অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रायगड जिल्हा जलदुर्ग

रायगड जिल्हा जलदुर्ग

रायगड जिल्ह्याची भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली भूमी. एकीकडे दऱ्या-खोऱ्यांचा... डोंगरांचा... वळणावळणाचा... घाटांचा भाग तर दुसरीकडे 240 कि.मी. लांबीचा अथांग अरबी समुद्र. अशी भौगोलिक रचना. ऐतिहासिक असे महत्व. मुंबई या राज्याच्या राजधानीला लगत असलेला जिल्हा. याखेरीज पर्यटकांचाही आवडता आणि मैदानी खेळ कबड्डीचा चाहता, अशी काहीशी या जिल्ह्याची ओळख. छत्रपती शिवरायांची राजधानी असलेला रायगड हा गगनाला गवसणी घालणारा गडदुर्ग तर अलिबाग आणि मुरूडच्या दर्यासारंगात आपले अधिराज्य गाजविणारा अलिबागचा कुलाबा आणि मुरूडचा अजिंक्य असलेला जंजिरा हे जलदुर्ग. त्यामुळे पर्यटनाला भरपूर वाव.

चला तर मग पाहुयात अलिबाग मुरूडमधील हे दोन जलदुर्ग...कुलाबा किल्ला खुद्द अलिबागच्या समुद्रातील खडकावर कुलाबा व सर्जेकोट ही दुर्गद्वयी उभी आहे. हे दोन्ही किल्ले मिश्रदुर्ग या प्रकारातील. भरतीच्यावेळी कुलाबा हा किल्ला चारही बाजूने पाण्याने वेढला जातो व जलदुर्ग बनतो; तर ओहोटीच्या वेळी चक्क किल्ल्यापर्यंतची जमीन उघडी पडते व किल्ला भुईकोट बनतो. असा हा निसर्गाचा आगळावेगळा चमत्कार पहावयास मिळतो. हा किल्ला समुद्रातील ज्या खडकावर उभा आहे, त्याची दक्षिणोत्तर लांबी 267 मीटर तर पूर्व पश्चिम रुंदी 109 मीटर अशी आहे.छत्रपती शिवरायांनी समुद्राचे आणि आरमाराचे महत्व जाणून त्याठिकाणी मोक्याच्या बेटावर किल्ले बांधले, जुने किल्ले दुरूस्त केले.

19 मार्च 1680 रोजी महाराजांनी किल्ला बांधायला सुरुवात केली. त्यांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याचे बांधकाम जून 1681 मध्ये पूर्ण केले. त्यानंतर हा किल्ला म्हणजे छत्रपतींच्या आरमारी डावपेचांचा केंद्रबिंदू. सरखेल कान्होजी आंग्रे यांची कारकीर्द येथेच गाजली. 4 जुलै 1729 रोजी कान्होजी आंग्रे ह्यांचे कुलाबा किल्ल्यावर निधन झाले. 1770 मध्ये पिंजरा बुरुजापाशी लागलेल्या भयंकर आगीत किल्ल्यावरील अनेक बांधकामे जळून नष्ट झाली. 1787 मध्ये लागलेल्या दुसऱ्या आगीत आंग्य्राचा वाडा नष्ट झाला.

29 नोव्हेंबर 1721 रोजी ब्रिटीश व पोर्तुगीजांच्या संयुक्त सैन्याने किल्ल्यावर सहा हजार सैनिक व सहा युद्धनौका घेऊन हल्ला केला, पण त्यांचा त्यात सपशेल पराभव झाला.या किल्ल्याचे प्रवेशद्वार किनाऱ्याच्या बाजूस पण ईशान्येकडे वळवलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्ग स्थापत्यात केलेल्या अनेक प्रयोगांपैकी असलेला एक प्रयोग याठिकाणी पहावयास मिळतो तो म्हणजे, हा दुर्ग बांधताना दगडाचे मोठ-मोठे चिरे एकमेकांवर नुसते रचले. मात्र दोन दगडांमधील फटीत चुना भरला नाही. त्यामुळे समुद्राची लाट किल्ल्याच्या तटभिंतींवर आदळल्यावर पाणी दगडांमधील फटीत घुसते व लाटेच्या तडाख्याचा जोर कमी होतो.किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर मोर, हत्ती, हरण, कमळ, शरभ अशी शिल्पे कोरलेली आहेत. दुर्गाचा दुसरा दरवाजा अवशेष रुपात शिल्लक आहे.

