर्यावरणाच्यादृष्टीने अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.
जंगलात वाघ असणं हे समृद्ध जंगलाचं प्रतिक आहे. जंगलात असलेल्या अन्नसाखळीमधील वाघ हा मुख्य घटक आहे. तसेच वाघांमुळे जंगलात असलेल्या वनस्पतींचे आणि इतर तृणभक्षी प्राण्यांचे समतोल साधण्याचे काम ही केले जाते. वाघांची संख्या ज्या जंगलात जास्त असते तिथे जंगल हे सर्वदृष्टीने परिपूर्ण मानले जाते. जंगल चांगले असल्याचा लाभ माणसास देखील मिळतो, पर्यावरण संतुलन राखण्याबरोबरच माणसाला आवश्यक असलेला निरोगी श्वासही त्यातूनच मिळतो.
जैवविविधतेच्या बाबतीत संपन्न असलेले हे क्षेत्र निम सदा हरित जंगल असून दुर्गम, अति उतार असलेले, डोंगराळ आणि घनदाट स्वरूपाचे हे जंगल आहे. या भागात सांबर, रानडुक्कर, लंगूर यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. पश्चिम घाटातील वनस्पती संपदा पाहिली तर थक्क व्हायला होते. जवळपास साडेचार हजार प्रजातीच्या वनस्पती येथे असल्याचा अंदाज आहे. यात स्थानिक, दुर्मिळ वृक्ष प्रजातींचा समावेश आहे.
ऑर्किड फुलाच्या २४५ प्रजाती येथे आढळतात. रानतेरडा वनस्पतीच्या ७२ तर कंदी फुलांच्या ४६ प्रजाती आढळतात. कारवी च्या १८ प्रजाती आढळतात. सस्तन प्राणी, स्थानिक आणि स्थालांतरीत होऊन येणारे पक्षी, सरपटणारे प्राणी, उभयचर प्राणी अशा किती तरी पशु-पक्षी आणि प्राण्यांनी हा प्रदेश संपन्न आहे. वन पर्यटकांना मनसोक्त आनंद देणारे आणि वन्यजीव अभ्यासकांचे औत्सुक्य अजून वाढवणारे हे क्षेत्र गडकिल्ल्यांच्या पर्यटनासाठी ही आकर्षणाचे ठिकाण आहे.
२०१० मध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि कोयना वन्यजीव अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात महत्वपूर्ण पाणलोट क्षेत्र आहेत. अनेक झरे तसेच वारणा आणि कोयना नद्या ही येथूनच उगम पावतात. वारणा आणि कोयना नद्यांवर धरणाची निर्मिती करण्यात आली असून कोयनेच्या पाण्यावर महत्वाचा जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित आहे.
पश्चिम –दक्षिण महाराष्ट्रातील शेती या पाण्यावर अवलंबून आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा परिसर निम सदाहरित वृक्षराजीने नटलेला आहे. येथे वाघांचे अस्तित्त्व आहे. हा परिसर वाघांच्या अस्तित्त्वासाठी अत्यंत सुरक्षित मानला जातो. असं असलं तरी ऊंचसखल डोंगर रांगाचा हा प्रदेश असल्याने येथे व्याघ्र दर्शन दुर्मिळ आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प विदर्भाबाहेरील पहिलाच व्याघ्र प्रकल्प आहे.
चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे ३१७.६७० चौ.कि.मी आणि कोयना वन्यजीव अभयारण्याचे ४२३.५५० चौ.कि.मी असे मिळून हे क्षेत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले आहे. येथे वाघाबरोबरच गवा, चितळ, सांबर, हरीण, बिबटे असे प्राणीही पाहायला मिळतात. सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सह्याद्रीच्या डोंगर रांगात कपारींमध्ये अनेक दुर्मिळ वनस्पती, प्राणी सापडत आहेत. त्याची जागतिक पातळीवर नोंद ही आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकलपामुळे पर्यटनाला चालना मिळून स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
विमान : पुणे २१० कि.मी
रेल्वे: मिरज जंक्शन ११० कि.मी. कोल्हापूर ८० कि.मी, कराड ६० कि.मी
रस्ता : कोयना नगर: कोल्हापूर- १३० कि.मी. कराड- ५६ कि.मी, सातारा ९० कि.मी
बामणोली/तापोळा: सातारा- ४० कि.मी, सातारा- महाबळेश्वर-तापोळा- ९० कि.मी
चांदोली : मुंबई ३८० कि.मी, कोल्हापूर ८० कि.मी, कराड- ६० कि.मी
लेखिका: डॉ. सुरेखा मधुकरराव मुळे
संदर्भ : वन विभाग
माहिती स्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 7/22/2020
सिंचनाच्या स्वाभाविक मर्यादा विचारात घेऊनही कृषी उ...
आगळीवेगळी खानावळ हरसूलजवळील खोरीपाडाच्या ग्रामस्था...
मोठी गुंतवणूक करून एखादा कृषी प्रक्रिया उद्योग उभा...
केंद्र शासनाच्या शेती व शेतकरी कल्याण विभागाने ही ...