किल्ल्यावर चार टोकांना चार, पश्चिमेला पाच, पूर्वेला चार, उत्तरेला तीन व दक्षिणेला एक असे 17 बुरुज आहेत. या बुरुजांना पिंजरा, नगारखानी, गणेश, सूर्य, हनुमंत, तोफखानी, दारुखानी अशी नावे आहेत.प्रवेशद्वारातून आत गेल्यावर डाव्या बाजूच्या मार्गाने पुढे जाताना भवानी मातेचे मंदीर लागते. त्यासमोरच पद्मावती देवीचे छोटे व गुलवती देवीचेही मोठे मंदिर आहे. तेथून पुढे गेल्यावर डाव्या बाजूस वाडे, पागा, कोठी यांचे अवशेष दिसतात. डावीकडची वाट हजरत हाजी कमाल उद्दिनशहा दरबार ह्यांच्या दर्ग्याकडे जाते. तसेच परतीच्या वाटेवर डावीकडे आंग्य्रांच्या वाड्याचे अवशेष दिसतात. या किल्ल्यावर अजूनही लोकांचा राबता असलेले सिद्धीविनायकाचे मंदीर आहे. गणेशमूर्ती संगमरवरी असून तिची उंची दीडफूट आहे. 1759 साली राघोजी आंग्रे ह्यांनी सिद्धीविनायकाचे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो. मंदिराच्या प्रांगणात उंचवट्यावर उत्तरेस मारुतीचे व दक्षिणेस शंकराचे मंदिर आहे.मंदिरासमोर चिरेबंदी बांधणीची गोड्या पाण्याची पुष्कर्णी आहे.

पुष्कर्णीच्या पुढे तटापलिकडच्या दरवाजातून बाहेर गेल्यावर स्वच्छ पाण्याची विहीर असून आत उतरण्यास पायऱ्या आहेत. दुर्गाच्या दक्षिण टोकाला असणाऱ्या दरवाजाला धाकटा दरवाजा, यशवंत दरवाजा, दर्या दरवाजा असेही म्हणतात. या दरवाजावर गणपती, गरुड, मारुती, मगर, कमळ, वेलबुट्टी यांची नक्षी कोरलेली आहेत. किल्ल्याच्या दरवाजालगत कान्होजींची घुमटी व द्वाररक्षक देवतेचा शेंदूर फासलेला दगड आहे.

किल्ल्याच्या तटात गोदीचे अवशेष आहेत. तेथे नवीन जहाजे बांधली जात व जुनी दुरुस्त केली जात असत. किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. किल्ल्याच्या उत्तरेला चाके असलेल्या दोन तोफा आहेत. तोफांच्या चाकांजवळ तोफा बनवणाऱ्या कंपनीचे नाव कोरलेले आहे, डाऊसन हार्डी फिल्ड, डाऊ मूट आर्यन वर्क्स, यॉर्कशायर, इंग्लंड. वर्ष 1849 असे आहे.अलिबागपासून अंदाजे 60 कि.मी. अंतरावर मुरूड हे गाव असून त्याबाजूस जंजिरा याठिकाणी अजिंक्य असा जंजिरा मोठ्या दिमाखात उभा आहे. याच जंजिऱ्याच्या सिद्दीची राजधानी म्हणून मुरुडची ओळख. प्राचीन अशा या किल्ल्यासोबतच किनाऱ्यावरील नारळी-पोफळीची झाडे परिसराच्या सौंदर्यात भर घालतात. समुद्र लाटांचा सामना करीत मजबुतीने उभी असणारी 40 फूट उंचीची किल्ल्याची तटबंदी खास आकर्षण आहे.

किल्ल्यातील गोड्या पाण्याचे तलाव, मजबूत बुरूज, तोफा पाहता येतात. हा मुरुड-जंजिरा किल्ला समुद्र किनारपट्टीवर एका ओव्हल आकारातील खडकावर वसलेला आहे.जझिरे मेहरुब-जंजिरामुरूडजवळील या बेटाचं महत्व ओळखून कोकणातल्या कोळ्यांनी येथे एक मेढेकोट म्हणजे लष्करी ठाणे उभारले. याच्यावर लढून ताबा मिळविणे अवघड आहे हे ध्यानात घेऊन निजामशाही सरदार पिरमखान याने कोळ्यांच्या राजाशी मैत्रीचं नाटक केले आणि दगाबाजीने हे ठाण काबीज केले. इ.स.1567 ते 1571 या काळात येथे दणकट जलदुर्ग उभारला, त्याच अरबी नाव ठेवलं. जझिरे मेहरुब या नावावरुनच पुढे जंजिरा हे नाव प्रचलित झाले. इ.स.1617 पासून येथे सिद्धीची सत्ता सुरु झाली.

जंजिऱ्यावर ताबा मिळावा अशी छत्रपती शिवरायांची तीव्र इच्छा होती. पुढे छत्रपती संभाजी महाराजांनीही जंजिरा जिंकण्याची जिद्द बाळगली होती. त्यासाठी किनाऱ्यापासून या जलदुर्गापर्यंत दगडधोंडयांचा सेतू उभारावा आणि मग हल्ला करावा अशी विलक्षण योजना केली पण औरंगजेबाच्या स्वराज्यावरील आक्रमणामुळे हाही बेत अर्धवट सोडावा लागला. असा हा अजिंक्य जंजिरा भारत स्वतंत्र झाल्यावरच स्वतंत्र झाला.एकोणीस बुरुजांची अजस्त्र तटबंदी... मध्यभागी महाभयंकर अशा कलाल बांगडी चावरी आणि लांडा कासम या नावाच्या तीन तोफा... शिवाय शे-दिडशे लहान तोफाही येथे आहेत. गडामध्ये प्रचंड तलाव आहेत. गडाच्या दरवाजात दगडात कोरलेलं एक शिल्प आहे.

ज्यामध्ये एका वाघाने आपल्या चार पंजात, शेपटीत व तोंडात असे सहा हत्ती पकडलेले दाखवले आहे. आपल्या दराऱ्याने पश्चिम सागरावर प्रभुत्व गाजवणारा जंजिरा म्हणजे एक देखण दुर्गशिल्प आहे यात शंकाच नाही. मुख्य म्हणजे किल्ला अजूनही सुस्थितीत 21 गोळाबेरीज बुरुज आहे. बुरुजावर मूळ आणि युरोपियन मेक रुस्टींगच्या अनेक तोफांचा आहे.पर्यटकांनी या दोन्ही किल्ल्यास अवश्य भेट द्यावी आणि स्वराज्याच्या लढ्यातील या मूक साक्षीदारांना डोळे भरुन पहावे. कसे जाता येईल...साधारणत: दोन दिवसांचा दौरा सहजरित्या काढता येऊ शकतो.

मुंबईहून-पनवेल-वडखळमार्गे अलिबागला यावे. अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावरुन ओहोटीच्या वेळेस किल्ल्यात चालत जावे. अलिबाग येथे वरसोली, किहीम, मांडवा, नागाव आदी बिचवरही पर्यटकांना यादरम्यान भेट देता येऊ शकते. शिवाय मुंबई गेट वे ऑफ इंडिया येथून बोटीनेही अलिबागला जाण्याची सोय आहे. गेट वे ऑफ इंडिया येथून फेरी बोटीने केवळ एका तासात अलिबागला पोहोचता येते. तसेच जंजिरा किल्ला पाहण्यास मुरुड किंवा राजापुरी येथून शिडाच्या होडीने किल्ल्यात जावे लागते. हा किल्ला पाहून झाल्यावर पर्यटक जवळच असलेल्या नांदगाव आणि काशीदच्या शांत आणि रम्य समुद्र किनाऱ्याचा आनंद घेऊ शकतात. तसेच त्यांना नंदगावातील श्रीगणेशाच्या प्रसिद्ध मंदिरासही भेट देता येऊ शकते.

 

संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग.

संदर्भ :- ‘महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ले’- श्री. मोहन शेटे.

माहिती स्त्रोत : महान्युज

 

अंतिम सुधारित : 8/19/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate